माझी गझल मुशाफिरी......
सरणावरचे प्रेत म्हणाले
"थोडी स्वप्ने मनात उरली" ... सरणावरचे प्रेत म्हणाले
"तिरडीवरती मुकाट चढली" ... सरणावरचे प्रेत म्हणाले
रडणारेही थकले खांदे , मग देहाचे ओझे झाले
किती माणसे उगाच अडली ... सरणावरचे प्रेत म्हणाले
जन्म घ्यायचा आहे अवघड ... तितका शेवट सोपा मित्रा!
बस! आत्म्याची चिंधी उडली .... सरणावरचे प्रेत म्हणाले
तुझे बोटभर चंदन माझ्या ... आत्म्यावरही लाव जरासे
स्पर्श सुखाची माया जडली ... सरणावरचे प्रेत म्हणाले
नकोस लपवू अश्रू वेडे ... मुक्त मनाने निरोप दे ना!
किती माणसे बिलगत रडली ... सरणावरचे प्रेत म्हणाले
तिने गुंफिले हार वाहिले... कुणीतरी मग देहावरती
भेट व्हायची, अखेर घडली ... सरणावरचे प्रेत म्हणाले
सुखदुःखाचे क्षण सारे मी ... सोबत घेऊ किंवा सोडू
आठवणींची कुपी सांडली ... सरणावरचे प्रेत म्हणाले
उरातली का जाळत होती ... दुःखापेक्षा तिला काळजी
भाळावरती ठिणगी उठली ... सरणावरचे प्रेत म्हणाले
एखाद्याचे जाणे सुद्धा ... सहज पचवते दुनिया सारी
चला ! उद्याची चिंता सरली ... सरणावरचे प्रेत म्हणाले
©️✒️ *यशश्री रहाळकर*
(गझल आवडल्यास मूळ नावासह संपूर्ण फॉरवर्ड करावी ही नम्र विनंती)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!