कालसापेक्ष 🔗
♾♾♾♾♾♾♾♾
भय काय असतं? एखादी पडकी हवेली किंवा एकाट वाडा, अंधारी रात्र बहुतेक अमावस्या ... कुत्र्याचं भेसूर रडणं , वाऱ्याचा हुरहूर लावणारा आवाज .....रक्तरंजित विद्रुप चेहेरे ..... साधारण असच वर्णन असतं ना गूढकथेचं...... मग माझी कथा त्या पालिकडची आहे. नेहमीचे ढोबळ आडाखे आणि मुरलेल्या भयाच्या कल्पनांपालिकडचे काहीतरी .... मी संध्या राजे ....माझी कथा ऐकायला तुम्हाला थोडंस मागे म्हणजे माझ्या भूतकाळात डोकवावे लागेल.... काळाची मर्यादा लांघून ... तसेही आपण वर्तमानात कुठं जगतो?? आपण मनानी रमतो भूतकाळात किंवा स्वप्नरंजन करीत असतो उद्याचे ... येणाऱ्या भविष्याचे .ह्या साऱ्यात वर्तमानात उरतो तो केवळ देह... मन ??ते कुठं तरी काळाच्या अल्याड-पल्याड भिरभिरत..... घड्याळाच्या लंबकासारखं.
तर मी संध्या राजे वयानं मध्यम... प्रौढत्वाकडे झुकलेली .. परिस्थितीनं जराशी उच्च मध्यमवर्गीय सुखवस्तू ... सुटी म्हणावीत अशी मोठी दोन मुलं , मोठ्या पदावर काम करणारा आणि त्याच टारगेट ,मीटिंगच्या चक्रात आकंठ बुडालेला नवरा ... कामाची कमी नी वेळेची हमी असणारी मी .
त्या दिवशी सकाळी चहा करायचा म्हणून ओट्यापाशी उभी होते अगदी सहज खिडकी बाहेर नजर जावी तशी गेली अन तो दिसला . रस्ता ओलांडून पलीकडच्या खांबाला टेकून उभा असलेला .कपड्यांवरून तरी बऱ्या घराचा वाटला..... निश्चल शांत उभा एकाग्रतेने माझ्याच कडे पाहतोय असा भास क्षणभर झाला अन माझ्या अंगावर रसरसून काटा आला . हा माझ्याकडे पाहतोय? का पाहतोय हा माझ्याकडे?मला आठवत नसणारा कुणी ओळखीचा आहे का?
तेव्हढ्यात घराची डोअर बेल वाजली ... दूधवाला आला होता. मग त्या भय्याच्या चारा कसा महाग झालाय? वगैरे गप्पा ऐकून मी पुन्हा कामांकडे वळली. मनातून विचार मात्र जात नव्हते रस्त्या पलीकडल्या त्याचे ... मी खिडकीच बंदच करून घेतली ... डबे वगैरे भरले नवऱ्याला मुलांना वाटेला लावलं. नेहमीप्रमाणे नवऱ्याने उशीर होईल असे सांगून निरोप घेतला. आता मी संध्याकाळपर्यंत अगदी निवांत होते. अश्या वेळी मी पेपर अन जोडीला काहीतरी खायला घेऊन मस्त उन्हात टेरेसवर बसते . आजही तसेच केले .... पुन्हा नजर वळली ती रस्त्याकडे... तो अजूनही तसाच तिथेच उभा होता ... रोखून पाहत माझ्याकडे??
तो अगदी निश्चल उभा काहीही हालचाल न करता ... मात्र एव्हढ्या अंतरावरूनही जाणवावे असे तीव्र डोळे एकटक रोखून पाहत ... पापणीही न लवता. कोण आहे हा ? असा काय आहे ? ह्यांनी माझ्यावर पाळत ठेवायला ठेवलाय का कुणी?? गेल्या आठवड्यातील कडाक्याच भांडण आठवलं... अन माझ्याच विचारांचं मला हसू आलं ... यांना राग येऊच शकतो माझा पण संशय नक्कीच नाही ... उलट मलाच संशय येतोय त्यांच्या सेक्रेटरी वरून....कसल्या सुंदर, चटपटीत, हुशार ,असतात या इंग्रज मुली .हो! मी इंग्रजच म्हणते त्या जेम फर्नांडीस ला ... पेपरमध्ये लक्ष लागेल का आता ? उठून आत जायला निघाले तर हा तसाच खांबाला टेकून उभा ... काय प्रकार आहे हा ?
दार लावून आत गेले अन उगाचच हे आवर ते आवर करू लागले ... कपाट काढलं उपसून आवरायला ... हा रस्त्या पलीकडचा मंदार मोहिते तर नसेल ... कॉलेज च्या गुलाबी दिवसातले ते क्षण आठवले ... मंदार शेजारीच राहायचा . कित्ती आवडायचा तो मला त्यालाही बहुदा आवडत असावी मी ... हो बहुदाच म्हणावे लागेल . कारण तोही कधी बोलला नाही अन मीही . आता माझ्या लग्नाला 22 वर्षे झाल्यावर कशाला येईल तो ? अन आला तरी असा उभा राहील कशाला ? पुन्हा त्याच्या विचारानं नजर बाहेर अन तो तसाच उभा रोखून पाहत आरपार. आपल्यापासून अंतरावर उभ्या असणाऱ्या काहीही कृती न करणाऱ्या अनोळखी व्यक्तीची भीती वाटू शकते का ?? हो नक्कीच वाटू शकते. मला विचारा ....
हा जो कोणी माणूस आहे माझ्याकडे बघणारा ...याचा चोरी किंवा दरोड्याचा तर विचार नाही ना ???या विचारानं संपुर्ण सकाळ बेचैनीत काढल्यावर अखेर दीड वाजता मी बहादूर वर ओरडलेच.. बहादूर हा सोसायटीचा नेपाळी वॉचमन ..." क्यो बहादूर हम तुम्हे क्या मख्खीया मारने के पैसे देते है?" न समजून बहादूर "नाहीं जी हांजी " करू लागला ... मी रस्त्याकडे बोट दाखवून तिथे एक माणूस उभा आहे त्याला हाकलायला सांगितलेे . "भिकारी होंगा मॅडम" म्हणत तो काठी घेऊन निघाला अन मी घरी परतले. एव्हढ्यात रखमाबाई कामाला आल्या त्या लादी पुसत असतांना माझी नजर पुन्हा बाहेर गेली पाहते तर तो तसाच तिथेच उभा ??? चिडून रखमाबाई ला म्हणाले " बघ बघ काय कोडगा आहे ... सकाळपासून उभा आहे ... या बहादूर ला सांगूनही उपयोग नाही ... केव्हाचा पाहतोय इकडेच ... थांब आता पोलिसांनाच बोलावते ... " माझा रुद्रावतार बघून रखमाबाई उभ्या राहिल्या बाहेर डोकावत म्हणाल्या " कोन ता मानुस ओ बाई?" मी खांबाकडे बोट करून म्हणाली " तो ग तिथे उभा आहे बघ बघ आपल्याकडेच बघतोय " ..... रखमाला चांगलाच घाम फुटला भीतीने थरथरत ती म्हणाली ... " बाई रस्त्याच्या पल्याड कुणिबी न्हाई कुनीच मानुस न्हाई हो!" 😳😳
(क्रमशः....... पुढील भागात उत्तरार्ध)
🔏©यशश्री रहाळकर
नाशिक
30/01/19
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
बुधवार, ३० जानेवारी, २०१९
कथा - कालसापेक्ष
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पुढच्या भागाची उत्सुकता लागली.
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिखाण , पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे
उत्तर द्याहटवा