वैश्विक महामारीच्या थैमानात ....लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मी माझ्याच पुरता मनातल्या मनांत निश्चय केला होता की ह्या विषयावर संयम बाळगायचा. विषय खोल आहे, गंभीर आहे आपण गप्प बसायचं... मात्र मी कितीही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शहाण्या मुलासारखी कोपऱ्यात शांत बसले तरी... लोक येऊन माझ्यातल्या उनाड, उचापती करणाऱ्या, दंगेखोर मुलाला चिथावणी देऊन जागे करतात. मग काय उचलली लेखणी अन् लागली खरडायला!.... ओहोहो! ☺ नवीन म्हणीचा जन्म झाला . असो! तर सांगायचा हेतू एव्हढाच की मी लिहिणार नव्हतेच लोकांनी अक्षरशः भाग पाडलं. घरात बसून 'Be safe be at home ' असे स्टेटस ठेवण्याचे अहोभाग्य आमच्या पूर्वजांनी आम्हाला लाभू दिले नाही .. मी काही warrior नव्हे बरं! वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट , त्यांच्या आषाढी कार्तिकी पैकी एक ही वारी...👍 चालायचेच . ह्या खांद्यावर येऊन बसलेल्या वेताळामुळे हॉस्पिटल गाठणे अनिवार्य होते... तिथेच माझ्या डोक्याला पर्यायाने लेखणीला रिकाम्या वेळात भरपूर खाद्य मिळाले. इथे तिन्ही त्रिकाळ मला समर्थांची आठवण होत राहिली.... दासबोधातली मुर्खांची लक्षणे जिवंत आजूबाजूला फिरताना बघून रामदास स्वामी त्रिकालदर्शी असावेत , ह्यावर माझा ठाम विश्वास बसला. मी हा जो काही लेखन प्रपंच करतेय तो कुणाचीही टिंगल करण्याच्या उद्देशाने नव्हे तर आपापले आत्मपरीक्षण करावे ह्या हेतूने... 👍 अनावधाने कुणी दुखावल्यास आधीच क्षमा मागते.... झालंय काय लोक सध्या बेजार झालेले आहेत... आधीच लॉक डाऊन, कोरोनाची भीती, आर्थिक ताण... आणि त्यात दारूच्या दुकानात ही एव्हढी रांग... देवा रे ! ताण घालवावा तरी कसा? त्यात दिवसभर बायको दिसणार हे ही adjust करायचे.... तर थोडक्यात सगळाच्या सगळा राग ह्या गरीबावर निघायचा.🙅 .... म्हणून माफी मागून सुरुवात करते.
भारतात सध्या सगळ्याच प्रकारच्या मूर्ख शिरोमणींना अक्षरशः चरायला मोकळे रान मिळाले आहे. भरपूर रिकामा वेळ... आणि भरपूर रिकामटेकडे वाचक ... ह्यामुळे जुळून आलेल्या दुग्ध शर्करा योगामुळे काय वाट्टेल ते पोस्ट करायचे, हा प्रकार फारच बोकाळला आहे. जे काही आले ते धपाधप फॉरवर्ड करत जाण्यामुळे अफवा आणि चर्चांचा महापूर आला. ह्यात सर्वाधिक अवॉर्ड विनिंग अफवा म्हणजे ,"उपग्रहाद्वारे भारतावर कोरोना नाशकाची फवारणी" .... ही पोस्ट अनेक उच्च शिक्षित व्यक्तींनी आपले आद्य कर्तव्य असल्यागत फॉरवर्ड केली... मला त्या दिवशी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याची लाज वाटली . हसावे की रडावे हेही कळत नव्हते... खरंच कॉमन सेन्स हा एव्हढा अन-कॉमन असतो ??? त्या खालोखाल हास्यास्पद विडिओ म्हणजे एक रेडा सदृश्य माणूस कुठल्याश्या हॉस्पिटलचा डीन म्हणून बरेच काही बोधमृत पाजायचा. गंमत म्हणजे दर वेळी त्याचे आणि हॉस्पिटलचे नाव बदललेले असायचे... तो कुठल्याच दृष्टीने डॉक्टरच काय कंपाउंडर देखील वाटत नव्हता. ही देखील पोस्ट इतके वेळा आली की मला डोळे मिटले तरी हाच प्राणी भुतासारखा दिसायचा. जिल्हाधिकारी/ आयुक्त/ कमिशनर ह्या लोकांच्या नावाने आदेश सूचना व्हाट्स अँप वर फेसबुकवर पहिल्या की माझे डोके सुन्न व्हायचे. साधीशी गोष्ट आहे मंडळी ,ह्या लोकांच्या अध्यादेशांना कायद्याचे स्वरूप प्राप्त असते.....त्यामुळे कुठलाही आदेश एका रीतसर मार्गाने सही शिक्क्याने जाहीर होतो. सध्या जिल्ह्यातील सगळी जबाबदारी ह्यांच्यावर आहे... हे सारे लोक प्रचंड काम करताहेत.. इतकं की आपण अख्ख्या वर्षभरात करत नाही. त्यांना सोशल मीडियावर घालवायला फावला वेळ नाही. त्यांच्या नावावर पोस्ट लिहिणाऱ्या आणि मग फॉरवर्ड करणाऱ्या लोकांना प्रत्येकी चार शिव्या मी घरातूनच देते... दोन लाथा घालण्याची देखील तीव्र इच्छा असते मात्र ती सध्या तरी पूर्ण होऊ शकत नाही.
"पुस्तक दिसले की वाचायचे आणि माणूस दिसला की बोलायचे" हे माझे तत्व. त्यामुळे icu बाहेरही मी निवांत गप्पा ठोकत बसते . एकतर तिथे लोकांना बोलायचे असतेच... कित्येकदा रडायचेही असते...😢👍 सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत माझ्या चौकश्या सुरू व्हायच्या ..... मग कोसळलेल्या आभाळागत माणसे बरसू लागत . गेले काही दिवस साधारण 45 ते 50 वयोगटातल्या अनेक स्त्रिया ओ पी डी ला येत होत्या... दिसत तर ठणठणीत होत्या . .... आणि प्रत्येकीच्या हातात ecg . बहुतेकांशी बोलतांना जाणवले की ह्या स्त्रिया केवळ धडधडते म्हणून येत आहेत. गेले 10 दिवस मी हा प्रकार पाहते आहे. एक काकू बोलता बोलता म्हणाल्या , सतत कोरोनाच्या बातम्या वाचून सोशल मीडियावरील पोस्ट पाहून धडधडते . तर मेख अशी आहे... "एक बाधित स्त्री फिरताना आढळली." ... अश्या आशयाच्या बातम्या फिरतात तेव्हा ह्या बायका घाबरून जातात. मुळात अशी बाधित व्यक्ती पाहून ओळखू यायला ती काय पिशाच्च आहे का ? हातात कँडल पांढरी साडी... आणि जर खरेच अशी व्यक्ती आढळली आहे तर यंत्रणेकडे रिपोर्ट करावा... सोशल मीडियावर अश्या फुटकळ अफवा माजवून काय होणार? सुजाण म्हणवणारे नागरीकही घाबरून जातात... आपण ह्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण निष्कारण वाढवत आहोत. गेले काही दिवस मी नर्स, डॉक्टर, वॉर्डबॉय आणि अम्ब्युलन्स वाले ह्यांची जी काही धावपळ ह्याची देही ह्याची डोळा अनुभवली आहे त्याला साष्टांग प्रणिपात... आपण खरेच आवश्यकता नसेल तर हॉस्पिटलमध्ये जाणे टाळायलाच हवे. उगाच ही test करून पाहू अन् ह्या डॉक्टर ला भेटून बरं वाटतं हे वयस्कर लोकांनी थांबवले पाहिजे. एक पासष्टीचे काका रोज आपल्या पत्नी आणि आईला घेऊन येत होते .. साधारणपणे प्रत्येकी 20 /22 हजार खर्चून सासू-सूनेने ढीगभर टेस्ट करून घेतल्या ... त्या करताहेत तर मी का मागे राहू? इथेही स्पर्धा.🙅काका एक दिवस वैतागून म्हणाले, " दोघींच्याही डोक्यावर परिणाम झालाय,...रोज काहीतरी नवीन ... दोघींनी जीव नकोसा केलाय. " आजींना तर म्हणे त्या डॉक्टरांना भेटूनच बरे वाटते ... कठीण आहे. अश्या परिस्थितीत डॉक्टरांवर टीका करणाऱ्या पोस्ट viral होतात तेव्हा खूप वाईट वाटतं.
कोरोना रुग्णांच्या आहारतालिका, भीमसेनी कपूर जाळा, लिंबू खा, सुंठाच्या गोळ्या खा... ह्यांसारख्या पोस्ट फॉरवर्ड करतांना सत्यता पडताळून पहिली जातेय का ? हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा... अनेकदा वैद्यकीय व्यवसायाशी निगडित व्यक्ती सांगतातही की हे असं सरसकट सगळ्यांना सहन होतेच असे नाही... वेगवेगळ्या प्रकृती प्रमाणे आहार असावा... मात्र ह्या फॉरवर्ड च्या शर्यतीत आपलेच घोडे प्रत्येकाला दामटायचे असते . सायबर क्राईम अंतर्गत मध्यंतरी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली... काही दिवस ग्रुप लॉक झाले पुन्हा जैसे थे.... कोरोना सारख्या गंभीर विषयावर माहिती प्रसारित करण्याचे अनेक शासकीय /वैद्यकीय जबाबदार लोक असतांना आपण आपली अक्कल का पाजळावी ?? मुळात सोशल मीडियाचा वापर घबराट निर्माण करण्याकरीता , दिशाभूल करण्या करीता का करतोय आपण? आज महाभारतातला कर्माचा सिद्धांत खरा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे... प्रत्येकानं आपापलं कर्म प्रामाणिकपणे करायचं. त्यातही वातावरणातली negativity पाहता आपण सद्विचारांचा एखादा दीपक लावू शकलो तरी पुरे... सध्या प्रत्येक जण एकटा पडलाय... भीती आहे, उद्या काय होईल? टेन्शन आहे. मला काही झालं तर मुलांचं कसं? हा ताण आहे.... माणसांची भीती वाटतेय एकमेकांना... आणि गरज आहे ती देखील माणसांचीच👍.... माझ्या मैत्रिणींचे नुसते फोन येऊन गेले तरी इतकं बरं वाटलं की काय सांगू !सोशल मीडियाचा वापर सध्या आपण एकमेकांशी कनेक्ट रहायला केला पाहिजे... भावनिक आधार, आनंद, कौतुक , प्रेम ... कित्येक सुरेख भावना आहेत ज्या पॉझिटीव्हीटी ची ऊब निर्माण करतात .आपण जे काही पोस्ट करतोय किंवा फॉरवर्ड करतोय त्याला आपण जबाबदार आहोत ह्याचे भान प्रत्येक सोशल मीडियाचा वापर करणाऱ्याकडे असलेच पाहिजे... नाहीतर सोशल मीडियाच्या बाबतीत आपण नुसतेच साक्षर झालो सुशिक्षित झालोच नाही असे म्हणायची वेळ येईल.
पूर्वी आपण वेळ मिळाला की करू म्हणून अनेक प्लॅन्स करून ठेवलेले होते... ते सगळे आपण नक्कीच प्रत्यक्षात आणू शकतो. जुन्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे... नातेवाईकांशी फोन करून बोलणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे... किती सुंदर आहे ना! त्यातही कोरोनाची आकडेवारी ह्या विषयावर बोलायचे टाळा. त्रास होत असेल /ताण येत असेल तर news सतत पाहू नका. गाणी गा, चित्र काढा , नाच करा, मुलांसोबत मस्त खेळ खेळा, अभ्यास करा.... घरातच मस्त फोटोशूट करा, वेगवेगळे पदार्थ करून पहा. आता ह्या दोन गोष्टींवर काही मंडळींचा तीव्र आक्षेप आहे..☺ मध्यंतरी साडी चॅलेंज, बेस्ट मॉम आणि कपल चॅलेंजनी धुमाकूळ घातला होता... मला नाही पटले मी नाही भाग घेतला... इतके सोपे आहे ते!👍 ज्याला पटेल त्याला त्याच्या पद्धतीने आनंद घेऊ देत ना! टीका करणे फार सोपे आहे... पुढे त्यावरही कुणीतरी सायबर डिपार्टमेंट च्या नावाखाली पिल्लू सोडलं की ह्या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो ... अखेर घाबरून हे चॅलेंज प्रकरण बंद झालं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आनंदी राहू पाहतोय... राहू द्या. सगळ्यांनी परिस्थिती बिकट आहे म्हणून गंभीर दुःखी तणावातच असायला हवे का? लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेक गृहिणींची जणू वेगवेगळ्या रेसिपी करण्याची चढाओढ लागली...ह्या जणू घोर पातक करताहेत अशी टीका केली गेली. उपलब्ध साहित्यातून वेगळा पदार्थ करून पाहणे म्हणजे उधळमाधळ नाही ना ! जरा गृहिणींच्या बाजूनेही विचार करा की... घरांत लहान मुले अक्षरशः अडकली आहेत त्यांना शांत , खुश ठेवण्यासाठी केव्हढा आटापिटा करावा लागतोय. ह्या सगळ्या काळात गृहिणींची जी काही सत्वपरिक्षा सुरू आहे त्याला नमन करायला हवे. काही वर्क फ्रॉम होम करणाऱ्या स्त्रिया तर याहून खडतर कार्य करीत आहेत... काम आणि घरकाम दोन्ही करणे खरेच अवघड आहे. पार्लर वर किंवा नटण्यावर टीका करतांना आपण दुसऱ्या बाजूला कौटुंबिक हिंसाचारात कमालीची वाढ झाल्याचे नमूद केले आहे का ? ज्यांच्याकडे अगदी लहान बाळ किंवा वृद्ध माणसे, आजारी व्यक्ती आहेत त्यांची काळजी तणाव आपण समजून घेत आहोत का?? प्रत्येकाने हा विचार केलाच पाहिजे.
गेल्या काही दिवसांत मी अनेक स्त्रियांच्या प्रेरणादायी कार्याविषयी जाणून घेतले... त्यातूनच कदाचित खूप प्रेरणा खूप आशावाद निर्माण झालाय.... दिसायला इवले पण अफाट कार्य...👍😊
★ माझ्या मैत्रिणीची आई वय वर्षे 70 , पती आजारी सुनेचे दुसरे बाळंतपण एकहाती केले... तिचा पहिला बच्चू सांभाळून कुणाच्याही मदतीशिवाय... तेही कोरोनाचा कहर असणाऱ्या इंदोरमध्ये .. कधीही न पाहिलेल्या त्या माऊलीला मी शतशः प्रणाम केले.
★एक शिवणकाम करणारी ताई आपल्या मशीनचा वापर करून फावल्या वेळेत काही करता येईल का ? अश्या विचारानी प्रेरीत झाली. घरातल्या जुन्या कॉटनच्या साड्या, जुन्या बेडशीट स्वच्छ निर्जंतुक करून तिने सुरेख मास्क शिवले... सोसायटी च्या बाहेर एक बॉक्समध्ये ठेवून दिले... भाजीवाले, फळवाले , भिकारी , मजूर अनेकांनी ते घेतले... 10 मास्क पासून सुरुवात केलेल्या तिने आज 40 ते 50 मास्क दरदिवशी बनवायला सुरुवात केली... कापड तिला एका सेवाभावी संस्थेने पुरवले. आज use n throw मास्क घेतला तरी 16 ते 20 रु किंमत आहे. किती ही निस्वार्थ सेवा!
★अनेक मैत्रीणींनी आपापल्या घरकाम करणाऱ्या बाईंना पूर्ण पगार देऊन रजा दिलीये. काहींनी तर 3 ते सहा महिन्यांचे पैसेही देऊन टाकले. कित्येकींनी किराणा भरून दिला, डाळी साळी, तेल ,गहू दिलेत... ह्या गोष्टी कुणी जाहीरपणे मांडत नाहीत पण आपल्या मुलांसारखेच तिच्याही मुलांचे पोट भरले पाहिजे... ही भावना किती लोभस आहे.
★काही स्त्रिया तर भन्नाट आहेत... सेवाभावी संस्थेअंतर्गत अन्नपदार्थ आणि औषधांची पाकिटे गरजूंना प्रत्यक्ष नेऊन देतात. त्यासाठी महानगरपालिकेची परवानगी काढून गाडीला स्टिकर लावून जागोजागी वस्त्यांमध्ये फिरून असे कार्य करतात.काही पोलिसांनाही चहा नाश्ता देतात.
★एक केटरिंगचा उद्योग करणारी मैत्रीण घरबसल्या काही करता येईल का असा विचार करू लागली. तिच्याकडे तांदूळ होते.. रोज 50 पाकिटे इडली चटणीची ती बनवून देऊ लागली. एका सेवाभावी संस्थेची गाडी येऊन तिने सोडलेल्या बादलीतून ही पाकिटे घेऊन जायची. त्या बिल्डिंगच्या अनेकींना ह्यातून प्रेरणा मिळाली . त्याही जमतील तशी पाकिटे देऊ लागल्या... आता सकाळी बिल्डिंगला बादल्याच बादल्या लटकलेल्या असतात... 800 ते 1000 पाकिटे इडल्या ती संस्था घेऊन जाते. 👍 थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ते ह्यालाच.
★अनेक भजनी मंडळे, भिशी ग्रुप मिळून प्रत्त्येकी 10 पोळ्या आणि भाजी असेही पार्सल एकेक दिवस पुरवले हेही मी पाहिले. तेव्हा खरंतर खूप आनंद झाला... आपण रामाच्या सेतूतील इवली खार झालो तरी चालेल , पण कुणा गरजूला जमेल तशी मदत करत राहायची.
परप्रांतीयांचे लाखोंनी लोक रोज नाशिक ओलांडत आहेत तेव्हा इथे आम्हाला अन्न पाणी मिळाले म्हणून कृतज्ञता व्यक्त करताहेत ते अश्याच अनेक सेवाभावी संस्थांच्या पुढाकारामुळे👍 आणि सामाजिक भान जपणाऱ्या अनेकांमुळे.
★औरंगाबादच्या एका मैत्रीणीच्या शेजारी राहणाऱ्या नर्सला कोरोना वार्डची ड्युटी लागली. नर्स ताई हॉस्पिटलमध्येच रहायला.. तिची दोन मुले सांभाळायला आजी होती. मात्र पोरं आईची आठवण काढून सारखी रडायची. दोघींच्या फ्लॅट मध्ये बाल्कनीची जाळी होती... मैत्रीण आपल्या पोरांसोबत बाल्कनीतच राहू लागली. खाऊ केला की त्यांना द्यायचा. सगळ्यांचा ऑनलाइन अभ्यास करून घ्यायचा.. पोरही गाण्याच्या भेंड्या खेळत, गप्पा मारत. रात्री बाल्कनीतच गोष्ट सांगायची . नर्स ताईंची लेकरे झोपली की आजी उचलून पलंगावर ठेवायची... मुले रमली. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळूनही इच्छा असेल तर नक्कीच मदत करता येते ह्याचाच हा अनोखा धडा.
ह्या सगळ्या उदाहरणांमुळे माझा पूर्वीच एका तत्त्वावर विश्वास होतो तो अधिक दृढ झाला... ते तत्व म्हणजे ... " हे जग सुरळीत सुरू आहे कारण अनेक चांगली माणसे ह्या जगात आहेत." ही चांगली माणसे कुणी वॉरियर नसतील पण माणुसकी, सहृदयता ह्यांचे मजबूत खांब आहेत.... उद्याच्या सुरेख आयुष्याची आशा आहेत. आपण कुणीही अमर नाही, प्रत्येक जण कधीना कधी जाणार आहोत. कधी आणि कोणत्या कारणानी हे माहीत नाही. आपल्या हातात त्या क्षणापर्यंतचे सुरेख आयुष्य आहे...ते आनंदाने भरभरून जगुया...👍 हृदयात माणुसकीचा दीप अखंड तेवत ठेवूया.😊

👌👌
उत्तर द्याहटवा