फॉलोअर

रविवार, २६ एप्रिल, २०२०

आठवणीतला अखजी


 "अखजीचा .. अखजीचा मोलाचा सण रेखा जी
निंबावरी ..  निंबावरी बांधला छान झोका जी...."

बहिणाबाईंनी रचलेलं उत्तरा केळकर ह्यांच्या सुमधुर आवाजातील गीत मी ज्या ज्या वेळी ऐकते त्या त्या वेळी माझ्या बालपणीच्या साऱ्याच आठवणी जिवंत होत माझ्यासह फेर धरून नाचू लागतात. अखजी अर्थात अक्षय तृतीया म्हणजे (विदर्भातील) प्रत्येक माहेरवाशिणीसाठी पर्वणीच . साडेतीन मुहूर्तातील हा अर्धा मुहुर्त... वैशाख शुद्ध तृतीया.... अर्थात अक्षय तृतीया हा दिवस अनेकविध अर्थानं अत्यंत महत्वाचा मानला जातो.
                      "अक्षय" अर्थात अविनाशी... एका सर्वमान्य आख्यायिकेनुसार श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की ,"ह्या दिवशी केलेले दान कधीही क्षय होत नाही ." ... म्हणून हा दिवस 'अक्षय तृतीया' ह्या नावाने ओळखला जातो. हा दिवस पितरांचे ऋणाईत होण्याचा देखील आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मरण करून त्यांच्या उत्तम गतीसाठी दानधर्म केला जातो . ह्या दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली ..भगीरथाने आपल्या पूर्वजांना स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून घोर तपश्चर्या केली.. आणि फलस्वरूप गंगा नदी पृथ्वीवर आली,अशीही आख्यायिका प्रचलित आहे . त्यामुळे शुभकाळात गंगास्नानालाही महत्व आहे . ह्याच दिवशी व्यास मुनींनी महाभारत निवेदनाला प्रारंभ केला ... त्यांचे लेखनिक होते आपले गणपती बाप्पा...अश्या अनेकविध कथांमधून अक्षय तृतीया हा सण सुंदर विणलेला अनेकपदरी गोफ वाटतो. 
                      शुभ दिवस तर आहे पण पितरांना समर्पित म्हणून अर्धा मुहूर्त..... मात्र ह्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली जाते. नवीन कामांची सुरुवात, नवीन दुकानांची पूजा आवर्जून ह्या मुहूर्तावर होते. येणाऱ्या तप्त उन्हाळ्याची सोय म्हणून की काय... मातीचे घट दान केले जातात. शेतीसाठी बियाणांची खरेदी, नवीन अवजारांची खरेदी ह्याच मुहूर्तावर केली जाते. नांगरलेल्या भूमीचे पूजन केले जाते... काही भागांत नांगराचीही पूजा केली जाते... पाऊस मुबलक पडून पीके उत्तम यावीत म्हणून प्रार्थना केली जाते.
                    ह्या साऱ्या पल्याड माहेरवाशीणींसाठी हा सण आगळी पर्वणी असते. चैत्र गौरीच्या निमित्ताने माहेरी येण्याची ओढ आगळीच असते. महाराष्ट्रात घरोघरी चैत्र शुद्ध तृतीयेला चैत्रगौर मांडली जाते. अर्थात देवातली अन्नपूर्णा पाळण्यात विराजमान केली जाते... महिनाभर तिची पूजा करून ... अक्षय तृतीयेला तिला निरोप दिला जातो. ह्या निमित्ताने होणाऱ्या गौरी पूजन समारंभाचा अर्थातच हळदी कुंकवाचा अक्षय तृतीया हा अखेरचा दिवस असतो. घरच्या लेकी सुनांचे कोडकौतुक करा , त्यांना पाळण्यात झुलवा अर्थात सन्मानित करा असा लाखमोलाचा संदेश देणारा हा सण.... शहराच्या धावपळीत , अस्थिर जीवनात हळूहळू "खास बायकांचा राखीव "असा हा उत्सव विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे. अक्षय तृतीया म्हणून मेंदूच्या सर्च इंजिनमध्ये टाईप केलं की आपसूक "चैत्र गौर" हा पर्याय उमटावा, इतकं मनस्वी आमचं नातं.
                      गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी दही लावून अन्नपूर्णेची मूर्ती उजळण्याचे काम माझ्यावर सोपवले जाई... तिजेला तिला सुरेख चंदनी पाळण्यात गादी, लोड उश्या मांडून विराजित केले जाई. इवल्याश्या त्या मूर्तीला इवलीशी वस्त्रे नि तऱ्हेतऱ्हेची सुवासिक फुले वाहिली जात.प्रवासातून थकून आली म्हणून दुधाचा नैवेद्य असे... नंतर मात्र दोन्ही वेळा जेवणापूर्वी देवीस नैवेद्य दाखवला जाई.पानात हमखास गोड पदार्थ असायचा. चैत्रगौर म्हणजे अन्नपूर्णा... तिला सारे ताजे लागे.. न वापरलेल्या ताज्या शेवया, चकल्या, शेव , करंज्या ह्यांचा मोठा मान असे . बहुतेक पदार्थ आम्ही शाळेत गेलो की केले जात...आणि डब्यात डबे घालून दडवून ठेवले जायचे. मात्र ताज्या गव्हाच्या शेवया करायला आजी लोकांना आमची मदत लागे...
दोन उंच डबे समांतर ठेऊन त्यावर स्वच्छ पुसलेला वेळू आडवा ठेवला जाई... त्याखाली मऊसूत साडी अंथरली जाई... मग आजीने ताटात तासनतास खपून तयार केलेल्या तारेसारख्या शेवया हळुवारपणे हातांवर गुंफत लांबवायच्या नि त्या वेळूवर सोडवून वाळत घालायच्या... हे जोखमीचं काम झालं की काहीतरी खाऊ मिळत असे. 
                गौरीच्या हळदीकुंकाच्या निमित्ताने मुलींना माहेरपणाला आणले जात असे... मग अक्षय तृतीयेपर्यंत ठेऊन घेऊन नंतर सासरी पोहोचवत असत.  आमच्या सगळ्या ताई नि आत्या घरी येत नि घर नुसते उजळून जाई... बाभळीवर झोके बांधून दिले जात.. कुंपणाची मेंदी पाट्यावर वाटून हात सुरेख लालेलाल रंगत असत . हातभर बांगड्या भरुन घ्यायचो नी दिवसभर धुमाकूळ घालायचो... संध्याकाळी अंगणात झिम्मा फुगडी रंगायची... जेवणानंतरचे आवरून झाले की आई , वहिनीही सामील होत.. मग सगळ्या फेर घरून गाणी गात ..  मी सासरी कशी सुखात आहे पण माहेरचीही आठवण ओढ लावते, अश्या आशयाची गीते असत. वैशाख चांगला तापू लागलेला असायचा, मग  ऊसाचा रस, कलिंगडे, कैऱ्या ... ह्यांची खादाडी होत असे. 
                 गौर बसली की अजून एक गोष्ट आवर्जून केली जाई... ती म्हणजे "चैत्रांगण" गेरू किंवा शेणाने लिंपलेल्या अंगणात रोज एक शुभचिन्ह रांगोळीने रेखले जाई... दुसऱ्या दिवशी आधीचे न पुसता नवे काढले जाई... म्हणजे दर दिवशी एकेक वाढवत अक्षय तृतीयेला सारे अंगण रंगोळीमय झालेले असायचे. श्री राम ।। चैत्रगौर प्रसन्न ।। अश्या शुभ चिन्हाने सुरुवात केली जायची... मग त्यात स्वस्तिक, गदा, ओम अशी शुभचिन्हे , आकाशातले सूर्य चंद्र, , चांदणी...नागमंडल, हत्ती, मूषक असे उपयुक्त प्राणी, गणेश, लक्ष्मी अश्या देवता, तुळशी वृंदावन , पाळणा, आंबा, हळदी कुंकू, बांगड्या , खण नारळ... काय काय असायचं.सगळ्या संसाराचा पसाराच जणू अंगणात मांडून बसायचो. ती गंमत, तो आनंद आता पैसे खर्च करूनही मिळायचा नाही.
                   अक्षय तृतीयेला बहुतेक घरोघरी नैवेद्य असायचा... बऱ्याच भन्नाट पदार्थांची ह्यात सांगड घातलेली असायची. ताज्या शेवयांची खीर जशी अत्यावश्यक असे तसेच ताज्या चिंचेचे चिंचवणे खूपच महत्वाचे असे... साधारण आठ दिवसांपूर्वी झाडावरची उतरवलेली चिंच साफ करण्याचे काम आम्हाला मिळे... पोत्यावर बसून खल पालथा ठेऊन चिंच फोडायची मग त्यातले चिंचोके नि टरफले ह्यांचे वेगवेगळे ढीग करायचे... मग चिंचेला भरपूर मीठ लावून त्याचे गोळे डब्यात भरायचे... तो चिंचोक्यांचा खच म्हणजे मोठी संपत्ती वाटायची... मिटक्या मारत ते मीठ लावलेलं बुटुक तोंडात टाकायचो.. आहाहा! ही चिंच भिजवून  त्याचा कोळ चाळणीवर रोळीत त्यात चारोळ्या गूळ मीठ घालून हे चिंचवणे केले जाई.. त्यासोबत कुरडया तळल्या जात त्याही ताज्याच बरं ! ह्यांच्या जोडीला वाळा नि जायफळ घालून केलेले कैरीचे पन्हे असायचे.. काही घरी आमरस पुरणपोळीचाही कुळधर्म असायचा. 
                   संध्याकाळी घरोघरी हळदीकुंकू असायचे. त्याचा तो थाट काय वर्णावा.. दुपारपासून देखावे तयार करण्यात आम्ही मग्न असायचो. कुणी डोंगर, कुणी जंगल , कुणी किल्ला तर कुणी थेट हिमालयावर देवी नेऊन ठेवत. नऊवारी नेसून नथ घालून सुवासिनी तयार होत. देवीसमोर आमच्यापासून लपवलेले सगळे फराळाचे पदार्थ मांडून ठेवले जात. ... शेव, चिवडा, शंकरपाळे,चकली, करंजी,अनारसे... करंजी देवीला शिदोरी म्हणून दिली जाई त्यामुळे ती तोऱ्यात असायची. पन्हे आणि आंबेडाळीचा /कैरीच्या डाळीचा नैवेद्य दाखवला जाई, भिजलेल्या हरभऱ्याने देवीची ओटी भरत... देवीच्या पाळण्याला मोगऱ्याच्या गजऱ्यांनी सुंदर सजवले जाई . प्रत्येक सवाष्णीला हळदी कुंकू, मोगऱ्याचा गजरा, डाळ पन्हे दिले की हरभऱ्याने ओटी भरत असत. तृप्त चेहऱ्याच्या प्रसन्न अन्नपूर्णा घरोघरी भेटत.. क्षुधा क्षमन करणारी अन्नपूर्णा माता जितकी मोलाची आहे , तितकीच घराघरांत नांदणारी ही खरी खुरी अन्नपूर्णा, गृहस्वामिनी महत्वाची आहे . आजही अक्षय तृतीयेच्या ह्या साऱ्या सोहळ्यात मन गुंतून पडलं आहे... अखजी आठवला की त्याने मनावर नकळत केलेले माणसं जोडून ठेवण्याचे संस्कार, वाडवडील गेले तरी त्यांची आठवण ठेवण्याचे संस्कार, स्त्री ला सन्मान देण्याची शिकवण, माहेरवाशिणींची धम्माल, स्त्रियांचं राज्य.... सारं सारं वाळ्याचा पन्ह्यासारखं मनाला आतून बाहेरून गारीगार, आंबट गोड करत जातं.
©🔏यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!