आधी दोघे एकमेकांना भेटणार, मग प्रेमात पडणार मग लग्न नी गोड बाळ होऊन प्रेमकहाणीचा सुखद शेवट...असंच असता ना थोड्याफार फरकानं प्रत्येकाचं प्रेम. माझी कथा मात्र काहीशी उलट्या दिशेनं वाहणारी .... लग्नाला 11 वर्षे उलटून गेलीये; 9 वर्षे वयाच्या मुलाचा बाप असणारा मी आजच्या व्हॅलेन्टाईन डेला माझ्या प्रिय आशूला भेटायला चाललो आहे .. ती माझं सर्वस्व; माझं जीवन; जगण्याचं एकमेव कारण आहे हे आज मी तिला सांगणार आहे. कधीही व्यक्त न केलेलं माझं अव्यक्त प्रेम आज मी व्यक्त करणार आहे. तिला द्यायला 11 लाल गुलाब असणारा बुके , अंगठी अन असलं बरंच काय काय घेऊन मी औरंगाबाद ला जाणारी गाडी पकडली.चॉकलेटस घेणं मात्र मी प्रकर्षानं टाळलं...... न जाणो पुन्हा त्या जखमेवरची खपली निघून दुःख वाहू लागेल.
सर्वसामान्य म्हणावं असं चौकटीतील आयुष्य माझं ... सरळ नाकासमोर शिकत नोकरी धरली जरा स्थिर झाल्यावर रीतसर चहापोह्यांच्या कार्यक्रमाला लागलो. पहिलंच स्थळ सांगून आलं ते आशूच.. रूपानं सामान्य चारचौघींसारखी शिक्षण जेमतेम .. पण चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आणि तजेला. लग्नानंतर संसारच करायचा आहे नोकरी वगैरे नाही हे स्पष्टपणे पहिल्याच भेटीत सांगणारी आशू आईला सून म्हणून खूपच आवडली. लग्न झालं आयुष्य पुढे चालू लागले... आशू समंजस होती आणि खरेच अत्यंत प्रेमानं समरसून संसार करीत होती. मी मात्र जवळपास सगळ्याच arrange marriage चे असते तसे दिवस ढकलत होतो. दोन वर्षांनी आमच्या पिल्लाचा जन्म झाला 'आयुष ' ... त्याच्या भवती आशू गुरफटून गेली . तिने कधीही स्वतः साठी काही मागितलं नाही जे काही हट्ट असायचे ते आयुष साठी... तसा आमचा संसार दृष्ट लागण्या सारखा होता .. लोक म्हणत.अन दृष्ट लागलीच..😢
आयुष आमचा पिल्लू मोठा गोड छोकरा...चोकॉलेट्स भयंकर आवडायचे त्याला कसलंही काम असो वा अभ्यास .. चोकॉलेट्स म्हटले की स्वारी तयार. आशूनेही अतिशय चांगल्या सवयी लावल्या होत्या त्याला ... त्याची शाळा, क्लास, अभ्यास, छंद वर्ग वगैरे सगळ्या गोष्टींकडे तिचे काटेकोरपणे लक्ष असायचे.मी पियुष आणि ती आशू ...आमची नाव जोडून आयुष हे त्याचं नावही तिनंच तर ठेवलेलं .. आयुष तिचा श्वास होता; तो साधारण 3 वर्षांचा असेल तिने दुसऱ्या पिल्लाचा विचार बोलून दाखवला अन मी कडाडून विरोध केला. आपल्याला दुसरे मूल होणे परवडणार नाही हे मी तिला पटवू लागलो.. तिला पटले नाही पण मान्य केलं बिचारीन ...तेव्हा तिचं ऐकलं असतं तर ... पण अश्या जर तर वर आयुष्य उभं राहत नाही ना !
डिसेंबर महिन्यातील 10 तारीख आमच्यावर काळ घेऊन आली ... कधी नव्हे तर घरी लौकर आलो म्हणून आशूला मी काहीतरी खमंग खायला करायला सांगितलं... आयुषची शाळा सुटायची वेळ झाली होती .. मी तश्याच पायात चपला सरकवत मीच घेऊन येतो म्हणून सांगितले... घरापासून 10 मिनिटांवर शाळा . मोठ्ठ Dairy milk देताच स्वारी खुष.. घराजवळच्या वळणावर नेमका गाडीखाली दगड आला मी आणि आयुष फेकले गेलो... जबर मार लागूनही मी वाचलो पण आयुष.... तो इवला जीव डोक्यावरचा आघात पेलू शकला नाही. होत्याचं नव्हतं झालं . हॉस्पीटलला नेईपर्यंत पिल्लू नव्हता या जगात ... आयुष ला शाळेतून आणायला गेलेलो मी अखेर त्याचं प्रेत घेऊन घरी आलो. आशूचा दगड झाला होता 3 दिवस 3 रात्री ती शून्यात डोळे लावून हरवल्यागत बसलेली..काय करू काही सुचेना? आयुष चं जाणं तिनं मान्यच केलं नव्हतं.
सगळे आप्त जमले होते...सगळ्याच घरावर शोककळा पसरली होती ... जे झालं ते भयंकर होतं पण त्याहूनही अघोरी माझ्यापुढं वाढून ठेवलं होतं... गळ्यातलं मंगळसूत्र माझ्या दिशेने भिरकावत अत्यंत त्वेषाने आशू किंचाळली " माझ्या आयुष चा खून केलाय तुम्ही . मी कधीही तुम्हाला माफ करणार नाही." गेला तो माझाही मुलगा होताच ना! पण हे समाजण्या पालिकडे ती पोचली होती. आयुष चे दिवसवारे होताच दुसऱ्याच दिवशी ती आपल्या माहेरी औरंगाबादला निघून गेली . निघतांना एव्हढं च म्हणाली ," आता आपल्यात काही उरलं नाही. आयुष्यभर तुम्ही कधीही माझ्यावर प्रेम केलं नाही... माझी कसलीच तक्रार नाही. तुम्ही पाठवाल तेव्हा मी डिव्होर्स द्यायला तयार आहे..मला तुमचे काही नको .. माझे जे काही होते ते सगळे तुम्ही हिरावून घेतलंत ..."
तिच्या नसण्यानं मी पुरता कोसळून पडलो... महापुरात ज्या झाडाच्या आशेनं पोहत जावं ते झाडच उन्मळून पडावं असं काहीसं होतं... तिच्याविना एक क्षणही जगणे अशक्य आहे हे आताश्या मला पुरतं कळून चुकलं आहे. तिच्यावरचं प्रेम मी कधी व्यक्तच केलं नाही ... आज पश्चाताप होतोय.आजच्या प्रेमादिनाला तिला भेटून सारं सांगणार आहे... एव्हाना ती सावरली असेल अशी अपेक्षा करतोय... माझी अपुरी प्रेम कहाणी पुरी करायचा निश्चय करून निघालोय माझ्या आशूला भेटायला...तिच्या आणि माझ्या उरातले उसावलेले टाके सांधले जाणार नाहीत कदाचित पण प्रितीची नवीन गुलाबी वीण पुन्हा एकदा घालायला हरकत काय आहे ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!