आयुष्य एक युद्ध मानलं तर आपण प्रत्येक जण लढतच असतो.कुणी आर्थिक परिस्थितीशी ,कुणी सामाजिक विषमतेशी, कुणी आपल्याच आजूबाजूच्या माणसांशी तर कुणी स्वप्न आणि वास्तव यामधल्या दरीशी... अविरत झगडत असतो.मात्र आज जिची कथा मी मांडणार आहे तिने आयुष्याशीच युद्ध मांडले आहे...प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक श्वासाशी ...आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी.या साऱ्याला भक्कमपणे पराभूत करून ती आनंदानं खंबीर उभी आहे...दर वेळी एखादया अजिंक्य योध्याप्रमाणे....शरीराचे घाव मिरवत हसतमुखाने.माझ्या प्रत्येक कथेनंतर वाचकांचा एक प्रश्न हमखास असतोच,"ही कथा खरी आहे का?" होय आजची कथा खरी आहे अगदी 100%
बहुतेक लेकी असतात तशीच ती लाडकी...माहेरी लाडाकोडात वाढलेली. सुयोग्य, श्रीमंत मोठ्या एकत्र कुटुंबात घरच्यांनी रीतसर लग्न करून दिलेले...इथपर्यंत तिची कथा तुम्हा आम्हा सारखीच.मात्र नवऱ्याने अचानक एक दिवस स्वतंत्र नवीन व्यवसाय करण्याचं ठरवलं नी एकत्र कुटुंबातून वेगळा झाला....थोडासा रोष कटूपणा ओढवूनच. नवऱ्यासह वनवासात जाणाऱ्या सीतेची भूमी आपली हे तर काहीच नव्हते त्यापुढे.... सासरच्या मंडळींच्या रागाचं केंद्रस्थान निष्कारण ही बनली. हिनेच आमच्या मुलास तोडलं असा काहीसा समाज करून घेतला.
खऱ्या अर्थाने दोघांच्या संघर्षास सुरुवात झाली.राहत्या घरात व्यवसाय सुरू झाला.. त्यात बाळाचं आगमन सुखावून गेलं.वेळप्रसंगी बाळाला शेजारी झोपवून ती नवऱ्याबरोबर कामाला उभी राहिली. मात्र एक दिवस अचानक होत्याचे नव्हते झाले... तिचा बच्चू अवघा काही महिन्यांचा आणि तिची तब्येत प्रचंड ढासळली. तपासणीअंती तिचा हृदयाचा (valve )व्हाल... झडप काम करीत नव्हती. इतक्या कमी वयात संकट कोसळलं... तातडीनं operation करावे लागणार होते.. खर्च होता 3.5 लाख. पहिल्यांदा तर पायाखालाची जमीनच सरकली तिच्या... कारण सगळे saving नवीन व्यवसायात गुंतवलेले अगदी स्त्री धन सुद्धा नवऱ्याच्या हवाली केलेले.... मात्र नवऱ्याने धीर दिला .. "बिचाऱ्याने रात्रीतून पैसा कसा उभा केला कोण जाणे." ती प्रेमानं भारावून सांगते.
operation पार पडलं मात्र जगण्याचे युद्ध सुरूच होते...ती शुद्धीवर आलीच नाही...कोमात गेली.एक दोन नाही तर पुरते चार दिवस...डॉक्टरांनी देवावर हवाला ठेवला.चार दिवसांनी ती खडबडून जागी झाली,"माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज मला आतून आला... मी अशी जाऊ शकत नाही." ती तिचे अनुभव सांगतांना म्हणाली... रसरसून काटा उभा राहिला अंगावर...😢 देवाने आई घडवताना वेगळाच साचा वापरला असेल नाही!ती शुद्धीवर आली मात्र युद्ध संपलेले नव्हते तिचे शरीर थकले होते.. ती पॅरालाईज झाली होती...उठून बसणेही स्वतः स्वतः चे जमत नव्हते. तिने बाळाला भेटायची इच्छा सर्वप्रथम व्यक्त केली.तिचा बच्चू फक्त सहा महिन्यांचा होता.ज्या बाळासाठी ती परत आली होती त्याला उचलून घेणे उराशी कवटाळणे सुद्धा तिला शक्य होत नव्हते. काचेपलीकडे रडणारे तान्हे बाळ आणि अलिकडे हतबल आई😢
पुन्हा तिच्या मनातल्या आत्मसंवेदनेने सांगितले ... ऊठ उभी रहा तुझ्या बाळाला गरज आहे तुझी. आश्चर्यकारकरीत्या आठव्या दिवशी सारे मनाचे बळ एकवटून प्रचंड जिद्दीने ती उभी राहिली. पडत धडपडत व्यायाम करत ध्यास घेत महिनाभरात हळूहळू बरे होत तिच्या जगात ती पूर्वी सारखी परत गेली. आता आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगायचा तिनं निश्चय केला. बाळ मोठं होत होतं, व्यवसायाचा व्याप वाढला स्थिरता आली.ती driving शिकली, swimming उत्तम करू लागली, व्यायाम आहार विहार सगळे अत्यन्त मनापासून केलं. आयुष्याची किंमत खऱ्या अर्थानं तिला कळली होती... प्रत्येक क्षण बोनस आहे असा ती वसूल करते. या दरम्यान थकलेल्या खचलेल्या पेशंट ना भेटायला जाणे त्यांना धीर देणे त्यांना जगण्यासाठी प्रेरणा देण्याचे कार्य तिने सुरू केले.मुलगा दहावी झाला .. नवरा यशस्वी उद्योजक झाला मोठं मनाजोग घर झालं... कुटुंबातील कडवटपणा विरून आता सगळ्यांची ती लाडकी बनली.
मात्र युद्ध नसेल तर वॉरियर कसा??आठ वर्षे मुदत असणाऱ्या (valve) हृदयाच्या झडपेला पंधरा वर्षे तिच्या शरीराने साथ दिली...तिची सकारात्मकता, व्यायाम या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणूया.आता पुन्हा एकदा ऑपेशन ला सामोरे जावे लागणार....मात्र तिला न्यूमोनिया ने ग्रासलं दोन महिने झगडून ती बरी झाली त्यातून....आता तिचे या आठवड्यात operation आहे हृदयाच्या झडपेचे...त्यापूर्वी भेटून गेली.लवकरच भेटायचे आश्वासन हसतमुखाने देऊन..... तिचं operation करतांना डॉक्टरांना अधिक ताण असेल तिच्यापेक्षा इतकी हसतमुख प्रसन्न...😊.तिला विचारले, इतर लोक सतत किती कोसतात देवाला? मलाच का ? why with me? हा प्रश्न तुला पडत नाही का? नेहमीप्रमाणेच हसत मुखाने तिनं उत्तर दिलं,"I am chosen one!" जणू ती सांगतेय मला निवडलंय देवाने ह्या साऱ्या साठी ...माझ्यातल्या क्षमता ओळखून...लढायला जिंकायला.माझी ही अपराजिता पुन्हा एकदा युद्धाला सामोरी जातेय ती नक्कीच जिंकणार !👍 मला विश्वास आहे. operation चे टाके टॅटू सारखे मिरवणाऱ्या, प्री वेडिंग सारखे प्री ऑपेशन फोटो शूट करू का ?विचारणाऱ्या, खळखळून हसणाऱ्या , आयुष्य मनापासून जगणाऱ्या ह्या अपराजीतेला आभाळ भरून शुभेच्छा!लहान मोठ्या समस्यांमध्ये चिडणाऱ्या, आयुष्यावर वैतागणाऱ्या, पोरांना रागावणाऱ्या आणि रडत कुढत जगणाऱ्या सगळ्यांना यातून नवी प्रेरणा मिळेल अशी आशा करते.
© यशश्री रहाळकर

छान
उत्तर द्याहटवाKhupach mast
उत्तर द्याहटवाVery encouraging.....a true warrior in life.......well said "yash"....
उत्तर द्याहटवाVery very encouraging.....a true warrior, i must say......well said "yash". Mona
उत्तर द्याहटवाPositive energy...Positive vibes ....jivanachi khari vyakhya
उत्तर द्याहटवासकारात्मक
हटवा