🙄 मनःपिशाच्च 👶
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
तो शशी .....वयवर्षं पाचच्या आसपास . वर्षभरापूर्वी एका पौर्णिमेच्या रात्री त्याला पोलिसांनी आमच्या आधार आश्रमात दाखल केले... आमच्या वात्सल्य आधार आश्रमातील बहुतेक मुलांना नाव नसतेच किंवा असले तरी माहीत नसते मग आम्हीच काहीबाही नाव ठेवतो . तो पौर्णिमेला आला त्यात दुधाळ गोरापान... आम्ही त्याची 'शशी ' नावाने एन्ट्री करून घेतली.शशी शांत होता त्याहीपेक्षा थिजलेला शून्य भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. या पिल्लाला पाहता क्षणीच पोटातून माया दाटून येई... काय होते त्याच्यापाशी कोण जाणे? पण हा अनुभव अगदी वात्सल्य मधल्या प्रत्येकीनं घेतला होता.
वात्सल्य आधाराश्रमात आम्ही एकूण 14 बायका तर माळीकाम, सक्युरीटी वगैरे साठी 3 पुरुष कर्मचारी होते. गेली 10 वर्षे मी येथील पूर्णवेळ अधिक्षिका म्हणून काम पाहत होते. अगदी 0 ते 14 या वयोगटातील सरासरी 60 मुले आश्रमात असतं... कुणी अनाथ म्हणून तर कुणी जन्माला येतात फेकून दिले म्हणून.प्रत्येकाच्या काळजात दुःखाचे वादळ होते... एकाकी पणाचे, नाकारले गेल्याचे... ही मुले मायेला आसुसलेली असत .. बरेचदा सारा मनाचा कोंडमारा क्षुल्लक गोष्टींवर काढत बसत.
माझ्या पतीच्या निधनानंतर मला कामाची गरज होतीच शिवाय या चिमुकल्यांच्या विश्वात मी माझं दुःख दूर सारू शकत होती. माझी 11 वर्षांची लेक निलांबरी ... सगळे नीला म्हणत तिला ... आणि मी... निलीमा जगदाळे.. आमचं दोघींचं जग...वात्सल्यच्या 2 खोल्यांत सहज सामावलं होतं.आल्या दिवशीच शशी आणि नीलाची मस्त गट्टी जमली.. तो बहुतेक वेळा आमच्याच दोन खणी घरात असायचा. नीला तासन तास त्याच्यासोबत असे...खाऊतला खाऊ काढून त्याला देई.तसा शशी सगळ्यांना आवडायचा...तो आवडायचा ???का दया यायची ??का नेमकं काय वाटायचं ?? हे मात्र कोडं होतं .
शशी या वर्षभरात एक अवाक्षरही बोलला नव्हता.मात्र तो मुका असावा असे वाटत नव्हते .. त्याला सारे ऐकू येई होकार नकार मान डोलावून तो प्रतिक्रिया द्यायचा.त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास, हट्ट जाणवला नाही.बहुतेकदा तो शांत बसलेला असे.आश्रमाच्या दक्षिण दिशेला मोडक्या पायऱ्यांवर तो एकटाच बसलेला असे.मुलांसोबत खेळतांना किंवा भांडताना त्याला पहिलेच नव्हते.असे एकांडे मूल मी गेल्या 10 वर्षांत पहिलेच नव्हते.नीलाला मी नेहमी विचारायचे..," काय ग खेळता तू नी शशी?" नीला गोड हसत सांगायची, " आई! तो असला ना की मस्त वाटतं. काही खेळत नाही तो शांत बसतो बघत.. पण असं वाटतं सगळे डोळ्यातले टपटप थेंब आहेत ना .. तो सगळे पिऊन घेतो. " तिच्या ह्या अगम्य उत्तराची मला गंमत वाटायची. एक मात्र नक्की होतं नीलाच्या आयुष्यातली एकाकी पोकळी शशीने भरून काढली होती... नीला जेमतेम वर्षाची असतांना वडील गेले... वडील म्हणजे काय हेही तिला कळू नये असे...पाठचं भावंड नाही की कुणी हक्काचं नाही.आश्रमातील इतर मुले मोठ्या बाईंची मुलगी म्हणून तिच्या पासून फटकून असत.त्यात तिला शशीचा आधार वाटायचा.... सोबत वाटायची.
एक दिवस संध्याकाळी सारी मुले अंगणात खेळत होती. मुलांच्या खोलीतील खिडकीची दांडी निखळली होती... ती बघायला म्हणून मी गेले तर शोभा बाई शशीच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत होत्या.
ह्या शोभा बाई गेले काही वर्षे मुलांना सांभाळायच्या. त्यांचा लेक गेल्या महिन्यातच अपघातात दगावला होता... मला या प्रसंगाचे राहून राहून नवल वाटले . त्यांना ऑफिस मध्ये बोलावून घेत विचारलं," शोभा ताई मी तुमच्या भावना समजू शकते.. पण त्या शशीला भीती वाटेल हो अश्याने.. लहान पोर आहे ." शोभा बाई म्हणाल्या," त्यो शशी हाय ना .. त्येच्यापाशी रडल की त्यो समदं दुक्क आसू पिऊन टाकतो." आता मात्र मी चाट पडले...हा शशी अश्रू पितो ?? काय प्रकरण आहे हे?? हाच अनुभव ओळीनी अनेक व्यक्तीं कडून माझ्यापर्यंत पोहोचला... बागकाम करणारे रामधन माळी बुवा, भांडी घासणाऱ्या सरोज बाई, आश्रमातील जरा कळती मुले नभा, लक्ष्मण, गणेश, भावना या सगळ्यांच म्हणणं एकाच होतं. शशी दुःख अश्रू पिऊन टाकतो...मी अचंब्यात पडले होते... शशी अश्रू पितो?? काय असावे हे... ह्या चकार शब्दही न उच्चारणाऱ्या मुलामुळे इतक्या सगळ्यांना हलके वाटते ... काहीतरी गूढ नक्की आहे.
मला ते गूढ नेमकेपणानं उकलण्या आधीच अविश्वसनीय अघोरी संकटांची मालिकाच सुरू झाली. एका सकाळी पोलीस स्टेशनमधून फोन आला...रामधन माळी बुवांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला होता...अगदी अशक्य.. गळ्यात तुळशीमाला घालणारे टिळा लावणारे आणि अखंड विठ्ठलाचे नाव घेणारे रामधन भाऊ... मी भेटीला गेले तर कोडगेपणा ने म्हणाले..... "तिनं इमान राखलं न्हाई म्हनून संपवावच लागलं.. तसा आदेशच व्हता" काय हे कुणाचा आदेश??पुन्हा उत्तरले,"माझ्या मनाचा.." काय बोलावे या वेडेपणाला ... परत आले वात्सल्य आश्रमात तर गणेश आणि लक्ष्मण ची भयंकर मारामारी सुरू होती... गणेशनी लक्ष्मण च्या डोक्यात दगड घातला... दवाखान्यात नेईपर्यंत लक्ष्मण दगावलाच. पोलीस केस..साक्षी पुरावे नोंदी सारा ससेमिरा ...... अखेर गणेशला बालसुधारगृहात पाठवणे साऱ्या खटाटोपात 2 दिवस अक्षरशः वाया गेले.गणेशच्या भेटीतही त्याचे म्हणणे एकच होते, "त्याच्या मनाने तसा आदेशच दिला होता "
वात्सल्य चे वातावरण गढूळ गढूळ होत गेलं.रामधनमाळी बुवांनी तुरुंगातच आत्महत्या केली.. बरोब्बर घटनेच्या 15 व्या दिवशी..... बरोब्बर त्याच दिवशी बालसुधारगृहाच्या भिंतीवरून उडी घेऊन पळून जाताना गणेश गाडीखाली चेंगरून जागीच चिरडल्या गेला... सुटला.😢
काय प्रकार आहे हा...माझ्या समजण्या पलीकडे होता..खरंतर समजून घ्यायला अवधीच मिळत नव्हता... एका सकाळी भावना आणि नभा या दोन 13/14 वर्षांच्या पोरी शाळेत जाण्यासाठी गेल्या त्या परत आल्याचं नाही... काही दिवसांनी त्यांची प्रेते कुठल्याश्या लॉज वर सापडली... अनन्वित अत्याचाराच्या खुणा होत्या देहावर...पोलिसांचा ससेमिरा सुरूच राहिला.आश्रमातच काहीतरी काळंबेर असावं अश्या अंदाजाने संशयाची सुई माझ्या दिशेनं फिरू लागली. काय होतंय हे समजायच्या आत काहीतरी अकल्पित घडलेलं असायचं.एकपाठी एक अश्या या दुःखद घटनांची साखळीच जणू गुंफली जात होती
आश्रमातील वातावरण भयावह झालं होतं... जणूकाही काहीतरी घडणार आहे अकल्पित खूप थरारक जीवघेण.... भांडी घासणाऱ्या सरोज बाई न कळवता चार दिवस कामाला उगवल्याच नाही. बाकीच्यांवर अतिरिक्त कामाचा ताण कटकटी होऊ लागल्या. त्यांच्या चौकशी साठी पाठविलेला चौकीदार रिकाम्या हाती परतला त्या कुठे गेल्या कुणालाच माहीत नव्हते.आता त्यांचे काय होणार कोण जाणे??असा विचार करत खिडकीबाहेर डोकावलं तर पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात झळकत होता.अचानक एक गूढ वलय मला त्या चंद्रा भवती दिसू लागले अन मला शशी आठवला.त्याला शोधत मी निघाले.. तो नेहमीप्रमाणेच दक्षिणेकडच्या मोडक्या पायऱ्यांवर एकटाच बसला होता.. माझी चाहूल लागताच त्याने गर्रकन मागे वळून पाहिले...सारं चांदणं जणू त्याच्या दुधाळ चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं... त्याच्या डोळ्यात प्रचंड ओढ होती आर्जव होतं... जणू म्हणत होता "या ना बाई! तुमचं मन मोकळं करा.. सारी दुःख रीती करा." मी चमकले हे मानवी नाहीच ... तशीच मागे मागे सरकत मी धावत सुटले ... थेट माझ्या खोलीपर्यंत.
दुसऱ्या दिवशी रामधन माळी बुवांच्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली होती... शोभा बाईंनी विधवा सुनेचा खून केला होता. ," माझ्या मनानं तसंच कराले सांगितलं मला... त्या सुनेच्या वाईट चालीन माह पोरगं गेलं."शोभा बाई सांगत होत्या. मी परोपरीने समजावत होते ,"अहो शोभा बाई अपघातात गेला लेक तुमचा. सून मायेनं करायची काय हे?" पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. शोभा बाई तुरुंगात होत्या तरीही त्यांच्या जीवालाही आता धोका आहे... मनाला हा विचार चाटून गेला पण पण....खरं अरिष्ट अजूनही वात्सल्य वर घोंगावत होतं...
मी ताबडतोब पावलं उचलायचं ठरवलं... आधी ज्या हवालदारांनी शशीला वात्सल्य मध्ये आणून सोडले होते व सगळ्या कायदेशीर बाबी पुऱ्या केल्या होत्या त्यांचा नाव व नंबर मी शोधून काढला. बऱ्याच खटपटीकरून संपर्क झाला एकदाचा... त्यांची बदली दूरच्या गावी झालेली..त्यात त्यांनी शशीला आणून सोडले त्यालाही 2 वर्षे झाली असावीत...त्यात त्याचे खरे नाव काय माहीत नव्हते... रेकॉर्ड नाही ... प्रश्नांची सुसंगती लागेना. मात्र वात्सल्य आश्रमाचं नाव ऐकून त्यांना तो गोरेला मुका मुलगा आठवला. तो साधारण कुठल्या परिसरात एकटाच सापडला याचीही त्यांनी माहिती सांगितली.मी त्याचा फोटो काही पेपरवाल्याना देऊन कुणाला माहिती असल्यास संपर्क करण्यास सांगितले....दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली देखील... खरंतर हे उशीरा सुचलेलं शहाणपण होतं... पण वाट पाहण्याखेरीज कोणताच उपाय माझ्याकडे नव्हता.साधारण 5 दिवसानंतर एक फोन आला... त्या व्यक्तीने स्वतः भेटण्याची व या संदर्भात माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली... मात्र त्यांना कायदेशीर कटकटी नको होत्या... हे माझ्याच सोयीचे होते मलाही केवळ माहितीत रस होता.
त्या व्यक्ती एक 60 वर्षांच्या आजी होत्या... त्यांची भेट मी एक मंदिरात घेतली... काही वर्षांपूर्वी त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या निंबाळे दाम्पत्याचा हा मुलगा असावा असे त्यांनी सांगितले. ह्या मुलाच्या आईचा खून स्वतः त्याच्याच वडिलांनी केला होता ... तिच्या चारित्र्यावर संशय आला म्हणून ... त्यांच्या मते ते दोघे रंगाने काळे होते मात्र गोरा मुलगा झाल्याने हा संशय वाढत गेला . पुढे पंधरा दिवसांच्या अंतरान त्या निंबाळे गृहस्थाने स्वतः फाशी लावून आत्महत्या केली... त्यांचा मुलगा त्या रात्रीपासून गायब झाला... तोच हा असावा. आता तर माझी खात्रीच पटली... शशी म्हणजे निंबाळेचाच तोच मुलगा. आजींचे मी खूप आभार मानले... त्या मुलात काही विचित्र पाहिल्याचे आठवते का? असे विचारताच आजी ताण देऊन आठवू लागल्या पण वय परत्वे त्यांना काही केल्या आठवेना.त्यांनी माझा संपर्क क्रमांक नोंद करून घेतला व निरोप घेतला.
मी वात्सल्य ला परतले... उद्या शोभा बाईंना पंधरा दिवस होतील तुरुंगात जाऊन ... त्यांना सद्बुद्धी दे रे देवा... म्हणत मी देवापुढे हात जोडले...अखेर त्याच्याचकडे धाव घ्यावी लागते ना!अचानक डोक्यात काहीतरी चमकलं .. पंधरा दिवस... मी घटनाक्रमाची उजळणी करू लागले... पौर्णिमा अमावस्या ... खेळ सुरू होता.. आजींनी सांगितल्या प्रमाणे त्या निंबाळे दाम्पत्याचा खून व मृत्यू यात 15 दिवसांचे अंतर... झालेले सगळे घटनाक्रम आठवत मी नोंदी घेत गेले... अविश्वसनीय ... हेच गणित हेच सूत्र पौर्णिमा-अमावस्या.... बापरे! मी भीतीने थरथरत होते.. आज अमावस्या मी खात्री करून घेतली. पोलीस स्टेशन मध्ये फोन करून सतर्कतेचा इशारा दिला त्यांनी तो मी वेडी असल्यागत उडवून लावला. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच शोभा बाईंनी हाताच्या नसा कापून आत्महत्या केली होती. मला पोलीस चौकशी करीता घेऊन गेले... वात्सल्य शी संबंधित लोकांचे हे असे अनैसर्गिक मृत्यू त्यात माझा गाढवपणा म्हणजे रात्री कॉल करणे.. माझ्यावरचा संशय बळावत गेला. मला रोज पोलीस स्टेशनला जाऊन सही करून यावे लागे शिवाय त्यांच्या चौकशीला सामोरे जाणे ही एक शिक्षाच होती.
एका संध्याकाळी अचानक त्या आजींचा फोन आला... त्यांनी सांगितलेले तुटक असंबद्ध होते पण महत्वाचे ठरणार होते. तो निंबाळेचा मुलगा असा मुका होता पण कधीकधी मोठ्या पुरुषाच्या आवाजात गाणी गायचा... घराच्या मागच्या जुन्या बुजवलेल्या विहिरीच्या कठड्यावर बसून.... मनाच्या तळात गढूळ डोह असे काहीसे ते गाणे एकदा आजीबाईनी ऐकले होते व त्या घाबरून बेशुद्ध पडल्या होत्या... त्या मुलाची आई एका स्वामींची भक्त होती त्यांच्या आश्रमात त्याला रोज घेऊन जात असे ... बरोबर!... जरासे आठवून स्वामी चिन्मयानंद आश्रम असे नाव त्यांनी सांगितले. दुसऱ्याच दिवशी तातडीने मी स्वामींच्या आश्रमात धाव घेतली. तिथल्या गर्दीत माझा लाग लागणे शक्यच नव्हते... इतक्यात स्वामींच्या एका शिष्याने मला आतल्या कक्षात नेले... मी स्वामींच्या पायावर लोळण घेतली धाय मोकलून रडू लागले. स्वामींना कसे कळले कोण जाणे? त्यांनी मला शांत होऊ दिले शिष्याला पाणी दे अशी खूण केली. घनगंभीर आवाजात स्वामीजी बोलू लागले, " दुःखाचा अश्रूंचा केव्हढा तिरस्कार करतो ना आपण! पण ही सर्वाधिक श्रेष्ठ ईश्वरी भेट आहे... मनात दुःख साठलं ना की अश्रूंवाटे ते राग , भीती, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह या षड्रिपु ना बाहेर फेकतं... बाळ ! तुला आता भीती पासून मुक्ती मिळाली ना ती या अश्रूंमुळे." मी समजून मान डोलावली. एका घोटात पाणी संपवले व न थांबता घडला प्रकार त्यांना कथन केला. मला माहित होते त्या पलीकडे कित्येक गोष्टी स्वामींना माहीत असाव्या अशी त्यांनी मान डोलावली. शून्यात नजर लावून मला म्हणाले.. "येत्या पौर्णिमेला तुमच्या आधार आश्रमात पूजा ठेवतो चालेल?" मी त्यांच्या पायावर डोके ठेवले. पौर्णिमेला सकाळी ठरल्याप्रमाणे ते आले सोबतीला मोठा शिष्यसमुदाय घेऊनच.... ग्रहशांती आणि बऱ्याच शांतीपूजा त्यांनी करविल्या. मंत्राघोषाने वात्सल्य दुमदुमून गेलं... प्रत्येकाच्या गळ्यात त्यांनी मोत्याचे ताईत घातले... शशीच्या सुद्धा ...त्यानी देखिल तो ताईत शांतपणे घालून घेतला.
ऑफिसमध्ये बसून स्वामीजी बोलू लागले," तो मुलगा शशी मुक्त झालाय आता. तुम्ही कर्ण पिशाच्च ऐकले असेल ना?कानात सतत बोलणारे भाकीत करणारे... हे मन पिशाच्च होते." माझ्या चेहऱ्यावरील संभ्रम पाहून स्वामीजी बोलू लागले," अधुऱ्या वासनांची पूर्ती व्हावी म्हणून मृत्यूनंतर पिशाच्च योनी धारण केलेल्या लोकांना स्वतः चे अस्तित्व देह नसतो.असे पिशाच्च दुबळे ,खचले ,दुःखी देह शोधतात आणि त्यात वास्तव्य करून वासनापूर्ती करतात. जे मनात राहते ते मनःपिशाच्च. त्या बुजल्या विहिरीतुन ह्या मुक्या पोराच्या मनात शिरले. लोकांना दुःख पितोय, अश्रू पितोय असे आमिष देऊन त्याच दुःखाच्या जागी विखार भरायचा... कधी संशय, कधी वासना तर कधी तिरस्कार." स्वामीजी पण पौर्णिमा- अमावस्ये च काय? मी न राहाऊन विचारलं.स्वामीजी सांगू लागले " मनाचा कारक चंद्र, मनावर चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असल्याच आपले ज्योतिष शास्त्र मानते. पौर्णिमेला सर्वाधिक प्रभाव दाखवून मनाला आपल्या नियंत्रणात आणून मनःपिशाच्च वाईट कृत्ये करवून घेत असे... मात्र अमावास्येला शून्य प्रभाव ... अश्या वेळी मनःपिशाच्च निष्क्रिय परंतु प्रभावाखालील व्यक्तीने तोवर काहीतरी अघटीत केलेले असे . नैराश्याने ती व्यक्ती आत्महत्या करीत असे.चंद्र रत्न मोती म्हणून अभिमंत्रित सिद्ध मोती मी सर्वांच्या गळ्यात घातलाय" सारा प्रकार आता माझ्या ध्यानात आला. पुन्हा एकदा स्वामींच्या पायावर डोके घासले.
जेवणे वगैरे सारे पार पडल्यावर मी नेहमी प्रमाणे रात्री राउंड घ्यायला निघाले. पहिले मुलांच्या खोलीत गेले शशी शांत झोपला होता. सुटकेचा निश्वास टाकून मी परतत होते ... तेव्हढ्यात खिडकीपाशी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसू लागला .. आज मला ते चांदणे पवित्र शुद्ध वाटत होते. तेव्हढ्यात तेच गूढ वलय मला चंद्राभवती दिसू लागलं. कुणीतरी राकट पुरुषी आवाजात गाणी गात होतं .......
मनाच्या तळात गढूळ डोहात...
रुतलेल्या गाळात... ये ना आत आत....
उतरू खोलात.. मन धावतं मन धावतंsss
बापरे! भयंकर भेसूर आवाज दक्षिणेच्या मोडक्या पायऱ्यांकडून येत होता. मी धाव घेतली तिकडे.... तिथं निलांबरी पाठमोरी बसली होती... मी नीला नीला म्हणत आवाज देऊ लागले... ती गर्रकन वळली. ते गाणं तिच म्हणत होती.....तिच ओढ डोळ्यात चेहऱ्यावर ओसंडून वाहणारं चांदण ..........
🔏©यशश्री रहाळकर
Maast hotter👍👌👌👌👌
उत्तर द्याहटवा