दोन लघुकथा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
1)दीर्घायुष्यी
सकाळी नेहमीच्याच वेळी नानींनी डोळे उघडले.. जाग आली म्हणायचे.. त्यांना दिवस काय नी रात्र काय? नेहमी प्रमाणेच पहिला विचार मनांत आला,"अजूनही मी जिवंतच आहे म्हणायची!" स्वतः च्याच विचारावर हसत त्या सावकाश उठल्या... सगळे अवयव उत्तम स्थितीत होते. पिकल्या केसांवर सुरुकुतलेली त्वचा नी ती पांघरून टाकणारी इवलीशी देहाची कुडी. नानींना उगाचच वाटायचं त्या झोपेतल्या झोपेतच एके दिवशी राम म्हणणार,ती काळझोप अजून यायची होती.वयाची 99 वर्षे पूर्ण केलेल्या नानींना जगण्याचा भयंकर कंटाळा आला होता. तसं आजारपण म्हणावं असं औषधाला नाही."मला अजून का जिवंत ठेवलस बाबा ??" ,हा प्रश्न विचारायला रोज त्या मंदिरात जात.
नेहमीसारखी आन्हिके उरकून त्या नेहमीसारख्या खिडकीपाशी बसल्या.. सून वरदा प्रेमळ होती चहा नाश्ता आणून ठेवतांना गोड हसली . अरे हो! आज केदार परत येणार होता ना! केदार त्यांचा लाडका नातू सगळ्यात धाकटा सगळ्यात प्रिय पाच वर्षांनी परतत होता विदेशातून ..नानी खूष झाल्या .. रोजच्या प्रमाणे जवळच्या बालाजी मंदिरात निघाल्या. आज त्या कसलीही तक्रार न करता मनोभावे हात जोडून पायऱ्यांवर बसल्या.
काही साळकाया दर्शनासाठी आल्या होत्या. नानी दिसतांच त्यांची कुजबूज सुरू झाली. नानी ऐकत होत्या पण मनापर्यंत पाझरू देत नव्हत्या. एक म्हणाली," इतकं जगू नये बाई, माणसानं!की कंटाळा यावा आपला" दुसरी फिस्स हसत म्हणाली,"तर काय रोज देवाला येतात मग देव देतोय दीर्घायुष्य." नानी मनात म्हणाल्या," बायांनो! मी कुठं मागतेय आयुष्य पण देव माझं ऐकत नाही ग. कृपा कसलीग दीर्घायुष्य शाप आहे शाप! " सारं मनातल्या मनांत.
नानींनी सावकाश घराची वाट धरली. तरुणपणी नवऱ्याचं मरण झेलत नशीब म्हणून, त्याच्या पश्चात वाढवून सासरी सुखात नांदणाऱ्या दोन्ही मुलींचे नवरे गेले, दोन सुनांचे मृत्यू, एका लेकाचा मृत्यू ...अजून काय हलाहल पिऊ रे शंकरा! म्हणत त्या घरी आल्या.
दाराशी खूप गर्दी .. ठोकाच चुकला त्यांच्या.कुणीतरी पाणी दिलं... बसवलं खुर्चीत. सकाळी पारीजातासारखी मोहरली सून आता भकास निर्माल्य दिसत होती. ज्याची वाट सारे घर डोळ्यात प्राण आणून पहात होते त्या केदारचा घरी आला तो मृतदेह. परत येतांना पहाटेच एक भीषण अपघातात तो दगावला होता. सुनेचा नी लेकाचा टाहो त्यांचं काळीज कापत गेला.
नानी कोपऱ्यात देहाची नी मनाची घडी घालून बसल्या होत्या.येणारा प्रत्येक जण आपल्याकडे काय नजरेनं पाहतोय हे त्या जीर्ण कुडीला जाणवले .. अगदी आत आत्म्यापर्यंत .सकाळचीच बया कुणालातरी सांगत होती, " कित्ती जणांचे मरण पचवले हो म्हातारीने! पण टस नाही का मस नाही..आता नातू गेला पुढ्यात. १०० री पूर्ण करेल म्हातारी.. काय उपयोग त्या आयुष्याचा?" नानींना स्वतःच्याच घरी चोरागत वाटू लागले. दीर्घायुष्य दीर्घ दुःखाची मालिका असते हो .. कधीही न संपणाऱ्या .. माझा काय दोष ? जिवंत ठेवलंय त्यानं हा दोष ?? नानी रडू लागल्या लोकांच्या नजारांतून येणारे चटके तरी बरे पण स्वतः च्याच नजरेत त्या गुन्हेगार होत्या... त्याची शिक्षाही त्या भोगणार होत्या दिर्घआयुष्यी जन्मठेपेची....😔
©🔏यशश्री रहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
2)पहिली पंगत
अबोली नावाप्रमाणे अगदी मितभाषी होती म्हणूनच की काय गाडगीळांच्या घरांत अगदी सहजी रुळली होती... 20 /25 माणसांचं भरलं गोकुळ त्यात पै पाव्हणा येणारा जाणारा...सतत घरात माणसांचा राबता. गाडगीळांचा गेली चार पिढ्या मंगल कार्यालय आणि केटरिंग चा व्यवसाय होता. अण्णा गाडगीळांना तीन मुले ... तिघेही एकत्रच राहत.अण्णांच्या पत्नी वत्सला बाई वयाच्या 74 व्या वर्षीही मस्त खमक्या होत्या अजूनही सारे घर त्यांचा शब्द प्रमाण मानायचे.
वत्सला बाईंच्या तिन्ही सुना मिळून 5 नाती तर नातू एकुलता एक .. अबोली त्यांची नातसून. तळ कोकणातल्या गरीब जोशी गुरुजींची लेक... माहेरी अन्नाला महाग असणारी... दिसायला गौरी सारखी सात्विक पण जरा कानाखालची असावी म्हणून गरीबाची पोर केलेली.
अबोली खरेच सात्विक आणि लाघवी होतीच. कश्याच साठी तिची तक्रार नसे. तसे गाडगीळांनीही तिला सोन्यानी मढवले हिऱ्यांनी उजळवले होतेच.ती शांतपणे तिची कामे करायची कुणी चिडवले ,खोडी काढली तर हसून द्यायची. सगळ्या नणंदा आणि तिघी सासवांची ती लाडकी झाली.लग्नाला चार महिने लोटले होते. अजूनही ती वत्सला बाईंशी चकार शब्द बोलली नव्हती. या नजरेच्या धारेने रोखून पाहणाऱ्या नी आपल्या सासवांना खऊट बोलणाऱ्या आज्जेसासूची तिला खूप खूप भीती वाटायची.
आधी घरातल्या कर्त्या पुरुषांची नी पाहुण्यांची पंगत, नंतर आजेसासू नी सासू ह्यांची .. सगळ्यांत शेवटी अन्न झाकपाक करून एका ताटांत वाढून घेत अबोली एकटीच स्वयंपाक घरात स्वतः चे जेवण उरकायची. एव्हाना कोशिंबिरी चटण्या संपलेल्या असत, भजी एखादं दुसरे उरे... सगळं अन्न गारढोण झालं असायचं.. तसं वेगळं काय म्हणा त्यात... घराघरांत राबणाऱ्या प्रत्येक अन्नपूर्णेच्या वाट्याला हेच येतं ना!😢
आजही ती नेहमीसारखी सारे आवरून स्वयंपाक घराच्या कोपऱ्यात बसून जेवत होती...आज भाजी संपून गेली होती नी आमटी सुद्धा ... दुपारचे दोन वाजलेले नवं काही करण्याचे त्राण अबोलीत उरले नव्हता.नेमक्या त्याच वेळी वत्सला बाई डोकावल्या भरल्या घरांत चटणी पोळी जेवणाऱ्या नातसुनेला पाहून त्यांचा रागाचा पारा नी तोंडाचा पट्टा सुरू झाला... भीतीनं थरथर कापत अबोली रडू लागली.
अण्णा गाडगीळ बैठकीच्या खोलीतून हा सारा प्रकार ऐकत होते. .... दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी पंचपक्वांनांचा स्वयंपाक करायला सांगितला... एक अत्यंत महत्वाची मानाची व्यक्ती घरी जेवायला येणार असल्याने सगळी तयारी करण्यास सांगितले... सगळ्या घरातील बायका पदर खोचून कामांस लागल्या . गाडगीळांच्या प्रतिष्ठेला साजेसे चांदीचे ताट वाट्या मांडण्यात आले... बासुंदी, खव्याची पोळी, करंजी, चिरोटे,लाडू बेत झाला.. भाज्या कोशिंबिरी चटणी सजल्या भजी- वड्यांचे वास दरवळू लागले... फुलांच्या रांगोळ्यांनी पात्र सजले.उदबत्तीचे सुवास घमघमू लागले.
आता कोण खास आमंत्रित आहे ह्याची सारेच वाट पाहू लागले. अण्णा गाडगीळांनी वत्सला बाईंना औक्षणाच तबक तयार करायला सांगितलं आणि.... अबोलीला आवाज दिला. ती हात पुसत बाहेर आली. वत्सला बाईंना त्यांनी नातसुनेला औक्षण करायला सांगितलं... अबोली न कळून घाबरी झाली ... फुलांनी सजलेल्या ताटाजवळ तिला बसण्यास सांगितले..... आपल्या सुनांना आणि वत्सला बाईंना उद्देशून ते गंभीरपणे म्हणाले, "आज अन्नपूर्णेची पूजा करण्याचे माझे व्रत आहे. अन्नपूर्णा जेवल्याशिवाय आज कुणीही जेवणार नाही. " गाडगीळांच्या सगळ्या स्त्रिया त्या दिवशी पहिल्या पंगतीत जेवल्या.
🔏©यशश्री रहाळकर
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
शनिवार, ६ एप्रिल, २०१९
दोन लघुकथा-दीर्घायुष्यी आणि पहिली पंगत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!