फॉलोअर

शनिवार, २७ एप्रिल, २०१९

आत्मशोध आणि पहिली भेट

  ललित लेख 1

आत्मशोध     

               डोक्यावरचा तेजानं भरलेला घडा ओतून रीता होत सूर्याचा तांबूस गोळा मावळतीची वाट चालू लागतो. हीच ती वेळ जेव्हा अर्धमिटल्या उजेडाच्या दिवट्यांमध्ये झाडांच्या सावल्या शीरविरहीत कबंधां-सारख्या फेर धरून भोवताली नाचत असतात. किनाऱ्या च्या ओढीनं परतणाऱ्या जहाजाची शीडे उभारून वेगानं फडफडावीत तसेच पाय आपसूक  समुद्र किनारे गाठू लागतात.
                 सृष्टीच्या सुरेख रंगीत कॅनव्हासवर गूढतेच्या काळ्या रंगाची बाटली जणू उपडी होते...सगळे रंग त्यात मिसळून एकच रंग दशदिशांतून उतरत जातो... गहिऱ्या काळ्या डोहात डोकावून पाहावे तसे आपणच अनोळखी त्रयस्थ होत जातो हळूहळू स्वतः ला...मला फार फार आवडतं असं .. तुटक परकं व्हायला...वडाच्या पारंब्यांवर सूरपारंब्या खेळाव्या तसं... प्रत्येक पारंबी जणू स्वतंत्र झाडच आहे .. इतकी स्वतः पासून दूर .. मात्र कुठेही न तुटता,न विलग होता.
                 धड उजेड नाही की मिट्ट काळोख नाही, धड दिवस नाही की रात्र नाही अश्या ह्या अतृप्त अर्धमिटल्या वेळी मला  सोबतीला कुणीही नको असतं... माझ्या मनाशी माझंच द्वैत मी विणत निघालेली असते... सती निघालेल्या कुणा तिनं उतरवावीत तशी एकेक नात्यांचे आभूषण मी उतरवत निघते...मनाच्या तलम कोऱ्या वस्त्रावर राग हेवेदावे मत्सर ह्यांच्या घड्या पडू न देता लपेटून घेते हलकेच स्वतः ला...वाळूत चालतांना आपल्याच पायांचे ठसे पुसले कसे जातात? बस .. एकदाच वळून पाहते आणि तसंच पुसून टाकते सारं मनाच्या पाटीवरचं.....
                  दुरून मोठी लाट येऊन किनाऱ्यावर कोसळते...समुद्राची गाज विलक्षण नादमधुर असते...सहस्त्र ढोल एकत्र निनादत जावे अन घुंगरू खळक्कन तुटून उन्मळून पडावे ... वाळू अजून ऊब धरून असते अश्या वेळी झोकून द्यावं स्वतःला त्या अथांग वाळूवर...समुद्राचा खारा वारा दधिची सारखा पिऊन घ्यावा...बोचत जातो आतपर्यंत.... एकेक एकेक दार चिरत जातो मनाचे..तळघर उघडायला मात्र जमत नाही त्याला.
                   अश्यावेळी ओच्यात सोनचाफ्याची फुले असावी....हा सोनचाफा मोठा शहाणा.. मोगऱ्यागत भूल घालून वेडावत नाही की रातराणी सारखा अवेळी उगवत नाही.. तगरीसारखा देवभोळा नाही की मधुमालती सारखा झपाटून टाकत नाही. सोन्याची वस्त्रे लेवून एखाद्या तटस्थ रजोगुणी राजासम हा सोनचाफा सुगंधापलिकडे कसलीही बोच आत्म्याला करून देत नाही. भरभरून सुगंध झिरपू देते मी मनात खोल खोल.
               हळूहळू रात्र नटू लागते.. आपल्या कृष्णकाळ्या रुपाला चंद्र चांदण्यांची रत्नजडीत नक्षी लेवू लागते... चंद्र तारे समुद्राच्या निळ्या दर्पणात डोकावतात आणि क्षणैक सगळा सागर फेसाळतांना  झळाळून जातो... या साऱ्या निसर्गाच्या सप्तपदीत मी एक परकी, तटस्थ, त्रयस्थ निरीक्षक भारावून विस्मयाने पाहत असते.
              फेसाळती एक लाट पायाला स्पर्श करून या निसर्गचित्रात तुम्हाला सामावू पाहते.... पुन्हा माहेरपण संपून सासरी निघालेल्या  शहाण्या लेकीसारखी परत फिरते. परततांना शंख शिंपली पखरण झालेली असते..मी उठून त्या वेचते... त्याच वेळी त्याच क्षणी मनाचं तळघर शिंपला अलगद उघडतो...कित्येक गोष्टी मनाच्या या तळघरात बंद असतात... किती स्वगतं, किती गप्पा, कित्ती स्पर्श, कित्ती आंदोलनं ... सारं सारं मोकळं होतं. .... एखादया खजिन्यासारखं... एकदा मायेनं आंजरून गोंजारून भिरकावून देते मी सारं त्या अथांग समुद्रात. काही क्षणांच्या या तपश्चर्येतून मणामणाचं ओझं मी रीतं केलेलं असतं.
              खूप चमत्कार अशक्य अफाट गोष्टही करेल नक्कीच मानव.. पण सोडून देणं जमेल का ? निसर्गातील प्रत्येक घटक राखून ठेवत नाही काहीच .. झाडे फळे फुले देतातच ना!.. परततांना मी कोरी असते.. सारं आहे नाही ते अवयवांचं गाठोडं गुंडाळून एक अनामिक शक्ती सह परत फिरते माझ्या जगात....इथं मी कुणिकुणी होत जाते मग....लेक आई पत्नी...नटवत जाते स्वतः ला नव्याने नात्यांच्या वस्त्रात......मात्र ती एक संध्याकाळ आधीच आत्म्याच्या गर्भरेशमी पदरावर आनंदाचा मोर विणून गेलेली असते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

ललित लेख 2

पहिली भेट

            गाभूळलेल्या चिंचा खोल खोल आत अलगद चिंचोके धरू लागल्या ते दिवस.पाडावरच्या कैऱ्या जिभेला आंबट चटक लावू लागल्या ते दिवस... पूर्वेच्या गालांवर पहाटे पहाटे लाल गुलाबी लालीचे रंग चढत जावे.. अन दिनकराच्या येण्याची चाहूल लागावी .. तशी आरक्त लालीमा गालांवर उमटू लागली होती. देहाची मोगऱ्याची टपोरी कळी नी मनाचं हे एव्हढं भलं मोठं सूप झालं होतं..... "आनंद पोटात माझ्या मावेना "असं का म्हणतात बरे? ह्याची प्रचिती हळूहळू आतल्या धडपडीनं मिळू लागलेली.निसर्गाच्या आदिम सृजनाचा आविष्कार प्रत्यक्ष प्रकटला. झाडावर फळ येणं, मांजरीला पिल्लं होणं, चिमणीनं काड्या जोडून केलेल्या घरट्यात अंडी घालून उबवित बसणं ... ह्या साऱ्या सृजन सोहळ्याचं साक्षीदार असणं निराळं अन प्रत्यक्ष स्वतः च्याच निखालस शुद्ध वारश्याच्या dna च्या गुंफणी जोडून एक सजीव निर्माण करणं ... केवळ शब्दातीत असतं.
              निसर्गातील एक सजीव घटक म्हणून स्वतः ची इवली रूपे निर्माण करण्याचा, जे आयुष्याचे तुकडे विस्मृतीत गेले आहेत ते जोडत जाऊन कोलाज करण्याचा हा प्रवास....विज्ञानानं कितीही गुंतागुंतीची उकल करू देत ... अपत्य जन्म मी ईश्वराचा प्रसाद मानते.... प्रसाद अघोऱ्यागत पुन्हा पुन्हा हात पुढे करून मागायचा नसतो. जो मिळेल जसा मिळेल तेच परम भाग्य.ह्या साऱ्या विचारांचं पीक मनाच्या तळात डौलानं डुलत होतं... तरीही स्वार्थाचा कोयता सपासप कापत गेलाच.
             एकच मूल हवंय तर तो मुलगाच असावा नाही का? मुलगा व्हावासा वाटण यात गैर ते काय? मुलगी नको कुठं म्हणतेय मी... निलाजऱ्या स्पष्टींकरणाचा वणवा .. उभं पीक डोळ्यादेखत जळून गेलं . कुठंतरी आदिम मातृत्वशक्तीची उपासक माझ्यातली माता गमावून स्वार्थानं अंतर्बाह्य लिडबीडलेली माणूस  झाले मी... आता माझे डोहाळे पुल्लिंगी होऊ लागले... लाडू, आंबा, पेढा.....चकली, करंजी मात्र नकोच मला. जुन्या जाणतेपणाची शाल पांघरलेल्या पण त्याआड आयुष्याचे कटू धडे गिरविलेल्या बाई बापाड्या मुलगाच होईल ची भविष्यवाणी करू लागल्या... अन मनात कुठंतरी उगाचच पाच तोळ्यांच्या पाटल्या घडवायला दिल्याचे भाव तरळून गेले. विनोदी वाटेलही ऐकायला पण एव्हाना मी  देवघरातील केवळ साऱ्या पुरुष देवतांना हात जोडीत असे... बाळकृष्णा धाव रे !.. प्रभू रामराया पाव रे! दासबोध हा ग्रंथ वाचायला घेतला गीता नको ... करण तो दासबोध आणि ती गीता 🤦🏻‍♀ एखादया गर्भश्रीमंत बाईंन चार दीन दुबळ्यांच्या माना पिरागाळून  जमवलेल्या संपत्तीने दागिने घडवून नखशिखांत नटावे ... तसे माझे निर्लज्ज विचार मीच समर्थन देत दिमाखात मिरवीत होते.
                   मातीत रुजणारा प्रत्येक अंकुर डेरेदार झाडाचं फळ फुलांच्या बहराचं स्वप्न उरात साठवत असतो... मी देखील  स्वप्न साठवत होते...  ते वृक्षाच होतं की नाही माहीत! पण फळांच मात्र होतं. मनाची घोडदौड कित्येक मैल सुसाट निघाली... कार्यप्रसंगात एखाद्या जगज्जेत्याच्या तोऱ्यात वावरणारी मी मुलाची आई होते नाकावरचा ओसंडून वाहणारा रुबाब किंचित सावरत मोत्याची ठसठशीत नथ... मी कुणीतरी खास असायला हवं होती अन ती धन्यता एक पुल्लिंगी जीव जन्माला घालून मिळणार होती.
            काही क्षण असेही असतात आयुष्यात की मन आणि बुद्धी यांच्या परस्पर सामंजस्याच बंधन नष्ट होत. बुद्धीचा वायूवेग मनाचा अग्नी यात .. मन तीव्र होत जातं.. अग्नी वाऱ्याच्या आटोक्याबाहेर जातो अन एकच वणवा भडकतो.... हा वणवा केवळ एकच शक्ती विझवू शकते... सद्विचारांची, सुसंस्कारांची शीतल वर्षा. पण तुमच्या मनावर कोरलेल्या स्वार्थाच्या लेण्यांपुढे हे  पंगू झालेले सद्विचार गुडघे टेकवतात.
               नवनिर्मितीचा आनंद एखाद्या कलाकाराला विचारा.. कलाकृती कल्पनेतून प्रत्यक्षात उतरेपर्यंतचा जो काळ असतो तो काळ सर्वाधिक सुखावह असतो..उरातल्या कल्पनेच्या बीजाला धुमार्यांची इवली पालवी फुटलेली असते.. ते रोप सावकाश उपटून प्रत्यक्ष जगाच्या कुंडीत रुजवायचा असते... एकदा ते रुजले, वाढले ,बहरले की आपण अन त्याच अस्तित्व विलग होत जातं.... हे असं अगदी इतकंच मानवाच्या बाबतीत का शक्य होत नसावं?  निर्मितीचा आनंद सगळ्यात मोठा .. तो गमावून बसलो तर दोन्ही हात रिकामेच ... मानवा व्यतिरिक्त प्रत्येक सजीव हा आनंद निर्भेळ, निष्पाप, स्वार्थरहीत मनानं उपभोगत असतो... पक्षी घरट्यातल्या पिलांना चोचीन भरवतात तेव्हा तो पक्षी आहे की पक्षीण .. ह्या भविष्याशी त्यांचे घेणे देणे नसते. गाय वासराला मोठया मायेनं चाटत असते.. कधीतरी लंगड वासरू जन्म घेत.. मात्र त्या आईची माया आटत नाही. माकडाचं पिल्लू विजेच्या तारांचा धक्का लागून मरतं त्या माकडीणीचा आकांत असह्य असतो.मधमाश्या सोडून गेल्यावर बोडक पोळं उरतं तसं भावनांचं बोचरेपण संपलेल्या माणसाचं आईपण संपलय की काय? भविष्याचे मनोरे बांधत , दिखाऊ प्रतिष्ठेचे बुरुज त्या मनोऱ्यावर चढवत... निसर्गदत्त अलौकिक आईपण त्या इमल्या च्या तळाशी कुठंतरी गाडून टाकलेलं असतं. मग त्या मनोऱ्यांवर दिमाखदार चौकटी म्हणून आपण म्हणतो, "मुलगा व्हावासा वाटणं यात गैर ते काय? जगाचा नियम नव्हे का तो?" मुळात बाळ व्हावसं  वाटायला हवं तिथं आदिमायेची कवाड बंद करून टाकतो आपण.
                 एक इवला जीव कणभराचा मणभर करतांना काय असा तो फरक पडतो .. त्याच्या तो किंवा ती असण्याचा. दोहोंचा पान्हा एकच, दुखणी खुपणी जागरण सारखच, बोबडे बोल तेच... तेच मखमली बाहुपाश गळ्यात अन तीच माया काळजात. पिल्लांना उडायला शिकवून त्यांच्यापासून विलग व्हायची प्रक्रिया जमायला हवी नाही का?
            काही तासांचा वेदनांच्या तळाचा खोल खोल प्रवास पार केल्या नंतर मृत्यूच्या दाराला मस्तक टेकवून आलं की आयुष्यातील सर्वाधिक मधुर संगीत ऐकायला मिळत.. बाळाचा पहिला जिवंत असल्याचा पुरावा.. टॅss हा! ही सरगम केवळ परमेशालाच निर्मिता यावी.. .. एखाद्या देखण्या तळ्याच्या काठाशी निष्णात गायकाची भैरवी चढत जावी अन मैफल कधी संपूच नये असे वाटत जावं तसं काहीसं होत जातं. हा क्षण खूप मोठ भावनांचं गाठोडं घेऊन येतो...आनंद जन्माचा,  दुःख वेदनेचं, तृप्ती मातृत्वाची, उत्सुकता चिमण्या जीवाला पाहण्याची, भीती बाळ ठीक असेल ना याची,जबाबदारी आईपण निभावण्याची, ओझं बाईपणातून आईपणाच्या वाटचालीचं .. अश्या साऱ्या परस्परविरोधी भावना मनाच्या रणांगणात तलवार उपसून लढत असतात. आपण सोनेरी खुर्चीत बसलेल्या प्रमुख अतिथी सारखं बघत राहावं...  लढू द्यावं त्यांना मनसोक्त. एका निर्णायक क्षणी आपल्या हातात जगातील सर्वाधिक अमूल्य चषक असतो .. आपलं बाळ. माझ्या ओटीत आदिमाया होती... एका लाथेनं तिनं क्षणार्धात माझे स्वप्नांचे इमले उध्वस्त केले... तोऱ्याच्या नथीचे मोती तटातट गळून पडले. मानाच्या पायघड्या गुंडाळून कोपऱ्यात भिरकावीत मजेत खोडकर हसू पांघरून ती पहुडली होती. तिच्या टपोऱ्या आरस्पानी डोळ्यात डोकावतात मला माझं प्रतिबिंब दिसलं... मनात आलं
प्रतिबिंब तू माझे
रूप अवखळ साजिरे
आकाश माझे झळाळते
तू चांदणे गोजिरे
ओळखीचं हसू तिच्या गालावरच्या खळीतून  डोकावून पाहत होतं .आजही माझ्या मनातल्या अल्बम मध्ये सुरेखश्या दुधाळ चौकटीत हा प्रसंग असाच्या असा मी फ्रेम करून ठेवलाय. तिचा जन्म सणसणीत चपराक होती माझ्यातल्या स्वार्थाच्या विलेपनावर... पुढं कित्येक क्षणांच्या शीतल शुद्ध शिपक्यांनी तिनं ते विलेपन पार धुवून टाकलं. तिनं धावत येऊन हातांची गळा मिठी मारली की  मन कारंजा होत जातं....
हात तुझे ग चांदणझुला हिंदोळे रेशमी
तिची नी माझी पहिली वाहिली भेट मला आदिम निसर्गचक्रातील सृजनाचे खरे खुरे आईपण शिकवून गेलेली.🙏😊

🔏©यशश्री रहाळकर
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!