फॉलोअर

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

वेडा गुलमोहर

वेडा गुलमोहर
••••••••••••••••••••••••••••••••••
          उन्हाचा चटका जाणवू लागला की रस्त्याच्या कडेला लांबच लांब पसरलेले लाल मांडव दिसू लागतात... सगळी पाने झटकून लाल केशरी टोप्या मानाने मिरवत दोनचारचं प्रकारची झाडं भर ग्रीष्मात मोहरतात... एक म्हणजे पळस आणि दुसरा हा गुलमोहर. त्यातही पळस एकटा भेटणार माळरानावर ....एकांडा शिलेदार.... गाडीतून वेगानं जातांना ज्वाळाच पेटल्यात दूरवर असा भास व्हावा. मात्र हा गुलमोहर कुठेही भेटतो ... शहरांत, गावांत,शेतात विशेषत्वाने रस्त्याच्या दुतर्फा. हा गुलमोहराचा लाल मांडव मला माहेराची सय देणारा खूप जवळचा वाटतो. माहेरच्या गावचं माणूस भलेही ओळखीचं नसो पण भेट झाली की मनांत माहेर साकारून जातं. काळजावर गुलाबपाणी शिंपडून जातं ना! अगदी तस्स मला दर वेळी गुलमोहराचा बहर पाहताच होतं.
              माझं माहेरचं घर मस्त मोकळं... डोक्यावर गच्ची अन समोर प्रशस्त अंगण.आजूबाजूला फळाफुलांची झाडं अन समोर खेळाचं मैदान ... कुंपणाच्या कडेने मस्त मेंदी,अशोक,डाळींब, सीताफळाची झाडं डवरलेली असतात... दाराशी मोगरा बहरलेला, तगर सदाफुली डोलत बसलेला असतो. देखणा पांढरा नी गुलाबी गुलाब वेड लावत असतो .... आणि या साऱ्यावर कुंपणाच्या कोपऱ्याला गुलमोहर कमरेत किंचित वाकून एखाद्या रखवालदारा सारखा तोऱ्यात उभा असतो.
             खरंतर हा गुलमोहर आम्ही तिथं राहायला येण्याआधी पासून तिथंच होता... शेजारच्या घरातील अंगणात लावलेला... परंतु सत्यभामेचा पारीजात रुक्मिणीच्या अंगणात फुलांची उधळण करीत असे ... तस्सा हा गुलमोहर पूर्णतः झुकला तो आमच्याच अंगणी.पारीजातकाची फुले ठीक आहेत हो! पण गुलमोहर म्हणजे भलता वैताग... प्रचंड कचरा होतो ह्या झाडाचा..शेंगा धरल्या की त्या पडतात,त्याच्या शेंगा पसरट पात्यासारख्या लांब ... आम्ही त्याच्या तलवारी करून युद्ध खेळायचो 😆  शेंगा बऱ्या पण पाने गळतात, फुलांच्या पाकळ्या गळतात एव्हढेच काय देठांच्या काडयाही गळतात.रोज अंगण झाडतांना आई त्या गुलमोहराला शिव्या घाली... गुलमोहर निलाजरा हसत उभा राही... पुन्हा हवेच्या झुळकी सरशी भरपूर कचरा विखरून जाई.त्याला कुणीही पाणी घातले नाही कधी ... खोल खोल जमिनीत शिरून कुठून मिळवायचा कोण जाणे ?.... पण अजून तो तस्साच तगून आहे.
             ह्या झाडाचा आणिक एक त्रास म्हणजे ह्याची फुलं माकडांना प्रचंड आवडतात ... त्यामुळे ह्या झाडावर ऐन उन्हाळ्यात माकडांच्या टोळ्यांच्या टोळ्या येत नी धुडगूस घालीत. माकडेच ती .. आपल्या स्वभावधर्माला जागून प्रचंड हैदोस घालीत... माठ फोड , लोणच्याच्या बरण्या फोड, वाळवणाचे पापड कुरडया पळव, उन्हे दाखवायला ठेवलेले गहू उधळ ...असे उपद्व्याप करून जीव नकोसा करीत. संधी मिळताच ही पूर्वजांची गँग स्वयंपाकघरावर आक्रमण करायची ... मग बटाटे पळव, पोळ्यांचा डबाच्या डबा पळव  असे बरेचदा व्हायचे.. मग त्या त्या घरात खिचडीचे कुकर चढवून क्रुद्ध अन्नपूर्णा देवी माकडांनी आणि पर्यायाने गुलमोहराने कसे जीवन कष्टप्रद केले ?? ह्या विषयावर बोलत असे. एकदा एका माकडाने पोळ्यांचा समजून तिखट मीठाचा डबा (मिसळणाचे पाळे) पळवला ... त्या वेळी मात्र शिक्षा स्वरूप गुलमोहराची छाटणी झाली... पण महिनाभरात तो  पुन्हा डौलात उभा ठाकला. ह्या गुलमोहरावर अगदी दाट पाने असतांनाही कोणत्याच पक्षाचे घरटे कधी दिसले नाही.... न जाणो हा सनकी घरट्यासह भिरकावून द्यायचा कधीतरी ह्याची जाण पक्ष्यांना असावी.
           निसर्ग शिकण्याचा विषय नव्हे तर ती अनुभवातून आत्मसात करण्याची मैफिल आहे असं मला नेहमी वाटतं. माझी लेक 3वर्षांची होती तेव्हाची गोष्ट. ती निसर्गाला हळूहळू आत्मसात करत होती... तिच्या कल्पनेप्रमाणे.... बाहेर पडलो आम्ही की झाडांची ओळख परेड सुरू व्हायची...तिच्या जाणिवांतून तिने झाडाचं बारसं केलं होतं. जस गुढीच झाड (कडुलिंब) आणि कढीच झाड (गोडलिंब).देवाचं झाड (तुळस), तोरणाचं झाड(आंब्याचं), टुचुक झाड (बाभळी टुचुक म्हणजे इंजेक्शन) असे अगम्य पण तर्कपूर्ण नामाभिधान होते. 😄 त्या वयात या जगातील प्रत्येक वस्तू झाडावरच निर्माण होते असा तिचा ठाम विश्वास होता... अगदी कुत्र्याची पिल्ले सुद्धा 😉तिच्या ह्या भाबड्या जगात मी माझं स्वार्थी अप्पलपोटे जग काही क्षण विसरून जायचे. वेडा गुलमोहर हेही तिनेच दिलेले नाव. "हा वेडा बघ उगाच कंबरेत वाकून एकाच बाजूला झुकतोय ना !कंबर दुखेल ना अश्याने " ... रस्त्याच्या बाजूला झुकलेल्या गुलमोहराकडे पाहत एकदा ती म्हणाली....."तो इतरांना सावली द्यायला झुकलाय, थोडं दुखेल पण छान वाटेलं त्याला " ... माझ्यातली संस्कारस्वरूपीणी मातृशक्ती जागी होत म्हणाली.लेक चटकन म्हणाली, " आवडेल मला गुलमोहर व्हायला."
             तुमच्या नाळेतून विचारांचे प्रतिध्वनी तरंग स्वरूपात उमटतात म्हणतात... प्रत्यय आलाच. मलाही लहानपणी त्या गुलमोहराखाली निवांत बसलं की वाटायचं, मी गुलमोहर झालेय... कसलाही हव्यास, अघोरी मत्सर, स्पर्धा सारं त्यागून देतेय. कसलं कौतुक झालं आनंद नाही.. नाही झालं दुःख नाही. जवळचं सारं सारं देऊन वाटून टाकणारा गुलमोहर...कवी ग्रेसांच्या ओळी आठवत ..
झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया
जमणार नाही कदाचित पण आवडेल मला गुलमोहर व्हायला.
🔏©यशश्री रहाळकर
          

८ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर आणि टुचुक भारी tqq तू माझ्यासाठी मला गुलमोहर आवडतो म्हणून हे पाठवलं tq so much dear🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  2. Kitti god lihites yashree asa kahi sundar vachla ki vatat aapn khup kahi muddam visarla chalalo aahe ....

    Shilpa S

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!