फॉलोअर

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

कोsहम् ?


         स्नेहल दोन महिन्यांपूर्वीच सोळा वर्षांची झाली होती.तिच्या बरोबरीच्या मुली केव्हाच वयात आल्या होत्या. हल्ली मुली अगदी बाराव्या तेराव्या वर्षीच वयात येतात. एका दृष्टीने स्नेहलच्या आईला... सीमाला हे बरेच वाटत होते. बाराव्या वर्षी कुठे काही जाण असते हो देहाची? आणि तसेही काही मुली उशिराच वयात येतात... अशी स्वतःची समजूत घालून घेत सीमा निश्चिन्त होती...  मात्र सीमाची धाकटी लेक सोनलची मासिक पाळी सुरू झाली आणि आता मात्र सीमा जराशी चिंतेत पडली.. सोनल जेमतेम बारा वर्षांची... मोठ्या स्नेहलहून चार वर्षांनी लहान... तिच्या शरीरात भराभर होणारे बदल आईच्या चकार नजरेतून सुटले नाहीत. मात्र स्नेहलच्या बाबतीत कसलेच चिन्ह दिसेना, एका कळीचे फूल होण्याच्या प्रवासाची सुरुवात अजून झालीच नव्हती का? , ह्या काळजीने ग्रासल्यावर तिने हा विषय आपला नवरा... संकेतच्या कानावर जरा संकोचानेच घातला. संकेतने विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना लगेचच एका गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन दिली. सीमा आणि स्नेहल डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बसलेल्या असताना त्यांच्या आयुष्यात हाच क्षण मोठे वादळ घेऊन येणार आहे , ह्याची जराही कल्पना त्यांना नव्हती.


     एक साधे सरळ आयुष्य जगणारी सीमा आपल्या छोट्याश्या चौकोनी संसारात खुष होती. नवरा संकेत शाळेत क्लार्क होता. दोघी लेकी ,मोठी स्नेहल दहावीत धाकटी सोनल सहाव्या वर्गात शिकत होत्या. फावल्या वेळात संसाराला मदत म्हणून सीमा शिवणकाम करायची... फार मोठी स्वप्ने नाहीत आणि जगण्याच्या फार गरजाही नाहीत....त्यांच्या लेकी आणि छोटसं घरकुल ह्यातच अवघं विश्व सामावलेलं होतं. सारं काही सुरळीत सुरू होतं पण दुधात मिठाचा खडा पडावा तसं काहीसं झालं.


         डॉक्टरांनी स्नेहलची प्राथमिक तपासणी केली आणि तिची सोनोग्राफी काढून आणायला सांगितले. दोनच दिवसांत पुन्हा मायलेकी रिपोर्ट घेऊन क्लिनिकला हजर झाल्या...  डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सीमा भोवळ येऊन तिथेच पडली. संकेतला फोन करून बोलावून घेण्यात आलं... आणि डॉक्टरांनी त्यांना दोन दिवसांनी पुन्हा भेटून सविस्तर बोलायला सांगितलं.. सीमा दोन दिवस त्याच धक्क्यात होती. संकेतने शेवटी स्वतः डॉक्टरांची भेट घेण्याचा ठरवलं. डॉक्टरांनी शांतपणे स्नेहलचे सोनोग्राफीचे रिपोर्ट पुढे करत सांगितले,


"हे बघा मि. संकेत ... तुमच्या मुलीला स्नेहलला गर्भाशयच नाहीये... म्हणजे जन्मतः काही दोष घेऊन बाळ जन्म घेते त्यातलाच हा एक दोष आहे."


"अहो काय बोलताय काय डॉक्टर तुम्ही?? असे कसे असेल ? आमची स्नेहल अगदी नॉर्मल आहे .. इतके वर्षांत तिला कसलाही त्रास झालेला नाही."

संकेतला भर ए. सीत दरदरून घाम फुटला.


          स्नेहलच्या अजूनही काही तपासण्या करणे आवश्यक आहे. तिची केस प्रचंड रेअर आहे, अगदीच वेगळी आहे.. आपण एका डॉक्टरांच्या एक्स्पर्ट टीमलाच तिचे रिपोर्ट दाखवू ,असेही त्या डॉक्टरांचे म्हणणे होते. दरम्यान अजूनही कुणाकडे रिपोर्ट दाखवून सेकंड ओपिनियन जरूर घ्या.. असेही सांगायला त्या कचरल्या नाहीत. त्या त्यांच्या उत्तरावर ठाम होत्या... स्नेहलला जन्मजात गर्भाशय नव्हतेच. नशीबापुढे हताश झालेला संकेत जड पावलांनी घरी परतला... त्याची आणि सीमाची नजरानजर झाली आणि तिचा बांध फुटला...


"असे हो कसे झाले?? आजवर साधा ताप नाही आला कधी पोरीला... काहीतरी चूक झालीये डॉक्टरांची. आपण .. आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू."


          पुढे काही दिवस दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या डॉक्टरांचेही मत घेण्यात आले. तीन- चार वेळा आतून बाहेरून अशी स्नेहलची सोनोग्राफीही करण्यात आली... ह्या सगळ्या खटाटोपात सत्य बदलणार नव्हते स्नेहलला जन्मजात गर्भाशयच नव्हते. स्नेहल ह्या सगळ्यात बावरून गेली होती... आपल्याकडे काहीतरी नाहीये जे असायला हवं होतं एव्हढंच तिला कळलं. तिच्या पासून सत्य किती दिवस लपवून ठेवणार होती सीमा? शेवटी पुन्हा पहिल्याच डॉक्टरांना गाठून सीमाने पदर पसरला... 


"काहीतरी ट्रीटमेंट असेल ना हो डॉक्टर... काहीतरी करा.."

आईचा भाबडा आशावाद बोलत होता... एव्हाना तिने सगळ्या देवांना साकडं घालून झालं होतं.


डॉक्टरांनी शांतपणे सीमा आणि संकेतशी बोलायला सुरुवात केली..


"आता तुम्ही सावरले आहात असे गृहीत धरून सविस्तर बोलते.... एखादा अवयव जन्मजात नसेल तर तो आपण तयार करू शकत नाही पण हो काही केसेसमध्ये गर्भाशय रोपण यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे... तुमच्या मुलीच्या बाबतीत ती शक्यता पडताळून पाहण्यासाठी आणि अजून अधिक गुंतागुंतीच्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी आपल्याला अधिक तपासण्या कराव्या लागतील... तसेच तज्ञांचे मतही विचारात घ्यावे लागेल.."


आता फार काळ न दवडता, "डॉक्टर सांगतील तसे करूयात" , असे ठरवून दोघे घरी परतले. तिथूनच स्नेहलचा एक प्रचंड थकवणारा प्रवास सुरु झाला... गर्भ फलनाच्या वेळी गुणसूत्रांच्या ज्या जोड्या जुळतात त्यातल्या लिंगनिश्चिती करणाऱ्या गुणसूत्रांच्या जोडीत गोंधळ उडाला की असे होत असावे.... पुढे तीन महिने विविध तपासण्यांचा आणि रोज कुणातरी वेगळ्या डॉक्टरांना भेटण्याच्या चक्रातून स्नेहलची अखेर सुटका झाली. 


          डॉक्टरांच्या एका ग्रुपने स्नेहल आणि तिच्या आईवडिलांसह एक सेशनच घेतले. त्यातल्या तज्ञांच्या मते, स्नेहलची केस जनुकीय अभ्यासकांसाठी एक कोडेच आहे. जगभरात अश्या जवळपास पाच हजार केसेस आहेत ज्या स्त्रियांना जन्मजात गर्भाशयच नाही. बाकी त्यांचे आयुष्य वयात येण्याच्या टप्प्यापर्यंत नॉर्मल होतं. MRKH अर्थात Mayer-Rokitansky-Kuster-Hauser snydrom असे तिच्या समस्येचे क्लिष्ट नाव होते. ह्यात प्रामुख्याने बाह्य अवयवांची वाढ नॉर्मल होत असली तरी शरीरांतर्गत अवयव अविकसित राहतात किंवा नसतातच. हा एक प्रकारचा जेनेटिक डिफेक्ट असून त्याच्या जोडीला एखादी किडनी सुद्धा अविकसित अर्थातच निरुपयोगी असण्याचा धोका असू शकतो. स्नेहलच्या बाबतीत दोन्ही किडनी उत्तम काम करत होत्या पण तिची समस्या त्याहून क्लिष्ट होती. Intersex प्रकारातील 46,XY  असे तिचे मेडिकल भाषेतील निदान होते. अगदी सहज सोप्या भाषेत सांगायचे तर ती अर्धी स्त्री अर्धा पुरुष होती... बाह्य इंद्रिये स्त्री सूचक असली तरी अंतर्गत पुरुष इंद्रिये अविकसित अवस्थेत होती. तिला ओव्हरीज अर्थात अंडकोष नव्हतेच तर त्या ऐवजी अविकसित टेस्टीज , वृषणकोष होते... ही अशी  जनुकीय दोषांची केस काही कोटींत एखादीच ... तिच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना खूप महत्वाचे ठरणार होते. त्यासाठी पालकांची परवानगी मिळावी म्हणून सगळे प्रयत्नशील होते.


सेशनमध्ये डॉक्टरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणाऱ्या सीमाचा शेवटी कडेलोट झाला...


"केव्हाची ऐकतेय मी केस केस , असं संबोधता आहात तुम्ही माझ्या मुलीला. तुमच्यासाठी ती फक्त एक केस असेलही, एक नंबर पण त्याआधी ती जिवंत माणूस आहे हे तुम्ही लोक बहुदा विसरले आहात."


तिच्या संतापापुढे सगळेच जरा वरमले. .. संकेत बापाच्या मायेने विचारता झाला....


"बाकी ती एक निरोगी आयुष्य जगू शकेल ना डॉक्टर..?"


          डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली आणि ते दोघे स्नेहलला घेऊन घरी परतले. एक लढाई नशीबासोबत ते पराभूत होऊन आले होते... दुसरी लढाई समाज नावाच्या राक्षसाशी बाकी होती. सगळे मेडिकल इथिक्स बाजूला ठेवून क्लिनिकच्या स्टाफ पैकी कुणीतरी नाव फोटोनिशी "जेनेटिकल चमत्कार" अश्या सवंग मथळ्याची बातमीच छापून आणली. आता जे काही होणार होतं ते ह्या जेनेटिकल दोषापेक्षाही भयंकर होतं.


          चारचौघात सहज लपून जाईल अशी स्नेहल अचानक चर्चेचा  विषय बनली. आडून आडून चौकशी करणारे शेजारी आता थेट घरात घुसून सांत्वन करू लागले. संकेतलाही कामाच्या ठिकाणी अनंत प्रश्न पडलेल्या लोकांना तोंड द्यावे लागे... त्या सगळ्यांचे साधे सरळ आयुष्य ढवळून निघाले. कुणी तिची कीव करत होतं तर कुणी टिंगल. रोज सोबत शाळेत जाण्याऱ्या, एका बेंचवर बसणाऱ्या मुलींच्या आईंनी त्यांना स्नेहलशी मैत्री तोडायला सांगितली... बिचाऱ्या स्नेहलला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत होता. तिचे भविष्य आता काय ह्या वंचनेत अखंड आईबाबा बुडालेले असायचे , त्याचाही उगाचच एक अपराधी चरा तिच्या काळजावर खोलवर उमटून गेला. आपण नेमके कोण आहोत.. एक स्त्री की एक पुरुष? असा प्रश्न सतत त्या पुरत्या वयातही न आलेल्या मुलीला सतत बेजार करत होता. एकदा शाळेतील मुलींच्या वॉश रुम्सच्या भिंतीवर कुणा टारगट मुलाने ,


"स्नेहल कोण आहे ती की तो?" 


असे खरडून ठेवले आणि तशीच धावत स्नेहल घरी आली. आईच्या मांडीवर स्वतःला झोकून देत कितीतरी वेळ ती रडत होती. तिला कुशीत घेऊन स्नेहलही रडत होती. दुसऱ्या दिवशी एक किन्नरांची टोळी त्यांच्या दारात उभी होती, "ती आमच्यापैकी आहे तिला आमच्या सोबत पाठवा." अशी गळ ते घालू लागले. त्यांचे ते बीभत्स हावभाव आणि टाळ्या बघून स्नेहल भीतीने पांढरी पडली, दुसऱ्या दिवशी तिला सणसणून ताप भरला. सोळा वर्षांचा कोवळा जीव सहन तरी किती करणार? 


           दोन चार दिवस होत नाही तोच एक सो कोल्ड सोशल वर्कर टी व्ही रिपोर्टर आणि कॅमेरा घेऊनच हजर झाले... त्यांना स्नेहलची मुलाखत घ्यायची होती... तिला तिचे जेंडर लिंगभाव निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, ती हवे तर पुरुष होणे स्वीकारू शकते तश्या प्रकारच्या लिंग बदल शस्त्रक्रियेला त्यांची NGO मदत करेल असे काहीबाही ती बरळत होती.


            सीमाने काडकन तिच्या मुस्काटात ठेऊन दिली, आजवर रोखून धरलेल्या सगळ्या हतबलतेचे, निराशेचे रागात रूपांतर झाले होते. स्नेहलला पोटाशी धरत प्रचंड संतापाने ती किंचाळली..


"काय हवंय तुम्हाला ? काय हवंय काय? आता तिचे प्रदर्शन टी व्ही वर मांडायचे आहे का? घ्या काढा फोटो. अरे तुमच्यापेक्षा गुरं बरे रे! एखादे लंगडे वासरू सहज सांभाळून घेतात आणि तुम्ही नावालाच माणसे ... गिधाडे आहात गिधाडे... किती टोचाल ?  किती चोची माराल? नशिबाने आधीच  पाचर मारलेल्या ह्या जीवाला.. कुणी म्हणत प्रयोगाला द्या, कुणी म्हणत मुलाखत द्या... अरे माणूस तरी समजता का तुम्ही तिला??"


सीमाला धाप लागली होती पण ती थांबली नाही ,

"काय फरक पडतोय ती स्त्री आहे की पुरुष की आणखी कुणी.. ? त्या आधी माणूस आहे ना ती.. पिल्लू आहे माझं ते.. हात जोडते मी जगू द्या तिला ..आम्हाला एकटं सोडा."


सीमा धाय मोकलून रडू लागली.


किती अजब असतो ना आपण माणसे... 

आपलं 'तो' किंवा 'ती' कुणीतरी असण्यापेक्षा "माणूस"  असणं आपल्यासाठी इतकं बिनमहत्वाचं का असतं ?

✒️ यशश्री रहाळकर



1 टिप्पणी:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!