आबा गोखले आज तब्बल सहा महिन्यांनी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. त्यांचे वय पंच्याऐंशीच्या वर असावे, नेमके किती? हा वयाचा आकडा मोजणे त्यांनी आताशा बंद केले होते. एव्हढे वय असूनही तसे ते ठणठणीत म्हणावे असेच होते.वयपरत्वे येणारी दुखणी अधून जरा दणका देत होती पण मूळचा मजबूत देह फार काही पडझड व्हायची नाही.. लवकरच ते दुखण्यातून रिकव्हर होत आणि पुन्हा उभे राहत. सावकाशपणे मजबूत पावले टाकीत ते सोसायटीच्या गेटबाहेर पडले . जरा डावीकडे चार आठ पावले चालत गेले की सुरेख गार्डन होत आणि त्याला लागूनच जॉगिंग ट्रॅक... नेहमीच्या बाकावर सिनियर सिटीझन्सचा गप्पांचा अड्डा रंगला होता.. कुणीतरी मोठ्याने हाळी दिली,
"काय म्हणताय आबा ? कसे काय आहात?"
"मी मस्त मजेत!"
सवयीने म्हणत आबांनी ट्रॅक पकडला. कट्ट्यावर बसलेले सगळे आता त्यांच्या लेकाचे सदाचे मित्र.. "एखाद दोन वर्षात सदा बँकेतून निवृत्त होईल आणि तो कदाचित इथे रमेल", त्यांच्या मनात आले. त्यांच्या वयाचे, त्यांचे मित्र म्हणावे असे कुणी आता जिवंत उरले नव्हते. त्यांना बबन आठवला.. त्यांचा जिवलग मित्र.त्याला जाऊनही दोन वर्षे उलटली होती. बबन त्याच्या शेवटच्या दिवसांत अंथरुणाला खिळवून होता. आबांच्या दिवसांतून दोन चकरा तरी त्याच्याकडे व्हायच्याच.. कधी त्याला पुस्तक वाचून दाखव कधी जुन्या आठवणींची उजळणी तर कधी कुमार गंधर्वांची गाणी..त्याला वेदना असह्य झाल्या की तो म्हणत असे ,
"आबा तुझ्या त्या देवाला सांग बाबा .. मला काही स्वर्ग नको बोलाव म्हणा आता.. थकलो रे!"
आबा कसनुस हसत म्हणायचे,
"बबन ,त्याने श्वास मोजून पाठवलेले असतात. बाबारे! त्या आधी सुटका नसते."
एके रात्री बबन गेला सुटला बिचारा. बबन, संजू, अण्णा, रामेश्वर सगळे होते तेव्हा ह्याच बाकांवर आपल्या कसल्या गप्पा रंगायच्या. राजकारणावर तर कडाडून वाद होत मग टपरीवर चहा प्यायला जायचे.. "जगण्यात गंमत होती नाही!" आबा पुन्हा एकदा स्वतःशीच बोलले हल्ली ते स्वतःशीच फार बोलत तेही मनातल्या मनात. जेमतेम एका राऊंडमध्ये आबांना धाप लागली त्यांनी बाकावर बसून घेतले. बाकावर त्यांचा नावडता विषय सुरू होता "घरातील वयस्कर व्यक्तींमुळे झालेली पंचाईत" ह्या विषयावर बोलणारा कुणीही तरुण राहिलेला नव्हता पण त्यांच्याहूनही अधिक वयाचे दीर्घायु मायबाप जिवंत असलेल्यांची पार गोची झाली होती. आपण जणू तिथे नाहीच आहोत अश्याप्रकारे आबांनी बसून घेतले, कानावर पडणारे आत झिरपू द्यायचे नसते हा अलिखित नियम त्यांच्या वाढत्या वयाने त्यांना शिकवला होता.
कुणाच्यातरी वडिलांनी खोलीचे दार लावून घेतले. बराच वेळ न उघडल्याने काळजी वाटून मुलाने फायर ब्रिग्रेडला बोलावून बाल्कनीतून आत शिरून दार तोडले. एव्हढा गोंधळ झाल्यानंतर लक्षात आले की म्हातारबुवा फक्त गाढ झोपले होते. "लेका तुला काय बापाचे प्रेत दिसेल अशी अपेक्षा होती की काय?" नेहमीसारखे आबा मनातल्या मनात स्वतःशी बोलले. कुणाच्या तरी नव्वदीच्या मातोश्री जिना चढून वर तर गेल्या पण त्यांना खाली उतरताच येईना. आता पासष्टीच्या मुलाने काय करावे तोच म्हातारा झालाय तो उचलेल तरी कसा? मग चक्क चार माणसे बोलावून मातोश्रींना उचलून खाली आणण्यात आले. "बघा गडयांनो जिवंतपणीच चार माणसे बोलवावी लागली." बोलणारा हसला तो दुःखानी, त्राग्यानी की उपहासानी? आबांना प्रश्न पडला. कुणाला आता रिटायर्ड झाल्यानंतर वडिलांच्या आजारपणाचा खर्च परवडत नव्हता, कुणाला परदेशातील लेकाकडे जायचे होते पण वयस्कर आईवडिलांमुळे अडकून पडायला झाले होते. कुणाला नातवंडांसोबत राहता येत नव्हते, कुणाला लेकीच्या बाळंतपणाला जाता येणार नव्हते, कुणी सेवा करकरून थकले होते तर कुणी स्वतःचे दुखणे सांभाळू की आईवडिलांचे ह्या विवंचनेत होते. होता होता विषय उपासनी जोडप्यावर सरकला आणि आबांच्या अंगावर सरसरून काटा आला. कोविडच्या दुसऱ्या लाटेत साठीचे उपासनी पतिपत्नी एकाच दिवशी गेले मात्र नव्वदीच्या घरातले उपासनी आजीआबा ठणठणीत होते. त्यांचे दुःख आठवले आणि आबा अंतर्बाह्य थरथरले. एव्हढ्यात कुणाच्या तरी ते लक्षात आले असावे.. हा विषय नको असे कुणीतरी खुणेनेच सुचवले.
आबा थरथरत उठले आणि घराकडे निघाले. आता त्यांच्या पायातले त्राण जणूकाही कुणीतरी काढून घेतले होते. हळूहळू एकेक पाऊल उचलत ते चालू लागले. नंदकिशोर उपासनी आणि आबा गोखले सख्खे शेजारी गेली कित्येक वर्षे एकमेकांच्या साथीने सुख दुःख वाटून घेतलेले. त्यांना अनेकदा भेटावेसे वाटूनही अगदी एका भिंतीआड जाणे आबांना नकोसे वाटत होते. "किशोरला कोणत्या तोंडाने भेटू? देवा रे! मी जगून काय करतोय?" अतीव दुःखाने आबांचे डोळे झरझर वाहू लागले. ते घरी पोहोचताच स्पृहाच्या लगेच लक्षात आले की आबांचे काहीतरी बिनसले असावे. त्यांना पाण्याचे भांडे देत ती सहजपणे म्हणाली,
"बरं वाटलं का आप्पा? कित्ती दिवसांनी बाहेर पडलात ना!"
तिला काहीच उत्तर न देता आबांनी पेपर हातात धरला आता तोही वाचवेना. "जरा पडतो.." म्हणून ते त्यांच्या खोलीत आडवे झाले. समोरच्या भिंतीवर संपदाचा, त्यांच्या पत्नीचा हसरा गोड फोटो होता. त्याला चढवलेला चंदनाचा हार मात्र त्यांना अजूनही बोचला. संपदाला जाऊनही वीसेक वर्षे झाली होती.. वटपौर्णिमेचा दिवस होता, नेहमीप्रमाणे मनापासून तयार होत नथ घालून पूजेला निघालेल्या संपदाला आबांनी मोगऱ्याचा गजरा दिला.. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं. वडाच्या पूजेला गेलेली संपदा तिथेच कोसळली, ते अखेरचीच. दवाखान्यात नेण्याजोगे सुद्धा काही उरले नव्हते. भेटायला येणारे सगळे म्हणत होते आबांच्या पत्नी किती पुण्यवान!.. आणि आबांचे मन मात्र स्वतःला कोसत होते.. एकटेपणाचे ओझे दिसते तितके हलके नसते.. जो उचलतो त्याचे त्यालाच ठाऊक. आबांचा आणि तिचा संसार अत्यंत सुखाचा होता दोघे जणू एकमेकांत विरघळून गेले होते. दोन मुलींच्या पाठीवर सदानंदाचा जन्म, मुलींचे सुस्थळी लग्न, सदाला बँकेत उत्तम नोकरी, अतिशय प्रेमळ सुस्वभावी सून स्पृहा आणि नातवंडे .. आयुष्य म्हणजे नुसते आनंदी आनंद.आता तर थोरल्या लेकीला नातवंड झाले होते म्हणजे ते पणजोबा सुद्धा झाले. आता सुखासुखी डोळे मिटावेत एव्हढेच त्यांना वाटत असे. दर वेळी दुखण्याने जायबंदी झाले की ते आपल्या पत्नीला म्हणत,
"अहो!किती दिवस असा एकटा राहू मी? बोलावून घ्या आता तुमच्याकडे"
पण दर दुखण्यातून अत्यंत आश्चर्यकारकरीत्या ते बरे होत आणि घरी परत येत. तशी घरी कसली उणीव नव्हती त्यांची खोली सुसज्ज होती .. टीव्ही एसी , लेकींशी खास गप्पा मारायला फोन , पुस्तके अगदी गरज पडली तर दिमतीला माणूस सुद्धा ठेवला जाई. लेक सून मायेने , न कंटाळता त्यांची काळजी घ्यायचे. दोन्ही नातवंडे अमेरीकेत स्थायिक झालेली.. असे सगळे आलबेल असूनही आबांना आताश्या जगण्याचा कंटाळा आला होता. सगळ्यात जास्त भीती त्यांना वाटायची ती,
"आपल्या घरच्यांना आपला कंटाळा तर नाही ना येणार?"
सदानंद बँकेत मोठ्या हुद्द्यावर, त्यात लॉक डाऊनमध्ये बँका सुरूच होत्या. सगळी काळजी घेऊनही कसा कोण जाणे एक दिवस सदाला ताप भरला.. दोन दिवसांत घरातले सगळेच कोविड पोझिटिव्ह निघाले. चार सहा दिवसांत आबांना धाप लागू लागली अखेर ऍडमिट करावेच लागले. पुढे जवळपास बावीस दिवस आबा व्हेंटिलेटरवर होते. ते जिवंत परतणार नाहीत अशी अटकळ असताना ते एकेदिवशी शुद्धीवर आले आणि बरे होऊन घरी परतले. स्पृहा आणि सदाला सुद्धा आपले परत येणे अपेक्षित नसावे, त्यांना उगाच वाईट वाटले. सदा आणि स्पृहा सुद्धा जवळपास आठ दिवस ऍडमिट असल्याचे त्यांना कळताच आपल्यापायी पोरांना किती त्रास झाला असेल ह्याची खंत त्यांना पोखरून गेली.ह्या सगळ्या अवघड काळात सोसायटीतील सगळे लोक जमेल तशी मदत करत होते . डबे देणे, औषधे आणून देणे, ऍडमिट कुठे करता येईल ह्याची, ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करणे सारे सारे शेजारच्या लोकांनी केले. नंदकिशोर उपासनींच्या कुटुंबाशी त्यांचा विशेष स्नेह. आबा आणि सदाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी, बेड मिळावा, ऑक्सिजन मिळावा म्हणून त्यांनीच तर केव्हढी धावपळ केली होती. उपासनींचा लेक सदापेक्षा चारपाच वर्षे मोठा. एका सकाळी ती दुर्दैवी बातमी आली सकाळी आठ वाजता उपासनींची सुनबाई तर दहा वाजता लेक कोविडच्या लाटेने गिळला होता. बाहेरगावी असणारी दोन्ही नातवंडे कशीबशी परत आली आणि जेमतेम विधी पूर्ण करून परतली सुद्धा .आता घरात उरलेले दोन दुर्दैवी जीव नंदकिशोर आणि त्याची पत्नी.. रोज आपण जिवंत असल्याच्या वेदनेने मरत होते. नव्वदीच्या आतबाहेर असणाऱ्या मायबापाला साठीच्या लेकसुनेची तिरडी उचलावी लागली होती ह्यापेक्षा जास्त दुर्दैवी कदाचित कुणीच नसेल. त्यांचा तो विलाप पाहून आबांनी अंथरूण धरलं होतं.. काही महिने आबा गलितगात्र होते पण नेहमीप्रमाणे निलाजऱ्या वठलेल्या खोडागत त्यांना पुन्हा एकदा जीवनाची पालवी फुटली. ह्या घटनेला काही महिने उलटून गेले पण अजूनही आबांना उपासनींना भेटण्याची भीती वाटत होती. न जाणो ते म्हणतील..
"कोविडमध्ये हा मसणात गौऱ्या गेलेला म्हातारा जिवंत राहिला आणि आमची त्याच्या अर्ध्या वयाची धडधाकट मुले गेली."
उपासनींचा मुलगा आणि सुनेच्या मृत्यूला केवळ दुर्दैव एव्हढेच एक कारण म्हणता येऊ शकले असते. आबांचा तसा थेट संबंध नसूनही त्यांना अपराधी वाटत असायचे. उपासनींची आठवण जरी कुणी काढली तरी आबांचा गळा भरून येई , छातीवर दडपण जाणवे.. एक विलक्षण घुसमट त्यांना गुदमरून टाकत असे. उपासनी हल्ली कुठेच बाहेर पडत नसावेत.. घरकामाला दोन माणसे नातवंडे लावून गेली होती.दूधाची पिशवी बाहेर लटकवली असायची ती बरेचदा दिवसभर तशीच लटकत असायची. अनेकदा भेटीला म्हणून त्या दिशेला वळवलेले पाऊल आबा पुन्हा माघारी फिरवत. आपण भेटीला जायला हवे, असे अगदी मनापासून वाटूनही भेट घेणे ते टाळत गेले. ह्या टाळण्याने कदाचित त्यांची घुसमट वाढत गेली. त्यांच्या लेकाच्या सदाच्या हे जरासे लक्षात आले असावे त्याने थेट विषयाला हात घालत म्हटले देखील,
"आबा एकदा भेटून या उपासनी काकांना तुम्हाला मोकळे वाटेल. कुणाचे मरण कुणाच्या हातात असते का? ज्याची वेळ येईल तो जातोच त्याला कुणीही अडवू शकत नाही."
उत्तरादाखल आबांनी होकारार्थी मान हलवली. आज जेवण झाले की कसेही करून भेटीला जायचेच त्यांनी निश्चित केले. जेमतेम आमटी भात चिवडून ते उठले जड पावलांनी ते शेजारच्या घरापर्यंत पोहोचले.. एव्हढेशे अंतर पण किती जड झाली होती पावले.. दाटून आलेला आवंढा गिळत त्यांनी दारावरची बेल दाबली.कामवालीने दार उघडून त्यांना बसा म्हटले आणि पाण्याचे भांडे पुढे केले.आतल्या खोलीतून संथ पावले टाकीत नंदकिशोर उपासनी बाहेर आले.. "बापरे! नुसता हाडांचा सापळा उरलाय हा" आबा मनात म्हणाले. दोन मिनिटे निरव शांततेत गेले.. आबांचे डोळे झरझर वाहत होते. एखाद्या अपराध्या सारखे आबा खाली मान घालून बसले होते. क्षणभर दोघांची नजरानजर झाली आणि नंदकिशोरने हंबरडा फोडला..
"आबा आबा! किती उशीर केलास रे भेटीला.. मी तुझी रोज वाट बघत होतो."
आबा शांतपणे उठत त्याच्या शेजारी बसले आणि पाठीवर हात ठेवत म्हणाले..
"किशोर कोणत्या तोंडाने भेटीला येऊ रे! पायात बळ नव्हतं रे! काय सांत्वन करू तुझं मी तरी.."
आबांच्या नजरेला नजर न देता खाली मान घालून किशोर म्हणाले,
"मला वाटलं तुलाही इतरांसारखं वाटलं.. माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या जागी आम्ही दोघे का गेलो नाही? शक्य असते तर तसच नसत का रे केलं? ह्या अश्या जिवंत असण्याला काय अर्थ आहे तूच सांग?"
आबांना कळून चुकलं ही घुसमट आपली एकट्याची नाही.. कदाचित वय वाढलेल्या प्रत्येकाची आहे. माणसाने निरुपयोगी ठरेपर्यंत जगूच नये खरेतर.. दुसऱ्याला आपल्या मरणाची वाट पहायला लावण्यासारखे दुःख नाही. पण त्याहीपेक्षा मोठे दुःख हेच असावे "जिवंत असल्याचे कानकोंडेपण " दुसरा कुणी तसा व्यक्त होत नसेलही पण स्वतःच मन स्वतःला जिवंत असल्याबद्दल गुन्हेगार मानत राहतं... बराच वेळ आबा किशोरच्या पाठीवर हात फिरवत होते.. ही घुसमट कश्यानेच कमी होणार नाही ह्याची खात्री असूनसुद्धा.
✒️यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!