आज अनेक वर्षांनी नाशिकला आजोळी निवांतपणे राहायला आली. मुंबई (मध्य) मध्येच जन्मून वाढलेली आणि आता पस्तिशी गाठलेली मेघना पक्की मुंबईकर... लग्नानंतरही तिथलीच झालेली.... मात्र तिची ती लहानपणची आजोळची ओढ अजूनही तशीच.... तेव्हा उन्हाळी शिबीर वगैरेचे फॅड नसल्याने बहुतेक सुट्टया उन्हाळी असो वा दिवाळी, आजोळीच मस्त मज्जेत जात. मुंबईकरांना पहायलाही न मिळेल इतक्या गाई-गुरं,नदीचं पाणी आणि मंदीरच मंदिरं... तिची आजी 'नानी' अन् तिच्या गोष्टी, मेघना रमून जाई. तिला एक मामा 'सदा' नाव त्याचं, मामी 'माधवी' अन् त्यांना दोन लेक या शिवाय तिची प्रिय नानी अस तिच आजोळ. आजोबा मेघनाच्या आईच्या अगदी लहानपणीच वारलेले.. सदा मामा अन् त्याची मुले पौरोहित्य अन् किराणा दुकान, पूजा साहित्य असे पारंपारीक व्यवसाय करत. सगळे समाधानी ,आनंदी लोक. नेहमीच मोठ्या उत्साहाने, प्रेमाने तिचे स्वागत होत असे.
आज जवळजवळ आठ वर्षांनी ती नानीकडे निवांत आलेली.. दारातच नानीने तुकडा पाणी ओवाळून टाकले. कोडकौतुक , भेटीगाठी अन् प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजून निघाल्यानंतर बंगळीवर बसत ती म्हणाली,
"बरेच बदल केलेत ग वाड्यात, नवा झाला अगदी! पण बंगळी मात्र तशीच आहे ना ग नानी ?"
"चितळे बाई... अधून मधून पाय लागू द्यात गरीबाच्या घराला"
म्हणत मामानं टपली मारली.राजू-विजू मामाचे लेक, एक पटकन बॅग घेऊन गेला अन् एक मस्त चहाचे कप घेऊन आला. पाठोपाठ मामी पोहे घेऊन आली. ख्याली खुशाली झाल्यावर नानी सगळ्यांना म्हणाली ...
"ती माझ्याशी गप्पा मारायला आलीए हो! तुम्ही सगळे लागा कामाला. आम्हा दोघी मैत्रिणींना जरा निवांतपणा द्या बघू."
पडत्या फळाची आज्ञा मानून जो तो आपल्या वाटेला पळाला. नानी तशी कडक अन् जरबेची बाई फक्त माझ्यासाठी ती "ए नानी" माझी Best friend. अगदी हृदयस्थ गप्पा आम्ही एकमेकींशी मारायचो... तसा आठवड्याला एखाद/दुसरा फोन मेघना करायची नानीला... पण प्रत्यक्ष गप्पांची सर का येते त्याला ?
गप्पांची गाडी मेघनाची नोकरी, मुलगा, त्याचा अभ्यास, जावईबापू, मेघनाचे आई बाबा, सदा मामा, राजू विजू, माधवी असा अगदी संपूर्ण प्रवास करून आली. या सगळ्या गप्पांच्या नादात रात्र कधी झाली कळलही नाही. मामीने दिवे लावले अन् ...
"गप्पांनीच पोट भरलं की जेवायचय"
म्हणत हाक मारली.
"आले आले!"
म्हणत दोघीही आत वळल्या. बाहेरूनच नाही तर आतूनही घराचा चेहरामोहरा पार बदलून गेलेला मेघनाला जाणवला. डायनिंग टेबलवर मामीनं पानं मांडली होती अन् घर अगदी नवं... तिच्या घरासारखं काहीसं आहे, हे नाही आपलं आजोळ, तिला सर्रकन जाणवून गेलं.
"विजूss बापट आबोबांना डबा दिला काय रे?"
असं विचारत नानी जेवू लागली. अगदी पारंपारीक जेवण नेहमीचंच चटण्या, कोशिंबीरी, दही भात सगळं साग्रसंगीत. मेघना शांतपणे जेवू लागली. राजूविजू जेवणानंतर घर दाखवायला म्हणून घेऊन गेले. त्यांच्या स्वतंत्र attached टॉयलेट बाथरूम आणि सुखसोईच्या खोल्या ,मस्त रंगसंगती ,Wall painting, मामामामीची खोली सुरेख, अद्ययावत किचन, त्यात फूड प्रोसेसर पासून microwave पर्यंत सगळी उपकरणे, अगदी चहाकॉफी मशीन सह नटलेलं. वरती दोन प्रशस्त हॉल, आणि आजूबाजूला नव्याने बनविलेल्या निवासी तेरा ते पंधरा रुम्स. अगदी आनंदान राजू-विजू सारं दाखवत होते, सांगत होते काहीबाही. तोंडदेखल कौतुक करत मेघना विचार करत होती इथे चौसोपी अंगण होतं, इथं कठड्याचा लाकडी जिना, इथं ओसरी तिथे कणगी.... कुठे आहे सगळं ??
सगळ्यात जास्त नवल तिला याचच वाटत होत की नानीने या सगळ्याच्या परवानगी कशी बरे दिली ? नानीची खोली त्याच जागी तशीच होती. काही पेट्या, भिंतीचा तोच पिवळा रंग, आबोबांचा फोटो अन् भलाथोरला सागाचा पलंग. तिथेच जरा टेकते न टेकते तोच आजी तेल घेवून आली. तिची आणि नानीची जुनी सवय भरपूर तेल नानी हळूवारपणे तिच्या केसात जिरवायची.. अगदी लहानपणीपासून. राजू - विजू जाताच नानी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली...
"आजोळ शोधतेस बयो हरवलेलं? तुझी आई तसलीच, अशीच फिरत राहीली घरभर बालपण शोधत."
"तुला ग कस कळल नानी? मनकवडी गं माझी ती "
म्हणत मेघना नानीच्या गळ्यात पडली.
"झाल्या की नाही आजी नातीच्या गुजगोष्टी?"
म्हणत सदा मामा डोकावला. त्याने जुन्या नाशकातील दहीपूलावरून खास लस्सी आणली होती. त्या अगदी नेहमीच्याच स्वादानं तिला मस्त गारेगार वाटलं आतून, मनंही शांत होत गेलं... मग सारेच पांगले अन् तिनही आजच्या गोधडीत गुरगुटून घेतलं.
सकाळी तिला नेहमीच्या सवयीने लवकर जाग आली. कडक आल्याचा चहा होताच आजी म्हणाली,
"चल जरा फिरून येऊ"
मग काय मेघना अन् नानी मागच्या आळीतून निघाल्या. मेघनाला सगळं नविन , ज s रा बदललेलं दिसत होतं. रविवार कारंजाची बरीच जुनी घरे, वाडे बदलून तिथे फ्लॅट झाले होते. काही जुनी दुकाने, बोळा सोडल्यास सारे नवीन... रामकुंड बदललेलं, मंदीर, पायऱ्या, पार बदललेले. अभावितपणे ती म्हणाली ,
“नानी! काय हे? सगळंच पार झपाट्याने बदललं की गं!"
एका मंदीराच्या ओट्यावर थबकत नानीने "बैस" अशी खूण केली.
" आपणही नाही का ग बदललो? मी जख्ख म्हातारी झाले अन् तू कुठे परकरी पोर राहीलीस "
म्हणत नानी टाळी देत हसली. नानीने बोलण्याची लय पकडली की बोलत राही अन् मेघना ते मनापासून ऐकत राही.
"सगळच सतत बदलतच असतं गं राणी! कठीण असतं ते त्याला स्विकारण. आता हेच बघ भुश्याच्या शेगडी आणि लाकडांच्या पितळी बंबापासून सुरु झालेलो आम्ही आज गिझर, गॅस शेगडी, सोलरकुकर ही मज्जेत वापरतो... पण बघ हे सारे सोयीचे लाभदायी बदल आपण माणसं चटाचट स्विकारतोच. वय वाढतं, शरीर थकतं... मग कित्येक गोष्टी पचत नाहीत पण हे ग कुठे स्विकारतो?"
तितक्यात तिच्या दोन मैत्रिणी भेटल्या अन् आजी नातीच्या गप्पांची गाडी त्यांच्याकडे वळली. त्यांचा निरोप घेऊन घराकडे निघाल्या तेव्हा मेघना नानीला मूळ विषयाकडे वळवत म्हणाली..
"तर नानी.. आपला विषय तसाच राहीला बदल"
“अहं! आपला विषय आहे बदलाचा स्वीकार."
एकेक एकेक रस्ता चालत नानी जोशी वाड्यापुढे थबकेली जरा,
"तुला मोहन आणि रेखा आठवतात काय जोशींचे?"
तिने होकारार्थी मान हलवताच... नानी म्हणाली
"तर त्यांची आई, मैत्रिण माझी... पोराच्या लग्नाच्या काळजीने खंगून गेली, गेली मागल्या दिवाळीत. मोहन साधा कारकून बँकेतला ....कळवळून म्हणायचा बापाला.. 'आपण या जागी घर बांधून घेऊ बिल्डर कडून' पण नाही. कुळाचाराचे देव होते घरी कसे नी काय? बाप बधला नाही. या जुनाट वाड्यात पोरगी देईना कुणी. आता दोघे मुंजे राहताहेत... तोंडही बघत नाहीत एकमेकांच.."
मागली आळ ओलांडत दोघी लोणारी गल्ली ओलांडू लागल्या. मेघनाची श्रवणभक्ती चाललेली नुसतीच, मात्र अगदी मनापासून...
“काय असतं ना मेघना, (असे म्हटलं की आजी काहीतरी गुपित सांगते... मेघनाने कान टवकारले) काही बदल माणसाला अगदी नकोसे असतात पण त्याचा योग्य वेळी स्विकार करण म्हणजे माणूस म्हणून जगणं. त्या काळात तुझी आई शिकलो हुशार होती, नोकरी करते म्हणाली, लवकर लग्न करणार नाही म्हणाली... मी स्विकारलं. सदा शिकला नाही, तो लहान असूनही आधी त्याचं लग्न लावून दिलं, त्याला दहा वर्षे मूल नव्हतं... हेही मी स्विकारलं आनंदानं. तुझ्या आईनं एकच मूल बास म्हटलं, हेही मी स्विकारलं.खरंतर, हे सारे बदल माझ्या आयुष्याबद्दलच्या कल्पनेच्या अगदी विरुद्ध होते ... पण मी त्यांना आनंदानं स्विकारलं. आपण बदल करतो वा होतात ते ..पण आपण त्यांचा स्वीकार करावा सहज, मग सारं सोप होऊन बसतं."
एक खोल श्वास घेत ती क्षणभर थबकली...
"कोपऱ्यावरचे बापट.. विनुभाऊ आठवतात ना! तू खेळायचीस ती आरती गं!"
"हं हं आरतीचे आबा ,त्यांचं काय गं ?"
मेघनाने उत्सुकतेने विचारलं..
एक दीर्घ उसासा टाकत नानी सांगू लागली,
"मागच्या पावसाळ्यात त्यांचा जुनाट वाडा पडला.. ढिगाऱ्याखाली त्यांचा लेक ,आरतीचे बाबा सापडून वारले. अठ्याऐंशी वर्षांच्या बापाला साठीच्या लेकाला खांदा द्यावा लागला. वाईट झालं..... खूप वाईट झालं... पण गेली पाच सहा वर्षे तोच लेक घराच्या नूतनीकरणासाठी कोणकोण बिल्डर आणत होता. तेव्हा विनूभाऊ म्हणायचे माझी तिरडी म्हणे याच वाडवडीलांच्या घरात बांधा... आता सून माझा नवरा तुम्ही मारला सांगून निघून गेलीये, कायमची आरतीकडे... विनूभाऊ भ्रमिष्टासारखे फिरतात.पलीकडच्या वाड्यातल्या खोलीत राहतात एकटेच...वाईट वाटतं. आम्ही एकेक जण ठरवून डबे पाठवतो. .... पण काय गं..हे अस जगणं शाप आहे शाप.. "
मेघनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं अन् वाटल .. खरंच, आपली आजी कित्ती दूरदर्शी आहे. तिने मुलं नातवंड साऱ्यांच्या सोयीनं तिचं प्रिय घर, जिथे तिच्या आठवणी होत्या तेही किती सहज बदललं....
मनकवडी नानी हसत म्हणाली,...
"अं हं! मी नाही गं काही बदलले मात्र अडसर न होता स्विकारले बदल... आयुष्यात माणसानं वड व्हावं , बरंका ! बघ तो समोरचा वड, २५० वर्षे उभा आहे. लोक पूजतात त्याला ...का माहितीये ? नव्या पारंब्यांतून तो रुजत जातो, जमिनीत पुन्हा पुन्हा... रुजणं थांबवत नाही, न कंटाळता नव्या नव्या पारंबीतून रूजत जातो.. अधिक खोल. आपणही असंच व्हावं गं... आपल्या घरट्यात ! नवीन नवीन कल्पना ,विचार, साऱ्या नकोशा बदलांचा सहज स्विकार करत राहावा... मग झाड भक्कम होत बरंका आतून... केवळ या पारंब्यामुळे.."
बोलता बोलता घर आलं. अंगणातल्या बंगळीवर बसत नाही तोच नानी कौतुकानं सांगू लागल्या ,
"राजूचे लग्न ठरतेय गो! एवढ्या गप्पात महत्वाचेच विसरले. त्र्यंबकची पौरोहित्य घरात असणारी पोर ...लाघवी आहे, कष्टीक आहे. घेईल सांभाळून साsरं घरातलं... आपला गोतावळा येणारा-जाणारा सारं निभावेल असं वाटतय.... आता सदा अन् माधवी ठरवतील तसे काय ?"
हातात सांजाच्या बश्या घेऊन प्रसन्न चेहऱ्याने मामी पुढे झाली. मामा तिथेच खुर्चीवर टेकला. नानी मामाला म्हणाली,
"सदा माधवीला पैठणी घेणार आहे हो मी लेकाच्या लग्नात, खास येवल्याला कारखान्यात नेऊन विणून घेईन पण तिच्या पसंतीने बरंका! "
मामी मिश्कील हसत म्हणाली ,
"ते नंतर बघूच हो तेव्हाचं तेव्हा... पण लाडक्या नातीला काय खरेदी करणार माहेरपणची... नाही नाही आजोळ पणची ??"
नानी उत्तरली....
"पैठणी कपड्याचे ड्रेसेस मिळतात हल्ली म्हणे..., तेच घेईन म्हणते "
मेघनाला या अजस्त्र वडाची नव्यानं लुकलुकणारी पोपटी पारंबी दिसली.
✒️यशश्री रहाळकर
नेहमीप्रमाणेच सुंदर कथा. खरच सगळ्यांनी बदल स्वीकारले तर कटकटी भांडण होणार नाहीत.
उत्तर द्याहटवाखरंय
उत्तर द्याहटवाहो बदल हे स्वीकारले पाहिजे निसर्ग ही हेच शिकवतो आणि त्यातच आनंद आहे
उत्तर द्याहटवाखरयं
उत्तर द्याहटवा