"छिनाल! रंग फासतेय बघ... बघ...तोंडाला... उद्या बाजारात बसेल. रांडेची अवलाद! तुझ्या आयशीने आमची बदनामी केली ती कमी आहे का ग? आता तू पळून जा यारासोबत...."
आजीच्या तोंडाची तोफ धडधडू लागली आणि मिनूला आपलं नेमकं काय चुकलंय हे कळेनासं झालं... नुकतीच ती कॉलेजला जायला लागली होती, आणि बरोबरीच्या मुलींप्रमाणे एकदा लिपस्टिक लावावे असे तिला वाटले. एका मैत्रिणीने सहज तिला ते लावूनही दिले... कॉलेज संपवून ती घरी आली आणि आजीच्या डोळ्यांत संताप उतरला. आजीच्या शिव्या, तिची चिडचिड आणि एकूणच सगळा त्रागा मिनूवर नसून तिच्या आईवर असतो, हे लक्षात घेण्याइतपत ती आता मोठी झालेली होती. आणि दुसरं असंही की ,"पळून गेलेल्या आईची मुलगी" हे ऐकून ऐकून तिचं मन पुरतं बोथट झालं होतं. मिनू 3 वर्षांची असताना तिची आई कुणाचा तरी हात धरून पळून गेली होती ... म्हणजे तिला तरी हे सगळं असंच वारंवार सांगितलेलं होतं. पुढे कधीही तिची आई तिला भेटली नव्हती, ना पत्र ना फोन ना तिची साधी चौकशी केली कधी.... मिनू भरल्या घरात आपले बाबा, काका-काकू, त्यांचे दोन मुलं आणि आजीसोबत राहत असे पण खरंतर ती मनाने एकटी होती.... सतत तिला झिडकारले जाई, तुच्छतेने हिणवले जाई... ह्या सगळ्यांमागे एकच कारण होतं ,"ती पळून गेलेल्या आईची मुलगी होती" ... घराबाहेरच्या जगातही, अगदी शाळेत घातल्यापासून ते आजवर कुणी कीव केलेली तर कुणी टीका टोमण्यांनी तिला घायाळ केलं होतं. सरळमार्गी मिनू खालमानेने मुकाटपणे आला दिवस ढकलत होती.
मिनूचे बाबा म्हणजे मुखदुर्बळ दुकानदार माणूस.... अंगावर एकच एक ढगळ ड्रेस पार कळकट होईपर्यंत घालायचे, चेहऱ्यावर सतत एक अपराधी, बिचारे भाव. ते मिनूशी फार बोलत नसत पण गाईसारख्या स्नेहार्द दृष्टीने बघायचे... मिनूवर त्यांची माया होती . तिला काही कमी पडू नये म्हणून ते धडपडत असायचे. आजीला न कळू देता बऱ्याच वस्तू, पैसे मिनूला द्यायचे. ह्या माणसाच्या सुखाच्या काही परीभाषा आहेत की नाहीत? आनंद, दुःख वगैरे होते की नाही हे कळायला मार्ग नव्हता. त्यांनी मिनूचा विचार करता दुसरे लग्न केले नव्हते... म्हणजे आजी तरी असं सतत म्हणायची,
"ती बाजारबसवी हे पोरीचं लोढण गळ्यात बांधून गेली आणि माझ्या दिनूने पोरीच्या सुखाकडे पाहून दुसरं लग्नही केलं नाही.... न जाणो सावत्र आई छळ करील पोरीचा! एव्हढं पुरुषाचं काळीज पण त्यालाही पाझर फुटला पण ही आई म्हणावी का चांडाळीण ? खुशाल पोर टाकून पळाली."
'मीनल दिनकर पाचपांडे' ह्या नावाच्या जोडीला मार्कशीटवर 'आईचे नाव' खाली मीनाक्षी हे नाव दिसायचे तेव्हढीच मिनूची आणि आईची ओळख. एकदा तिने बाबांच्या कपाटात अगदी तळात कागदाखाली एक लग्नातील फोटो पाहिला होता त्यात बाबांच्या शेजारी उभी असणारी बाई कदाचित ही मीनाक्षी म्हणजे आपली आई असावी. फोटोवरून तरी बरी असावी दिसायला इतकेच कळत होते. ह्या विषयावर विचारावे तरी कुणाला? "आई" हा शब्द किंवा तिचे नाव सुद्धा घेतले तरी आजी खाऊ की गिळू अश्या नजरेने बघत गरळ ओकायला लागायची. मिनूला मात्र खूप उत्सुकता होती ह्या मीनाक्षी नावाच्या बाईला उर्फ आईला भेटण्याची... कारण ही ती बाई होती जिने मिनूचं आयुष्य तिचा काहीही दोष नसतांना नरक करून टाकलं होतं.
मिनूला कॉलेजला जायला लागून बरोब्बर महिना झाला असेल आजीने तिच्या लग्नाचा घाट घातला. तिच्या बाबांनी चेहऱ्यावर अधिकच केविलवाणा भाव आणत आपली बाजू रेटली,
"लहान आहे पोर अजून! जेमतेम १८ ची तर झालीये... अजून काही वय झाले नाही. शिक्षणात गती आहे तिला डिग्री घेऊ द्या..."
तशी आजी नेहमीच्या कर्णकर्कश आवाजात हातवारे करत फुत्कारली..
"त्या त्या कुळबुडवीचे रक्त आहे ... बघ हो दिनू! माय गेली संसार टाकून, पोरीला कितीसा वेळ लागणार आहे पाऊल वाकडं पडायला... आज ताब्यात आहे तोवर अक्षदा टाकून मोकळा हो!"
मिनूवर कितीही माया असली तरी दिनू गप्प झाला... त्याला त्याची बायको ताब्यात ठेवता आलेली नव्हती... ती पळून गेल्याच्या आगीची धग मिनूसारखी तो सुद्धा सोसत होता. पुरुष म्हणून तो सर्वार्थाने कुचकामी ठरला होता... त्याला साधा एका बाईवर अंकुश ठेवता आलेला नव्हता. तो ज्या समाजात वावरत होता तिथली "पुरुष" ह्या शब्दाची व्याख्या निराळी होती... इथे वर्चस्वाच्या कक्षेत तो सपशेल नापास झाला होता. त्याने एकवेळ बायकोला बेदम मारहाण केली असती तरी ठीक होतं, दुसरी बाई ठेवली असती तरीही चालणार होतं ... पण त्याला त्याचीच बाईल म्हणजे रूढार्थाने त्याची संपत्ती सांभाळता आलेली नव्हती... आता त्याला आवाज कुठे होता बोलायला?
पहायला येणाऱ्या पहिल्याच मुलाशी मिनूचे लग्न ठरले. मुलगा कुठल्याश्या गावातील शाळेत क्लार्क होता. मुलाला आई-वडील कुणीही नव्हते, कोणत्यातरी नातेवाइकांकडे तो वाढला होता. त्याला मिनू पसंत पडली आणि मिनूचे मत विचारात घेण्याची गरज घरच्या मंडळींना वाटली नाही. बाकी , अश्या पळून गेलेल्या आईच्या मुलीला याहून कोणतं चांगलं ठिकाण मिळणार होतं? साध्याच पद्धतीने घरच्याघरी मिनूचे लग्न झाले... पाठवणीच्या वेळी देखिल आजीने मिनूच्या आईचा उद्धार केलाच..
"संसार सुखाचा कर हो! आणि चित्त संसारात असू दे... उठसूठ इकडे यायचे नाही ... लक्षात ठेव! तुझ्या आईने लावलेला कलंक झेलला मी पण तू आता तसलं काही केलंस तर डोळेच मिटेन मी."
मिनलचा नवरा सोपान तसा माणूस म्हणून बरा होता. दोन खणी घरात त्यांचा संसार सुरू झाला...
"तसे आपले बाबा पण माणूस म्हणून बरेच होते की..."
मिनूच्या मनात येऊन जाई.
सोपान अगदी सरळमार्गी, आपण बरं आणि आपलं काम बरं असे जगणारा, फारशी स्वप्ने नसलेला एककल्ली माणूस. त्याने लहानपणापासून पोरकेपणाचे दुःख सहन केले होते..बरीच वर्षे एकट्याने काढली... आता मात्र स्वयंपाकपाणी आणि घरकाम करायचा कंटाळा यायचा त्याला, मग समाजमान्य मार्ग म्हणून लग्नाला उभा राहिला. शेतीवाडी पैसा अडका, आईवडील नसणाऱ्या ह्या पोराला कोण मुलगी देईल?? मिनूला त्याने लगेच होकार दिला आणि लग्न झालेही... त्याची फार मोठी स्वप्ने , फार अपेक्षा नव्हत्याच. कधीमधी मिनूचे बाबा तिच्या भेटीला येऊन जात.... एव्हढाच काय तो बदल होई . बाकी दिवस आला तसा मावळायचा... आणि रात्र...???? कधीतरी उपचार म्हणून नवरा तेही काम उरकून घ्यायचा.... त्यात रंगत नव्हती, उपभोग नव्हता,... आनंद , उन्माद ,चित्कार असे काहीही नव्हते... होता तो एक सपकपणा एकदाचे उरकून घ्यायचे ह्या भावनेतून निर्माण झालेला.... आपण लग्न केलंय तर हे केलंच पाहिजे म्हणून नवरा एक काम असल्यागत उरकायचा, मिनूलाही एकदाचे कर्तव्य करून टाकू म्हणून संपवायचेच असायचे.... दोघांमध्ये संवाद नव्हताच तासन तास दोघे असूनही घरात नीरव शांतता असायची. धुणीभांडी, स्वयंपाक, पाणी भरणे ह्या कामात मिनू स्वतःला बुडवून घ्यायची.
मात्र एक दिवस वादळ घेऊन आला... मिनूचे बाबा सकाळी लवकरच मिनूच्या घरी आले . आपला जावई सोपानला विनंती करत म्हणाले,
"जावई बापू! लेकीला चार दिवस माहेरी नेईन म्हणतोय... लग्न झाल्यापासून नेलेच नाहीये."
सोपानला नकार देण्याचे काही कारणच नव्हते. चार कपडे कोंबून मिनू तयार झाली... बसमध्ये दिनू आपल्या लेकीला बारीक खुसपुष्या आवाजात सांगू लागला...
"तिला तुला भेटायचे आहे. अखेरची इच्छा म्हणून..."
"तिला म्हणजे कोणाला बाबा??"
"मीनाक्षीला ... तुझ्या आईला.."
त्या दोघांमध्ये बसच्या खडखडाटात सुद्धा एक भयाण शांतता पसरली. मिनूला अनेक प्रश्नांचे भेंडोळे बांधत निघाले होते.... ह्या भेटीची तिने कधी कल्पनाच केली नव्हती, असे नाही पण बाबा असे चोरून आपल्याला आईकडे नेतील असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. अनेक गोष्टींसाठी तिला जाब विचारायचा निश्चय करून मिनू शांत बसली.
"अखेरची इच्छा ... म्हणजे आजारी दिसतेय ती."
मिनू मनातच म्हणाली.
अखेर दोघे बाप लेक एका बंगल्यात पोहोचले. गेटवरच्या गार्डने अदबीने त्यांना आत नेले. एका खोलीत ती बसली होती... मीनाक्षी... तिची पळून गेलेली आई. खोलीत फार उजेड नव्हता, त्यात पिवळसर दिवा... ती हुबेहूब फोटोतली होती. गोरा रंग ,टपोरे डोळे, अपरे नाक आणि गालावर गोड खळी. आता जराश्या वयाच्या खुणा जाणवत होत्या आणि ती थोडी थकलेली, फिकुटलेलीही असावी. मात्र चेहरा तेजस्वी आणि आत्मविश्वासाने निथळत होता.
"आपण हिच्यासारखे अजिबातच नाही. रंग रूप सगळे बाबांचेच घेतले की आपण! "
मिनूच्या मनात आले.
दोन क्षण काटकोनावर उभे असणारे ते तिघे आणि भयाण शांतता पसरली... तिने सहेतुक दिनुकडे पाहिले. मिनूला त्या आई नावाच्या अनोळखी बाई जवळ सोडून दिनू "आलोच!" म्हणत खोलीबाहेर पडला. खोलीचे दार उघडून हातात चहाचा ट्रे घेऊन कामवाली आत आली.
"शेवंता ! आता आम्हाला disturbe करू नकोस."
तिने बजावले... आणि पाठोपाठ दार आतून बंद केले.
"बस ना ग तू! अशी अवघडून उभी नकोस राहू."
म्हणत तिने हातानेच खूण करत मिनूला बसायला सांगितले.
मनातून खूप खूप चिडायची इच्छा होत असूनही सवयीने मिनू गप्प बसली. दोन क्षण शांततेत मनाशी काहीतरी जुळवाजुळव करत मीनाक्षी म्हणाली...
"मिनू मी तुझी जन्मदात्री... आई म्हणण्याचा अधिकार मला नाहीये... माहितीये मला."
मिनू तरीही गप्प बसली...
डोळ्यांतले पाणी पुसत मीनाक्षी पुढे म्हणाली...
"मला तुला भेटायचं होतं एकदाच ... शेवटचं. दुसरी काही इच्छा बाकी नाहीये माझी. फक्त तुला डोळे भरून पहायचं आणि कडकडून मिठीत घ्यायचं होतं ग!"
आता मात्र आयुष्यभराच्या संतापाचा लाव्हा ओकत मिनू म्हणाली...
"हे बघा! मला कुणीही आई नाही. ती तेव्हाच माझ्यासाठी मेली जेव्हा ती कुणाचा तरी हात धरून, मला टाकून पळून गेली. त्यानंतरही तिचे भूत मला "पळून गेलेल्या बाईची मुलगी" म्हणत छळत राहिले. बाबांनी मला इथे कश्याला आणलंय मला माहित नाही..."
"तुझा राग अपेक्षित आहेच मला. फक्त तो राग माझी बाजू समजून... किमान ऐकून घेतल्यावर कायम ठेवू शकशील तू??"
मिनू काय उत्तर देणार ? निःशब्द झाली ती.
"मिनू! माझ्यावर विश्वास ठेव ... मी कधीही पळून गेले नव्हते... तुला टाकून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता माझ्यापुढे.... तुला मी लिहिलेली पत्रे, भेटीचा प्रयत्न तुझ्या आजीने तुझ्यापर्यंत पोहोचू दिलाच नाही."
मिनू अविश्वासाने ऐकू लागली. आजवर उठता बसता आपल्याला मिळणारा शिव्यांचा आहेर खरा की अजून काही?? कदाचित आपल्यापुढे मांडलेली बाजू अर्धवट असू शकते.
तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव वाचून मीनाक्षी म्हणाली..
"एक स्त्री म्हणून , एक माणूस म्हणून मला समजून घेशील का?"
मीनाक्षी शून्यात पाहत सांगू लागली..
"तात्या, माझे वडील गेले आणि मामाने माझे लग्न तुझ्या बाबांशी लावून दिले. तुझे बाबा माणूस म्हणून वाईट नव्हते पण जोडीदार म्हणून कमी पडायचे. आमच्या खाजगी आयुष्यात सतत ताण असायचा कारण हे त्यांना आणि मलाही ठाऊक होते की आम्ही एकमेकांना सुखी करू शकत नाही. माझे जगण्याचे आयाम, माझी स्वप्ने आणि माझ्या गरजाही खूप वेगळ्या होत्या... अगदी शारीरिक गरजा सुद्धा... "
क्षणभर विचार करून मीनाक्षी म्हणाली...
"आता तू पुरेशी मोठी झाली आहेस, विवाहित आहेस हे समजून घ्यायला. दिनू सगळ्याच बाबतीत कमी पडत होता... एखादं काम उरकल्यासारखा तो प्रणय पुरा करायचा... मला मात्र त्याहून अधिक हवे होते.. उपाशी होते ग मी. तळमळत असायचे दिवसरात्र... दिनूला हे कळत नव्हते असे नाही पण... पण त्याला आता स्वतःला बदलणे शक्य नसावे. त्यात कधीतरी निसर्गाने संधी साधली. तुझा जन्म झाला... हवासा नक्कीच नव्हता माझ्यापुरता तरी."
मिनूने चमकून पाहिले.. आपला जन्म नकोसा... किती थेट बोलतेय ही?
"मी खरं बोलणार आहे मिनू... माझ्याकडे फार वेळ नाही. ट्युमर माझ्या मेंदुभर पसरला आहे... फारतर एखादा महिना काढता येईल मला..... तर कुठे होतो आपण?? हां! तुझ्या जन्मानंतर आलेल्या पोस्ट पार्टेम डिप्रेशनने मी पुरती खचले. आपल्या समाजाचा एक अलिखित नियम आहे .. संसारी स्त्रीने दागिने , कपडेलत्ते, गाडी बंगला वगैरेंसाठी हट्ट केला तर हरकत नाही. तिने वेगळी चूल मांडली तरी चालेल पण तिने काही गरजांबद्दल ब्र सुद्धा काढायचा नाही. नव्हे कुलीन घरातील बायकांना तश्या गरजाच नसतात... नवऱ्याने एखाद्या भिकाऱ्यापुढे तुकडा फेकावा तसे शरीरसुख झोळीत पाडून घ्यायचे. तो देईल तसे, तो देईल तेव्हढंच."
मिनू अंतर्मुख झाली... असं असू शकतं नक्कीच असू शकतं... एक स्त्री म्हणून तिनेही हेच अनुभवलं होतं का?
"अगदी परकं कुणी कश्याला? माझ्या आईला जेव्हा मी या संदर्भात सांगितलं तेव्हा तिने शिव हरी करत कानावर हात ठेवले. तिच्या मते , काही पुरुष त्या बाबतीत अधिक आक्रमक असतात मग बायकांना ते जीव नकोसा करतात.. तुझा नवरा तसा तर नाही ना! आता तर मुलगीही झालीये म्हणजे पुरुष आहे हे सिद्ध केलंय त्याने... जे जसं सुरू आहे ते तसच राहू दे.... हळूहळू आमचा दोघांचाही प्रणयाचा एकंदर उत्साह मावळला आणि आमचं लग्न केवळ कागदोपत्री उरलं.."
मीनाक्षी क्षणभर थांबली.. समोरचे पाणी ती घटाघटा प्यायली...
"मी महत्वाकांक्षी होते. बँकेच्या परीक्षा देत सहज नोकरी मिळवली... स्वतःच्या पायावर उभी राहिले आणि पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ह्या अश्या निरर्थक 'सुखी संसाराच्या' नाटकातून सुटका करून घ्यायची. एकच अडचण होती त्या वेळी ती म्हणजे तू... तू जन्मली असल्याने मी संसार सोडण्याचा निर्णय कधीही घेणार नाही अशी जवळपास खात्रीच होती दिनू आणि त्याच्या कुटुंबाला..."
अचानक आवेगाने मिनूचे हात हातात घेऊन ती म्हणाली..
"तुझी गुन्हेगार आहे ग मी ... माझा स्वतःचा विचार केला पण तुला पुढे स्वतःकडे ठेवेन, तुझी कस्टडी आई म्हणून मिळवेन असे ठरवले आणि घराबाहेर पडले. मी कुणासोबत पळून गेलेच नव्हते तसे कुणीही स्पेशल माझ्या आयुष्यात तेव्हा नव्हतेच. मी माझ्या मेलेल्या लग्नाला कंटाळून त्यातून बाहेर पडले होते. ... माझी भूक मोठी होती मी उपाशी होते...पोटाबरोबरच आणिक एक भूक असते ग देहाची भूक... काय करणार होते मी तिचे?? माझी ही उपासमार समजून घेण्याइतपत समज, मन किंवा जाणीवाच नव्हत्या कुणाकडे..."
मिनूने शून्य चेहऱ्याने तिचे हात झटकत म्हटलं,
"तुझ्या एका निर्णयामुळे माझं आयुष्य बदलून गेलं... तू ज्या क्षणी मला सोडून दुसरा पर्याय निवडला त्या क्षणी संपलं आपल्यातलं सारं..."
थंडपणे सुस्कारा सोडत मीनाक्षी म्हणाली...
"स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते... बरोबर ना! पण हे कुणी लक्षात का घेत नाही की त्याआधी ती माणूस असते. एक नकोसं आयुष्य, नकोसा जोडीदार आणि संपलेलं लग्न संपवून मी बाहेर पडायचं ठरवलं तर चुकलं कुठे?? तुझ्या आजीने एकप्रकारे ब्लॅकमेल केलं मला ... दिनू डिव्होर्स देईल पण आयुष्यात तुला मुलीला भेटू देणार नाही , अशी कडवट भूमिका घेतली त्यांनी. तुझ्या आणि इतर लोकांच्या मनात मी अगदी शरीरसुखाला उतावीळ बाई आहे, कशी कुणाचा हात धरून पळून गेले वगैरे रंजक कहाण्या रचून रचून सांगत गेली, मला बदनाम करत गेली... ह्या साऱ्या प्रकारांत त्यांनी त्यांचा इगो वाढवत , सुखावत नेला... काहीही करून मी त्यांना शरण यायला हवी होते. पण अखेर आम्ही वेगळे झालोच. माझा सगळा राग तुझ्यावर निघत गेला... मी कोर्टात तुझ्या कस्टडीसाठी अर्ज केला होता पण ही वाईट चालीची बाई आमच्या मुलीला विकून टाकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली..."
मीनाक्षी संतापाने अंतरर्बाह्य थरथरत होती...
"मी तुला भेटू नये, बोलू नये ह्याची सगळी काळजी त्यांनी घेतली. खरं सांगू, पुढे मलाही मनाजोगा जोडीदार मिळाला मी रमले माझ्या जगात, अगदी तुला विसरून पुढे सुद्धा गेले. हे जीवघेणं दुखणं उमळलं आणि आयुष्यातील सगळी पापे भुतांसारखी फेर धरून नाचू लागली.... तुझ्यावर मी अन्याय केलाय, आणि मी त्या ओझ्यातून मोकळी होऊ इच्छिते... मला माफ करशील बेटा?"
हात जोडून आसवे ढाळणाऱ्या मिनाक्षीकडे पाहून मिनूच्या मनात कणव दाटून आली....
"काय दोष होता हिचा आणि काय दोष होता माझा तरी?? एखाद्या व्यक्तीचे माणूस म्हणून अन्न, वस्त्र, निवारा हे जसे मूलभूत अधिकार आहेत तसाच शारीरिक सुख हा अधिकार नाही का?? तिने त्याची निवड केली म्हणून ती वाईट कशी??"
असा विचार करत माणुसकीच्या सहृदय भावनेने तिने आपल्या आईला प्रेमाने जवळ घेतले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. तिचे बाबा नेमके त्याच वेळी दार उघडून आत आले आणि म्हणाले...
"मिनू ! आपल्याला निघायला हवं आता. मी घरी खोटं सांगून आलोय."
त्या परिस्थितीत सुद्धा ह्या बाप नामक बांडगुळाची कीव वाटली मिनूला... ती निश्चयाने म्हणाली,
"जिने आयुष्याच्या प्रवासात माझी साथ सोडली तिला मी सोडू शकत नाही बाबा... मी पुढचे काही दिवस इथेच आईजवळ राहणार आहे.आमच्या खूप गप्पा बाकी आहेत अजून..."
दिनूचा चेहरा अविश्वासाने पांढरा फटक पडला... तो संदिग्ध स्वरांत विचारता झाला..
"आणि जावई बापूंना काय सांगू??"
मिनू आपल्या आईच्या डोळ्यांत डोळे घालून मिश्कीलपणे हसत म्हणाली,
"सांगा मिनू पळून गेली तिच्या पूर्वी पळालेल्या आईसोबत."
✒️यशश्री रहाळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!