फॉलोअर

गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

तिचा चष्मा

💁 तिचा चष्मा
🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
  
             ' ती ' स्वतः कितीही आधुनिक विचारांची आणि कोणत्याही वयाची असू देत   तिच्याच सारख्या कुणा दुसरीकडे पाहण्याचा तिचा एक वेगळाच चष्मा असतो . जाड भिंगाचा ... काळ्या जाड फ्रेमचा नाकावर खूण उमटावी इतका जाडाजूडा ...... आहे ना गम्मत ! बहुदा स्त्रिया अकारण दुसऱ्या स्त्रिला एकतर स्पर्धक मानतात किंवा पायातील वहाण ...आता ह्या "दुसऱ्या स्त्री " गटांत त्यांची लेक , आई ,बहीण मात्र मोडत नाहीत बरका... तर अश्या आप्त म्हणाव्या अश्या चार दोन स्त्रिया सोडल्या तर यच्चयावत स्त्रिया ... " दुसऱ्या " गटांत ..... या दुसऱ्या गटातील स्त्रिचे दुर्गुण?? लक्षात घेऊन कुणा तिसरीपुढे त्यात मसाला घालून मांडण्याचे काम हा चष्मा इमानेइतबारे करीत असतो .
            काल कधी नव्हे ते थंडीत उठून morning walk ला गेले... दोन आजी वयाच्या बायका थोड्या अंतरावर चालत होत्या. त्यांच बोलण कानावर पडत गेलं ... आपोआप ह्म्म .. सुरूवात कालच्या भजनापासून झाली ... चला काहीतरी गोड ऐकायला मिळेल म्हणून मी कान टवकारले तर काय???दीक्षित आजी काल कसे पचपचीत lipstick लावून भजनाला आल्या होत्या ना ! या वयात असली थेरं... बरं दिसतं का?असे म्हणत दुसरीने री ओढत मनातील संतापाचे पाणी घातले ... ... देवाचे नाव घ्यायच्या वेळेला आणि वयाला ह्यांचा विषय काय असावा ?? जरा चष्मा काढून यांनी पाहिले असते तर आवडती भजने , त्यांच्या चाली या मोहक विषयात वेळ गेला असता आणि मन प्रसन्न झाले असते ना! बरेचदा निश्कारण आपण उद्वेग,राग, तीरस्कार ,संताप यांचे गाठोडे वाहत असतो .
        एका मैत्रीणीच्या मस्त रंगलेल्या पार्टीमध्ये ती माझ्या कानाशी खुसफुसली "ती पाहिलीस का? केव्हढा तो गळा पाठीचा " .... माझ्या प्रश्नार्थक बावळट चेहऱ्याकडे पाहून पुन्हा पुटपुटली " अग दोन वर्षापूर्वीच नवरा गेलाय तिचा ...अक्सिडेंटने ... बरं दिसत का हे ?? " आता हे बरं दिसण काय असत हे अजूनही मला कळलेलं नाही . आणि हे कोण ठरवत ?? माझी मैत्रीण ज्या पार्टीची गेले पंधरा दिवस खपून तयारी करतेय ... त्या आनंदाला ती पारखी झाली ती ह्या चष्म्यामुळे .
          आपण कुणाच्याही कोणत्याच समस्येवर खरतर ना तोडगा देउ शकत ना ती सोडवू शकत ..जो तो व्यक्ती आपापल्या परीने लढत असतो . एक स्त्री असूनही आपण कित्येकदा हे समजून घेतच नाही. एक स्त्री दुसऱ्या स्त्रिची शत्रू आहे की नाही माहित नाही पण .... हा चष्मा आपल्याला साधे माणूस म्हणूनही तिच्याकडे पाहू देत नाही. ती नोकरी करते - सासूच्या जिवावर ,ती स्वतःला सुंदर राखतेय - कामच काय तिला दुसरे ?.... ती स्वतंत्रपणे जगतेय - आगावू उधळलेली , ती संसारात तडजोडी करतेय - बावळट कुठली .... प्रत्येकीला आपण धिक्कारत असतो . कशासाठी?? कोणता आनंद मिळतो यातून ?
             हे जग सगुणाचा साक्षात्कार आहे ...या जगात खूप काही जे सुंदर लोभस हवेहवेसे आहे . खूप वैविध्य आहे , खूप अनवट वाटा चालायच्या आहेत ...आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण गुरू करू शकतो ... खूप काही नकळत टिपू शकतो खूप काही शिकू शकतो ... मात्र हा जो तुलनांचा , अकारण तिरस्काराचा चष्मा आहे ना ... तो आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या positive energy गोठवून टाकतो . हळूहळू दुसऱ्या स्त्री मधील चांगले काय ते न टिपता आपण केवळ दोषच आपण पाहू लागतो .
          कधीतरी एखादी स्वतःकडेच या चष्म्यातून पाहू लागते , मग तिला जाणवत राहते तिचे खुजेपण ... ती कशी गोरी आहे मी नाही , ती कशी हुशार आहे मी नाही ती कशी सगळं व्यवस्थित करते , तिच कसं कौतुक होत माझ नाही ... ही नाही नाही ची यादी हळूहळू वाढत जाते .नैराश्य डिप्रेशन या आजाराने  सर्वाधिक स्त्रियाच ग्रस्त आहेत ... याचे कारण बरेचदा हा चष्माच असतो .... आपण निष्कारण दुःखी ,त्रासिक होतो ती चष्म्याचीच कृपा.
           या चष्म्याने एक मात्र होते की दोन स्त्रिया एकमेकींकडे सारख्याच टोकदार भूमिकेतून पाहत असतात ...विचार करा जरा ..किटी /भिशी असू द्या किंवा भजन ,एखादे get together असो वा गाण्याचा कार्यक्रम ... जेव्हढी चर्चा आपण स्त्रिया एखादीच्या चुकांची आणि आपल्या बाजूने दिसणाऱ्या दुर्गुणांची करतो त्याच्या पाव पट तरी आपण एखादीचे गुण किंवा कौतुक करतो का ?? मी स्वतः देखिल बरेचदा याच चष्म्यातून पाहत असते फक्त आताश्या बरेचदा तो काढून ठेवणे हळूहळू मला जमू लागले आहे. एकदा ही सवय लागली ना की काहीतरी चांगल शोधायची सवयच  जडते ,दुसऱ्यांबरोबरच स्वतःमधील देखिल चांगल्या गोष्टी नव्याने गवसू लागतात ...  मन त्याच सुखद आनंद देणाऱ्या चांगल्या बाबींची पुनरावृत्ती करू लागते ... अंतर्बाह्य निर्मळ होते.
           स्वतःच्या मनाला या जगातल्या सगळ्या positive energy साठी खुले करा ... दोन्ही हात पसरवून स्वागत करा अश्या शुद्ध आनंदाचे जो कुणाची रेषा लहान करून , कुणाचा मत्सर करून मिळणारच नाही . 'तिच्या ' कडे पाहतांना कधीतरी चष्मा काढून तिचे बूट घालून बघा... तिला टोचणारे काटे ,झालेल्या जखमा आणि त्यांच्या वेदना एकदा कळल्या ना की तिच्यातले काहीतरी चांगले निश्चित सापडेल.
🔏© यशश्री रहाळकर
      नाशिक
   ८/१२/१८
(लेख आवडल्या जसाच्या तसा नावासह forward करणे म्हणजे Digital सुसंस्कृतपणा होय . 😃)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!