फॉलोअर

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

भोपळ्याचं झाड (भाग 2)

भोपळ्याचं झाड (भाग 2)
पूर्वार्ध 
https://kattayashashri.blogspot.com/2019/02/blog-post_21.html?m=1
                डॉ यथार्थ आचार्य मुळातून हादरले होते . या भाकड कथा नी अंधश्रद्धांवर त्यांचा विश्वास नसला तरी देखिल.... झाडांवर माया करणारा एक प्राध्यापक खंबीर होता पण लेकीच्या मायेनं एक बाप व्याकुळ झाला होता. चेहऱ्याची रेषही न ढळू देता त्यांनी आपला हात तिच्या डोक्यावर ठेवला. स्थिर नजरेनं तिच्याकडे पाहत म्हणाले " वना बाळा फार थकलीयेस तू! जरा आराम कर ...बरं वाटेल. " ते हात धुवायला म्हणून उठले परत येऊन पाहतात तर वना तिथं नव्हतीच.
                 आपण पाहतोय ते खरं की भास क्षणभर कळलेच नाही त्यांना ...हॉटेलच्या पोऱ्यानं तिला बाहेर पडताना पाहिलं होतं.. त्याच दिशेनं पुढे पुढे जात भेटेल त्याला विचारात डॉ. यथार्थ अक्षरशः धावत सुटले. काही क्षणांचाच तेव्हढा फरक ... कुठे असेल वना? त्यांच्या मनात वादळ उभं राहिलं. पत्नीच्या पश्चात प्रेमानं वाढविलेला हा इवला जीव वनश्री त्यांच्या जगण्याचं एकमेव कारण होती. तासाभरात नवीन पाहुणी गायब झाल्याच्या , झाडानी नेल्याच्या कहाण्या गावभर पसरल्या. मदत करणे तर दूरच जो तो डॉ यथार्थना बोल लावू लागला.
                    डॉ यथार्थ गावातली काही जाणती माणसे  घेऊन शोध घेत घेत गावभर हिंडू लागले. हा जत्था गावाच्या दक्षिणेस पोहोचला ... शेवटच्या टोकावरील मोकळ्या उजाड जागी  भग्न वाड्यापाठी ते झाड होतं.त्याखाली असणाऱ्या थडग्याजवळ पुतळ्या सारखी बसलेली वनश्री त्यांना दिसली.... ते मोठमोठ्याने हाका मारू लागले " वना ए वना अग! अशी न सांगता निघून का आलीस.. काय झालं माझं काळजीनं पाहिलेस का? " पण त्यांच्या हाका तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हत्या मुळी.. त्यांनी जाऊन तिला गदागदा हलवत म्हटले .. " पुरे कर हा वेडेपणा .. चल चल बरं आपण घरी जाऊ ."  अचानक ते चपापून मागे सरकले .. त्यांचा विश्वास बसेनासा झाला त्यांच्याच डोळ्यावर ... वनाचे डोळेच काय हळूहळू चेहराही हिरवट होत चालला होता... काय प्रकार आहे हा?? खरंच कमला बाईंनी सांगितल्या प्रमाणे भुताखेताचा प्रकार आहे का? त्यांच्यातील विज्ञानवादी विचारवंताने हतबल होऊन शरणांगती पत्करली होती.
                गढूळून टाकणाऱ्या आर्त आवाजात वनश्री म्हणाली " पपा माझं बोलणं बाकी आहे अजून. ते अपूर्ण सोडून मी कशी येऊ .तुम्ही निघा ..." पाहणारे लोक स्तब्ध झाले होते कुणालाच काय करावे सुचेना . त्या झाडापुढे गुडघे टेकून डॉ यथार्थ बसले हात जोडून विनऊ लागले " मी आयुष्यभर प्रेम केलं झाडांवर ... त्याच हे फळ का ?? काय अपराध आहे माझ्या लेकीचा सोड तिला .. मला घेऊन जा .. Please..." बापाचं काळीज काय असतं हे त्या क्षणी त्यांना उमगलं होतं... शेवटी पुन्हा लेकीकडे वळत त्यांनी घरी चालण्याचा आग्रह सुरू केला..... एव्हढ्यात झाडाची एक फांदी कडकडाट करत मोडली अन थेट त्यांच्या डोक्यात पडली. बेशुद्ध अवस्थेत पुढे काय चालले आहे हेही त्यांना उमजेना.
                मध्यरात्री कधीतरी त्यांना जाग आली तेव्हा ते एका घरात होते ... गावातील काही माणसांनी त्यांना उचलून आणलं असावं.डोक्याला खोक पडली असावी... तिथं पट्टी बांधलेली होती. अचानक ते "वना वना " अश्या हाका मारत उठले.... आजूबाजूला बसलेल्या माणसे त्यांना रोखत म्हणाली " ओ पाव्हनं... कुठं निघाला? तुमाला कसं आनलं उचलून आमचं आमाले म्हैत." माझी लेक माझी लेक म्हणत धावत सुटलेल्या डॉ यथार्थना चार जणांनी बळेच धरून ठेवलं... एक वयस्कर माणूस त्यांच्या जवळ येत म्हणाला " आरं बाबा जीवांनी गेलास तू तर तुझी लेक कोन वाचिवनार?" सारे उमजून ते शांत बसले .देवरूषी ला बोलावणं केलं होतं आता तोच काहीतरी करू शकेल... कुणीतरी त्यांना ते का आणि कशाकरता आले हे विचारलं मग आपल्या झाडांच्या अभ्यासापासून ते कमला बाईंच्या माहिती देण्यापर्यंत सारं त्यांनी सांगून टाकलं .लोकांच्या चर्चा मेलेल्या मनानं ऐकत ते निपचित पडून होते...अचानक त्यांनी विचारलं " मी सुद्धा गेलो होतो ना तिथं  त्या झाडाजवळ .मला कसं काही झालं नाही."प्रश्नार्थक चेहऱ्यानं कुणीतरी दिलेले भांडभर पाणी ते घटाघटा प्यायले.
             आपण कमला बाईंचं ऐकलं असतं तर .... आता काहीतरी केलंच पाहिजे म्हणत त्यांनी मोबाईल काढला पण उपयोग शून्य त्याला रेंज नव्हती..सकाळी गावपाटालाच्या लँड लाईन फोनवरून संपर्क करू शकाल असं आश्वासन गावकीनं दिलं. दिवसभराच्या थकव्यानं आलेला शीण, डोक्यावरचा मार आणि मानसिक ताण या तिन्हींचा एकत्र परीणाम स्वरूप त्यांना बसल्या बसल्याच झोप लागली. स्वप्नात त्यांना वनश्री दिसली पूर्ण हिरवी झालेली सर्वांगाला वेली लपेटून उभी...... तिच्या डोळ्यांत कोणताच भाव नव्हता वेदना नव्हती... त्यांना म्हणाली " पपा ह्या झाडाला मुक्ती द्या . सोडवा त्याला Please... तुम्हीच हे करू शकता ." तेव्हढ्यात देवरूषी आल्याची पुकार झाली अन त्यांचं स्वप्न भंगलं.
क्रमशः...
कथेचा शेवट लवकरच ..
©यशश्री रहाळकर
         नाशिक





२ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!