फॉलोअर

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

अलक :- अती लघु कथा

अलक १ उपाशी
वसुधा नेहमीप्रमाणे ऑफिसमधून परतली... आता घर शांत होते. सकाळी निघण्यापूर्वी सासूबाईंशी झालेले कडाक्याचे भांडण मनात खदखदत होतेच. दाणदाण हातपाय आपटत फ्रेश होत ती स्वयंपाक घराकडे वळली. तिचे आवडते दडपे पोहे आणि वेलची घातलेली कॉफी तयार होती... बाजूला चिठ्ठी ..,"वसू खाऊन घे हो!मी मंदिरातून आले की पुन्हा सकाळचे पूर्ण करू.उपाशी पोटी भांडू नये ना!"वसुधाचे डोळे झरझर झरले आनंद की दुःख ? कोण जाणे?
©यशश्री राहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
अलक २ नमन
लग्नाचा दहावा वाढदिवस .. ती खूप प्रयत्न करूनही सुट्टी घेऊच शकली नाही. नवऱ्याचा उतरलेला चेहरा साठवत ती ऑफिसहून परतली. नेहमीप्रमाणे नवरा आणि मुले जेवायला वाट पाहत होता...ती डोळ्यांत पाणी आणून काही बोलणार इतक्यात फुलांच्या पायघड्या उलगडल्या... औक्षण करतांना नवरा म्हणला "माझे पाय अपघातात गमावल्या नंतर माझे पाय होऊन सारे घर सावरणाऱ्या तुझ्या पायांना माझा नमस्कार"
©यशश्री राहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
अलक ३ एकटी
अजय अनुप्रिताचे लग्न आता ठरल्यात जमा होते... दोघांनी एकमेकांना कॉलेज मध्येच पसंत केले होते ... आता सहा वर्षांनी सारे घरच्यांच्या गाठी भेटी होऊन रीतसर ठरवायला जमले. अजयचे कुटुंब मोठे जरा जुन्या वळणाचे कर्मठ त्यात तो तीन भावांत एकटाच मुलगा ... त्यांना लग्न अगदी पारंपारिक आणि थाटामाटातच व्हायला हवे होते.... अनुप्रिताची आई वैदेहीची साऱ्याला संमती होतीच तिलाही लग्न उत्तम करायचे होतेच...तेव्हढ्यात अनुप्रिता बोलायला उभी राहिली,सगळेच चमकले जरासे.. ती करारी ठामपणे म्हणाली " मला आईनं वडिलांच्या पश्चात एकटीने वाढवलं आहे. माझे सारे लग्नविधी तिचं पार पाडणार एकटी...हे मान्य असेल तरच हे लग्न होईल." वैदेही लेकीकडे पाहत राहिली निःशब्दपणे....
©यशश्री राहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
अलक ४ आयता 
आज कधी नव्हे तर पावसामुळे नेहाला हाफ डे मिळाला . छत्री असूनही ती नखशिखांत भिजली होती, धावतपळतच तिनं घर गाठलं .. हुश्श झालं. सासूबाई नेहमीच्या सिरीयल पाहत होत्या... सासरे पेपर वाचत होते.तिचा नवरा मंदारला आज ऑफ तो गाढ झोपला होता... आता कुणी पटकन चहा दिला तर कित्ती बरं ना! नेहाच्या मनात आलं तिच्या विचारांच तिलाच हसू आलं .. झटपट कपडे बदलून चहाच्या तयारीला लागावे तेव्हढ्यात बेल वाजली. सोसायटीच्या गेट बाहेरील चहाच्या गाडीवरील पोऱ्या होता. .. हातात गरमागरम चहा आणि कांदा भजी. सासऱ्यांच्या चेहऱ्यावरील आठी आणि नेहाच्या चेहऱ्यावरील प्रश्न बाजूला सारत सासूबाईंनी पैसे दिले .नेहाला जवळ बसवून घेतले,चहाचे कप पुढ्यात ठेऊन त्या मस्त निवांत चहाचा आस्वाद घेऊ लागल्या," आज आम्हा दोघींनाही आयता चहा हवा होता" त्या सासऱ्यांना म्हणाल्या. tv वरील सिरियलमधील सासू सुनेला छळत होती.
©यशश्री राहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
अलक ५ सामोसे
"अनुदिनी अनुतापे तापलो रामराया" जरा टिपेच्या आवाजात म्हणत मंदा आजींनी देवाजवळ दिवा अन डोळ्याला पदर लावला. वर वर्षे 82 असले तरी त्या अजूनही उत्तम तब्येत राखून होत्या... चवी ढवीचे फार आवडे त्यांना..खाण्यात त्यांचे फार चित्त होते.नवरा तरुणपणी गेल्यावर माघारी आलेल्या मंदा आजींना दुसरे काही सुख मिळालेच नव्हते. आधी भावाच्या नंतर भाच्याच्या संसारात पडेल ते काम करणारी बाई .. आपण आताशा अडगळ वाटतोय सर्वांना ..त्यांना फार फार वाटे. त्यात गेल्या आठवड्यात पोट बिघडले म्हणून भाचे सुनेनं "जरा वय झालं...तोंडाला कुलूप लावा" असं सांगितलं होतं.बाहेरून येणारा खमंग वास त्यांच्या नाकात भिनला.. "बाळ्याने आज सामोसे आणलेले दिसताहेत! मला मेलीला एखादा द्यावा चवीला" त्यांच्या मनात आले. बराच वेळ झाला कुणी विचारीना शेवटी न राहवून त्याच बाहेर आल्या. सगळ्यांचे सामोसे खाऊन झालेले दिसताच त्यांनी डोळ्याला पदर लावला आणि गळा काढून,"मला मेलीला विष दे रे बाळ्या!" ही नेहमीची कॅसेट सुरू केली. बाळू बायकोकडे पाहून खट्याळ हसत म्हणाला , "ते बाई आत्याचे समोसे बाजूला काढून ठेवले होते ते खाऊन घेऊ ग! आता ती विष खाणार म्हणतेय!" सगळे खो खो हसत सुटले ..
©यशश्री राहाळकर
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
अलक ६ तुलना
वृंदाच्या लेकाचे लग्न होऊन चार महिने झाले होते. अनया त्यांची सून हात राखून वागते ,परकेपणानं वागतेय हे त्यांना बरेच दिवसांच जाणवलं.... अनयाच्या मोठ्या बहिणीचे लग्न मोडलेले त्यात तिचा सासरी बराच छळ झाला हे सारे त्या ऐकून होत्या.सकाळी उठल्यावर अनया पहिला फोन ताईला करते हेही एव्हाना त्यांच्या सवयीचे झाले होते......त्यांनी चार दिवस अनयाच्या लाडक्या ताईला राहायला बोलावले तिचं कोडकौतुक केलं आवडते पदार्थ अगदी विचारून खाऊ घातले. पुढे ती घरी गेल्यावर प्रत्येक वेळी त्या ताईचीच आठवण करून अमुक काम अनया पेक्षा ताईनेच कसे उत्तम केले असते, तिचा चॉईस कसा छान अशी स्तुती रात्रंदिवस आरंभली. हे सारं न सहन होऊन एकदिवस अनया संतापून म्हणाली, " माझी तुलना ताईशी मुळीच करू नका.. मला आवडत नाही ते! मी कशी आहे हे समजून तर घ्या ना आधी?"  वृंदाचा बाण अगदी योग्य जागी लागला होता ," हेच तर मी म्हणतेय त्या ताईच्या खाष्ट सासुशी माझी तुलना नको करुस . आधी समजून तर घे मी कशी आहे!" अनयाला काय कळायला हवं ते कळून चुकलं... हळूहळू ताईचे फोन आणि सल्ले कमी होत गेले...
©यशश्री राहाळकर

५ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!