फॉलोअर

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

कळप

कळप
                    जर... आपल्यापुढे तीन समूह असतील ....1.शेकड्याने रानगाईंचा कळप आहे, 2. बारा पंधरा हत्तींचा कळप आहे आणि 3.आठ/दहा स्त्रियांचा समूह आहे..... यापैकी सगळ्यात deadly, सर्वांत भयंकर किंवा अत्यंत निर्घृण समूह कोणता?? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नं 3 चा समूह. होय ! मी स्वतः एक स्त्री असून माझं उत्तर अभ्यासपूर्वक आणि जबाबदार विधान आहे.या तिन्ही समूहांपैकी आठ दहा स्त्रियांचा समूह हा एकमेव असा समूह आहे जो स्वतःच्याच समूहातील सदस्यांना चिरडून पुढे जात असतो.रानगाईंचा कळप पहा... लहान पिल्ले, कमजोर ,लंगड्या गाई मध्यभागी असतात... सगळे मजबूत शिलेदार चहुकडून समूहाचे रक्षण करत असतात. हत्तींचा कळप तर आपल्या एकजुटीसाठी ओळखला जातो... बहुतेक समूहात बहिणी हत्तीणी असतात... साऱ्याच पिल्लांना त्या साऱ्या आपले मानतात.मात्र याउलट कोणत्याही प्रयोजनासाठी एकत्र आलेला ,कोणत्याही वयाच्या ,काही मोजक्या स्त्रियांचा अगदी तात्पुरता समूह सुद्धा 'संघ' किंवा 'कळपाची' कोणतीच लक्षणे बाळगून नसतो. या समूहात सातत्याने वर्चस्वाचे डावपेच सुरू असतात, एखादीला लक्ष करून तिला गुदमरून टाकण्याचे अखंड प्रयत्न असतात... एका उद्देशाने एकत्र आलेल्या स्त्रियांचा समूह त्या व्यतिरीक्त अनेक गुंतागुंतीच्या मोड तोडीत मग्न असतो.सगळ्यांनी हातात हात घेऊन समूहाचा विकास करू ही सांघिक भावना तर नसतेच पण असतो एक अट्टाहास कुणालातरी नामोहरम करण्याचा, तगमग असते कुणाला तरी नेस्तनाबूत करण्याची...त्याही पलिकडे , कुणाला तरी नीच दाखवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची....वर्चस्वाची घनघोर लढाई.
                      मला माहिती आहे ... या क्षणी तुम्हा सगळ्यांना निश्चित वाटत असणार,"आमचा अमुक भिशी ग्रुप/किटी ग्रुप किंवा भजनी मंडळ असं मुळीच नाही.आम्ही कित्ती प्रेमळ मैत्रिणी आहोत." अशी खात्री असेल ना तर काही मुद्दे नक्कीच तुमच्या ग्रुप मध्ये पडताळून पहा हं! ★ अनुपस्थित असणाऱ्या मेंबर बद्दल काहीच बोलले जात नाही. ★एखादीला माहीत असणारे दुसरीचे काही सिक्रेट्स किंवा हळव्या बाबी ग्रुप ला सांगण्याचे काम चोख होत नाही.★ग्रुप चा जर कुणी लीडर असेलच तर तो बाकीच्या मंडळींशी खाजगी संवाद साधून इतरांबद्दल माहिती घेत नाही.★लिडरच्या अनुपस्थितीत केलेल्या साध्याशा विधानाचा विपर्यास करून किंवा रंग बदलून ग्रुप लीडर पुढे मांडले जातच नाही.★थेट स्पष्ट चर्चेने गैरसमज झालेच तर सोडविण्याचे कार्य केले जाते........ या वरील पाचही प्रश्नांची उत्तरे जर खात्रीशीर "होय" अशी असतील तर खरेच आपला ग्रुप आदर्श आहे 5स्टार प्रामाणिकपणे सांगायचं तर या साऱ्यांचीच उत्तरे कधीही पॉझिटीव्ह असणे शक्य नाही.कारण ग्रुपला स्वतःचा एक चेहरा असतो... एक व्यक्तिमत्त्व असतं, एक विचारधारा असते.ती ग्रुप मधील एखाद्या व्यक्तीच्या अगदी भिन्न असू शकते. ज्याप्रमाणे मोहरी, हळद,तिखट ,मीठ, मसाला, गुळाचा खडा सारे एकत्र येत फोडणी दिल्यास बनणारा पदार्थ निराळा असतो.. त्यात ह्या साऱ्यांची चव असते मात्र पदार्थाचे रुपडे वेगळे असते... तसेच काहीसे प्रत्येक ग्रुपचे असते.
                     'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे', हा पाठ आपण शालेय जीवनात गिरविलेला असतो. त्यामुळे विविध समूह हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. विशेषतः स्त्रिया वेगवेगळ्या समूहात सक्रिय असतात... बरेचदा विरंगुळा म्हणून , आनंदासाठी तर कधी एखादे विशिष्ट कार्य (सामाजिक/सांस्कृतिक/आर्थिक वगैरे)करण्याच्या हेतूने बहुसंख्य स्त्रिया वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये सहभागी होतात. घराबाहेर पडतांना समविचारी समवयस्क मैत्रिणी असणे सोयीचे असते.या साऱ्याच समूहात प्रचंड मोठी energy शक्ती दडली आहे, असे मला कायम जाणवते.ह्या एकत्रित शक्तीच्या जोरावर अनेक अफाट अशक्य कामे सहजी होऊ शकतात.सगळ्यांत महत्वाचे म्हणजे एकमेकींना आधार देणं, मदतीचा हात देणं सहजी शक्य असतं.मात्र प्रत्यक्षात स्त्रियांचे हे समूह वादविवाद, भांडणे आणि राजकारणी डावपेचांनी  काठोकाठ भरलेल्या घागरीच असतात. एकदा तुम्ही ही घागर उचलली की डोईवरून उतरवणे फार अवघड काम होऊन बसते.खरंतर उंबरठा ओलांडणारी प्रत्येक स्त्री मोठा संघर्ष करूनच बाहेर पडलेली असते... कुणाच्या घरी कडक नियमांचा जाच असतो, कुणावर वृद्धांची जबाबदारी असते, कुणाला नवऱ्याचे विक्षिप्त वागणे झेलावे लागते तर कुणाला आर्थिक प्रश्न, मुलांचे प्रश्न असतात, नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांवर तर त्याहून निराळा ताणही असतो.ह्या साऱ्याचे भान आपण एक स्त्री म्हणून समूहात वागताना राखतो का? हा प्रश्न प्रत्येकीनं स्वतः ला विचारायला हवा. 'ही अशीच आहे नी ती तश्शीच आहे "असे म्हणून बोटे मोडतांना आपण तिच्या शूजमध्ये पाय घालून किती खिळे टोचतात हे पाहतो का? शिक्का मारणं कदाचित सोप्पय! अवघड आहे दुसऱ्या स्त्री ला समजून घेणं.
                        नुकताच एका ग्रुप चा अत्यंत कडवट अनुभव मी घेतला.. गेली पाच वर्षे सोबत चालणारा आणि कार्यक्रम करणारा हा ग्रुप... अचानक काहीही न सांगता मला वगळण्यात आलं... बरं गंमत अशी की ग्रुप मधील प्रत्येक व्यक्ती माझ्याशी अगदी "तुझ्या गळा माझ्या गळा" पद्धतीने वागणारी... अश्यावेळी प्रत्येकीला माझ्याशी असणारे वैयक्तिक गोड संबंध जपायचे होते मग वाईटपणा घेणार कोण? एका मैत्रिणीला तर मनातून हे इतकं बोचतय की चोरासारखी ती नजर चोरत असते☺ मी त्यांची अडचण समजून घेतली कोणताही आकांतांडव न करता... एखाद्या समूहात एखादी व्यक्ती श्रेष्ठ वरचढ ठरू लागली की त्या ग्रुप ला तुम्ही नकोसे होता. प्रत्येक समूहाचा चेहरा असतो असे मी म्हणते ते याचसाठी. हा अनुभव थोड्या फार फरकानं प्रत्येकीला आलाच असणार.एखादा ग्रुप मनातून तुमचं श्रेष्ठत्व मान्य करू लागला की समजावं हकालपट्टी निश्चित आहे. कोणत्याच समूहाला स्वयंपूर्ण शक्तिशाली लोक नकोच असतात... दुबळ्या, रडणाऱ्या, sort of बिचाऱ्या बायकाच का कुणास ठाऊक समूहांना हव्या असतात.
                     स्त्रियांचे समूह खरेतर जादूगार ठरू शकतात... एखादीला डिप्रेशन मधून बाहेर काढणारे, एखादीला आत्मविश्वास देणारे, एखादीच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालणारे. चालती बोलती जिवंत शाळा ठरू शकतात... आयुष्याचे ज्ञान देणारे, खूप काही शिकवणारे...कधी एखादी कला तर कधी एखादा पदार्थ ... त्याहीपलिकडे जाऊन प्रती माहेर होऊ शकतात... अगदी एकमेकींच्या गळ्यात पडून मनमोकळं रडणारे, एकमेकांचे कौतुक करणारे , माया करणारे, मदतीला धावणारे अन धीर देणारे. प्रत्यक्षात मात्र स्त्रियांचे समूह आखाडे असतात... अश्या खेळाचे ज्याला नियमच नाहीत... आहे केवळ वार .. जमेल तसे आणि जमतील तेव्हढे समोरच्याला मारत राहायचे.. कधी कृतीतून, कधी शब्दांतून... एव्हढं कठीण आहे का हो स्त्री म्हणून जन्माला आल्यावर दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं??? 'स्त्री म्हणजे निसर्गातील सृजनाचा साक्षात्कार आहे'... मग हा साक्षात्कार इतका कोता कसा जो दुसऱ्या सृजनाला सामावू तर शकतच नाही पण साधं समजूनही घेऊ शकत नाही.
                     नवरात्रीच्या निमित्ताने आपण नवदुर्गांचे पूजन करतो. प्रत्येक देवीरूप एका विशिष्ट शक्तीच्या उपासनेसाठी पूजिले जाते... लक्ष्मी माता संपत्तीदायिनी, सरस्वती माता विद्यादायिनी, रेणुकामाता मातृस्वरूपीणी, अन्नपूर्णा माता अन्नधान्य समृद्धी साठी , कालिका, दुर्गा,तुळजाभवानी माता आपल्या पराक्रम ,शौर्य आणि अतुलनीय धैर्यासाठी पूजिल्या जातात.यातील प्रत्येक स्वरूप दुसऱ्या पेक्षा निराळे आहे... सारीच रूपे श्रेष्ठ सारीच तितकीच तेजस्वी....विविध व्रतवैकल्ये ,उपासतापास , दानधर्म या निमित्ताने आपण करीत असतो... पण हे सारे तोपर्यंत अर्थहीन आहे जोवर आपण हे स्त्री शक्तीचे तत्व समजून घेऊ शकत नाही की "प्रत्येक स्त्री दुसरी पेक्षा निराळी आहे" तिच्या ठायी असणाऱ्या शक्तींचा आदर आणि योग्य सन्मान आपण करायलाच हवा. हे एकमेकींना समजून घेणं जमायला लागलं ना तर आयुष्यातले अर्धेअधिक प्रश्नच मिटतील. देवी महात्म्यातील एका कथेनुसार सरस्वती मातेचा अपमान शुम्ब निशुम्ब दैत्य करतात... तिला युद्धाचे आव्हान देऊन मोठ्या फौजेनिशी चालून येतात... त्या वेळी या युद्धात प्रत्येक देवी आपापली आयुधे घेऊन चालून येतात... मोठा रोमहर्षक कथाभाग आहे. आपण त्याची पारायणे करतो, पाठ करतो पण त्यातून शिकतो काय?? नवरात्र म्हणजे नऊ रंगाचे परीधान... प्रत्येक रंग निराळा ... प्रत्येकाचं आपापल्या जागी अढळ स्थान. हे सारे प्रत्यक्षात जेव्हा आपण मान्य करू आणि त्यानुसार आचरण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं नवरात्र आपल्याला उमजले असे म्हणता येईल नाही का??
              या नवरात्रीच्या निमित्ताने किमान 9 अगदी जवळच्या स्त्रियांना मी समजून घेईन असा निश्चय करूया...
1. जिच्याशी आपले सदाच वाद होतात ती आई
2. ज्यांचे काहीच पटत नाही त्या सासूबाई
3. अधूनमधून दांड्या मारणारी पण विश्वासू कामवाली बाई
4. सतत काहीतरी विकत घेण्याचा हट्ट करणारी लेक
5.लाडकी बहीण किंवा बहिणीसारखी जाऊ /नणंद
6.कधीमध्येच डोकावणारी पण गरजेला धावून येणारी शेजारीण
7. अनेक वर्षांची जिवलग मैत्रीण
8. जुजबी ओळखीची मैत्रीण
9. अनेक फॉर्मल निमित्ताने आयुष्यात येणारी स्त्री
या साऱ्यांना आपण समजून घेत गेलो तर ईर्षा, असूया,चढाओढ, भांडणे... ह्या राक्षसांचा वध करणे फारसे कठीण नाही.या दसऱ्याला लुटुया एकतेचं, आदर आणि प्रेमाचं सोनं...                 
©यशश्री रहाळकर

८ टिप्पण्या:

  1. खरंय गं खूपच हृदयस्पर्शी लेख लिहिलास��. असे अनुभव अनेक ग्रुप मध्ये आले मला, पण जिगिशा ग्रुप मात्र याला अपवाद आहे.
    जिगिशात जो व्यक्ती हुकूमशाही गाजवतो, स्वतःला वरचढ समजून इतरांना कमी लेखतो, महत्वाचे म्हणजे ग्रुप चा उपयोग किंवा त्यातील कार्यक्रमांचा उपयोग फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी करतो कौतुक मिळवण्यासाठी करतो , स्वतःच्या चुकीच्या वागण्याचा दोष ग्रुप मेम्बरस् वर फोडतो अशांनासुद्धा एक संधी देतो. परंतु एवढे करूनही जर त्याचे 'येरे माझ्या मागल्या' असेच असेल तर मग त्याची हकालपट्टी ठरलेलीच����‍♀
    कारण जिगिशा हे काही कोणी एकाने लावलेले रोपटे नाही ते एक स्वयंसिद्धांचे भरारी मारण्याचे आकाश आहे.
    खरं तर कुठलाही ग्रुप हा बहुरंगी सदस्यांनी बनलेला असतो त्यात कोणाची एक बाजू स्ट्रॉंग तर एखादी वीक असते पण त्यामुळेच ते एकमेकांना पूरक ठरतात आणि म्हणूनच ग्रुप एकसंघ राहतो. पण एखाद्याच्या जरी मनात श्रेष्ठत्वाची भावना आली की नावेला छिद्र पडलंच समजावं. अष्टपैलू सदस्य कार्यक्रमातील सगळ्याच भूमिका एकावेळी नाही साकारू शकत. ते एक सांघिक कार्य असते.
    आता प्रत्येक वेळी एखाद्या सदस्याची जर हकालपट्टी झाली म्हणजे ग्रुप वाईट आहे आणि तो सदस्य सर्वश्रेष्ठ आहे असा होत नाही. कधी कधी हकालपट्टी झालेल्या सदस्यानेही आत्मपरीक्षण करावे. स्वतःला खालील प्रश्न विचारावे
    1. ग्रुप ने हा निर्णय का घेतला असेल?
    2. आपण कुठे कळत नकळत चुकलो का ?
    3. आपल्यामुळे कोणी दुखावले गेले आहे का?
    4. आपल्या वर्तनात काय बदल अपेक्षित आहेत?
    या प्रश्नांची सारासार विचार करून स्वतः च उत्तरे शोधावी
    कदाचित त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे आणखी खुलत जातील.

    उत्तर द्याहटवा
  2. Agree to certain points raisef by you.....but at d same time i firmly believe that "how u treat others, is what u get back from them".....but u summed up in a positive note & that what matters d most.....v as humans r meant to learn & evolve as good human beings..... Isn't it....keep up ur good work...mona kulkarni

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!