फॉलोअर

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

गौराईची भेट

                  "तुझ्या घरी गौरी/महालक्ष्मी नाहीत का ग?".... या प्रश्नाचं उत्तर देतांना मनांत एक तीव्र टोचणी लागून राहते . नाही, माझ्या घरी गौरी नाहीत... ना माहेरी ना सासरी.अगदी लहान होते तेव्हापासून गौराईचे कोण अप्रूप वाटायचं... काही असो नसो सासरी गौरी तरी असाव्यात असं वाटायचं.माझ्या घरात भले येवो ना येवो पण माझ्या मनात मात्र गौराई थाटात येऊन जात असे... अजूनही येते.खरं सांगू!माझा निरोप घेतल्याविना जात नाही हं ती. माहेरून सासरी परततांना कश्या मुली मागच्या आळीतल्या मैत्रिणीकडे जरा डोकावून येतात .. तश्शी ती माझ्याकडे आवर्जून येऊन जाते.ख्यालीखुशाली विचारते... गोडसं हसू चेहऱ्यावर आणत पाणावले डोळे पुसत ... मजेत रहा म्हणत निरोप घेते.
                   माझ्या घरी नसू देत गौरी पण माझ्या मागं लगीन घाई असते. एखाद्या मैत्रिणी सोबत साड्या बघायला अगणित दुकाने पालथी घातलेली असतात, कुणाच्या बाळांचे ड्रेस तर कुणाचे खण आण,हार आण, गजरे आण अमुक वाणसामान आण... वेलची विसरले ग म्हणत मैत्रिणींचे फोन घणाणत असतात...वर बरंय ग तुझ्याकडे गौरी नाहीत... म्हणत साऱ्या जणी हक्कानं मदतीला बोलावतात.मी देखिल तितक्याच प्रेमानं काही काम असेल तर सांगा म्हणते. लहानपणी तर सगळ्यांचे हळदी कुंकवाचे निरोप मी द्यायचे....आणि गंमत म्हणजे प्रत्येक घरी गौरी असल्यानं गोडधोड हातावर मिळे कधी लाडू तर कधी चकली. सोन्याच्या पावलांनी येणारी गौरी माझ्या भेटीला घडीभर विसावतेच... मी साद घातली की उभ्या उभ्या का असेना टेकून जाते. "आपल्या घरी का नाही ग गौरी?" लहानपणी अगदी पाचव्या वर्षी..आईला विचारलं होतं... आई म्हणाली होती,"घरात नसेना का मनांत तर आहेत ना! आपण भेटून यावं त्यांना." माझं अन गौराईचं सख्य असच बालमैत्रिणी सारखं.
                      गौरी जेवतात त्या दिवशी तर गंमतच होते... मला किमान 15 ठिकाणाहून जेवणाची आमंत्रणे मिळतात. सगळ्यांना नाईलाजानं नकार द्यावा लागतो... आणि हे अगदी दर वर्षी होतं बरं! एकाच ठिकाणी कायमसाठी निमंत्रण स्वीकारलेले असल्याने इतर ठिकाणी जाता येत नाही ...मात्र कुणाकडे वेळेवर अडचण आली किंवा सवाष्ण मिळतच नाहीये
मग "चालेल जेवलेली सवाष्ण...उष्टवायला तरी ये ग !" असा आग्रह होतो. वेळ निभावून न्यावी लागते. लोक आत्यंतिक श्रद्धेने हे पूजन करीत असतात त्यांच्या श्रद्धेचा आदर राखलाच पाहिजे... या गडबडीत एका ठिकाणी मला रात्रीचे जेवायला बोलावले देवा रे! सकाळ संध्याकाळ नैवेद्याचे पानभर जेवण ... पुढे चार दिवस मी जेवले नाही.. नंतर मात्र मी माफ करा असे स्पष्ट सांगू लागले.अनेक लोक मला,"तुझ्याकडे गौरी नाहीत आयत जेवायला काय होतं" असं जरा कटुपणे म्हणतातही पण आयांनो !बायांनो ! ... पोटात करंज्या साठोऱ्या ठेवायला आम्ही गौरी नव्हे! ज्यांच्याकडे गौरी आहेत त्यांनी ह्याचे आवर्जून भान ठेवा... आग्रह करकरून जेवायला घालणे .. ह्यात काही पुण्य नव्हे. तरी बरे अमुक 4 पुरणपोळ्या खाव्या असा नियम नाही ... नाहीतर आमची धडगत नव्हती.
                       गौरींचे हळदीकुंकू म्हणजे पर्वणीच असते. मला आमंत्रण देतांनाच तुझ्या घरी नाहीना मग आलंच पाहिजे अशी धाकयुक्त छुपी भूमिका असते...खरं सांगायचं तर मलाही खूप आवडतं जायला... संध्याकाळी 5ला निघालेली आम्हा मायलेकींची वरात रात्री 11 साडे अकरा पर्यंत घरी येते.प्रत्येक घरी मी शांतपणे टेकते... दिवसभराच्या अविश्रांत श्रमाने दमलेली खरीखुरी गौरी अलौकिक सुंदर दिसत असते...कुणी घाईघाईने साडी बदललेली तर कुणी नेमके एका कानात कानातले घालायला विसरली असते.तृप्तता या शब्दांचं मूर्त रूप पहायचं असल्यास या हळदी कुंकवाला जरूर जावे. गौराईला नेसविलेल्या साड्यांच्या प्रकाराची चर्चा करावी, आरास सुरेख झालीये असं भरभरून कौतुक करावं.... खरी खुरी गौराई प्रसन्न होते... मला त्या देखाव्यांच, सजावटीच मुळीच कौतुक नाही ... नजर लागून राहते ती गृहलक्ष्मीवर. असं तेज जे कोणत्याही कृत्रिम रंगरांगोटीने येऊच शकत नाही. कुंकू लावतांना ती म्हणते,"गौरी सेवा करून घेतात. होईल तसे करायचे" घरातील सासू किंवा जेष्ठ स्त्री भरभरून सुनेचे कधी नव्हे ते कौतुक करते... त्या त्या प्रत्येक क्षणी मला गौराई भेटते.
             खरी गौराई आहे घरातल्या सुना ... लोक म्हणतात जेष्ठा कनिष्ठा दोघी माहेरवाशिणी आहेत. नक्कीच दीड दिवसासाठी माहेरी येणाऱ्या प्रत्येक लेकीचं कौतुक करा, प्रेम द्या हे शिकविणारा हा सण. पण तुमच्या या माहेरवाशिणीचं कौतुक करणाऱ्या तरी परक्या कुठे आहेत??त्याच खऱ्या मूर्तिमंत गृहलक्ष्मी आहे ना!चार शब्द कौतुकाचे पुरेसे असतात त्यांना.मला तर याच गृहलक्ष्मीच्या रूपात गौरी भेटत असतात. प्रसन्न, समाधानी, करारी आणि तेव्हढ्याच प्रेमळ.दरवर्षी या खऱ्या गौराईची भेट घ्यावीच लागते... नाहीतर त्या नाराज होतात ना! त्यांचा राग परवडणारा नसतो मला.शिवाय निमित्त असतेच ,"हिच्याघरी गौरी नाही तरी आली नाही दर्शनाला" ... गौराई प्रत्येक घरी सोन्याच्या, हळदी कुंकवाच्या पावलांनी ये हो ! घर सुखसमृद्धी ने भरून टाक. माझ्यासाठी मात्र गोड तृप्त हसू आणि एक गळाभेट राखून ठेव ... नक्की.
© यशश्री रहाळकर

४ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!