फॉलोअर

बुधवार, १७ जून, २०२०

देहभान

देहभान
*******

               मंजू हतबलपणे, घरात येऊन पडलेल्या निलयच्या लग्नाच्या पत्रिकेकडे पाहत होती... एकाच गावात असूनही कुरियरने आलेली ही आमंत्रण पत्रिका... तिच्या लाडक्या एकुलत्या एक भाच्याची. मंजुचा हुंदका घशातच अडकला. ती धावतच बेडरूम मध्ये गेली... आई नेहमीप्रमाणे शून्यात नजर लाऊन बसलेली... तिच्या मांडीवर डोकं ठेवून मंजू धाय मोकलून रडली...,"किती दिवस? अजून किती दिवस चालणार हे आई?".. मनात येईल ते उलट सुलट बोलत सुटली,आईपर्यंत त्यातलं अवाक्षर पोहोचणार देखील नाही ह्याची पूर्ण कल्पना असूनही...ती बोलत होती.गेली दोन वर्षे अल्झायमरने आईच्या अस्तित्वातल्या बऱ्याच गोष्टी आधीच पुसून टाकल्या होत्या. तरीही मंजूला बरं वाटलं, मोकळं वाटलं...डोळे पुरते रीते झाल्यावर ,थोडं सावरत उठून बसणार तोच आईनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला,"मंजू.. रडू नकोस ग.होईल.. सारं ठीक होईल"त्या क्षणी आपण मंजू आहोत हे आईला आठवलं,तिनं धीर दिला ही गोष्टच केव्हढा आनंद घेऊन आली तिच्यासाठी.चटकन तिने कॉफी करून आणली अन त्यासोबत दोन बिस्किटं आईला भरवून नेहमीची औषधं दिली...क्षणात आई लहान बाळाप्रमाणे गुरफटून झोपून सुद्धा गेली. 
                 आता निवांतपणे पेपर वाचत कॉफीचा मग घेऊन ती बसणार एव्हढ्यात दादा-वहिनीचा फोन आला...संजू दादा त्याच्या स्वभावाप्रमाणे मोघम बोलला...वहिनीने मात्र त्रागा सुरू केला,"ही काय पद्धत झाली? दोन दिवसांवर लग्न ठेपलं येऊन आज कळतंय आम्हाला........." थोडक्यात निलयच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका नागपूरला दादाकडेही आजच मिळाली असावी... वहिनीच्या एकंदर बडबडीत मानापमानाचे बरेच कंगोरे होते...,"मलाही आत्ताच मिळाली पत्रिका ...नाही .आधी माहीत नव्हते आत्ताच कळले.",मंजू मोघम बोलली.वहिनीने फोन तसाच सुरू ठेवत आपले आश्चर्य व्यक्त केले... तिचे ऐकवून झाल्यावर फोन दादाला मिळाला...,"मंजू काय प्रकार आहे हा?" दादाने थोडक्यात विचारले."भेटल्यावर बोलू दादा."म्हणत मंजूने फोन ठेवला. विलक्षण थकवा, चीड, संताप,उद्विग्नता,अगतिकता... काय नेमकं वाटतंय तिचं तिलाही नीटसं उमजत नव्हतं.
                   समोरच पडलेला पत्रिकेचा लिफाफा तिने उघडला... मोरपिसाच्या आकाराची सुरेख पत्रिका.. सगळी रंगसंगती मोरपिसांचे रंग वापरून केलेली.... पाहताक्षणी देखणी दिसणारी पत्रिका.... की फक्त वरवरची सजावट? बाकी मजकूर टिपिकल कुलदेवता प्रसन्न,अगत्य येण्याचे करावे वगैरे छापाचा. श्री अनंतराव व सौ अंजली जहागीरदार ह्यांचे पुत्र निलय ह्यांचा विवाह केळशीचे कुणी कै.वामन जोशी ह्यांच्या जेष्ठ कन्येशी , चि. सौ. कां. मधुराशी करण्याचे योजिले होते. संसाराची मोरपिशी स्वप्ने देहभर नाचवत, संस्काराची गाठ पदराशी बांधत तरुण झालेली लाघवी समंजस मधुरा मंजूने मनातल्या मनात चितारून टाकली. पत्रिकेवरून दिसतेय वडील नसावेत आणि जेष्ठ कन्या म्हणजे नंतर धाकटी भावंडे असणार. कुठल्याश्या खेड्यातील ,गरीब गरजू घरातील ही मुलगी असावी.... फार पूर्वी लग्नपत्रिकेवर "अमुक व्यक्तीचे तमुक व्यक्तीशी शरीरसंबंध करणे साठी" असा मजकूर असायचा ...किती थेट ,किती स्पष्टपणे लग्नाचा हेतू मांडला जाई. पुढे सामाजिक प्रतिष्ठेचे विष त्यात मिसळत गेले आणि आता तर मूळ हेतूच दूर फेकला गेलाय की काय? असे वाटावे एव्हढी स्थित्यंतरे झाली आहेत. तिच्यातील समाजशास्त्राची प्राध्यापिका डोकावली आणि तिचे तिलाच हसू आले.निलय बरेचदा गप्पा मारतांना पॉईंट आऊट करायचा , "मावशी तुझ्यातली मंजू मॅडम मधेच बाहेर येतेय ग!"
                'निलय' मंजूचा मातृत्वाचा साक्षात्कार होता... प्रत्यक्षात तिला तिचं हक्काचं बाळ कधीच न लाभल्यानं निलयच्या रूपात तिने मनातल्या मनात या भावनेला बाळसं धरून मोठं केलं होतं. अंजू ताईला चार मुलींच्या पाठीवर नवसाने झालेला हा लेक... अपुऱ्या दिवसांचा अशक्त... त्याच्या जन्माच्या वेळी पाठोपाठच्या बाळंतपणाने अर्धमेली झालेली ताई... भयंकर आजारी पडली... त्या वेळी त्या इवल्याश्या निलयला मंजुनेच सांभाळलं.. सहा महिन्यात निलय मस्त गुटगुटीत झाला...त्याची प्रगतीही उत्तम होऊ लागली... निलयशी एक अदृश्य नाळ जोडली गेली ती ह्याच वेळी...मंजू मावशी त्याची अत्यंत लाडकी झाली... पुढे वाढत्या वयाबरोबर मावशीची मैत्रीण झाली.अनेक गोष्टींवर दोघांच्या गप्पा होत असत, त्याच्याशी vedio game खेळणे, शॉपिंग करणे movies ना जाणे दोघांची धम्माल सुरू असायची.निलय अभ्यासात बरा होता,मेहनती होता ... नव्या ट्रेंड प्रमाणे IT इंजिनियरिंग पास होतांनाच जॉब मिळाला.. मग पुढे अनेक नोकऱ्या बदलून बंगलोर ला सेटल झाला.. म्हणजे स्वतःचे घर ,गाडी वगैरे घेऊन झाले. मात्र लग्नाचा विषय काही मनावर घेत नव्हता... खरतर टाळत होता.... उशीर उशीर म्हणत वयाची 32 गाठली त्याने. मावशीने काहीतरी सोक्षमोक्ष लावावा म्हणून अंजू ताई नि अनंतरावांनी मंजूला त्याच्याशी ह्या विषयावर बोलायची गळ घातली." मंजू अग बाई चालेल सून आम्हाला कोणत्याही जातीची... त्याची काही मैत्रीण असेल तर सांग म्हणावं,"ताई रडवेल्या स्वरात म्हणाली होती. तिच्या स्वरात काळजी कमी अन् भीती अधिक होती.. असं मंजूला उगाच वाटलं.आपण ह्या भानगडीत पडायलाच नको होते.. पण पश्चात्तापाची वेळ निघून गेली होती.
                     संजू दादा आणि वहिनी दुसऱ्याच दिवशी पहाटेच निघाले .. थेट लग्नघरी न जाता तिच्याकडे येणार होते जेवायच्या वेळे पर्यंत... मंजू यंत्रवत स्वयंपाकाला लागली. मन मात्र भलतीकडेच धावत होतं. आईचे सगळे आवरून  देणाऱ्या नर्सिंगच्या मावशी आल्या...आईच्या नाश्त्याची प्लेट सरकवून ती पोळ्यांना लागली."संजू दादा किती धीरगंभीर अगदी बाबांसारखा आणि मी मात्र आईसारखी थेट स्पष्ट बोलणारी.ताई कुणावर गेलीये कोण जाणे.. मुळुुमुळू रडुबाई, भित्री. ताईशी तिचं फार कधी जमलंच नाही . तसे दोघींमध्ये अंतरही 14 वर्षे म्हणजे खूपच होते... तिच्यानंतर चार वर्षांनी आई बाबांना संजय दादाचा जन्म सुखावून टाकणारा होता. मी मात्र उतारवयात अगदीच अनपेक्षित, गरज नसतांना चुकून झालेली नकोशी होते." किती उलट सुलट धागे मंजूच्या मनातल्या मनात विणले जात होते. असे सारे असूनही शेंडेफळ मंजू बाबांची विशेष लाडकी होती... बाबा तसे अचानक गेले .. मंजू S.Y.B.A . ला, जेमतेम 19 वर्षे पूर्ण.. त्यांच्या जाण्याचा फटका बसला तोही मंजूलाच.. अचानक मंजू लेक न वाटता जबाबदारी वाटू लागली.. जरा घाईगडबडीतच , वर्षाच्या आत स्वतःहून चालून आलेल्या गडगंज ठिकाणी तिला उजळून टाकली.मंजू इंदोरच्या पेंढारकरांची एकुलती एक सून, सौ मंजुषा महेश पेंढारकर झाली . सगळ्यांच्या दृष्टीने मंजूने नशीब काढलं होतं.... एव्हढ्यात दारावरची बेल वाजली.. मंजूची गतायुष्याची उजळणी खंडीत झाली....,"दादा वहिनी आलात एव्हढ्यात. अग बाई! साडे बारा झाले" म्हणत तिने दार उघडले.
                     बऱ्याच महिन्यांनी भेट होऊनही आईनी संजू दादाला लगेच ओळखले.. त्याच्या चिमण्या कुठे आहेत हेही विचारले. त्याला चिमण्या आहेत, दोन लेकी आहेत हेही तिला आठवले... आठवणींचा काळ जरा मागे पुढे झाला होता एव्हढेच."आई .. माझ्या चिमण्यांना चिमण्या झाल्या आता", म्हणत दादा हसत सुटला. त्यांच्या जरा गप्पाटप्पा झाल्या नी आम्ही जेवायला बसलो. वहिनीला निलयच्या लग्नाची उत्सुकता अगदी खदखदत होतीच... तिची प्रश्नांची सरबत्ती जेवतांनाच सुरू झाली.."मंजू ,कशी आहे मुलगी? किती शिकलीये? नोकरी वगैरे करते का? तोलामोलाच ठिकाण असेल बाई!एकुलता एक मुलगा त्यांचा.काहीही म्हणा !अंजू वन्सना हे वागणं मुळीच शोभलं नाही. काय तर म्हणे घाईघाईत लग्न ठरलं... मुलींच्या लग्नात राबवायला आम्हाला फोन करकरून आधी बोलावून घेतलं आणि जिथे मिरवायचं तिथं मात्र वेळेवर अक्षदा टाकायला हे आमंत्रण....." वहिनीची एक्सप्रेस सुटली की न थांबता सुरू असते.....विचारलेल्या प्रश्नावर उत्तर मिळेल म्हणून थांबणे तिला मान्य नाही. दादा माझ्याकडे पाहून सूचक हसला. माझा उतरलेला चेहरा अन् रडून सुजलेले डोळे त्याच्या नजरेतून सुटले नव्हते."जेवण झाल्यावर बोलू." नेहमीप्रमाणे तो शांतपणे म्हणाला.
                जेवण झाल्यावर पुन्हा बैठक बसली .. मंजू काहीश्या संकोचाने विषयाला हात घालत म्हणाली,"निलयवर हे लग्न लादलं जातंय. त्याला खरंतर हे लग्न करायचच नाहीये.." माझं वाक्य तोडत वहिनी पुन्हा सुरू झाली..,"हो ना! वाटलंच होतं मला . इतक्या एकसे एक मुली सुचवल्या होत्या मी पण याचा नन्नाचा पाढा.तेव्हाच संशय आला मला.. ह्याची काहीतरी भानगड असणार बाहेर... मुलगी परजातीची नाहीतर .. नाहीतर परधर्माची असेल...अनंतरावांना कुठे पटणार आहे?" दादा जवळजवळ ओरडतच तिला म्हणाला, "मला मंजूशी बोलू देते आहेस की आम्ही बाहेर जाऊ दोघं?" वहिनी दादाचा रुद्रावतार पाहून गप्प बसली. "कसं सांगू कळत नाहीये?" म्हणत मंजू पुन्हा बोलायला सुरुवात करणार तोच फोन आला.. अंजू ताईचा होता. ताई रडत होती... निलय घर सोडून निघून गेला होता.. कायमचा, कधीही परतून न येण्यासाठी ,सारी नाती तोडून. त्यात परवावर लग्न येऊन ठेपलेलं...ह्या साऱ्या ताणामुळे अनंतरावांचं बीपी अचानक शूट झालं.. ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते.सगळ्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली.अखेर केळशीला जोश्यांकडे लग्न मोडल्याचं कळवण्यात आलं.निलयला नेमकं काय झालंय?लग्न का मोडलंय? ह्या साऱ्या प्रश्नांनी आणि नातेवाईक , आप्तेष्टांनी पुरते भंडावून सोडले.चार दिवस ह्या धावपळीत गेल्यानंतर अनंतरावांची प्रकृती स्थिरावली.हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी पाऊल ठेवताच अनंतरावांनी सगळ्यांना ठणकावून सांगितले,"झाली एव्हढी शोभा पुरे झाली. आता ह्या माझ्या घरात निलयचे नावसुद्धा घ्यायचे नाही. तो माझ्यासाठी मेला."
ताईने सवयीने मान डोलावली.. तिला हे मान्य आहे की नाही .. याने काहीच फरक पडणार नव्हता ; नव्हे तो कधीच पडला नाही. 
                   मानसिक आणि शारीरीक प्रचंड थकलेले आम्ही घरी परतलो.. परततांना थोडक्यात दादाला मी कल्पना दिलीच होती. वहिनीला सोबत म्हणून आईजवळ ठेवावे लागले होते . "काय घडायचं ते घडून गेलंय आता बोलण्यात अर्थ नाही म्हणत" दादाने सरळ विषय गुंडाळला.. वाहिनीच्या तोंडाळ स्वभावाला खाद्य पुरविण्यात अर्थच नव्हता.त्यापेक्षा तिचा झालेला गैरसमज कायम ठेवण्यातच शहाणपणा होता.दोन दिवसांत दादा नागपूरला रवाना झाला. जातांना मंजूचं हात हातात घेऊन शांत बसला, त्याचे डोळे झरत होते. "आपल्या साऱ्याच भावना किती संयतपणे व्यक्त करतो हा" ,मंजूच्या मनात आले. दादा म्हणाला,"मंजू खूप करतेस ग आईच. कधीकधी मला स्वतःचीच लाज वाटते.मुलगा म्हणून , भाऊ म्हणून अगदीच नालायक आहे मी"... मंजू त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाली, "अरे ! दुसऱ्याच्या का आईचं करतेय मी? माझीही आई आहे ना ती. माझ्या परीक्षेच्या काळात ती पाठीशी खंबीर उभी राहिली.. आता तिच्या परीक्षेच्या काळात तिला एकटं कसं सोडू?... आणि आमचा दोघी बहिणींचाही लाडका भाऊ आहेस तू. अपेक्षा, कर्तव्य ह्या ओझ्यानी नातं झाकलं जावं असं आता माझं वय नाही आणि तुझं तर मुळीच नाही..." मंजू त्याचा मूड बदलावा म्हणून काहीशी चिडवत म्हणाली, "दादा पार म्हातारा झालास की रे तू!" पुन्हा सारं निवळत दोघे दिसखुलास हसले... निरोपाच्या वेळी आई सारं विसरली होती..दादा वहिनी नागपूरला रवाना झाले नि घर पुन्हा सुनं झालं.काळाच्या कुठल्यातरी लंबकावर दोलायमान होत लटकणारी आई आणि आयुष्यातला कुठलाच काळ आठवू सुद्धा नये म्हणून वर्तमानात जगणारी लेक.. काळाच्या गर्तेत अश्या आम्ही दोघीच तेव्हढ्या उरलो."आपला दादा वेगळाच आहे नाही.. पुरुष म्हणजे सत्ता, पुरुष म्हणजे मनानी दगड.. या साऱ्यांच्या पल्याड हळवा, शरणागत पुरुष...समाज नावाच्या व्यवस्थेने उन्नत होतांना घडवलेला.." आपल्यात खोलवर रुजलेली समाजशास्त्राची प्राध्यापिका डोकावलीच... मंजूच्या मनात आलं..तिच्या विचारांचं तिलाच नवल वाटलं.
                     पुढचे बरेच दिवस संथपणे आपल्या गतीने उगवले आणि मावळले. एक दिवस भर दुपारी अचानक ताई आली.... खचलेली,घुसमटलेली,आतून पार तुटलेली, एरव्ही पेक्षा मनानं अधिक दुबळी...जो काही छटाकभर आत्मविश्वास होता तोही गमावून पराभूत योध्यासारखी आयुष्याच्या रणांगणात गलितगात्र झालेली अंजू ताई....घरात येऊन बसताक्षणीच मंजूला भरल्या गळ्यानं म्हणाली,"तुझ्या घरी मी रडले तर चालेल ना ग?? मला मोकळं व्हायचंय ग खूप दिवसांचं"... असं म्हणत ती धाय मोकलून रडू लागली.मंजू शांतपणे तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली... हे कोंडलेपण एका प्रसंगाचं नव्हतं. गेली अनेक वर्षे अनंतरावांशी जुळवून घेतांना अंजू ताईची दमछाक ,मन मारणं सारं मंजू मूकपणे पाहत होतीच.ताईचा बांध फुटला होता..., "मंजू मी तुझं ऐकायला हवं होतं ग! मला माहित होतं सत्य काय आहे? मात्र मी ठामपणे ते स्वीकारू शकले नाही. मी हरले ग ..आई म्हणून हरले.तुझ्या पाठीशी आई जशी खंबीरपणे उभी राहिली तसं मी माझ्या निलयच्या पाठीशी उभं रहायला हवं होतं. माझं चुकलं ग!" म्हणत अंजू ताई स्फुंदून रडू लागली.ताई जराशी शांत झाल्यावर मंजूने शांतपणे विचारलं, "ताई आता नेमकं काय झालंय?"अंजू ताईने मूकपणे एक लिफाफा मंजूच्या हातात दिला. त्यात निलयचं एक पत्र निघालं...निलयने लिहिलं होतं,
"प्रिय आई,  
              तुमच्या आईवडील म्हणून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करणे मला शक्य नाही मात्र एक माणूस म्हणून माझं कर्तव्य मी पुरं करणार आहे. पुन्हा एक शापित मंजू घडविण्यासाठी मी लग्न सोहळा करणार नाही.त्या गरीब बिचाऱ्या पोरीचा बळी तुमच्या प्रतिष्ठेच्या वेदीवर देऊ नका.वारंवार विनवण्या करूनही तुम्ही ऐकत नाहीत म्हटल्यावर माझ्याकडे घर सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही.मात्र मुलगा म्हणून तू कधीही मला हाक मार मी नेहमी धावून येईन. 
तुझा अभागी मुलगा 
निलय"
                  एव्हाना पत्र मंजूच्या अश्रूंनी चिंब भिजलं होतं. मात्र हे अश्रू दुःखाचे नव्हे तर आनंदाचे होते .अभिमानाने तिचा ऊर भरून आला होता. मंजू वेड्यासारखी ताईला कवटाळत म्हणाली,"ताई अग रडतेस काय अशी? तुला अभिमान वाटायला हवा तुझ्या कुशीतून माणूस जन्माला आलाय... खराखुरा माणूस.आता तुमच्या मान्यता प्राप्त पुरुषपणाच्या व्याख्येत नसेल बसत कदाचित तो... " खोल श्वास घेऊन मंजू बोलत सुटली तिच्याही मनाच्या तळाशी साचलेलं... "माझी गाठ बांधली ना तो महेश .. मला पहिल्याच रात्री जे म्हणाला तेच शब्द त्या दिवशी निलयने मला ऐकवले होते... साधं सोपं वाक्य, 'मला स्त्री देहात रस नाही' सारे जग उलथून टाकणारे भयंकर वाक्य... मात्र फरक इतकाच होता की निलयला देहभान होतं... त्याची सद्सद्विवेक बुद्धी ,त्याचं माणूसपण जिवंत होतं.... माझ्या दुर्दैवानी महेशला मात्र ते नव्हतं. त्याच वेगळेपण त्याच त्याला तर मान्य नव्हतंच पण त्यापलिकडे त्याच्या घरच्यांनाही मान्य नव्हतं. लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? या बेगडी प्रतिष्ठेपायी एका बिचाऱ्या मंजुषाच्या आयुष्याचा चिखल झाला.... मग अंगारे धुपारे, महाराजांना वाहून घेणं,काळी जादू काय काय करायला लावलं मला. अखेर अस्पर्श देह सांभाळलेल्या मला बाहेरख्याली कुलटा ठरवत घराबाहेर काढलं. त्या क्षणी आई जर पाठीशी उभी नसती तर कदाचित वेड लागलं असतं मला... आपल्या निलयने हे सारं थांबवलं त्या मधुराच्या आयुष्याचा खेळ मांडला नाही ... त्याच्या निर्णयाचा आदर कर ताई. तो आहे तसा आपला आहे त्याला त्याचं आयुष्य जगू दे." दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या... आई बाहेर येऊन बसली ... तिला काय आठवत होतं की नव्हतं कुणास ठाऊक मात्र दोघींच्या पाठीवर ती हात फिरवू लागली.
🔏©यशश्री रहाळकर

३ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!