फॉलोअर

मंगळवार, ३० मार्च, २०२१

अहो रुपम् अहो ध्वनी ।


अगदी परवाचीच गोष्ट .. एक मैत्रीण त्यांच्या महिला मंडळाच्या अध्यक्षांशी माझी ओळख करून देताना म्हणाली...

"ही फार मोठी साहित्यिक आहे बरं का! काय एकेक कविता लिहिते आणि कथा तर विचारूच नका."

असं कुणी माझं कोरड कौतुक करायला लागलं की मला between the lines ओळींचा इको कानात ऐकू येऊ लागतो... म्हणजे आता हिच वाक्य मला अशी ऐकू आली

"ही फार मोठी साहित्यिक समजते स्वतःला... कविता काय पाडते .. आणि कथा तर किती सुमार विचारूच नका."

मग स्वतःलाच सावरत मी झटकन म्हणाले,

"काही नाही हो साहित्यिक वगैरे... काहीतरी सुचतं तसं लिहिते बास! फार काही नाही."

नंतर एकांतात गाठून माझ्या मैत्रिणीने मला झाप झाप झापलं...

 "इथे चार ओळी धड न खरडणारे स्वतःला साहित्यिक मानून मिरवतात ... तुला जरा कौतुक केलं की काय होतं देव जाणे?"

अखेर मला देवावर सोपवून ती रागानेच निघून गेली... पण खरं सांगते राव! "साहित्यिक " ह्या शब्दाची जाम भीती वाटते मला. माझी हा शब्द मिरवण्याइतकी पात्रता आहे की नाही हा भाग अलाहिदा! पण ह्या शब्दाच्या उच्चारानेही हल्ली मला धडकी भरू लागली आहे. तुम्हाला म्हणून सांगते ते so called साहित्यिक आणि त्यांचे ते व्हाट्स अँप समूह म्हणजे "आली अंगावर आणि घेतलं शिंगावर"  

साधारणपणे नव्याने लिहिणारे माझ्यासारखे लोक समविचारी लेखनाची आवड असणाऱ्या माणसांच्या किंवा जे किमान आपण खरडलेलं वाचून प्रतिक्रिया देतील अश्या समूहाच्या प्रतीक्षेत असतात.. मग अश्या अनेक साहित्यिक समूहांच्या कळपात तुम्हाला सामील करून घेतलं जातं...ह्या समूहाची नावे देखील फारच विनोदी असतात... साहित्य , सरस्वती, अभिजात लेखन ह्या साऱ्याला अक्षरशः वेठीला धरलेलं असतं. कधीकधी तर हमीदाची कोठी ह्या धर्तीवर..."अमुक ढमूक चे साहित्य मंडळ" असेही नाव असते. आता इथे काय  कार्य होते ? तर कविता /लेख/ कथा पाडायच्या कश्या हे तुम्हाला शिकवले जाते... भलेही तुमच्या एका ओळीला अर्थ नसेल पण तुमची कविता बारा, सतरा, चौतीस , एकोणवीस अश्या अक्षरांच्या कवायती करून तयार झालीच पाहिजे. रोजच्या रोज चित्र , चारोळ्या, वेगवेगळे साहित्य प्रकार अगदी अभंग ते लावणी, ह्या साऱ्यांच्या महास्पर्धा ह्या आखड्यांमध्ये रंगत असतात... होय! हे ग्रुप आखड्यांपेक्षा अजिबात कमी नसतात ... सतत वाद, भांडणे, कटकटीचे राजकारण ह्यांच्या दंगली इथे छान रंगतात. साहित्यिक चर्चा वगैरे फालतू बाबींना इथे जागाच नसते... like वर like आणि वाह वर वाह! असे देण्याघेण्याचे सरधोपट हिशेब इथे असतात. तुम्ही न आवडलेल्या लिखाणाचेही भरभरून कौतुक करायलाच हवे असते... तसे न केल्यास तुम्ही नव-साहित्यिकांना प्रेरणा न देणारे कोत्या मनाचे मानले जाता.... त्यात अविश्वसनीय पद्धतीने तुमची जात / धर्म ह्यांचाही गटबाजी आणि बोली लागते...हे सगळे मी अनुभवलेले वास्तव आहे (पण सगळ्याच ग्रुप मध्ये असे नसते हं!☺️ काही ग्रुप आदर्श असतात.) आधीच स्पष्ट केले बाबांनो! 🙏उद्या कुणी येऊन माझे बखोटे धराल. .... कारण वेळ पडल्यास तेही धरले जाते हे मला पक्के ठाऊक आहे😂😂

ह्या समूहांचे सन्माननीय प्रमुख भयंकर इगो असणारे, आपण साहित्य संस्कृतीच्या सृजनाचे कार्य कसे करतो, साहित्यसेवेचे व्रत आपण कसे घेतले आहे वगैरे  ... हे सतत मिरवणारे आणि लेखक होऊ पाहणाऱ्या चार गरीब जीवांची मुस्काटदाबी करणारे महान मुजोर लोक असतात. (त्यात समूह संचालक भगिनी असतील तर एखाद्या लेडी डॉन सारखा त्यांचा दरारा असतो.) दर आठपंधरा दिवसांनी त्यांचा कौतुकसोहळा समूहावर आयोजित केला जातो... त्यावर समूह प्रमुखांबद्दल भरभरून न लिहिल्यास त्यांची खप्पा मर्जी होते आणि ब्रह्महत्येचं पाप शिरावर घेऊन वावरावे लागते. "ते किती महान आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला कशी संधी मिळाली , कल्पनांना कसे धुमारे फुटले, साहित्य क्षेत्राची कशी ओळख झाली... " वगैरे कौतुकाचा मुलामा ह्या देवतेवर सतत चढवावा लागतो. इथे एक ग्राफिक्सचा जाणकार ह्या डॉन ने हाताशी ठेवलेला असतो... रोजच्या रोज होणाऱ्या स्पर्धांचे सर्टिफिकेट्स design करण्याचे अत्यंत कौशल्याचे काम 😆 ही थोर व्यक्ती न थकता सातत्याने करत असते... समूहामधील "डॉनचा दाया हात" ही व्यक्ती असते.. त्यामुळे त्यांच्यापुढेही "घालीन लोटांगण वंदीन चरण" करावेच लागते. समूहातच नव्हे तर बाहेरच्या कोणत्याही स्पर्धेत तुम्हाला मिळालेलं यश समूहालाच सादर सस्नेह अर्पण करावे लागते... समूह संचालकांच्या मेहनतीनेच तुम्ही साहित्यिक म्हणून घडत असता. त्यांनी लिहिलेले लेखन कसे अप्रतिम आहे हे तर सतत प्रस्तुत करावेच लागते... समूह संचालकांचे वाढदिवस / लग्नाचे वाढदिवस दिवाळी/ पाडव्यासारखे मोठ्ठे सण असतात.🙄🤷..... एव्हढे सगळे पापड बेलून तुम्हाला काय मिळतं तर साहित्यिक असल्याचा शिक्का... 🙏🤦 त्या समूहांच्या तुमच्याच कडून सज्जड पैसे घेऊन केलेल्या स्नेहसंमेलनात तुम्हाला मोठमोठ्या पदव्या आणि ट्रॉफी बहाल केल्या जातात. 

इथून पुढे तुमची अवस्था कुत्रं खात नाही अशी वाsतड होते... तुम्ही त्या समूहातील मार्गदर्शक होता🙇💥 आणि न येणारे ब्रम्हज्ञान लोकांना पाजत सुटता. मार्गदर्शक म्हटलं की अचानकपणे केस पिकून म्हातारी झाल्याचे उगीच मला वाटून जाते. वेगवेगळ्या स्पर्धांचे तुम्ही परीक्षक होता... पण तुम्ही तपासून दिलेल्या नंबर्सना कवडीचीही किंमत नसते... डॉन म्हणतील त्या लोकांनाच नंबर दिले जातात... कधी नवीन व्यक्तीला प्रोत्सान म्हणून तर कधी समूह सोडण्याची शक्यता असल्यानं धरून ठेवायचं म्हणून...😝😔 ज्यांना कवितेचा गंधही नसतो पण कवी व्हायची खूपच तीव्र इच्छा असते अश्या उत्साही पिल्लांना तुमच्यावर सोडले जाते. मग व्हाट्स अँप, ग्रुप /पर्सनल, एफबी, मेसेंजर शक्य असल्यास कॉल करून वेळी अवेळी ही हौशी पिल्लावळ तुम्हाला मार्गदर्शन मागू लागते. हल्ली मला कुणी मार्गदर्शन करा म्हटलं की भीतीने मोठ्ठा गोळाच येतो पोटात... इतके हे लोक पिडतात.  

"मॅम तुमच्यासारख्या कविता कश्या लिहू ?"

"तुझे वाचन कमी असावे असे मला वाटते आहे जरा शब्दसंपदा वाढव...👍"

"नाही ते वाचन बिचन करायला वेळ कुणाकडे आहे इथे... तुम्ही झटपट टिप्स द्या"

मी कपाळ बडवून घेते... काय पाप केलेलं असतं म्हणून हे असले नर्मदेचे गोटे पदरी पडतात... ह्या लोकांच्या कवितेला छान म्हणायला स्वतःच्या पारदर्शक मनाच्या सटकन थोबाडीत मारावी लागते. एकतर सोशल मीडियामुळे प्रत्येक जण व्यक्त होतोय, लिहू लागलाय हे उत्तम आहे पण प्रत्येक जण स्वतःला साहित्यिक मानू लागलाय हे महाभयंकर आहे. 

अगदी स्वतःच्या नणंदेला...
 "ताई तू दुसरी माझी आली पोटी सासूच्या..." 

किंवा नवऱ्याच्या वाढदिवसाला..
"प्रिय... तुमच्यामुळे आयुष्याचे सोने झाले की आयुष्य सोन्याचे झाले म्हणू मी..." 

अश्या शुभेच्छा देणारी व्यक्ती ही महान साहित्यिक असते. चार शिंतोडे पडले की "अत्तराचे भाव कोसळतात " ... ऊन पडलं उन्हावर लिही, थंडी पडली तर गुलाबी हवेवर  लिही..  अगदी लॉक डाऊन वर सुद्धा कविता केलीच पाहिजे. बळीराजा माझा म्हणत ढिगाने कविता पाड, लघुकथा अलक वगैरेच्या नावे वाट्टेल ते लिही म्हणजे कथा ...

"चार ओळीत काव्य , दोन ओळींचे गाणे, एक ओळ कथा 
हा सगळा साहित्यिक म्हणवून घ्यायचा आटापिटा..."

आहाहा! काय ते अद्भुत काव्य ☝️ हे असलं पाट्या टाकत सुटलं की तुम्ही साहित्यिक झालाच म्हणून समजा. साहित्यिक होण्याची काही व्याख्याच नाही ना , तसे आवश्यक काही शिक्षणही नाही .. मग काय स्वतःच्या नावापुढे गझलसूर्य, काव्यसमिधा अश्या उपाधी बेलाशक निलाजरेपणाने मिरवायच्या... म्हणजे साहित्यिक होता येत असावे.... माझी साहित्यिक होण्याच्या व्यथेतील कथा इथेच संपत नाही.... तुम्ही ज्या समूहात असता तिथे एक विरोधी पक्ष असतो... ज्याला डॉन चे महत्व डाचत असते.. मग स्वतः डॉन होत तो नवीन ग्रुप सुरू करतो... त्या ग्रुप वर कसे नियम कडक आहेत, आपला ग्रुप कसा निर्मळ म्हणत नव्याने सुरुवात होते. मग तुम्ही ढोलकी सारखे दोन्हीकडून बडवले जाता. रोज रोजच्या स्पर्धा आणि साच्यातून कुरडया पाडल्या सारख्या कविता/लेख आणि कथा पडल्यानंतर एक क्षण असा येतो जेव्हा तुमचं तुम्हालाच उमजतं ... 

 "अरेच्चा! मनात जे साठलंय ... जे मला हृदयापासून मांडायचं आहे, जे मला उत्तम लिहिता येतंय ते तर मी गेले कित्येक महिने लिहायचेच राहिले आहे ." 
 
दिवसाचा एक ठराविक वेळच तुम्ही लेखनाला देऊ शकता ना! तिन्ही त्रिकाळ लेखन केलं तर बाकी काही नाही पण उपाशी नक्कीच मरू. तर तो सगळा अत्यंत महत्वाचा वेळ तुमची लेखणी कुणीतरी दिलेल्या फुटकळ विषयावर नाचत असते... तिला आत्मा नसतो अगदीच नीरस बेचव लेखनाचे ढिगारे ती रचत असते.... तोपर्यंत likes आणि वाहवा ची नशा इतकी झिंगून टाकणारी असते की लेखणीची घुसमट तुमच्या पर्यंत पोहोचतच नाही. अश्या लेखनाच्या डोंगर रचण्याला जर साहित्यिक म्हणत असतील तर बाबांनो ! मी नाही त्यातली... मी जे पटेल, जे भावेल ते आणि तेव्हढंच लिहिते. कुणाला आवडलं तर मनापासून आनंद वाटतो मला कुणाला नाही आवडलं तरी मी स्वागत करते... कुणाच्या तरी आभासी like साठी जीव टाकायला माझी लेखणी दुबळी नाही. मला आवडतात माणसं वाचायला , न सांगताही त्यांचे चेहरे जे बोलतात ते मांडायला आवडतं मला . जे माझ्या मनात उतरू शकत नाही ते कागदावर उतरवून कागद काळे कशाला?

शालेय अभ्यासक्रमात एक सुभाषित होतं....

"उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि
परस्परं प्रशंसयंते, अहो रूपं अहो ध्वनि ।।"

उंटाच्या लग्नात गाढवाच्या गायनाचा कार्यक्रम ठेवतात. गाढव उंटाच्या रूपाची प्रशंसा करतो आणि उंट गाढवाच्या गाण्याची.... दोघांजवळ नेमके जे नाही त्याचीच दुसरा प्रशंसा करतोय ... ह्या खोट्या, वरवरच्या दिखाऊ स्तुतीमुळे खरंतर दोघांचं नुकसानच होतंय... त्यांच्यापाशी जे गुण आहेत , त्यांची जी वैशिष्ट्य आहेत त्याकडे... त्याच्या विकासाकडे लक्ष कोण देणार?? प्रत्येकाचं आपलं एक लेखन वैशिष्ट्य असतं... कुणी सकस कथा लिहीतं, कुणी सहज गाणी, कुणी वृतांचा तोल सांभाळत गझल तर कुणी मुक्तछंदात अधिक खुलतो.... सगळं सगळ्यांना जमलंच पाहिजे हा अट्टाहास का ? कशासाठी??

तसं पाहिलं तर लेखन क्षेत्र फारच थोड्या लोकांना आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकतं, त्यापलीकडे मोजक्या लोकांना प्रसिद्धी आणि त्याहीपलीकडे शाश्वत स्थान विरळाच. तरीही सगळ्यांना हल्ली  साहित्यिक व्हायचं आहेच... वाहत्या गंगेत हात धुवत काही प्रसिद्ध कवी/गीतकार कवितांचे , लेखनाचे, अनुवादाचे वर्कशॉप घेताहेत... हजारभर रुपयात 36 प्रकार असे व्यवहारी स्वरूप आहे. 3/4 दिवसांच्या ऑनलाईन कोर्सचे 5 ते 10 हजार रुपये इतकी फी आहे. त्यांचे हे वर्ग फुल्ल असतात म्हणे... असू दे बापुडे!👍 कुणाला तरी लिहून पैसा मिळतोय ह्यात आनंद आहेच पण मला वेडीला वाटून जातं... असे कोर्स करून खरे साहित्यिक घडतात काहो?? मनाला बोचलेल्या वेदना कागदावर उतरवण्याचे शिकवता येईल?? दुसऱ्याच्या दुःखाशी एकरूप होत, सुखात रंगून जात शब्दांच्या चिमटीत त्याच्या भावना कश्या पकडायच्या हे येईल का शिकवता?? कुणी काहीही म्हणा बाबांनो! मी काही साहित्यिक नाही मी आपले हौसेने सुचेल ते लिहिते हेच खरे! लोभ असू द्यावा🙏😊
✒️ यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!