सुधा ताई तश्या हल्ली फार उदास असायच्या... इकडे "श्रीकृष्ण निवास" मध्ये रहायला आल्यापासून एकटेपणाने त्यांना पार पोखरून टाकले होते.... आता आयुष्याची उन्हे उतरणीला लागल्यानंतर खंत करावी असे खरंतर काहीच उरले नव्हते... येईल तो दिवस आनंदाने काढावा इतके सुखच सुख होते. आरोग्याचे म्हणावे असे काहीही त्रास देव दयेने नव्हते. दोन्ही लेकी आपापल्या घरी सुखात होत्या. मुलगा शुभंकर आणि सून संपदा ह्यांचा दृष्ट लागण्याजोगा संसार होता... दोन नातू अतिशय गुणी , हुशार होते. एक बंगलोरला नोकरी करत होता तर दुसरा उच्च शिक्षणासाठी अमेरीकेला रवाना झाले होता. सगळे आपापल्या आयुष्याच्या व्यापात गुंतले असूनही सुधा ताईंवर सगळ्यांची माया होती. नातवंडे आवर्जून फोन करत, विडिओ कॉल करून गप्पा मारत, लेकी देखील आलटून पालटून फोन करत. सुनेने देखील कोणताही परकेपणा ठेवला नव्हता... अतिशय मायेने ती सगळे करायची त्यांचे. मुलगा शुभंकर तर मातृभक्त होता अगदी... कंपनीत मोठ्या अधिकारी पदावर अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणे, मेहनतीने पोहोचलेला त्यांचा मुलगा त्यांच्या अभिमानाची खास जागा होता. कितीही व्यापात असला तरी शुभंकर आईची चौकशी केल्याशिवाय जेवायचा नाही.कितीही महत्वाचे काम असो आईसाठी त्याच्याकडे वेळ नाही असे कधीही व्हायचे नाही... एकूणात कोणत्याही व्यक्तीने स्वप्नात पहावं असंच वृद्धत्व नशिबाने सुधा ताईंना लाभलं होतं... नाही म्हणायला यजमान श्रीकृष्णराव जरा घाईनेच गेले म्हणायचे... त्यांची एकसष्टी मुलांनी अगदी हौसेने केली आणि त्याच रात्री त्यांनी तृप्तपणे जगाचा निरोप घेतला. आजचे हे सोन्याचे दिवस ...लेकाचा हा टोलेजंग बंगला पहायला 'ते' हवे होते असे सुधा ताईंना वाटायचे... पण बाकी तशी काही खंत नव्हती... हे खरे.
श्रीकृष्णरावांबरोबर जवळपास अख्ख आयुष्य सुधाताईंनी चाळीतील दोन खणी घरांत घालवलं होतं. तिथे सतत भोवताली माणसांची वर्दळ असायची... पुढे शुभंकर नोकरीला लागल्यावर त्याने मोठं घर घेतलं. मोठं घर म्हणजे शहराच्या मानाने मोठं... दोन बेडरूम असणारं... सुधा ताई तिथेही रमल्या... आजूबाजूची माणसे आपलेपणानी बोलायची,. सकाळी फिरायला जायला समवयस्क मैत्रिणी होत्या, भजनी मंडळ होतं, भिशी होती.... मुख्य म्हणजे आजूबाजूला भरपूर माणसे होती. सगळ्याच मध्यमवर्गीय माणसांना उच्चभ्रू व्हायची काहीशी घाई असतेच... आणि शहरात वाढलेल्या प्रत्येकाचं स्वतःच्या बंगल्याच स्वप्न असतंच. तसं ते शुभंकर आणि संपदाचेही होतेच. काही वर्षांपूर्वी मुख्य पुण्यापासून बरेच लांब कोथरूडला त्यांनी प्लॉट घेऊन ठेवला होता... आता त्या प्लॉट्स च्या जागांवर सुरेख बंगले उभे राहू लागले तसे त्यांनी आपले बंगला बांधायचे स्वप्न पुरे केले. प्रशस्त बंगल्याच्या दिमाखदार पाटीवरील "श्रीकृष्ण निवास" हे नाव बघून त्यांचे डोळे पाणावले. आपल्या सामान्य क्लार्क म्हणून आयुष्य काढलेल्या नवऱ्याच्या कष्टांची जाणीव लेकाने ठेवली ह्यात त्यांना कृतकृत्य झाल्यागत वाटले. नव्या जागेचं, प्रशस्त घराच्या नवलाईच नऊ दिवस कौतुक झालं... नंतर मात्र त्यांना जाणवली ती एकटेपणाची भयाण पोकळी. फारशी वस्ती नाही त्यातही काही बंगल्यांचे बांधकाम सुरू आणि त्याहूनही कमी बंगल्यात रहायला आलेले परीवार... एखाद्या गुहेत जावे तसे आपापल्या घरात दडून बसणारे! बोलायला माणूस दिसू नये अशी परिस्थिती...
मुलगा सून आपापल्या कामावर रुजू झाले तश्या सुधा ताई हळूहळू एकट्या पडू लागल्या. नाही म्हणायला एक पूर्ण वेळेची बाई सोबत म्हणून ठेवली होती... बाई कसली 19/20 वर्षांची पोर कमला... परप्रांतातील परभाषिक कमला सगळी कामे चटपटीतपणे करायची... पण तिचे मोडके तोडके मराठी आणि सुधा ताईंना तिची भाषाच येत नसल्याने तसा संवाद होत नव्हताच... सदेह सोबत होती एव्हढेच म्हणायचे.आता त्यांचे हळूहळू खाण्यापिण्यातून चित्त उडू लागले... तासन तास एकट्याच शून्यात नजर लावून बसलेल्या असायच्या.... जेमतेम महिनाभरात त्या अर्ध्या झाल्या... चेहऱ्यावरचे सगळे चैतन्य नाहीसे झाले, डोळे खोल गेले.... त्यांचा मुलगा शुभंकर आईच्या ह्या अवस्थेने व्यतिथ झाला... आपण इकडे येऊन चूक तर नाही ना केली.. असे अपराधीपणाचे विचार त्याच्या मनाने घेतले. सुधा ताईंनी आता कुणाशीही बोलणे सुद्धा सोडून दिले ... त्यांना झोप येईनाशी झाली. त्यांची मानसिक अवस्था ढासळते आहे, हे लक्षात आल्याने मुलगा आणि सून पुन्हा जुन्या घरी जावे अश्या विचारावर आले. .... आणि एक दिवस संध्याकाळी...शुभंकर आणि संपदा ऑफिसमधून घरी परतले..... तेव्हा कमला आपले कपडे बांधून दारात बसली होती. भीतीने ती थरथर कापत होती.... ती काम सोडून निघाली होती. एक पाऊलही घरात टाकायला ती तयार नव्हती. तिला आता सुधा ताईंची भीती वाटत असल्याचे सांगून ती पैसेही न घेता चालती झाली. शुभंकर आणि संपदाला हा काय प्रकार आहे ते कळेना. त्यांनी सुधा ताईंना घरभर शोधलं पण त्या कुठेच नव्हत्या... शेवटी शुभंकर "आई आई!" म्हणून हाका मारत सुटला आणि गच्चीवरून भराभरा सुधा ताई खाली उतरल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत होता..
"अरे शुभा! कधी आलास रे तू?? त्या शेजारच्या आजींशी बोलत होते रे! राधाक्का ...नाव त्यांचं. "
सुधा ताईंना आनंदात बघून शुभंकर आणि संपदाचा जीव भांड्यात पडला. तिथून पुढे सुधा ताईंचा स्वभाव पूर्णपणे पालटला... त्या सतत उत्साहात आनंदात असायच्या. बहुतेक वेळा राधाक्कांबद्दल बोलत असायच्या आणि जवळपास दिवसभर त्या काहीना काही निमित्ताने गच्चीवर असायच्या. कधी एखादा नविन पदार्थ करून मुलाची वाट बघायच्या... ही रेसिपी त्यांना राधाक्कांनी शिकवली असायची. कधी सुनेला लोकर आणायला सांगून नवीन पद्धतीचे विणकाम करत... अर्थातच राधाक्कांनी शिकवल्या प्रमाणे. राधाक्कांसारखा मोठा झुला.... बंगळी त्यांनी मुलाकडून गच्चीत लाऊन घेतली. एक दिवस माळी बोलावून घेतला आणि हवी ती सुंदर फुलझाडे लाऊन गच्चीवर टेरेस गार्डन फुलवून घेतलं. त्या झाडाफुलांत त्यांचा वेळ छान जाई... शिवाय राधाक्कांची सोबत होतीच. आई आनंदात राहते आहे ना... मग कोणत्याच गोष्टीला, खर्चाला शुभंकरची ना नव्हती. शेजारच्या तळपदेंच्या बंगल्यातील आजी राधाक्का ह्यांच्या रूपाने आपल्या आईला छान मैत्रीण मिळाली आहे... त्यामुळे आई पुन्हा पूर्वीसारखी आनंदी झालीये ह्यामुळे तोही खुष होता. राधाक्का कश्या मजेशीर गप्पा मारतात , पांढरी रेशमी नऊवारी कशी चोपून नेसतात... त्यांच्या गळ्यातली दोन पदरी मोहनमाळ कशी सुंदर आहे... गोऱ्यापान ,घाऱ्या डोळ्यांच्या, ठेंगण्याश्या राधाक्का कश्या गोड भजने गातात... अशी वर्णने सतत सुधा ताईंच्या बोलण्यात असायची. त्या आणि त्यांची नवी मैत्रीण राधाक्का अगदी मुली आणि नातवंडांना पण माहीत झाली होती... फोन आला की सगळ्यांचं पहिलं वाक्य असायचं...
"काय मग काय म्हणतेय नवीन मैत्रीण? काय नवे शिकवले आज?"
त्यावर सुधा ताई भरभरून बोलत जायच्या.
एक दिवस एका बिझनेस मीटच्या निमित्ताने शुभंकरची मि. तळपदेंशी भेट झाली. फॉर्मल गप्पांमध्ये "हे तर आपल्या शेजारीच राहणारे तळपदे" ... हे शुभंकरच्या लक्षात आले. तो अगदी भावविभोर होत त्यांना हात हातात घेत कृतज्ञतेने म्हणाला...
"आपल्या आज्जींमुळे माझी आई छान रुळली नवीन जागेत नाहीतर एकटी पडली होती फार..."
मि. तळपदेंच्या चेहऱ्यावरचे भले मोठ्ठे प्रश्नचिन्ह पाहिल्यावर शुभंकर म्हणाला..
"तुमच्या आजी ... राधाक्का. हल्ली रोज भेटतात आईला..."
राधाक्कांचे नाव घेताच मि तळपदेंचा चेहरा खर्रकन उतरला... क्षणभर विचार करून ते म्हणाले.
"आज संध्याकाळी तुम्ही please आमच्या घरी याल का?... तुम्ही आणि मिसेस..."
त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी बघून शुभंकर भेटीला लगेच तयार झाला. संध्याकाळी 7 च्या सुमारास शुभंकर आणि संपदा तळपदेंकडे गेले. तळपदे नवरा बायको वाट बघत असावे... जुजबी ओळखपाळख झाल्यावर... मि.तळपदेंनी विचारले...
"तुमच्या आईंविषयी काय म्हणालात आज तुम्ही...?"
शुभंकर उत्साहाने सगळे सांगू लागला. संपदाही सहभाग नोंदवत म्हणाली...
"तुमच्या राधाक्का भेटल्या आईंना आणि आमची काळजीच मिटली."
तळपदे नवरा बायको गंभीर झाले...
"कुठे भेटतात राधाक्का तुमच्या आईंना?"
मिसेस तळपदेंनी विचारलं.
"अहो गच्चीवर तुमच्या.. आणि माझी आई आमच्या गच्चीतून बोलते त्यांच्याशी."
शुभंकर म्हणाला.... संपदाने न राहवून विचारले...
"राधाक्का आपल्या मातोश्री आहेत का?"
क्षणभर शांत राहत मि. तळपदे म्हणाले...
"चला माझ्यासोबत.."
देवघरातल्या खोलीत एका मोठ्या तसबीरीकडे बोट दाखवत ते म्हणाले ...
"ही माझी आई राधाक्का.. 2 वर्षांपूर्वी निवर्तली."
क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले...
"आम्ही ह्या घरात रहायला आलो आणि आई एकटी पडली असावी... सतत मनाशी बोलायची , भिंतीकडे नजर लावून शून्यात बघायची... एका पहाटे ती गेलेली होती.. डॉक्टर म्हणाले कार्डियाक अरेस्ट पण मी स्वतःला कधीही माफ करू शकलो नाही...."
शुभंकरला घाम फुटला....चांदीच्या दिव्याच्या प्रकाशात फोटो उजळून निघाला होता. वर्णन हुबेहूब होतं अगदी... ठेंगण्या, गोऱ्या, घारे डोळे, पांढरी रेशमी नऊवारी आणि गळ्यांत दोन पदरी मोहनमाळ... संपदाला अरिष्टाची जाणीव झाली... आणि ती थरथरत हॉलमध्ये येऊन बसली. थोडा वेळ चौघेही मौन होते.
मिसेस तळपदे संवाद सुरू करत म्हणाल्या..
"माझ्या सासूबाईंना बागेची फार आवड होती.... विणकाम , भरतकाम सुरेख करायच्या... भजने तर इतकी गोड गायच्या...."
मि. तळपदे डोळे पुसत म्हणाले..
"माझी आई खूप आनंदी उत्साही होती पण मी मोठे घर म्हणत हा बंगला घेतला आणि आई एकटी पडत गेली... त्याच एकटेपणाने तिला पोखरले असावे..."
पुन्हा एकवार निःशब्द शांतता पसरली. शुभंकर आणि संपदाचा चेहरा काळजीने काळवंडला होता... निरोप घेतांना मिसेस तळपदे पुन्हा एकवार आठवण झाल्यागत म्हणाल्या...
"गेल्या दोन वर्षांत आम्हाला कुणालाही सासूबाई कधी दिसल्या नाहीत... तुमच्या सासूबाईंना पूर्वी कधीही भेटलेल्या नसतांना दिसल्या हे नवलच म्हणायचे....."
थोडंस विचारात गढून जात त्या पुढे म्हणाल्या...
"एकदा एका कामवालीला गच्ची झाडतांना त्या बंगळीवर बसल्याचा भास झाला होता ... मग ती कामच सोडून गेली. आम्ही कुणीही फारसे गच्चीवर जात नाही...वेळच नसतो एव्हढा निवांत..."
शुभंकर आणि संपदा मनातून हादरले होते. घरी येताच शुभंकरने दोन्ही बहिणींना कॉल करून सगळे कानावर घातले... बहिणींनी काळजीपोटी एक दोन दिवसात तिकडे येण्याचे आश्वासन दिले... तोपर्यंत संपदाने सायकायट्रिस्टची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली. "जेवायला चल .." म्हणून आईला बोलवायला गेलेला शुभंकर तिथेच हंबरडा फोडून रडू लागला... पुढचे सगळे सोपस्कार पार पडले. डॉक्टरांनी कार्डियाक अरेस्ट सांगितलं... पण शुभंकर स्वतःला कधीही माफ करू शकला नाही. सुधा ताई एकाकीपणाने पोखरून गेल्या हे सत्य त्याचे मन नाकारू शकले नाही.
दरम्यान पाच सहा वर्षे गेली असावीत. आता तो भाग खूपच छान डेव्हलप झाला होता . जवळपास सगळे बंगले असणारी ती कॉलनी मोठी टुमदार दिसत होती... मध्यभागी एक गार्डन आणि जॉगिंग ट्रॅक देखील तयार झाला होता. शुभंकर रोजच्या सारखा मॉर्निंग वॉकला गेला असता... एकाने त्याला मागून हटकले...
"अहो.. शुक् शुक्! हो हो आपणच.... तुम्ही त्या श्रीकृष्ण निवास वाले ना! माफ करा आपली तशी थेट ओळख नाही. मी नव्यानेच तुमच्या उजवीकडील बंगल्यात रहायला आलोय..."
मग ओळख झाली.... विचारपूस झाली. अगत्याने चहापाण्याला बोलवून तो माणूस निघाला... जातांना क्षणभर थांबत पुन्हा माघारी वळत म्हणालो...
"अहो.. मुख्य ते बोलायचे राहिलेच. तुमच्या आजींना सुधा ताईंना सुद्धा घेऊन या बरं नक्की. माझी आई आणि त्यांची छान मैत्री झालीये... गच्चीवर गप्पा मारत असतात तासन तास हल्ली... त्या निमित्ताने भेट होईल."
शुभंकर भीतीने पांढरा पडला होता... त्या बंगल्यांच्या जगात गच्चीवर अश्या एकेकट्या पडलेल्या किती म्हाताऱ्या होत्या कुणास ठाऊक?
✒️यशश्री रहाळकर
खूप छान लिहिलं आहे यशश्री मॅम. Good story telling.
उत्तर द्याहटवाआपली पोस्ट छान आहे Ramsay ने वाचली तर सिनेमा काढेल अभिनंदन आपले
उत्तर द्याहटवाकथा खरोखर खिळवुन ठेवणारी... शेवटापर्यंत जाई पर्यंत उत्सुकता तशीच होती...भयकथा तरीही मस्तच...
उत्तर द्याहटवाकथा खूपच सुंदर , खिळवून ठेवणारी.
उत्तर द्याहटवा