अनुत्तरीत???
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
काही प्रश्न अचानकपणे आयुष्यात धूमकेतू सारखे प्रकट होतात . तुमच्या आयुष्यात उलथापालथ करतात पण असे का झाले ?? हा प्रश्न तुम्ही काळाला न विचारलेलाच उत्तम असतो. काळाकडून उत्तर मिळतेच असेही नाही आणि मग सुरू होतो अनुत्तरीत प्रश्नांचा अखंड छळवाद..... पूर्वीच्या काळी एक बरं होतं काही नको ते घडलं की माणूस नशीबाला दोष देत बसे नी मोकळा होई . आता मात्र माणूस कार्यकारण भाव जाणून प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊ लागला. खरं सांगायचं तर काही प्रश्न सोडवायचेच नसतात.. ते तसेच अनुत्तरीत ठेवायचे असतात.
ही कथा आहे माझ्या मुलाची ... माझा एकुलता एक लेक अविनाशची ; त्याहीपेक्षा ही कथा आहे आभाची . अगदी नेमक्या शब्दात मांडायचे तर ही कथा आहे त्या दोघांमधील अनुत्तरीत प्रश्नाची ... कधीही उत्तर न मिळणारा इवला प्रश्न... का???
माझा लेक अविनाश वय वर्षे 47 नॅशनलाईज बँकेत उच्चपदस्थ अधिकारी ... कोणतंही व्यसन नाही अगदी कामाचं देखील नाही. आपले नियमित काम झाले की पावले घरी वळणारा कुटुंबवत्सल, सरळमार्गी , सरधोपट माणूस. वयाच्या 25 शीत M.Com.आणि ICWA झाला बँकांच्या परीक्षा देत वर्षभरात बँकेत लागला सुद्धा. त्याला साधे सरळ शांत आयुष्य हवे होते . वर्षभरात त्याच्यासाठी आभाला पसंत केलं खरंतर arrange marriage पण प्रेमविवाह वाटावा असा दृष्ट लागण्यासारखा जोडा. आभाला मनापासून संसार करायचा होता नोकरी व्यवसाय वगैरे नाही... अविनाश खुष झाला असावा यावर. मी आयुष्यभर पोस्टात नोकरी केलेली त्यामुळे आता गरज नसतांना सुनेने ती ओढाताण करावी असे मलाही वाटत नव्हते.अविनाशचे बाबा कोर्टातून रिटायर्ड झालेले .तसे छोटासा बंगला गाडी दागदागिने सारे जोडून ठेवले होते ते अविनाशसाठीच...
21 वर्षांच्या त्यांच्या संसारात आभाने तक्रारीला जागाच दिली नाही कधी.. गौराई वाटावी असे रूप सात्विक सौंदर्य...स्वभावानं लाघवी, हुन्नरी सतत नवनवीन कला कौशल्य शिकण्याची अतिशय आवड होती तिला. आभाचे माहेर गावातलच.. आईवडील दोघे शिक्षक होते त्यामुळे शिस्तीत वाढली . एक मोठा भाऊ वहिनी सारे प्रेमानी राहणारे सगळं कसं आखीव रेखीव सुरेख जीवन . त्यांच्या लग्नानंतर वर्षभरात अंबरीश चा माझ्या नातवाचा जन्म मग त्याला वाढवण सारा सोन्याचा काळ .. अंबरीश मुळात हुशार आणि मेहनती अगदी अविनाश सारखा .. गेल्याच वर्षी बारावी झाला 96 % नी IIT पवई ला रुळला सुद्धा वर्षभरात .. सुट्टीला तेव्हढा येई .आता उणीव काढू म्हणून ठरवलं तरी सुईच्या टोकावर मावणार एव्हढेही काही त्रासाचे वावगे नाही .
ह्या साऱ्या आखीव चौकटीवर एक वादळ येऊन धडकले .. साधारण 15 दिवसांपूर्वी दुपारी जरा पडते म्हणून त्यांच्या खोलीत आभा जी झोपायला म्हणून गेली ती अविनाश सायंकाळी आला तरी उठली नाही ... ती उठत का नाही ? म्हणून पाहिले तर गेली होती कायमची ... पोस्ट मार्टेम मध्ये तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले....... 43 व्या वर्षी सुखाचा संसार सारे मानाजोगे घडत असताना आभाने आत्महत्या का करावी ?? साऱ्यांनाच कोडे पडले होते.आडून आडून सारे तेच विचारीत पण ज्या प्रश्नाचे उत्तर मलाही ठाऊक नाही ते मी कसे देणार??
सारे हळूहळू ओढून आयुष्य मूळ पदावर आणत होते ... मात्र अविनाशचे आयुष्य जणू त्याच क्षणात कोंडले गेले होते...तो पुढेही जाऊ शकत नव्हता आणि मागेही फिरू शकत नव्हता.ह्या का ? चे उत्तर त्याला हवेच होते झपाटून टाकले होते जणूकाही त्याला ह्या का ?ने. आभा अचानक अर्ध्या वाटेवर सोडून गेली होती हे दुःख तर आयुष्यभराचे होते पण त्याहीपेक्षा ती कोणतीही चिठ्ठी न लिहिता कुणा जवळही काहीही व्यक्त न होता गेली हे शल्य आतून पोखरून टाकणारं होतं.13 दिवस कसेबसे येणाऱ्या जाणाऱ्या च्या भेटीत आणि विधीत त्याने घालविले .. लगेच रात्री त्याने घरातील प्रत्येक चिठ्ठी चपाटी अगदी कागद न कागद तपासायला घेतला .
आभाने कुठेच काहीच लिहिलेले नव्हते .. मग तिचे मेल शोधणं त्याचस password .. crack करवून घेणं सारं पार पडलं त्यावरही कुठेही काहीही दुखरे बोचणारे आढळले नाही.दोन दिवसांपूर्वी महिनाभराचे वाणसामान आणि अगदी आदल्याच दिवशी आठवडा भराची भाजी भरून ठेवली होती तिने... गेल्या महिन्यात वाढदिवसाला नवीन हिऱ्याच्या बांगड्या केल्या होत्या... मी खोदून खोदून अविनाशलाच विचारले तर काहीही भांडणे वाद काहीच घडले नव्हते त्यांच्यात. अविनाश वेडापिसा झाला .. आभाच्या प्रत्येक मैत्रिणीला तो भेटला .. प्रत्येकीला एकच प्रश्न आभा काही बोलली का ? पण आभा अगदी नॉर्मल होती असे प्रत्येकीने सांगितले ती असे काही करेल ह्याची कुणालाच कल्पना नव्हती. आभाच्या आईवडीलांचीही उलट तपासणी त्यानं घेतली... त्या बिचार्यांनी आधीच लेक गमवली होतीच पण का? केलं तिनं ह्याच उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं.आनंदात सुखात असणारी आपली लेक आत्महत्या का करेल?? हा प्रश्न त्यांनाही पडला होताच. अविनाश अगदी दूधवाला भाजीवाला पेपर टाकणारा पोऱ्या प्रत्येकाला भेटला...तिच्या आयुष्यातील क्षणभराचा हिस्सा असणाऱ्या सुद्धा प्रत्येकाला ... प्रश्न एकच ती काही सूचक बोलली होती का?
चार दिवसांत माझा लेक 10 वर्षांनी म्हातारा झाला होता...एकदा तर मनाचा संपूर्ण तोल ढळून तो मलाच अद्वातद्वा बोलू लागला... "तुला कसे माहीत नाही? तूच दिवसभर होतीस ना घरी सांग सांग मला का केलं तिने?" लहान पोरासारखा कुशीत शिरून रडू लागला. क्षणभरात शांत होत गंभीरपणे म्हणाला " आई मला ह्या का? च उत्तर हवंच आहे... नाहीतर मी जगूच शकणार नाही" आणि ताडकन निघून गेला.
सकाळी उठून पाहते तर बराच कागदांचा पसारा मांडून अविनाश बसलेला...कसल्या तरी आकृत्या नी कसले तरी अगम्य लेखन ... अंबरीश त्याच्याजवळ बसत म्हणाला " बाबा हे थांबावं आता... ऑफिस ला जायचे का? मी सोडू तुला" ... भावरहित मेलेल्या नजरेने अविनाश म्हणाला ," मी जाणार नाही.. सुट्टी घेतलीये... जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत " अविश्वासानं मी आणि अंबरीश पहात होतो .. याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे हे जाणवत होतच... अंबरीश चा हात धरून अविनाश त्याला म्हणाला " आभा तुझ्याशी बोलली होती का रे काही.. म्हणजे काही अडचण आहे त्रास आहे दुःख आहे असे काहीतरी सांगितले असेलच ना ! रोज फोन करायची ना तुला ... सांग रे सांग ." अंबरीश कडे कुठून उत्तर असणार .. तो नाही नाही ह्या अर्थाने मान डोलवत रडू लागला .
पुढच्या दोन दिवसांत अविनाशला जणू झपाटून टाकलं होतं आभानी ... साऱ्या शक्यतांच्या चौकटी मांडून आभाच्या आत्महत्येचे कारण कुठेतरी बसतंय का ? एव्हढाच एक विचार तो करू लागला. दिवसेंदिवस त्याची तब्येत आणि मानसिक स्वास्थ झपाट्याने खालावू लागलं.
तिला आर्थिक प्रश्न नव्हते.. खर्चाला कोणतीही बंधने नव्हती तशी ती खर्चिक नव्हतीच म्हणा! स्वातंत्र्य म्हणाल तर तेही मनसोक्त अनुभवलं होतं तिनं ..किटी, भिशी वेगवेगळे ग्रुप्स होतेच ना! जबाबदारी देखील नव्हत्याच म्हणावे लागेल लेक मोठा झाला होता आता त्याचीही काळजी नव्हती.चाळीशी नंतर दर वर्षी एकदा संपूर्ण चेक अप करून घ्यायचा हा आमचा अलिखित नियम ... मागच्याच आठवड्यात त्याचेच रिपोर्ट घ्यायला आम्ही दोघीही गेलो होतो डॉक्टर म्हणालेही ... सासू सुना एकदम फिट आहात...तिला तब्येतीची गाऱ्हाणी नव्हती.वयाची 44 वर्षे झालेली हे वय आता कुठल्या भुलव्याला भुळणारं नसत... आभा सात्विक होती वृत्तीनही... नको नको!! असला घाणेरडा विचारही तिच्याविषयी करणे शक्य नाही.हसतमुख मोकळी होती स्वभावाने .. मोकळं बोलायची आमच्या मस्त मैत्रिणी सारख्या गप्पा रंगायच्या ... पण कधी काही बोलली का ती?? खरंच मला काहीच आठवत नव्हते.
सकाळी सोबतच जेवलो आम्ही .. कुणाला खरं वाटेल .. तासभर गप्पा मारून जरा पडते म्हणून वर गेलेली व्यक्ती मूठभर झोपेच्या गोळ्या खाऊन झोपेल.. झोपेल ती कायमचीच....छे! मी काही विसरतेय का? महत्वाचं खूप महत्त्वाचं.....असा विचार करत बसले तर अविनाशला कसे सावरणार? मलाच वेड लागायचे.....माझ्याही नकळत मी तेच करत होते जे अविनाश करत होता.पुन्हा पुन्हा मी सुटलेले प्रसंग आठवू लागली तुटलेले दुवे जोडू लागली.पण व्यर्थ काहीच सापडले नाही.
ह्या साऱ्यात अविनाशचे बाबा स्थिर अविचल होते.... काहीतरी ह्यांना नक्कीच माहीत आहे आणि ते लपवता हेत असे राहून राहून मला वाटू लागले. त्यांनी ज्या गांभीर्याने सारं पार पाडलं होतं ते खरंतर खूप धैर्याची परीक्षा पाहणारं होतं वयाच्या सत्तरीत .. सून गेलीये,मुलगा कोसळून पडलाय, नातू बावरून गेलाय तरीही ते कोसळले नाहीत साऱ्या घराला त्यांनी एकहाती सावरलं ... काही तरी माहिती असेलच ह्यांना? तसे ते अलिप्त नी मितभाषी .. आभाशी गरजेपुरते बोलायचे कधीतरी पण पोटच्या लेकीसारखं प्रेम होतं तिच्यावर... क्वचित कधी माझे नी आभाचे वाद झालेच तर हे तिच्याच बाजूने बोलत. चौकोनाचे चारही कोन पडताळून पाहत होते मी कुठे फट राहिली... जिथून आभाला निसटावेसे वाटले?
अविनाश पाठोपाठ मी देखील रुतत चालले होते त्या का ? मध्ये ....खरंतर येणारा प्रत्येकजण जाणार असतोच कुणीतरी क्रम चुकवून आधी जाते... हे जाणे चटका लावणारे असतेच पण जेव्हा त्या व्यक्तीला आपल्या भवती विणलेल्या सुंदर आयुष्याचा मोह होत नाही ... अत्यंत शांतपणे आत्महत्येस प्रवृत्त होते तेव्हा काय कोसळत असेल कुटुंबावर?? त्याचे कारण मिळाले तर माणूस कोसू शकतो स्वतः ला नाही का ?? पण कारणच नसेल तर... कुणाला कोसायचं??
डॉ सुधान्शु घोष 12 नं वॉर्ड मधल्या पेशंटची डायरी वाचत होते...... तेव्हढ्यात ड्युटी वरचा वॉर्ड बॉय चहा घेऊन आला. "सर आज कुणाला मारलं पेशंट नी " डॉ सुधान्शु गंभीरपणे म्हणाले, " स्वतःला ....??" गेली 4 वर्षे आभा अविनाश देशपांडे वॉर्ड नं 12 ची पेशंट ... कधीतरी क्वचित आक्रमक होणारी वरकरणी नॉर्मल वाटायची. बहुतेकवेळा काहीतरी लिहीत असायची ... सगळ्या कथांत आभा असायची आणि सगळ्याच कथांत तिने आत्महत्या च केलेली असे. वॉर्ड बॉय ने न राहाऊन डॉक्टरांना विचारले.." सगळं सुख मिळतं ह्यांना कमी नाही काहीच.. तरीही जीवन नकोसं का व्हावं ?का केली असेल आत्महत्या ह्या बाईच्या नवऱ्यानं ..? " डॉक्टर शांतपणे म्हणाले,"काही प्रश्न सोडवायचे नसतात बाब रे! तसेच अनुत्तरीत ठेवायचे असतात."
🔏©यशश्री रहाळकर
नाशिक
14/03/19
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
गुरुवार, १४ मार्च, २०१९
अनुत्तरीत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Touching, something new, unpredictable,wish to receive such type of new trends in Marathi literature. Congratulations.
उत्तर द्याहटवाTouching! Chhan.
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाप्रश्न अनुत्तरित हवे
उत्तर द्याहटवा