फॉलोअर

रविवार, ३ मार्च, २०१९

बाबा बदलतो आहे..

बाबा बदलतो आहे ......
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
              गेल्या 3 पिढ्यांचा विचार केला तर सर्वाधिक बदल ज्या व्यक्तीच्या भूमिकेत झालाय ती व्यक्ती म्हणजे बाबा......साधारण 3 पिढ्यांपूर्वी ही व्यक्ती दादा, अण्णा, तात्या वगैरे नावांनी ओळखली जात असे. त्यांच्या नावातच प्रचंड दरारा होता. या काळातील बाबांना फारतर आपल्या अपत्यांपैकी हा पहिला तो दुसरा ....आणि ही धाकटी एव्हढेच ज्ञात असे.कोण कोणत्या वर्गात आहे हे मात्र खात्रीने सांगता येईच असे नाही. भल्यामोठ्या कुटुंबाचा अवजड डोलारा सांभाळण्यात आणि पिलांची पोटे भरण्यातच त्यांची सारी शक्ती पणाला लागे .
                 ह्या बाबांकडे हट्ट वगैरे करणे दूरच साधे बोलणेही हिंमतीचे मानले जाई. घरात एकमेव उत्पादक घटक म्हणून त्यांना वेगळी सन्मानाची वागणूक असे. धाक असा की त्यांनी घरात पाऊल टाकताच मुले उंदराच्या पिल्लासारखी बिळात घुसून पुस्तके वाचीत. "काय बंडोपंत अभ्यास काय म्हणतोय??" असे ते बहुदा दरडावत विचारीत आणि बंडोपंत अर्धी चड्डी सावरीत " छा ss न अण्णा " असे उत्तर देऊन धूम ठोकत. तत्कालीन मराठी सिनेमांतही पांढरी किंवा काळी टोपी घातलेले , संसाराचे ओझे रेटून थकून गेलेले हेच बाबा पाहायला मिळत. मुलीच्या वडिलांची अवस्था तर सिनेमांत गलितगात्र चितारण्यात येई.... कदाचित खरेच तशी असेल देखिल ...चार पाच मुलींची लग्न लावून देणे ; 4/5 मुलांना मार्गाला लावणे हे काम खरेच प्रचंड दिव्य असणार....  मात्र त्याग आणि सहनशीलता या दोन तत्वांवर त्यांचे जीवन चालत असे. आयुष्यात कुटुंबाला महत्व देतांना ते स्वतः ला कपडे शिवणे, नवे बूट घेणे टाळत ...हे अनुभव अनेकांनी आपल्या लेखनात मांडले आहेत... एका बाजूला परिस्थितीपुढे जरा वैतागलेले पण मूळचे कुटुंबवत्सल असे बाबा पुढच्या पिढीतील मुलांनी बाबा होतांना जाणीवपूर्वक बदलले.
                   आमच्या पिढीला जे बाबा लाभले ते "अहो बाबा" ..... बहुतेक मूळ गाव सोडून इतर शहरांत  नोकरी करणारे, बरेचदा बायकोही नोकरी करणारी... ह्या पिढीचे बाबा आपल्याला झेपेल तेव्हढेच कुटुंब मर्यादित राखणारे... आपल्याला मिळाले तसे तापट बाबा आपल्या मुलांना मिळू नयेत म्हणून सजग असणारे.. वेळ आली तर कधीमधी मुलांचे दोस्त होऊ पाहणारे बाबा. मात्र आपला एक आदरयुक्त धाक कुटुंबावर असला पाहिजे याची त्यांना जाणीव सदैव असे. ते " अहो बाबा " अश्या धाक नी प्रेम या दोहोंचे अनोखे मिश्रण होते. तरीदेखिल मुलांची मुख्य जबाबदारी आईचीच असे..  मुलांचे जमतील तसे लाड करणे हे बाबा लोक करीत .अभ्यास घेणे वगैरे आईवर सोपवून मोकळे होत. एखाद्या क्लासवरून आणणे सोडणे वेळ पडल्यास करीत... पुढे मात्र वाढत्या वयातील मुलांबरोबर त्यांचे मित्र बनत त्यांच्या मस्त गप्पा रंगत. ह्या काळात एक पोर कडेवर एक हाताशी नी बाई पळतेय नवऱ्यापाठी हे दृश्य हमखास दिसायचे .असा बाबा पुढे जात ओरडायचा, "चला पावलं उचला भराभर गाडी सुटायची ."
           त्याही नंतरच्या पिढीत हे चित्र आमूलाग्र बदललं ... आता मॉल मध्ये बाळ बाबाच्या कडेवर नी आई मस्त मोकळेपणी खरेदी करतेय हे दृष्य जागोजाग दिसू लागले. आता "अहो बाबा" वरून "ए बाबा" किंवा ए पपा , डॅडा पर्यंतचा प्रवास त्यांनी सहज पार केलाय. आता एकुलते किंवा फारच झाले तर दुकटे असणारे पिल्लू बाबाच्या प्रचंड अंगावर असते. एखाद्या मांजरीच्या पिल्लांनी मनसोक्त तिच्या अंगावर खेळावे तशी ही पिल्ले बाबावर खेळत, उड्या मारत असतात. हा बाबा आता पराकोटीचा शांत झालाय .. आपल्या मुलांच्या सगळ्या अफाट आणि अचाट कल्पना तो मान्य करतो नव्हे जगतो त्यांच्या जोडीला.
                 हळूहळू बाबा मधील आईचा भाव वाढत चालला आहे.... आता बाबा लहान बाळांना समर्थपणे सांभाळतात. काही लोक तर बाळाची नॅपी बदलण्यापासून तर त्यांच्या शाळेत पालक सभेला जाणे इथपर्यंत सारे करतात. बऱ्याच बाबाला मिळणारी पॅटर्निटी लिव्ह ते मजे करीता न घेता खऱ्या अर्थानं बाळासाठी घेतात . बाळाची आजारपणं बाबा निस्तारतात. बाळाचं नी बाबांचं अनोखं नातं विणलेलं सर्रास पाहायला मिळतं हे नातं काळजी ,प्रेम, मैत्री सारं लेवून समर्थपणे उभं आहे यात धाक दरारा वगैरे साठी जागाच नाही.आहे तो विश्वास आणि खात्री... प्रत्येक वेळी पाठीशी उभे राहण्याची..👍
                 'बाबा ' या रसायनाच मला नेहमीच एक स्त्री म्हणून प्रचंड कुतूहल आहे. एक स्त्री जेव्हा आई होणार असते तेव्हा शारीरिक ,मानसिक विविध टप्प्यावर ती पोटात वाढणाऱ्या इवल्या जीवात गुंतत जाते ... एके दिवशी तिच्या हातात ते बाळ येतं तत्पूर्वी तिनं प्राणांतिक वेदनांचा मोठा महासागर ओलांडला असतो...... पण बाबाचे काय??
               बाळ होण्याची चाहूल पत्नीला लागताच काही लडिवाळ घडामोडी सोडल्या तर बाबा होणं त्याच्या आयुष्यात अचानक येतं. दुपट्यात गुंडाळलेला तो चिमणा जीव एका स्पर्शात काय काय बरे शिकवतो त्याला? आईपण ही आदिम नैसर्गिक भावना आहे पण बाबा असणं हा मानवी सुसंस्कृत नागरी जीवनाचा पाया आहे. ही भावना  हळूहळू उत्क्रांतीतुन रुजलीये.. बदलत गेलीये. आतातर अनेक पुरुष सरोगसी द्वारे एकल पालकत्व स्वीकारताना दिसताहेत... हाही पुढचाच टप्प्या म्हणावा लागेल.
               भूमिका कितीही बदलली तरी एक मात्र नक्की 'बाबा' ही भावना तशीच आहे. एका बाबासाठी.... स्वतः च्या सगळ्या गरजा बाजूला ठेवून पिल्लाचा विचार आधी करायचा ही वटवृक्षा सारखी सावली तशीच आहे... आणि प्रत्येक पिल्लासाठी... कोणत्याही परिस्थितीत बाबा आहे ना! ही सुरक्षिततेची भावनाही तशीच आहे. प्रत्येक लेकीच्या आयुष्यातला पहिला हिरो बाबाच आहे नी प्रत्येक लेकाचा सुपरहिरो आजही बाबाच आहे 😃🙏
🔏©यशश्री रहाळकर
          नाशिक
        03/03/19

२ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!