फॉलोअर

मंगळवार, ४ जून, २०१९

प्रेषिअस स्टोन भाग 2

पूर्वार्ध:-
https://kattayashashri.blogspot.com/2019/06/blog-post.html?m=1
बॅचलर्स पॅरडाईज या क्लब मध्ये रणजीत वाघमारे रिटायर्ड cbi ऑफिसर मालपाणी मर्डर केस बद्दल सांगत होते. मृत आभा मालपाणी चा मृत्यू आणि त्या भवतीचे गूढ कायम होते.आता पुढे......
                 
                     रणजीत वाघमारे साहेब कथा रंगत जात असतांना मध्येच थांबले...आपलं ड्रिंक संपवून सगळ्या श्वास रोखून थांबलेल्या म्हाताऱ्यांकडे पाहत म्हणाले...,"अनेकांकडे हेतू होताच आभाला मारण्याचा...कोण असेल बरं खुनी??" सारे म्हातारे सराईतपणे उद्गारले ,"खुनाचे हत्यार तर सापडू दे!" मोठ्याने गडगडाटी हसत रणजीत साहेब पुढील कथेकडे वळले. आपल्या नेहमीच्या खड्या आवाजात त्यांनी प्रश्न केला, "मंडळी! खुनाचे हत्यार नाहीच मिळाले किंवा नसेलच तर हेतूंवर लक्ष केंद्रित करावेच लागते."...पुढे मूळ कथेकडे पुन्हा वळत त्यांनी कथानकास सुरुवात केली...,"खरंतर साधी सरळ वाटावी अशीच ही घटनांची मालिका आहे तरी संदेहाला जागा मिळालीच.मालपणींकडचा जुना नोकर म्हणाला त्याप्रमाणे अश्याच स्वरूपाचे मृत्यू मालपणींच्या घरात पूर्वी घडले होते....एकाच घरात एकाच प्रकारचे परंतु नैसर्गिक वाटावेत असे मृत्यू होणं ...खरंतर शक्यच नाही.आता या साऱ्यात काही साम्यस्थळे आहेत का ???याचा आणि एकूणातच संपूर्ण केसचा आम्ही शून्यापासून अभ्यास करू लागलो....आता सवाल एक नव्हे 3 खुनांचा होता.
                        3 व्यक्तींच्या मृत्यूतील दुवे जोडत जाऊनच या घटनांची उकल होणार हे निश्चित करून आम्ही इतिहास उकरून काढायला सुरुवात केली.
*पहिला मृत्यू झाला तो सोमेशची आई, धनेश मालपणींची पहिली पत्नी सुवर्णाचा... वय 34 मृत्यू झोपेत परिस्थिती समान,
*दुसरा मृत्यू आशिषची आई रत्नमाला चा ... धनेश मालपणींची द्वितीय पत्नी वय 34मृत्यू झोपेत परिस्थिती समान,
*तिसरा मृत्यू आभा आशिष ची पत्नी धनेश मालपणींची सून वय 34 मृत्यू झोपेत परिस्थिती समान.....
सुवर्णा, रत्नमाला आणि आभा  मृत्यूचा प्रकार एकच , मृत्यूसमयी वय समान 34 वर्षे ... ह्याखेरीज तिघी मालपाणी घरातील कर्त्या स्त्रिया , आपल्या वडिलांचे एकुलते एक अपत्य ??? ह्या मुद्द्याला मी उडालो ...अजून एक दुवा या तिघींमध्ये समान होता त्यावर नंतर बोलूच म्हणत रणजीत साहेबांनी क्षणभर विश्रांती घेतली...तोपर्यंत तरुण म्हातारे आपापसांत चर्चा करून तो समान दुवा शोधू लागले....रणजीत साहेबांनी विचारले ,"सापडलं का उत्तर??"त्यांच्या तालमीत तयार पठ्ठे एकसुरात उत्तरले,"धनेश मालपाणी" बरोब्बर! म्हणत रणजीत सर पुन्हा कथेकडे लक्ष वेधून घेत म्हणाले...या धनेश मालपणींची सारी माहिती आम्ही अत्यंत गुप्तपणे मिळविली.
                   धनेश मालपाणी हरहुन्नरी हुशार परंतु अनाथ गरजू मुलगा...गावाकडचा म्हणून विश्वासाने सुवर्णाच्या (प्रथम पत्नी) वडिलांनी सराफी पेढीवर नोकर म्हणून ठेवला पुढे त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या एकुलत्या एक लेकीशी लग्न झाले.त्याने पाच सहा वर्षात व्यवसायाची भरभराट केली सासऱ्याने सुखाने डोळे मिटले...आता व्यवसाय वृद्धी साठी रत्नांचा अभ्यास धनेश नी सुरू केला दरम्यान त्यांना सोमेश हा मुलगा झाला.यावेळी त्याची भेट रत्नांचे प्रसिद्ध व्यापारी रत्नमालाचे वडील यांच्याशी झाली...प्रथम पत्नी सुवर्णा चा आकस्मिक मृत्यू झाला आणि धनेश मालपाणी रत्नमालाशी विवाहबद्ध झाले. या दाम्पत्याला आशिष नावाचा मुलगा झाला..... पुढे काही वर्षांत रत्नमालाचा आकस्मिक मृत्यू झाला.आणि आता अगदी त्याच प्रकाराने धनेश मालपणींची सून आभाचा मृत्यू झाला...फरक एव्हढाच होता की आभा त्यावेळी गर्भवती होती.... आणि नातवाच्या आगमनासाठी धनेश मालपाणी खूष होते....केवळ या मृत व्यक्तींच्या माहेरच्या प्रॉपर्टीसाठी त्यांचा खून का व्हावा?? ही प्रॉपर्टी तर अखेर मालपणींचीच होणार होती.
                       एखादे कोडे सोडवत अखेरपर्यंत जावे अन शेवटचे कोडे सुटता सुटत नाही असे काहीसे झाले होते.मालपाणी आणि मेहता म्हणजे दोन धनाढ्य हत्तीची टक्कर...चर्चेला उत आला होता ,आमच्यावरील दबाव कमालीचा वाढला...बिग शॉट धनेशजींची थेट चौकशी करता येत नव्हती... सारं साचलेल्या डबक्यासारखं झालं होतं...आम्ही आपले वेड्यागत पुन्हा पुन्हा त्या डबक्याभवती फेऱ्या मारत होतो...पण एक... एकच अखेरची कडी या साऱ्यांना जोडणारी, काही केल्या सापडत नव्हती.आता थोडं सावधपणाने पावले टाकीत आम्ही केस बंद करतोय असे सांगत निरोपाची बोलणी सुरू केली.काही अखेरच्या नोंदींसाठी मालपाणींच्या घरात गेलो असता...40 वर्षे जुन्या नोकराकडून मी काही जुने फोटोग्राफ्स मिळविले...आणि कमाल झाली ...मला जे नेमकं हवं होतं ते सापडलं... आभा मृत्यूपूर्वी मेहातांच्या घरी गेली होती त्यामुळे तिकडेच धाव घेत ती वस्तू मी ताब्यात घेतली. त्या वस्तूचा रीतसर तपास केल्यानंतर तीच वस्तू खुनाचे हत्यार म्हणून सिद्ध झाली... धनेश मालपणींवर रीतसर गुन्हा दाखल झाला.
               एव्हढी उत्सुकता ताणून देत रणजीत साहेबांनी सावकाशपणे चविचावीनं आपलं ड्रिंक घेण्यास सुरुवात केली.... तरुण म्हातारे उतावीळ झाले आणि एकच गोंधळ उडाला...नेमकं हत्यार होतं तरी काय???,"सांगतो सांगतो!" म्हणत सगळ्यांना शांत करत रणजीत साहेब म्हणाले...ते हत्यार होतं एक सुरेख रुबी चा नेकलेस...सगळ्यांचे तोंड वीतभर वासले होते. पुन्हा एकदा आपलं गडगडाटी हास्य भिरकावत रणजीत साहेब सविस्तरपणे सांगू लागले...धनेश मालपाणी अत्यंत हुशार माणूस आणि हुशार माणसे असतात तसाच महत्वाकांक्षी.सुवर्णाशी लग्न करून तिची सोन्याची पेढी धनेशने मिळविली. पुढे रत्नांचा अभ्यास करतांना रत्नमाला चे वडील आणि त्यांचा लाखोंचा व्यवसाय आपला होऊ शकतो हे त्यांनी ताडले. रुबीचा अप्रतिम सुंदर नेकलेस बनवून त्यांनी तो सुवर्णाला भेट दिला ...कौतुकाने घातलेल्या त्याच नेकलेस ने चार पाच दिवसांत तिचा मृत्यू झाला...कारण त्या नेकलेस मध्ये काही खडे हे मूळ रुबी नसून त्याचे उपरत्न  Realgar रेल्गर होते...हे सौम्य विषारी असते त्याचे बारीक कटिंग इतके सफाईने केले होते की ते घालणाऱ्याला किंचित टोचावे...सामान्य माणूस हा भेद ओळखुच शकत नाही . रत्नांचा जाणकारच तो जाणतो...सुवर्णाचा मृत्यू नैसर्गिक मानला गेला..दबला.
                      पुढे रत्नमालाशी विवाह लाखोंचा व्यवसाय करोडोंत केला धनेशनी... परंतु रत्नमाला हुशार देखणी आणि सारी सूत्रे स्वतः च्या ताब्यात ठेवणारी होती...म्हणजे धनेशला संपत्ती मिळूनही अधिकार मिळत नव्हते...यावेळी पुन्हा एकदा त्याच सुरेख रुबीच्या नेकलेसचा फास आपसूक आवळला गेला...शिवाय तो हार चलाखीने गायब केल्याने सारेच प्रश्न मिटले. सुवर्णाचे काही जुने फोटो पाहत असतांना मला हा हार तिच्या गळ्यात असल्याचे दिसले. 37 वर्षांपूर्वी चा हा फोटो...बघा सारं सांगून गेला.हाच नेकलेस आभाच्या गळ्यात मृत्यूपूर्वी च्या काही पार्टी मध्ये घातलेला दिसला.धनेश मालपाणी दुबईला गेले असतांना काही सामान शोधतांना जुन्या पेटीत तो आभाला सापडला...अप्रतिम सुरेख होता तो... ती पार्टीत घालून गेली आणि प्रचंड कौतुक झालं तिचं.. मग पुढे काही function तिने तोच घातला...विष सौम्य हळूहळू भिनत गेलं हृदय बंद पडलं. नेमकं मृत्यूच्या पूर्वी संध्याकाळी आपल्या आईवडिलांकडे गेली असता तिनं तो आपल्या खोलीत काढून ठेवला म्हणून तो आमच्यपर्यंत पोहोचला...त्याच रीतसर परीक्षण करून घेताच सारं स्पष्ट झालं.
                    खरं सांगायचं तर आभाचा मृत्यू हा एक अपघात होता पण जाता जाता ती जुन्या गाडल्या गेलेल्या आपल्या सासवांच्या खुनाची उकल करून गेली. ज्या इस्टेटीच्या वारसाची धनेश मालपाणी आभाच्या मुलाच्या रूपाने वाट पाहत होते तो देखिल यात बळी गेला....या जन्मीची पापे याच जन्मी फेडावी लागतात....,"खरंय!" म्हणत रणजीत साहेबांचा जयघोष करीत सगळ्यांनी चषक उंचावले.
समाप्त★★★★★★★★★★
©यशश्री रहाळकर

1 टिप्पणी:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!