डॉ. वीणा वडगांवकर नेहमीच्या वेळेला बरोब्बर साडे नऊ ला त्यांच्या 'सुकृत' मॅटरनिटी होम ला हजर झाल्या. कॉफीच्या घोटांबरोबर सहज पेपर चाळत असतांना त्यांना सत्यभामा पाटील ह्यांच्या मृत्यूची श्रद्धांजली स्वरूपातील बातमी दिसली.काही क्षण हातापायांची ताकद एकदम गेलीये असं वाटून त्या स्तब्ध झाल्या. त्यांच्याकडे काम करणारी कुणीतरी मावशी सत्यभामा बाईंच्याच गावची होती... लगेच त्यांनी तिला बोलावून घेतले आणि विचारपूस केली.सत्यभामा पाटील बाईंनी शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे तिने सांगितले.आता ह्या उतारवयात, मुलांनातवंडांनी भरल्या घरात त्यांना काय दुःख असावे हे काही कुणाला उमजले नव्हते."आदल्याच सांजला त्या आपल्या हिथ आलत्या ना ओ बाई!" म्हणत मावशींनी आठवण करून दिली. डॉ. वीणा काहीसे सावरत म्हणाल्या, " त्या मुलीच्या तब्येतीबद्दल विचारायला आल्या होत्या... बरं जा तू कामाला आता" म्हणत त्यांनी मावशीला कामाला पिटाळले. डॉ. वीणाला भयंकर अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी ताबडतोब ड्रायव्हर ला गाडी काढायला सांगितले. त्यांची भाची डॉ स्नेहाने त्यांना लगेच तपासले, बीपी बरेच लो झाले होते. गोळी पुढे करत ती म्हणाली, "आत्या आता जरा आराम कर. फार दगदग करतेस, झेपत नाही तुला ." डॉ.वीणांनी वयाचीे साठी केव्हाच पार केली होती.थोडाथोडका नाही तर 37 वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. डॉ. स्नेहा, त्यांच्या चुलत भावाची मुलगी... गेली 12 वर्षे त्यांचे हॉस्पिटल उत्तम सांभाळत होती.तरीही एखाद्या क्लिष्ट केससाठी त्या हॉस्पिटलला येत. त्यांचे आपल्या कामावर अतीशय प्रेम होते... त्यांच्या हाताला गुण असल्याने पंचक्रोशीतील लोक श्रद्धेने त्यांच्याकडे येत.वयपरत्वे हे आता त्यांना झेपेनासे झाले होते हे मात्र खरे.
त्या घरी पोहोचेपर्यंत स्नेहाने फोन करून तब्येत बिघडल्याचे ,डॉ. वीणांचे पती व्यंकटेश रावांच्या कानावर घातलेच होते. बँकेतून मोठ्या अधिकारपदावरून रिटायर्ड झालेले व्यंकटेशराव आपले निवृत्त जीवन शांतपणे आनंदाने जगत होते. त्या दोघांची एकुलती एक लेक पिहू सॉफ्टवेअर इंजिनियर असून अमेरिकेत लग्न करून सेटल झाली होती. तिच्या मनासारखा जॉब, मनासारखा जोडीदार आणि एक बच्चू यात तिला रमलेलं पाहिलं नी व्यंकटेश राव सुखावले. वीणा ही धडपड का करते?हॉस्पिटल चा व्याप सोडून तिने आता आराम करावा ,असे त्यांनाही वाटायचे. मात्र दर वेळी काहीतरी क्लिष्ट ,अडलेली पेशंट आली की डॉ. वीणा धावून जात.नंतर त्या ताणाने त्यांची स्वतःची तब्येत बिघडायची नि व्यंकटेश राव सेवा करायचे.. हे नेहमीचेच झाले होते.आता मात्र त्यांनी वीणाला चांगलेच धारेवर धरले, तिचा फोन काढून घेत सक्तीची विश्रांती घेण्याचे फर्मावले.नेहमी प्रसन्न असणाऱ्या डॉ. वीणा मलूल दिसत होत्या..अंगात किंचित कणकण देखील होती. घासभर भात खाऊन गोळी घेऊन त्या निजल्या. दुपारच्या चहाचे विचारावे म्हणून व्यंकटेश राव डोकावले तर ताप फारच वाढला होता . डॉ. वीणा डोक्यात ताप गेल्याने बडबडत होत्या,"आई मी नाही मारले त्याला ! सुकृत मी का मारेन तुला.. आई तू मला सोडून जाऊ नकोस ! सुकृत सोड आईला, आई माझीयेे ..सोड सोड!" वीणाची ही बडबड ऐकून व्यंकटेश राव चांगलेच घाबरून गेले...त्यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये फोन केला... क्षणाधार्थ डॉक्टर ,नर्सेस, वॉर्डबॉय सारा ताफा घरात हजर झाला. त्यांच्या बेडरूमचे मिनी हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले.
डॉ.स्नेहा व्यंकटेश रावांशी बोलतांना म्हणाल्या,"आत्यानी काहीतरी ताण घेतलेला दिसतोय. मी उद्या आमच्या सायकायट्रीस्ट डॉ. जोशींना पाठवते... शरीरापेक्षा मनाचेच दुखणे अधिक वाटतेय मला...आता झोपेचे औषध दिलंय." रात्रभर दोन नर्सेस होत्या.सकाळी साधारण 10 वाजता डॉ. जोशी आले.त्यांचे तासाभराचे सेशन झाल्यावर ते व्यंकटेश रावांना म्हणाले ,"फारच ताण आलाय त्यांच्यावर ह्या वयात एव्हढा ताण योग्य नाही. बहुदा काही जुन्या जखमा पुन्हा दुखावल्या गेल्या आहेत.. Don't Worry! शोधू आपण. हळूहळू वाटेल बरं!" व्यंकटेश राव डॉक्टरांच्या बोलण्याने अधिकच काळजीत पडले.वीणाला नाश्ता घेऊन गेल्यावर त्यांनी विषय काढायचा प्रयत्न केला पण वीणा काहीच बोलायला तयार नव्हती. वीणाला तो विषय नकोसा होता.. जणू काही त्यापासून पळ काढत होती आणि मागून येऊन तोच विषय मानगुटीवर बसला होता. लेकीचा फोन आल्यावर त्या लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडल्या... "मला इथे राहायचं नाही घेऊन चल" म्हणाल्या.. मात्र आत्ता आजारपणाने हे शक्य नव्हते. एव्हढा लांबचा प्रवास झेपणार कसा? कशीबशी त्यांची समजूत घालून नर्सने त्यांना झोपवलं.व्यंकटेश राव मात्र मुळातून हादरले.. फारशी हळवी वगैरे नसणारी आपली खंबीर बायको अशी हरलेली, व्याकुळ त्यांनी कधी पहिलीच नव्हती. घरी तर सगळे सुरळीत होते... हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं असावं? ह्याचा ते अंदाज बांधू लागले. हॉस्पिटलमध्ये फोन करून त्यांनी काही रेकॉर्डस् मागितले. गेल्या आठवड्यात डॉ. वीणा ह्यांनी हाताळलेल्या केसेस त्यांनी वाचल्या.
आठच दिवसांपूर्वी त्यांच्या हॉस्पिटला emegency म्हणून दाखल झालेली एका केसने त्यांचे लक्ष वेधून घेतले. पिंपळस गावची एक बाळंतीण विचित्र अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली होती... तिच्या बाळाचे अवाढव्य डोके अडकले होते... तातडीने डॉ. वीणाला बोलावून बाळ बाळंतीण वेगळे करण्यात आले... मूल अनै
अबनॉर्मल वाटावे असे वाढले होते... पण दोघेही वाचले.त्या बाळाच्या मज्जारज्जू चा संपर्क देहाशी जवळपास नव्हताच...जन्मतः मूल मतिमंदच नाही तर लोळगोळा अपंग झालेले होते. फाईल बंद करून डोळे मिटताच व्यंकटेश रावांना डॉ वीणाची जखम ओली करणारा दुवा सापडला... 'सुकृत' .त्यांनी ताबडतोब अनेकांना फोन केले... आणि ह्या मतिमंद बाळाचे सगळे डिटेल्स गोळा केले. आता संपूर्ण तयारीनिशी ते वीणाच्या रूम मध्ये शिरले..नर्स ला बाहेर बसायला सांगून दार लावून घेतले. आपला स्वर सहज राखत वीणाला ते म्हणाले, "बरं वाटतंय का आता?" वीणा ने मान डोलावताच पुढे म्हणाले," तुला कसला ताण आलाय माहीत आहे मला. एकदाचं बोलून टाक .बरं वाटेलं बघ. असं ओझं घेऊन जगणार आहेस का? काय झालं त्या मतिमंद मुलांचं? तुला सुकृत आठवला का?" शिवलेले ओठ विलग करत वीणा रडू लागली,"सांगते मी. सांगावेच लागेल आता ही टोचणी मला सहन होत नाही. बरोबर होत्या सत्यभामा बाई.. कुणालातरी सांगितल्या शिवाय सुखाने मरताही येणार नाही." वीणाची निरवानीरवीची भाषा सहन न होऊन व्यंकटेश राव मायेनं तिच्या पाठीवर हात फिरवू लागले.
वीणा कित्येक वर्षांतले मनातले साचलेले बोलू लागली....व्यंकटेश राव स्थितप्रज्ञपणे ऐकत होते."माझ्या पाठीवर चार वर्षांनी सुकृतचा जन्म झाला.. सगळ्यांची भावंडे त्यांच्यासोबत खेळत.. मात्र माझा अर्धवट भाऊ घेऊन सतत आई बसलेली असते एव्हढंच कळायचं मला. राग राग येई त्याचा.हळूहळू मोठी होत गेले नि हा राग वाढत गेला... आईच लक्ष नसलं की सुकृतला चिमटे काढ,चापट्या मार असं करायचे. त्यातून एक विकृत आनंद मिळायचा मला. आईने संपूर्णपणे सुकृतला वाहून घेतलं... याच वेळी तिने मलाही जन्म दिलाय हे पार विसरली ती. पाच वर्षांनी बाबा ऑफिसमधील एका विधवा बाईंशी दुसरे लग्न करून वेगळे झाले.कदाचित आई फक्त सुकृतची आई उरली होती .. तिच्यातली बाईही संपली असावी. राहतं घर बाबांनी आम्हाला दिलं खर्चायाचे पैसे ,माझ्या शिक्षणाचे पैसे कश्यात कमी नव्हती...मी हुशार होते अभ्यासात, बाबांची खूप लाडकी होते. मात्र बाबा मला दुरावले ते याच सुकृतमुळे.. माझ्या वाढत्या वयाबरोबर माझा त्याच्यावरचा राग वाढत गेला.कित्येकदा त्याचा जीव घ्यावासा वाटे..." दात ओठ घट्ट आवळून बोलतांना किंचित धाप लागून वीणा थांबली. घोटभर पाणी नी दोन दीर्घ श्वास घेऊन पुन्हा बोलू लागली." हा असला मतिमंद भाऊ म्हणून मैत्रिणी नव्हत्याच फारश्या मी घुमीच होत गेले. दहावी झाल्यावर होस्टेलला राहून शिकण्याचा निर्णय घेतला... सुटका झाली माझी.गुणवत्तेवर पुढे पुढे जात राहिले. माझ्या छोट्याश्या पहिल्याच क्लिनिकच्या उद्घाटनाला आई सुकृतचे नाव पाहून सुखावली. भावाची आठवण ठेवली म्हणाली. मात्र तटकतोडपणे तिला मी सांगितलं... पुन्हा एकही सुकृत जन्माला येता कामा नये ,ह्याची कायम आठवण रहावी म्हणून सुकृतचे नाव दिलेय.... बिचारी आई ढसाढसा रडली. पुढे 32 वर्षांचा झाल्यावर सुकृत गेला... खरंतर बरंच वाटलं मला... कल्पनेत कित्येकदा मारलं होतं मी त्याला. मात्र आई पोटातून विव्हळ झाली.. का ?ते कळले नाही. पुढे आपल्या घरी ती आली ते जबाबदारी म्हणूनच... मी तोडुनच वागले कायम... माझ्या लेकीत आपल्या पिहूत ती मला शोधायची . शेवटपर्यंत इथेच होती... मतिमंद मुलांच्या शाळेत जाऊन काही बाही शिकवायची.... वय झालं ,शांतपणे झोपेत गेली."
"मी माझा शब्द पाळला व्यंकटेश..माझ्या हॉस्पिटलमध्ये एकही सुकृत जन्मता कामा नये... माझ्या प्रत्येक पेशंटला मी अनेक तपासण्या करायला लावायचे ,सदोष गर्भ काढुन टाकायला सांगायचे.आता विज्ञान खूप पुढे गेलंय.. खूप तपासण्या आहेत गर्भातच बाळाचा iq सुद्धा कळतो, मेंदूची,हाडांची ,ह्रदयाची वाढदेखील कळते. अगदी गर्भ असतांनाच बाळाच्या शस्त्रक्रिया देखील होतात... मात्र आपले मूर्ख लोक यांना सगळ्या तपासण्या केवळ गर्भाचे लिंग निश्चित करणाऱ्या हव्या असतात... स्त्रीचे भ्रूण काढून टाकायला लाखो रुपये खर्च करतील ... पण आवश्यक तपासण्या मात्र टाळतील... बिंडोक बावळट लोक. गेल्या आठवड्यात पिंपळसच्या देशमुखांची सून emergency केस म्हणून दाखल झाली होती. बाळाचे डोके मोठे असल्याने फसलं होतं... इतर डॉक्टरांनी केस घेण्यास नकारच दिला असावा... बाई मरणाच्या दारात होती.तिची आई सत्यभामा बाई पाटील ने पदर पसरला पोरीला वाचवा म्हणून टाहो फोडला... मीही लेकीची आई म्हणून आपल्या पिहुची शपथ घातली अखेर प्रयत्न करते म्हणून आम्ही कामाला लागलो... आई आणि बाळ दोघेही वाचले... बाळ विचित्र abnormal होतंच... मला सुकृत आठवला...😢 ह्या देशमुख बाईला पहिली मुलगी साधारण 10 वर्षांची होती... नंतर चार पाच वेळा मुलीचा गर्भ कुठेतरी पाडून आली होती... यावेळी मुलगाच होणार हे कळलंच असावं... कुठल्याश्या रानटी दवाखान्यात गर्भजल परीक्षा करतांना बाळाच्या मज्जारज्जूला धक्का बसला होता... मूल पाहताच काय ते कळावे असेच होते... दुसऱ्या दिवशी सासू आणि नवरा जे पाहून गेले ते फिरकलेच नाहीत.मात्र बाळ गुटगुटीत होते... हे बाळ मतिमंद तर आहेच पण साधे उभेही राहणार नाही ह्याची कल्पना सत्यभामा बाईंना बोलावून मी स्पष्टपणे दिली.सुश्रुतच्या सगळ्या नकोश्या आठवणी पुन्हा यायच्या नि मन विव्हळ व्हायचे... त्या बाईच्या 10 वर्षांच्या मुलीच्या जागी मी स्वतःलाच पहायचे.....चौथ्या दिवशी सकाळी ते बाळ अचानकपणे मृत झाल्याचे आढळले.बरेच झाले अजून एक वीणा वाचली.. एका बाईचा संसार वाचला बरं वाटलं मला.. त्या बाळाची आई मात्र अखंड रडत होती.
चार दिवसांनी एका संध्याकाळी सत्यभामा पाटील बाई आल्या... मी योगायोगाने तिथेच असावी... बाळ गेलेल्या लेकीचे दूध थांबत नव्हते म्हणून गोळ्या घ्यायला आल्या होत्या. थोडं बोलू का? म्हणून बसल्या... त्यांनी जे सांगितलं ते भयंकर होतं. त्या रात्री त्यांनीच गळा दाबून आपल्या मतिमंद नातवाचा जीव घेतला होता.. हेच माझ्या आजीने का नाही केलं? तेव्हाही हाच विकृत विचार चमकून गेला मनांत. मी समजुतीच्या सुरात झालं गेलं विसरून जायला सांगितलं.. मुलीचं फार वय नाही होतील तिला मुलं ,असाही धीर दिला. सत्यभामा बाई आपल्या हातून हेतुपुरस्सर घडलेल्या या गुन्ह्यामुळे कोसळल्या होत्या,"डाकट्रीन बाई आठ पोरं नि 12 नातवंड हायेती मला... आजवर जीव जलमाला घालन ठाऊक हुंत.... आज.. आज जीव घेतला.. कर्मा माझ्या कर्मा... देवाच्या दारी कशी जाऊ म्या??"म्हणत त्या रडू लागल्या. काही वेळाने शांत झाल्यावर माझे आभार मानले.. मन हलकं झाल्याचं म्हणाल्या. मनाची टोचणी कुणाला सांगितली नाही तर सुखाने मरताही येणार नाही म्हणाल्या. दुसऱ्याच दिवशी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली." डॉ वीणा रडत होत्या अखंड रडत होत्या... आपले मन शांत करीत व्यंकटेश रावांचा हात हाती घेत त्या म्हणाल्या," बरोबर होते व्यंकट त्यांचे... ....मी ... मी अनुभवलंय. म्हणूनच सगळं सांगायचं ठरवलं मी खरं खरं! गेले कित्येक दिवस सत्यभामा बाई त्यांचा तो नातू आणि त्याची ती हमसून रडणारी आई मला दिसत राहते... मी काय करू?? मी काय करू?आता ही टोचणी नाही सहन होत .. मला माहित होतं त्या बाळाचा मृत्यू अनैसर्गिक आहे.. बाळ गेल्याचे death certificate देण्यापूर्वी सहज तपासावे म्हणून गुंडाळलेले दुपटे सोडून पाहिले तर मानेवर चार बोटे होती... गुन्हा झाला हे माहीत असून मी लपवून ठेवले...मी सुद्धा एकप्रकारे त्यात सामील झाले... त्या रात्रीपासून शांत झोप नाही... कश्यात लक्ष लागत नाही... असं वाटतं मी सुकृतला मारलंय आणि आई माझ्याकडे जळजळीत डोळ्यांनी पाहातेय." .... दीर्घ श्वास घेऊन व्यंकटेश रावांनी वीणाला शांत व्हायला सांगितले... त्यांच्या कुशीत एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या शांतपणे झोपल्या. सकाळी नर्सने बीपी घ्यावे म्हणून पाहिले तर डॉ. वीणा गेल्या होत्या... कायमच्या. व्यंकटेश रावांच्या कानात त्यांचे शब्द घोंगावत होते.." मनाला टोचणी लागली तर सुखाने मरताही येत नाही."

खुपच ह्रदयस्पर्षी कथा आहे.
उत्तर द्याहटवापण या काळात अशी भावनाशील व्यक्ती फार कमी प्रमाणात आहेत.