थोरली सुट्ट्यांमध्ये धाकटीकडे जाऊन आली रे आली की तिचं काहीतरी बिनसतं... हे एव्हाना विठाबाईंच्या चांगलंच ध्यानात आलं होतं.तसं पाहायला गेलं तर थोरली प्रेमळ होती, माणसं जोडून ठेवायची, कामाला वाघ होती,घर वावर आला गेला पैपाहुणा सारं निगुतीने करायची... थोरलीकडे पाहून गावात तर सगळे विठाबाईंनी नशीब काढलं म्हणत. तशी थोरली उगा मत्सर करत जुळकुकडेपणा करणारी नव्हती... त्यात धाकटी तर तिची सख्खी मावस बहीण, लै जीव होता थोरलीचा तिच्यावर...मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोरांना घेऊन चार दिवस धाकटीकडे राहून परतली की थोरली दुःखी असायची, चिडचिड धुसफूस करायची. एरव्ही सहजतेने जी कामे ती करीत असे त्यांचाच तिला त्रास होई.. मग कटू बोलणं, पोरांना धपाटे घालणं हे सुरू राही.
विठाबाईंना दोन लेक.. नवरा तरुणपणीच वारल्यावर शेतात राबून विठाबाईंनी त्यांना लहानाचे मोठे केले.थोरला प्राथमिक शिक्षक बनून गावीच राहिला. शेती , नोकरी, घर सारं उत्तम राखून होता.त्याची बायको उज्वला त्यांची लाडकी सून ... दोघे मोठ्या प्रेमानं विठाबाईंचा सांभाळ करत. अकरा वर्षांच्या त्यांच्या संसारात सुखाचं सुख विठाबाईंनी अनुभवलं. दहा वर्षांचा नातू अन आठ वर्षांची नात... विठाबाईंच्या मायेच्या दुधावरली साय होती. याउलट धाकटा लेक जरासा स्वार्थीच होता. शिकून शहरात गेला तो तिकडचाच झाला... त्याची बायको श्यामला....श्यामला बरी होती म्हणजे जे काय चार दिवस सणावाराला यायची तेव्हा बरी वागायची.दोघेही शहरात नोकरी करतात.. सहा वर्षे झाली अजून मुलबाळ नकोच म्हणतात... त्यांना सेटल का काय ते व्हायचंय म्हणे! हे सेटल म्हंजे काय असते ते सत्तरीच्या विठाबाईंना अजून कळले नाही. धाकटा गेल्याच महिन्यात त्याच्या वाट्याची जमीन विकणार म्हणाला... त्याला शहरात घर घ्यायचं म्हणून इरेला पेटला.... हेच ते सेटल होणं असावं बहुदा.. ," बापजाद्याची जिमीन इकुन खानं.." विठाबाई मनाशीच म्हणाल्या.थोरली उज्वला नातवाचा अभ्यास घेतांना त्याला सांगत होती, " काकासारखा हुशार हो बाबा! शहरात जा अन सुखात रहा.. माझ्यासारखे तुझ्या बायकोचे हाल नको व्हायला." थोरलीला खडसावून तुझे हाल कसले होताहेत ग? विचारावे असे तीव्रतेने विठाबाईंच्या मनांत आले पण विषय कश्याला वाढवा म्हणून त्या ,"पांडुरंग! पांडुरंग!" म्हणत उठल्या अन मंदिराच्या दिशेने रवाना झाल्या.
उज्वला खरेच खूप खूप सुखात होती. तिच्या सरळमार्गी नवऱ्याचं तिच्यावर नितांत प्रेम होतं.मोठं चौसोपी घर होतं, दोन हुशार गोजिरवाणे लेकरं होते,शेतीतून उत्तम पीकपाणी येत होतं, नवऱ्याला शाळेतील गुरुजी म्हणून गावातले सगळे मान देत होते... सासुरवास नावाला नव्हताच उलट आईची माया मिळायची.आपले दोन्ही पोरं सासूच्याच आधाराने कसे मोठे झाले कळलंही नाही ह्याची जाणीव उज्वलला होती.अंगावर चार ठसठशीत दागिने होते... यंदाही कपाशीतून चांगले पैसे हाती आले की नवरा तिला पाटल्या करणार होता. घरचं दूध दुभतं होतं, गडिमाणस होती, घरचाच भाजीपाला, धान्य , मोकळी शुद्ध हवा... ह्या साऱ्यांमुळे लाभलेलं उत्तम आरोग्य.ह्यापेक्षा निराळं काय हवं होतं तिला??धाकटी जाऊ श्यामला तिच्या मावशीची लेक... श्यामलावर मोठ्या बहिणीची माया होती तिची. तिला डाळीसाळी, धान्य उज्वला निवडून पाठवे, गाईम्हशींचा खरवस,लोणची पापड आवर्जून घेऊन जाई. दिवाळीच्या सणाला श्यामला गावी येई... चार दिवस आनंदात जात. उन्हाळ्यात उज्वला पोरांना तिच्याकडे सुट्ट्यांना घेऊन जाई... तिथून परतली की मात्र उज्वला दुःखी असायची.
उज्वलाचं दुःख काही असण्या-नसण्याचं नव्हतंच मुळी... दुःख होतं तुलनेचं.शहरातल्या वरवरच्या दिखाऊ सुखांना ती भुलली होती. शहरात सुट्टीसाठी चार दिवस जावेकडे राहिले की उज्वलाला सारी प्रलोभने भुरळ घालू लागत. नळ सोडला की घरात 24 तांस पाणी, राजाराणीचा गुलाबी इवलासा संसार, सारं कसं व्यवस्थित आवरलेलं.. किचन ट्रॉलीज ने झाकलेलं सुटसुटीत, धाकट्या दिरांचं बायकोशी गोड गोड बोलणं, तिची सारखी स्तुती करणं,श्यामलाच मोकळं राहणं कधी ड्रेस तर कधी बिनबाह्यांचा स्लिव्हलेस ब्लाऊज घालणं, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन राखलेलं त्वचेचं गुलाबीपण... येणारा जाणारा नाही की पाहुण्यांचा त्रास नाही. शिवाय दर शनिवार रविवार मॉल ला जाणं खरेदी करणं, पिच्चरला जाणं मग बाहेरच हॉटेलमध्ये जेवून येणं... हळूहळू हेच सुख आहे हे उज्वलाला वाटू लागलं...घरी परततांना ती नाखूष असे.. कल्पनेत ती स्वतःला श्यामला प्रमाणे सुंदर ड्रेस मध्ये नटवायची... लिपस्टिक लावून हिलच्या सॅंडल घालून नवऱ्याचा हात सगळ्यांसमोर हातात घेऊन फिरायला निघायची... मात्र गावी येताच ह्या स्वप्नावर वास्तवाचं विरजण पडे मग तिची चिडचिड होत असे.
एकदा धाकट्या दिराचा तातडीने येण्यासाठीचा फोन आला.. श्यामलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते.. मदतीला कुणीही नव्हते.. धाकटा दिर चांगलाच घाबरला होता. उज्वला आणि थोरला लगेच निघाले.. पोरांना विठाबाई सांभाळणार होत्या... जेवणाची सोय शेजारच्या घरी स्वतः हुन झाली... चार जण धावून आले आणि उज्वलाला काळजी करू नको निवांत जा सांगितले...हॉस्पिटलमध्ये पोहोचताच दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली... श्यामलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, थोडक्यात बचावली म्हणायचे. थोरल्याने गरजेला हवे म्हणून सोबत आणलेले पैसे आणि उज्वलाच्या 2 बांगड्या मोडून पोलीसांचे तोंड बंद केले... झाला प्रकार अपघात म्हणून नोंदवण्यात आला . धाकट्याची नोकरी वाचावी म्हणून सारे प्रयत्न झाले... श्यामलाला समजावून जबाब बदलण्यात आला...या साऱ्या धावपळीत आठवडा उलटला. अखेर श्यामलाला आरामाला म्हणून सोबत घेऊन दोघे गावी परतले. उज्वलाला कळत नव्हते नेमके श्यामलाला दुःख तरी काय आहे की तिने जीव द्यावा? ती वेळ मात्र हा प्रश्न विचारण्यास योग्य नव्हती.. जरा शांत झाली की पुढे विचारू असा विचार समंजस उज्वलानी केला.
विठाबाईंनी सासू म्हणून झाल्या प्रकारावर चकार शब्द काढला नाही..बहुदा न सांगता सारेच अनुभवाने ताडले होते त्यांनी . अधिक अजून अधिक चा हव्यास माणसाला बर्बाद करतो , खरे सुख उपभोगत नसून समाधानात आहे हे धडे पिकल्या केसांनी त्यांना केव्हाच शिकवले होते. चार दिवस मूर्ती सारख्या वावरणाऱ्या श्यामलाचा बांध फुटला.. थोरली जाऊ आणि बहीण असणाऱ्या उज्वलाकडे तिने आपले मन मोकळं केलं... तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत, तिचे डोळे पुसत उज्वला सारे ऐकू लागली... धाकटा दिर अत्यंत महत्वाकांक्षी होता...शहरांत हात जोडून दिमतीला उभी असणारी सारी सुखे त्याला ओरबाडून घ्यायची होती.. त्याच्या स्वप्नांमध्ये आडवे येणारे कुणीही त्याला नको होते... घर होईपर्यंत स्वतःचं मूल नकोच ह्या कारणाने आजवर तीन वेळा त्याने श्यामलाला गर्भपात करण्यास भाग पाडले होते..."ताई! माझे हात बाळाच्या स्पर्शासाठी शिवशिवतात हो!" म्हणत श्यामलाने टाहो फोडला.
अनेकदा माहेरून लहानमोठ्या गरजांसाठी तिला पैसे आणावे लागत..घर घेण्यासाठी पैसे हवेत म्हणून तिचे दागिने तर कधीच विकून झाले होते... ऑफिसमधल्या एका स्त्रीशी नवऱ्याचे अफेअर असल्याचेही तिला कळले होते.मात्र 18 ते19 तास एकत्र काम करणार म्हणजे असे कॉम्प्लिकेशन्स होणारच... हे पासिंग अफेअर आहे असे नवऱ्याने तिला समजावले.तिला तिचे कामही मनाविरुद्ध करावे लागत असे.. तेथील पुरुषांचे टोमणे, स्त्री देहावरील कॉमेंट ह्याची तिने सवय करून घेतली होती.. कारण नोकरी सोडणे नवऱ्याने कदापि मान्य केले नसते. मन मारून रोज रोज नीटनेटकं तयार होणं, प्रेझेंटेबल राहणं किती मनःस्ताप देणारं आहे ह्याची कुणी कल्पनाच करू शकणार नव्हतं..... ह्या साऱ्यात स्वार्थीपणाचा कळस गाठला नवऱ्यानं...गेल्या शनिवारी धाकटा तिला आपल्या बॉस कडच्या पार्टीत तिला घेऊन गेला... त्याच्या बॉसनी प्रमोशन आणि मोठ्या पगाराच्या बदल्यात श्यामला सोबत एक रात्र सहवास मागितला... श्यामलाने निक्षून नकार दिला ... नवऱ्याचा दबाब वाढत चालला होता... नवऱ्याचा तिने एव्हढं करावं म्हणून हरतर्हेचा दबाब तिने मोडून काढला.. पण एक दिवस नवरा घटस्फोटाची नोटीस घेऊन आला... श्यामला वाईट चारित्र्याची असल्याने तिला घटस्फोट देणार असे त्यात होते...नवरयाने सरळ दोन पर्याय ठेवले ...बॉसची ऑफर मान्य कर किंवा घराच्या बाहेर निघ...बाहेर पडूनही नवरा तिच्यावर चिखलफेक करणारच.. शेवटी तिला मरण जवळ करावेसे वाटले.श्यामला म्हणाली,"ताई तुला नेहमी वाटायचं ना मी किती मजेत आहे.. शहरांत कसे सुखाचं सुख आहे.. पण ही शहरे म्हणजे भावनांच्या थडग्यावर वसवलेल्या महत्वाकांक्षेच्या वस्त्या आहेत.. इथे सुख आहे पण ओरबाडून घेतलेलं... इथे आनंद आहे पण तो विकत घेतलेला... क्षणिक! ह्या मोहाच्या चक्रात अडकलेल्या माणसाची सुटका नाही बघ. घर घेतलं की अधिक मोठं घर हवं... गाडी घेतली की अजून महागडी गाडी हवी .. सगळा सतत हव्यास..." दोघी बहिणी एकमेकींच्या कुशीत शिरून रडू लागल्या... थोरल्या उज्वलाचे अश्रू उपरतीचे होते ...सच्चे होते.
©🔏यशश्री रहाळकर

Agdi vasthav mast
उत्तर द्याहटवाखरंय....
उत्तर द्याहटवा