फॉलोअर

सोमवार, २५ मे, २०२०

Me Time

                            समिधा आज जरा तणतणतच घरी आली...तिचा दीड वर्षांचा लेक ,  विराज मस्त खेळायच्या मूड मध्ये होता....  मज्जेत हातपाय झाडत तो आऊईssss अश्या हाकाही घालत होता..... मात्र तिचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं . खरंतर आज कधी नव्हे तर तिला हाफ डे मिळाला...  आता मस्त रिलॅक्स होऊ , आरामात लोळत पडू आणि सोहमला जमलंच लवकर यायला तर एखादी  मुव्ही आणि नंतर डिनर बाहेर करून मज्जेत वेळ घालवू अशी साधारण योजना तिच्या मनांत रेंगाळत होती. घरी परततांना तिला अचानक आठवलं की विराजचं बेबी फूड, बेबी लोशन , डायपर्स वगैरे संपत आले आहेत ,अशी कालच आईने आठवण करून दिली होती. तिने झटकन गाडी नेहमीच्या स्टोअरकडे वळवली, सामान घेतले आणि आईच्या घराखाली गाडी पार्क केली. विराजला आज तिथेच ठेवून ती लगेचच निघणार होती. आईच्या ह्या घराची बिल्डिंग तशी जुनीच झाली होती... बाबा असतांना घेतलेले हे सेकंड हॅन्ड घर ,त्यामुळे हे होणारच होतं. बिल्डिंगची पार रया गेलेली, त्यात लिफ्ट नाही. तिने अनेकदा आईला आपल्या घरी येण्यासाठी आग्रह धरला होता मात्र आई तिच्या नकारावर ठाम होती. जोवर हातपाय चालताहेत तोवर स्वतंत्र राहायचं ,असं आई वारंवार म्हणायची. हातातल्या सामानाचे ओझे सावरत त्या पायऱ्या चढणे समिधाला अगदी नकोसे वाटत होते.... बाहेरून गप्पांचे आवाज येत होते बहुदा शेजारच्या दंडवते काकू असाव्यात.  त्या नेहमीप्रमाणे त्यांच्या नोकरी करणाऱ्या सुनेच्या कागाळ्या करीत होत्या...  तेव्हढ्यात तिच्या कानावर आईचा आवाज पडला,

 "... तुमचे बरे आहे हो सुनेची मुले म्हणून नाही म्हणता तरी येते. वेळप्रसंगी तक्रार करता येते, रडता येते... माझ्याकडे तर तोही पर्याय नाही. आपलेच दात आपलेच ओठ..." 

आईचे शब्द समिधाच्या कानात गरम तेलासारखे तडतडून गेले, तिरिमिरीत दार लोटून ती आत गेली , तिने विराजला उचललं ... आईला शरमेनं काय बोलावं सुचेना. तरी बिचारी सावरून घेत म्हणाली ,

 "आज लवकर आलीस का समू? थांब! मस्त चहा टाकते ." 

एक अवाक्षरही न बोलता समिधा विराजला घेऊन ताडताड जीना उतरत बाहेर पडली. त्याला घेऊन तिने थेट स्वतःचे घर गाठले.
                          आईला काही अडचण होतेय का पिल्लुला सांभाळायला?? तिने हे स्पष्टपणे मला सांगायला नको होते का? त्या दंडवते काकूंच्या कानाला लागून हे बोलण्याची गरजच काय? एक ना अनेक विचारांची धुसफूस तिच्या मनात सुरू होती. विराजभवती खेळण्यांचा पसारा टाकत ती कामाला लागली... तिने तात्काळ ऑफिसमध्ये Emergency leave साठी apply केलं आणि संबंधितांना धडाधड मेल पोस्ट केले. सुट्टी घेऊन हा प्रश्न कायमचाच सोडवून टाकते असा निश्चय तिने केला.... लगेच दुसऱ्या विंडोत ती बेबी सीटर्सचे पर्याय शोधू लागलीे. एकीकडे वरिष्ठांना घरी राहूनही आपण अर्धा दिवस ऑनलाइन कामे पूर्ण करू, असे आश्वासनही दिले.  कोणतेही काम आपल्यामुळे थांबणार नाही ह्याची ती पूर्ण काळजी घेणारी होती. ती तिच्या कंपनीतली सर्वांत efficient employee होती... हे बिरुद कायम ठेवण्यासाठी ती सतत धडपडत असायची . गेल्या 6 वर्षांत चार प्रमोशन्स तिने याच वृत्ती मुळे मिळवले होते.
समिधा प्रचंड महत्वाकांक्षी होती. लहानपणीपासून अत्यंत कष्टात दिवस काढलेल्या तिने , केवळ मोठं व्हायचं आणि खूप खूप पैसे मिळवायचे एव्हढंच आयुष्याचं ध्येय निश्चित केले होते . सोहम लॅच चे दार उघडून घरी आला... समू अजूनही ऑफिसच्या कपड्यांमध्येच होती तिची पर्स आणि बाकी सामान सोफ्यावर अस्ताव्यस्त पसरलेलं होतं.. ती अजूनही लॅप टॉप वर काम करत होती चेहरा अत्यंत त्रासिक... "वातावरण तापलेलं दिसतंय.." सोहमला अंदाज आला. आतल्या खोलीत पिल्लू खेळण्यांच्या पसाऱ्यात झोपून गेला होता... बहुदा त्याला खेळता खेळता झोप लागली असावी. हळुवार हातांनी त्याला उचलून ठेवायला गेला तर जागा होऊन पिल्लू रडू लागला , भुकेला असावा.. शांतपणे त्याने त्याच्या बॅग मधून बेबी फूड काढून त्याला भरवले , खाताखाता झोपुनही गेला .  आज समूचे काहीतरी बिनसले दिसत होते... त्याने नेहमीप्रमाणे पिल्लुची बॅग चेक केली, त्यात पोळ्या दिसल्या नाहीत. समूची आई बरेचदा पिल्लुसोबत पोळ्या पाठवून द्यायची... म्हणजे झटपट भाजी करून ती दोघे जेवायला बसत. आज पोळ्या नाहीत म्हणजे सासूबाईंची तब्येत बरी नाही की काय? बराच उशीर झाला होता आता ऑनलाइन देखील काही मिळायचे नाही. त्याने खिचडीचा कुकर चढवला, फ्रेश झाला आणि दोघांसाठी कॉफी घेऊन समीधा पुढे करत म्हणाला, 

"काय ग कसलं प्रेझेंटेशन आहे? काही नवीन प्रोजेक्ट का?" 

 समू एकदम भानावर येत म्हणाली,
 "सोहम तू कधी आलास? सॉरी , माझे लक्षच नव्हते, मी जरा कामातअडकले होते." 

बोलता बोलता समीधाने झटकन डोळे पुसले.

 "Oh My God! समू तू रडतेयस चक्क?? "

सोहमसाठी हा चांगलाच मोठा धक्का होता... आपली हट्टी, पोलादासारखी मजबूत बायको रडू शकते हेच त्याच्यासाठी नवीन होतं.  स्वतःला सोहमच्या मिठीत झोकून देत समू ढसाढसा रडू लागली. सोहमनी तिला वेळ दिला, मोकळेपणाने रडू दिलं... जरा वेळाने सावरत मूळच्या कडव्या रुपात परतून येत ती ठामपणे म्हणाली, 

"मी विराजची दुसरी काहीतरी सोय पाहतेय. " 

 "दुसरी म्हणजे? आई ठीक आहेत ना ?" सोहमने चमकून विचारले.

 "हो ,तिच्याच तर सोयीसाठी पाहतेय.  एखादे पाळणाघर किंवा बेबी सिटिंग." 

आता समूला काहीही सांगून उपयोग नाही हे एव्हाना सोहमला अनुभवातून कळलं होतं. उद्या जरा शांत झाल्यावर तिच्याशी बोलू असे ठरवून तो कामाला लागला.
                    समीधाच्या स्वभावातला कडवटपणा ही तिच्या अनुभवांची चव होती. समीधाचे बालपण तसे खडतर गेले होते. ती 9 वर्षांची असतांना वडील आजारी पडले... पुढे ते अनेक वर्षे अंथरुणाला खिळून होते... ती 15 वर्षांची असतांना ते वारले... खरंतर सुटलेच म्हणायचे. होते नव्हते सारे साठवलेले पैसे, आईचे दागिने त्यांच्या आजारपणात संपले. आईचे हाल ,आर्थिक ओढाताण तिला सहन व्हायची नाही. आई जेमतेम बारावी झालेली लगेच लग्न आणि समीधाचा जन्म ... पुढे नवऱ्याची सेवा आणि ढोर मेहनत नशिबात होती. जोवर समूचे आजोबा जिवंत होते तोवर त्यांच्या पेन्शन मध्ये भागायचे... किमान पोट भरायचे. पुढे त्यांच्या पश्चात  माय लेकीला दोन वेळचे जेवण मिळणे अवघड होऊ लागले. शिवणकाम, पापड लोणचे असे काही बाही कामे आई करायची पुढे तर पोळ्याही करू लागली, डबे करू लागली. आपल्या भावाला तिने समूचे शिक्षण चांगले व्हावे म्हणून मदत मागितली... मामाने समूला आपल्या घरी नेले; पण मामीच्या डोळ्यांत तिच्या मनाविरुद्ध घरात आलेले हे समिधा नावाचे ओझे सलू लागले. तिच्याकडून गुरासारखी कामे करून घे, सतत अपमान कर, वाट्टेल ते बोल असे प्रकार तिने सुरू केले. एकदा ती समूला आश्रित म्हणाली, त्याच क्षणी सतरा वर्षांची समू बॅग भरून घरी परतली. तिने ठामपणे आईला सांगितले , "मी तुला भार होणार नाही." बिचारी आई लेकराला पोटाशी धरून रडली आपण आपल्या अर्ध्या भाकरीतली चतकोर तिला देऊ मात्र आता कुठे पाठवायचे नाही हे ठरवले. समू मेहनती होती... टायपिंग शिकली. मिळेल ते काम कर, ट्युशन्स घे करत शिक्षण पूर्ण करीत राहिली. कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केले पुढे नोकरी करत पोस्ट ग्रॅज्युवेशन, अनेक लँग्वेज चा अभ्यास,अनेक अत्याधुनिक कोर्सेस करत ती स्वतःला घडवत गेली . प्रतिथयश कंपनीत मनाजोगी नोकरी मिळल्यावरही ती स्वस्थ बसली नाही. उलट पुढे जाण्याची तिची ओढ अधिक तीव्र झाली. ह्या साऱ्या दरम्यान आईवरचे तिचे प्रेम अधिकाधिक वाढत गेले. नोकरी मिळताच तिने सर्वांत आधी आईची सगळी कष्टाची कामे बंद केली. तिने आई आणि तिचं एक सुरेख जग नव्याने गुंफलं . आईला फिरायला ने, हॉटेलला जेवायला ने ,तिच्या आवडीच्या साड्या घे असे सारे सुख जे कधीही तिच्या आईने अनुभवले नव्हते ते सारे तिने आईसाठी मिळवले . हळूहळू समूचे वय वाढू लागले, तिने लग्न करावे म्हणून आई तिच्या मागे लागली. एककल्ली हट्टी समू तयार होत नव्हती. तिला आपले हेच आयुष्य छान आहे असे वाटत होते. आपल्या माघारी समिधाचे कसे? ह्या काळजीने आई पोखरून निघू लागली. अश्यात आईच्या भजनी मंडळाच्या ओळखीतूनच सोहमचे ठिकाण आले. सोहमला आईवडील नव्हते तोही कष्टाने मोठा झालेला, शांत समाधानी, मनमिळावू सोहम... आईला आणि पुढे समिधालाही आवडला. आईचा कायम सांभाळ करेन ह्या अटीवर समू लग्नाला तयार झाली. पुढे समिधाचे प्रमोशन्स आणि पिल्लुचा ...विराजचा जन्म , मोठे 3 बेडरूमचे घर ,गाडी सारे झपाट्याने झाले. मूळची महत्वाकांक्षी समिधा पुढे पुढे जात राहिली, पिल्लुची तिला काळजी नव्हतीच, तो आईजवळ अगदी मज्जेत असायचा.... अगदी सव्वा महिन्याच्या बाळंतपणानंतर ती जॉईन झाली तेव्हापासून आईच त्याचे सारे करत होती... जणू तिलाच बाळ झाले होते.
                     रात्री बरीच उशीरा झोपलेली समिधा सकाळी उशिराच उठली... तिचा एकंदरीत ताण पाहता सोहमनेही आपल्या ऑफिसला उशिरा येईन, असे कळवून टाकले. कॉफी घेत दोघे निवांतपणे बसले असतांना समिधाने घडला प्रकार सोहमच्या कानावर घातला.

 "इवल्या मुद्द्याचा गहजब केलाय तू समू ... आई थकू शकते, कंटाळू शकते हे तुला मान्यच नाहीये का?"

"अगदी मान्य आहे मला.. पण ते तिने ते थेट आणि स्पष्टपणे मला सांगायला हवे ना! "

समू चांगलीच दुखावली गेली होती... एव्हढ्यात आईंचा फोन आला... त्यांनी अनेकदा समूला केला असावा पण तिने बोलणे टाळले. समू संतापली की बोलतच नाही हे आई आणि सोहमला माहीत होते. आईंनी अखेर सोहमला कॉल केला. त्याही रडत असाव्या... अगदी अजिजीने गयावया करत त्या म्हणाल्या,

" तुम्ही तरी समजावून सांगा तिला. काल रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझा. चुकलंच माझं! बोलण्याच्या ओघात बोलून बसले . सकाळपासून पिल्लू नाही तर लक्षच लागत नाहीये. "

सोहमने फोन स्पीकरवर ठेवला होता. समू तडकून म्हणाली...

"बोलण्याच्या ओघात ?? तेच मनांत होतं तिच्या. मी कधीही तिला म्हटलं नव्हतं की विराजला सांभाळ.. ना कधी काहीही अपेक्षा केली होती तिच्याकडून . ती जे काही करतेय ते तिच्या स्वेच्छेने... म्हणजे असं मला तरी वाटत होतं आजवर."

सोहमने शांतपणे फोन बंद केला ... तयार झाला. एव्हाना पिल्लू उठला होता. समू पिल्लुचे आवरण्यात व्यस्त झाली. गाडीची चावी घेऊन निघालेल्या सोहमला "कुठे?" अशी हातानेच खूण करत तिने विचारले... त्यावर 

"काहीतरी नाश्त्याला घेऊन येतो . "

असे म्हणून सोहम बाहेर पडला. त्याने थेट समूच्या आईचे घर गाठले... रस्त्यात जातांना थांबून त्यांच्या आवडीचे खमण घ्यायला तो विसरला नाही. गाडी पार्क करत होता एव्हढ्यात दंडवते काकूंची भेट झाली. कालच्या प्रकाराने त्याही बिचाऱ्या खजील झाल्या होत्या . समूला आणि तिच्या आईला त्या अनेक वर्षांपासून ओळखत होत्या... अनेक वर्षे शेजारी राहिल्याने घरोबा होता. त्या सोहमला म्हणाल्या,

"जावई बापू ! बरं झालं तुम्ही आलात. कालपासून समूची आई सारखी रडतेय... काहीही खाल्लं नाही की चहाही घेतला नाही. माझंच मेलीच तोंडच फाटकं ! मी कुठून विषय काढला नि कुठे गेला."

"असू द्या हो काकू. चालायचंच हे, आई मुलगी म्हटलं की वाद आलेच ."

सोहम समंजसपणा राखत म्हणाला नी जीना चढू लागला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत दंडवते काकू उडगारल्या..

"किती नशीबवान आहे समूची आई... सोन्यासारखा जावई मिळालाय. .... प्रेमळ, समजूतदार."

अचानक जावई आलेला बघून समूच्या आईला काय करू काय नको असं झालं, बावरून गेल्या त्या. त्यांचे रडून रडून डोळे सुजून गेले होते. झोपही झाली नसावी . नेहमीच्या गोडव्याने सोहम म्हणाला...

"सासुरवाडीला चहा घ्यावा म्हणून आलो."

"हो हो! करते ना . या या बसा सोहमराव."

"काय हे आई? कितीदा तुम्हाला म्हणालो मी सोहम म्हणा नुसतं! आणि मी नाही तुम्ही बसा... चहा मी करणार आहे."

"अहो ! नाही नाही असं कसं? करते मी "

"बसा हो आई! रोज तुमच्या लेकीला करून देतो हा गडी ... आज तुम्हाला."

दोघांनाही मनमोकळं हसू आलं . बोलता बोलता सोहमने डिश भरल्या ,चहा टाकला आणि सासूपुढे करत म्हणाला,

"घ्या ! तुमच्याशीच बोलायला आलोय. आधी पोटोबा मग होतीलच गप्पा."

सोहम सतरा वर्षांचा असतांना त्याची आई हे जग सोडून गेली... बाबांनी सारे घर एकहाती सावरले त्याला जाच नको म्हणून दुसरे लग्नही केले नाही. पुढे काही वर्षांनी तेही गेले... सोहम पोरका झाला... खरे सुखाचे दिवस पहायला आई नाही ही खंत सतत वाटायची त्याला. समूच्या आईच्या ठिकाणी त्याला त्याची आईच दिसायची. सासू आणि जावई ह्या नात्याचा संकोच सारून बरेचदा तो त्यांना म्हणायचा

"मला तुमचा मुलगाच माना आई."

समू जितकी टोकाची हट्टी, आक्रस्ताळी तितका सोहम शांत, लाघवी आणि समजूतदार होता. खाणं झाल्यावर अगदी सहज स्वरात त्याने विचारले..

"आई, पिल्लू फार त्रास देतो का हल्ली? थकवा येतोय का तुम्हाला ? "

"नाही नाही तसं नाही..." 
अनपेक्षितपणे गांगरून त्या म्हणाल्या.

"हे बघा! आपण मोकळेपणाने बोलूयात का ह्या विषयावर? बोलून प्रश्न सुटतात न बोलून मनांत अढी बसते ."

समूच्या आईच्या डोळ्यांना धारा लागल्या... "खरंच किती नशीबवान आहोत आपण किती समजूतदार जावई मिळाला." त्या मनाशीच म्हणाल्या. अतिशय संयतपणे त्यांनी आपली बाजू मांडली. त्यांना कधीतरी समवयस्क बायकांत भजनाला जावे वाटे... पहाटे त्या ज्या हास्यक्लबला जायच्या तिथली डबा पार्टी, छोटीशी पिकनिक कुठेतरी जायची अधून मधून तिथे त्यांना जावे वाटे... जवळच एक गाण्याचा क्लास सुरू झाला होता ,अनेक वर्षांपासून त्यांना गाणे शिकायचे होतेे. मात्र अनेक वर्षे घरांत काचल्या गेल्या होत्या त्या.... आता (विराजला )पिल्लुला सांभाळण्यासाठी त्या पुन्हा बांधल्या गेल्या होत्या. त्यांना विराजचा अडथळा, अडचण वाटत नव्हती उलट त्याच्याशिवाय त्यांनाच करमत नव्हते. विराजला सांभाळणे हा त्यांच्यासाठी आनंदाचा ठेवा होता..... मात्र आता त्याला पाय फुटल्याने तो घरभर धावायचा आणि त्याच्या मागे फिरून त्यांची दमछाक व्हायची . ऑफिसमधून थकून येणाऱ्या लेकीसाठी पोळ्या करून देणं असो किंवा तिच्या आवडीचे पदार्थ डब्यात भरून देणं असो हा सारा त्यांच्या आनंदाचा भाग होता. अगदी खरं सांगायचं तर त्यांना दिवासभरातला थोडासा वेळ फक्त स्वतः हवा होता, quality time.... त्यांचा कामाला नकार नव्हता, ना जबाबदाऱ्यांना नकार होता... आपण हे सारे समिधाला सांगितले आणि ती दुखावली तर पिल्लुला आपल्याकडे येऊच देणार नाही ही भीती त्यांना सतावत होती. सारे उमजून मान डोलावत सोहम म्हणाला...

"आज आराम करा आजीबाई! उद्या तुमचा नातू तुमच्या सुपूर्त करतो. आणि आठवड्यातले दोन दिवस तुम्हाला सुट्टी... त्यात मात्र बदल होणार नाही . एक दिवस रविवार कारण त्या दिवशी समूला सुट्टी असते... दुसरा दिवस तुम्ही सांगाल तो ... मी सुट्टीचा ऍडजस्ट करीन.  हे मान्य करणार असाल तरच उद्या नातू येणार . चालेल ?"

समूच्या आईने समाधानाने मान डोलावली.

"आणि खूप दिवसांत ते नारळी पाकाचे लाडू केले नाहीत तुम्ही. आता जावई म्हणून हक्कानेच सांगतो करायला ."

म्हणत हसत हसत सोहमने निरोप घेतला. घरी पोहोयला चांगलाच उशीर झाला होता, जेवायची वेळ झाली होती... समू वैतागली होती एकतर पिल्लूला आजीच हवी होती आणि समूला सगळ्याची सवयच नव्हती. सोहमने समूच्या आवडीचे जेवण ऑर्डर केलं आणि पिल्लूला मस्त खेळवू लागला. लॅप टॉप उघडून समूने काही नोंदी घेतल्या आणि म्हणाली,

"जेवण झाल्यावर आपण लगेच निघू. हे चार पाच पाळणाघर आणि बेबी सिटिंग सर्व्हिसेस मी शॉर्ट लिस्ट केल्या आहेत. आपल्या दोघांच्या ऑफिसच्या वाटेवरच आहेत म्हणजे पिल्लुला आणणे सोडणे सहज शक्य होईल...मला त्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड, ऍडजेस्टमेंट नकोय . आपण सगळे नीट चेक करून घेऊया . "

सोहमनी समूचे दोन्ही खांदे धरले आणि तिच्या डोळ्यांत डोळे घालून विचारले...

"तुला खात्री आहे ह्या बेबी सीटर्स तुझ्या आईपेक्षा जास्त प्रेमाने विराजला सांभाळतील ?? "

समू निःशब्द होती... तिला ह्याची खात्री नक्कीच होती की तिच्या आईइतके मायेने कदाचित ती स्वतः सुद्धा विराजचं करू शकणार नव्हती. तोच विचारांचा धागा अलगद तिच्या नजरेतून टिपून घेत सोहम आश्वासकपणे तिच्या हातांना हातात घेऊन म्हणाला...

"समू ...मी काय सांगतोय ते नीट, शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी आत्ताच आईंना भेटून आलो. "

"तू का गेलास तिथे? मुळात तू का पडतोयस ह्या साऱ्यात?"
समिधा तोडून बोलली...

"कारण त्या माझ्याही आई आहेत आणि विराज माझाही पिल्लू आहे."

सोहमच्या आवाजातील जरबेने समू वरमली. पुन्हा आपले बोलणे मूळ पदावर आणत सोहम म्हणाला..

" तू फार मोठा गैरसमज करून घेतला आहेस. आईंना पिल्लुचा त्रास वगैरे होत नाहीये. खरंतर पिल्लू हा एकमेव आधार आहे त्यांच्या जगण्याचा. त्यांच्या आनंदाचा ठेवा आहे तो. मात्र तू कधी त्यांच्या बाजूने विचार केलाय का?  त्यांना थोडासा me time हवाय फक्त..."

"काय me time ?? म्हणजे काय ? "

"स्वतःचा थोडासा स्वतंत्र वेळ.. जो प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो . जो वेळ केवळ स्वतःसाठी राखून ठेवलेला असतो.  स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर, कर्तव्ये निभावल्यावर काही इवले क्षण हवे असतात ना प्रत्येकाला. हा वेळ म्हणजे me time."

"आईला असा स्वतंत्र वेळ हवाय ?? असं तुला वाटतंय... मला तर कधी जाणवलं नाही."

"असच होतं समू... आपण काही व्यक्ती आणि काही नाती इतकी गृहीत धरतो की त्या अपेक्षांचे काच आवळले जाऊ लागतात... मग प्रेमाची जागा त्रागा , वैताग , चिडचिड घेत जाते. "

समू शांतपणे ऐकत होती....

" आईंना गाण्याचा क्लास करावासा वाटतो, भजनी मंडळात जावंसं वाटतं.. समवयस्क मैत्रिणींबरोबर कधीतरी पिकनिकला जावंसं वाटतं... ह्यात चुकीचं ते काय , सांग बरं?? त्यांची कर्तव्ये करायला त्या तयार आहेत पण आपली कर्तव्ये ...? आपण पार पडतोय का?"

"हे सगळं आईने सांगितलं तुला ? मला कधी नाही बोलली ती..." समिधा डोळे मोठे करत म्हणाली

"Please समू ! आता ह्याचा इशू करणार का तू? आधी आई दंडवते काकूंजवळ बोलल्या म्हणून रागवलीस... पण त्या एकट्या आहेत ,त्यांना सोबतीला त्या काकूच असतात . त्यांच्याजवळ त्या बोलणार इतकी साधी सोपी गोष्ट आहे."

दोघेही काही क्षण शांत राहिले.... सोहम पुढे म्हणाला.

"आजीच्या प्रेमाला सर नाही ...कितीही पैसे मोजलेस तरी जी निश्चिन्तता पिल्लुला आईंजवळ ठेवण्यात आहे ती कुठेही नाही. मात्र हे देखील विसरू नकोस की पिल्लू त्यांची नसून आपली जबाबदारी आहे... त्यांना तोडू नकोस आणि भारही होऊ देऊ नकोस."

समिधाच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नांचे जाळे होते. सोहम पुढे म्हणाला...

"तुझा रविवारचा सुट्टीचा दिवस आणि माझा आठवड्यातील एक दिवस त्या सांगतील तो .. माझा विकली ऑफ flexible आहे... तो मी घेईन आणि आपण दोघे मिळून त्यांना दोन दिवस पूर्ण सुट्टी द्यायची ... हा वेळ म्हणजे त्यांचा me time..."

त्याच्या ह्या कल्पनेवर समिधा भलतीच खुश झाली... तिच्या मनावरचे सगळे दडपण क्षणांत दूर झाले. तेव्हढ्यात जेवणाचे मागवलेले पार्सल सुद्धा आले... पिल्लू घाईघाईने धावत येत पार्सल उघडू लागला... गरम असेल म्हणून अरे अरे ! करत दोघेही धावले. 
पिल्लुला उचलून घेत समू म्हणाली...

"हा दिवसभर असा धावत असेल तर आईची चांगलीच दमछाक होत असणार.. आता वरकामाला एखादी मुलगी शोधली पाहिजे आईच्या मदतीला . जेवली की नाही कोण जाणे आज. गोळी असते बी पी ची... विचारते तिला.." 
म्हणत समिधाने फोन लावला. सोहम पिल्लुला जवळ घेत म्हणाला...

"भांडण संपलं... आता उद्या ? "

"आ sss जी . आ sss जी ." पिल्लू म्हणाला.

©️🔏 यशश्री रहाळकर

३ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!