आमचं तसं अगदी कांदे-पोह्यांचं लग्न.. गुलाबी म्हणावेत असे फार काही दिवस अनुभवायला मिळाले नाही. मात्र लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंत मधले काही दिवस खासम खास होते... आम्ही नेहमी ज्या रेस्टॉरंटला भेटायचो आणि ज्या कोपऱ्यातल्या टेबलवर बसायचो त्याच ठिकाणी काल नाथांनी मला नेलं..( 'नाथ' ही माझी आमच्या अहोंसाठी खास प्रेमाची हाक) व्हॅलेन्टाईन डे होता... Love is in the air... वगैरे म्हणतात ना तसलं फार भारी वाटत होतं. वेटरला फिल्टर कॉफीची ऑर्डर देऊन कटवला आणि आम्ही जुन्या आठवणींत रमून जाणार एव्हढ्यात .....
....
...
धs डांम! धुडू sमं!
बाजूच्याच टेबलवरील कुटुंबातील, अजून उत्क्रांतपूर्व अवस्थेत असणाऱ्या मर्कटसदृश्य मानव पिल्लाने धाडकन खुर्ची पाडली होती ... मग काय.....
फटाक ! ताsड ताsड! भ्या ssss
मातोश्रींनी श्रीमुखात दोन लगावल्या नंतर कारट्याने मोठ्यांदा भोकाड पसरलं...पुढे अर्धा तास ते जोडपं चाईल्ड सायकॉलॉजी आणि मुलांना कसे प्रेमाने वाढवायला हवे ह्या विषयावर कडाडून भांडत होतं.... म्हणजे अर्धा तास आम्ही कसेबसे तिथं होतो पुढे कदाचित भांडण अधिक रंगले असेलही. आम्ही मात्र सगळ्या सुंदर मूडचा फालुदा घेऊन मुकाट घरी परतलो...😢 असा किंवा ह्या सारखा अनुभव थोड्याफार फरकाने आपल्यातल्या प्रत्येकाला आला असणार. सार्वजनिक ठिकाणी त्यातही विशेषतः हॉटेलमध्ये लोक तीर्थरूपांनी वारश्यात दिलेले साम्राज्य असल्या सारखे का वागतात? हा प्रश्न हल्ली मला नेहमीच पडतो.
घरांतली आणि मनातली जागा अगदीच गरजेपुरती जेमतेम असल्याने हॉटेल किंवा रेस्टॉरंट/ कॅफे वगैरे हल्ली समाज जीवनाचे महत्वाचे केंद्र बनले आहे.... कुणीच हल्ली कुणाच्या घरी जात नाही ... बाहेरच कुठेतरी भेटू , असा अलिखित नियमच झालाय जणू काही. आता ह्या बाहेरच भेटण्यामागे लोकांचे वेगवेगळे हेतू असतात. सहज गंमत म्हणून मी आजवर हॉटेलमध्ये भेटणाऱ्या नमुन्यांची गटनिहाय विभागणी करून टाकली.
★आधी बसू मग ...★
खाण्यापेक्षा पिण्यात जीव अडकलेले हे झिंगाट जीव गियर पडेपर्यंत निरुपद्रवी असतात... एकदा त्यांचा मेंदू तल्लख झाला की मात्र ते बॉस, बायको, तिचा मित्र किंवा प्रेमभंग झाला असल्यास एक्स बद्दल अर्वाच्य शिवीगाळ करू लागतात... कधी कधी फुकटात करमणूक देखील होते पण बहुतेक वेळा आजूबाजूच्या सगळ्यांना मनःस्तापच होतो. ह्या गटात फक्त पुरुषांचं वर्चस्व आहे असा गोड गैरसमज मात्र करून घेऊ नका हं! बायका सुद्धा खंबे सहज रिचवून अनेक व्हरायटीच्या शिव्या देतात.
★फेकू नंबर 1★
तुमच्या शेजारच्या टेबलवर जर ह्या प्रकारचे अर्धवट, बिनडोक आणि दिडशहाणे असे त्रिगुणात्मक ट्रिपल शेजवान राईस सारखे लोक आले तर घरी जाऊन बाम लावून झोपावे लागणार हे निश्चित.. इन्शुरन्स एजंट किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंगवाले असल्यास क्वचित प्रसंगी पेनकिलर सुद्धा लागू शकते.... हे लोक जे काही ज्ञान पाजळत असतात ते अखिल ब्रह्मांडासाठी गरजेचं असल्यागत मोठमोठ्याने ढणाणा सांगत असतात... रेस्टॉरंट मधील प्रत्येक व्यक्ती जणूकाही ह्यांचा भविष्यातील "बकरा" असते ... हळूहळू त्यांचा आवेश इतका वाढतो की तुम्हाला; 'कानांना झाकण का नाही दिलेस बाबा ?' असा प्रश्न देवाला विचारावा वाटतो.
★खादाड खाऊ★
रेस्टॉरंटमध्ये जाण्याच्या मुख्य उद्देश आयती खादाडी हाच आहे हे अगदीच मान्य पण काही लोक अश्या काही पद्धतीने खातात जणू दुष्काळातून उठून आले असावे... शेजारीच बसलेल्या कुणाला तरी आपल्या मचमचा आवाजाने, लडबडून खाण्याने किंवा बकाबका कोंबण्याने किळस वाटू शकते हे त्यांच्या गावीच नसतं.
★सेलिब्रेशन★
वाढदिवस/ लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचे रेस्टॉरंट हे हक्काचे ठिकाण आहे.... मात्र काही लोकांचा जोश पाहून हा जगातील पहिलाच वाढदिवस असावा असे वाटते... लग्नाचा वाढदिवस असेल तरी एव्हढा आरडाओरडा , फटाके , टाळ्या नि गोंधळ असतो जेव्हढा प्रत्यक्ष लग्नातही नसेल बहुदा. कुणीतरी काही वर्षे लग्न टिकवले ह्यात आनंद असतो की आसुरी समाधान ?? 🤔😂 त्यांचं त्यांना ठाऊक... थाट तर असा असतो की अख्ख्या हॉटेलचे बिल हेच भरणार आहेत... मग ते केक तोंडाला फासण सुरू झालं की ह्यांच्या तीर्थरूपांनी वेळीच ह्यांच्या तोंडात ठेवून दिली असती तर.. असा क्रूर विचार माझ्या मनात येतो.
★किटी.. आणि कटकटी★
तुमचं नशीब अगदीच वाईट असेल तर रेस्टॉरंटमध्ये तुमच्या शेजारी किटीचा ग्रुप येऊन धडकतो... ह्या ग्रुप मध्ये स्वतःला षोडशा समजणाऱ्या चाळीशी ते पन्नाशीच्या काकवा असतात. उगाचच मॉडर्न कपड्यात स्वतःचा न बसणारा देह कोंबून त्या जे फतकल मारतात ते चार तास उठत नाहीत. ह्या ग्रुपचे ध्वनी प्रदूषण एव्हढे असते की तिथून बाहेर पडल्यावरही तुमचे कान कित्येक तास वाजत असतात. ह्या ग्रुप मध्ये सगळे वक्ता असून कुणीच श्रोता नसते.. शिवाय प्रत्येक जण वेगवेगळे विषय हाताळत असते... त्यात वाद , कटकटी, न आलेलीची चुगली ह्या सगळ्या मसाल्याची खमंग भर पडते.
त्यात जर तुम्ही प्युअर व्हेज रेस्टॉरंटला असाल आणि "घुंघट का चाँद" टाईप बायकांचा ग्रुप असेल तर शांतता भलतीच महाग होऊन जाते. (तसा समझने वालोंको इशारा काफी है।... घरात अनेक बंधने असणाऱ्या घुंघट वगैरे तत्सम रूढी पाळणाऱ्या, फारसे स्वातंत्र्य अनुभवायला न मिळणाऱ्या) .. तर अश्या भगिनी अगम्य भाषेत, तारसप्तकात अक्षरशः किंचाळत असतात.. बरं तर बरं ... तुम्हाला त्यातले एक अक्षरही कळत नाही फक्त "पच पच"😆🤦
★कोपऱ्यातले राघू मैना★
रेस्टॉरंटमध्ये तुमच्या शेजारी समजा मस्त गुलाबी गुलछबू जोडपं बसलेलं असेल तर मज्जा येते... लग्न ठरलेलं, प्रेमिकांच, नवीन लग्न झालेलं, किंवा तत्सम जोडपं शक्यतो कोपराच गाठत... त्यांचा फार काही त्रास वगैरे होत नाही पण तुमच्या सोबत एखादे लहान मूल असेल तर मात्र गंमत येते... कितीही तिकडे पहायचं नाही असं बजावलं तरी ते आगाऊ कार्ट मोठ्ठ्याने , "आई ते बघ!👀 अव्वा!" करत किंचाळतच🙄... नेमका टेबलखाली पडलेला चमचा उचलायला टेबलखाली शिरतो आणि मग दोन दिवस नको त्या प्रश्नांना तुम्हाला सामोरे जावं लागतं. तुमच्या सोबत वयस्कर व्यक्ती असतील तर तुम्ही अख्ख्या वाया गेलेल्या, निलाजऱ्या तरुणाईचे प्रतिनिधी असल्यागत तुम्हाला वाट्टेल ते ऐकून घ्यावं लागतं.
★हम साथ साथ है।★
पंचवीस तीस लोकांचा फॅमिली ग्रुप बरेचदा हॉटेलमध्ये धडकल्यावर तुम्हाला बाजारात जेवायला बसल्याचा फील येतो... आधी हे लोक टेबलच्या जोडाजोडी करतात त्याचा प्रचंड आवाज वैताग आणणारा असतो.... मग ऑर्डर काय द्यायची ह्यावर वाद घालतात... मग सगळे तायाजी, जिजाजी, फुफाजी वगैरे उशिरा येणारे प्राणी उगवतात मग त्यांना जागा , मग खुर्च्यांचे आवाज देवा रे! कहर करतात. बरं उपस्थित 25 माणसे कमी की काय म्हणून अनुपस्थित एखाद्याला विडिओ कॉल लावला जातो मग प्रत्येकाच्या तोंडापुढे फोन नाचवत miss you पाय लागू वगैरे होतं... कधीकधी तर एव्हढं प्रेम ओसंडून वाहत असतं की डेलीसोपमध्ये प्रत्यक्ष शिरलोय असं वाटू लागतं.
★बा अदब बा मुलाहिजा★
काही लोक राजे महाराजांचे वंशज असल्यागत एन्ट्रीलाच घमासान सुरू करतात. सगळे वेटर हे त्यांचे खाजगी गुलाम आहेत असे मानून इतका घसाफोड करतात की एखादा गरीब वेटर चळचळा कापू लागतो... ह्यांना ताबडतोब ऑर्डर हवी असते, ते मीठ सुद्धा वेटरलाच वाढायला लावतात... शिवाय हे असंतुष्ट आत्मे अखंड सगळ्या पदार्थांना नावेच ठेवत असतात... ह्या हॉटेलपेक्षा दुसरे हॉटेलचं किती ग्रेट आहे हे सतत ऐकवत असतात... आजूबाजूच्या लोकांवर किती मूर्ख, गरीब आहेत अशी दयेची दृष्टी फेकत राहतात.... शिवाय कुणीच कसं काही बोलत नाही ... "मी बोलतो, भांडतो बाकीच्यांमध्ये दमच न्हाई" असेही सांगत असतात. शेवटी बिलावरून मनसोक्त भांडले की त्यांचे पोट भरत असावे.
ह्या आणि ह्या सारख्या अनेक अतरंगी लोकांना तुम्ही रेस्टॉरंट /हॉटेल्समध्ये पाहिले असेल... ह्या लोकांना सा. भा. रा.ची ... अर्थात सामाजिक भान राखण्याचे धडे गिरवण्याची खूप खूप गरज असते. आपल्या शेजारील टेबलवर बसलेला माणूस दुःखी, वैतागलेला असू शकतो... किमान माणुसकी म्हणून शांततेवर त्याचाही अधिकार आहे ना! काही दिवसांपूर्वी ही गोष्ट मला अधिक तीव्रतेने जाणवली .... माझ्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या कुटुंबातील बहीण-भाऊ .."वडिलांना आधी थोडं खायला घालूया काहीतरी मगच सांगू आईचं व्हेंटिलेटर आज काढणार असल्याचं " बोलणं मी ऐकलं आणि माझ्या काळजात चर्र झालं. त्या कधीही न पाहिलेल्या बाबांबद्दल माझ्या मनात अपार दुःख दाटून आले. किती दिवस बिचार्यांची पत्नी व्हेंटिलेटरवर होती कुणास ठाऊक? त्यामुळे रेस्टॉरंट मध्ये आपल्या शेजारच्या माणसाला/कुटुंबाला आपला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेणं ही आपली सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी आहे ही खूणगाठ मी मनाशी बांधून ठेवली.
काही पथ्ये प्रत्येकाने कटाक्षाने पाळायलाच हवीत... बोलतांना ओरडा, गलका करू नये, प्रेमी युगुलांनी आजूबाजूचे भान राखावे, अगदी तान्ह्या बाळांना हॉटेलमध्ये नेऊच नये... नवीन चेहरे ,आवाज यांनी ते बिचारे घाबरून जातात... थोड्या मोठ्या मुलांना नीट शिस्त लावावी त्यांना उधळलेल्या बैलांसारखे लोकांच्या अंगावर सोडू नये, काटेचमचे ही फेकायची वस्तू नाही हे नीट घरीच सांगावे, मुलांना चारचौघात तरी मारू नये...😝 बायकांच्या ग्रुप ने एका वेळी एकच बोलणार हा नियम लावून घ्यावा. थोडक्यात...आपली मजा कुणाची सजा होऊ नये... एव्हढी काळजी घ्यावीच. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक भान राखणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे... त्यामुळे त्याची आपण दुसऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो मात्र सुरुवात स्वतःपासून होऊ द्यावी... बाकी मज्जा मस्ती करायलाच हवी.... पण सा.भा. रा. सहित.👍😊
✒️यशश्री रहाळकर
Wah wah ....halki fulki lekhani.....duparchya chaha chi garaj nahi aaj.....Mood fresh zaala ekdam
उत्तर द्याहटवासुंदर..
उत्तर द्याहटवा