माणसाचे पूर्वज माकड होते असे मानले जाते... पण मग सगळेच पूर्वज बदल स्वीकारत गेले नाहीत असेच म्हणावे लागेल... काही माकडांनी उत्क्रांत होतांना टाळाटाळ केली किंवा आळशीपणा नडला असावा... त्यामुळे ती माकडेच राहिली. आपल्याला जरी सारखी वाटत असली तरी भारतात 11 प्रकारची माकडे आढळतात... खरेतर 11 प्रजातींची म्हणायला हवे पण आता माकडांमध्ये तरी "जात" नको... माणसाचे dna 98% मॅच होणारा, माणसासारखे 32 दात असणारा आणि बाकी खूपच साम्य असल्याने विविध प्रयोगांसाठी बळीचा बकरा ठरणारा हा प्राणी.... इकडे शहरांत माकडे फार दिसत नसली तरी गावांकडे माकडे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. भारतात माकड अजूनही वन्य प्राणीच मानले जाते.... त्यांना कुणी पाळलेले पाहिले नाही. खरेतर मनुष्य वस्तीजवळ राहून माकडे आता अगदी उत्तम माणसाळली आहेत. पूर्वी "मदारी" माकडांची एक जोडी पाळायचे आणि त्यांना नाचायला लावून ,विविध करामती करायला लाऊन खेळ करायचे ... हल्ली तेही दिसत नाहीत. ह्याच मदारीच्या खेळासारखा थायलंडला ओरांगउतान माकडांचा शो पहिला होता... लांब हातांची ही पिटुकली माकडे भलती करामाती असतात आणि आपलं मनोरंजन उत्तम करतात. अशी रीतसर ट्रेनिंग दिलेली किंवा पिंजऱ्यातली माकडे पाहणं वेगळं ... आणि प्रत्यक्ष मुक्तपणे जगणाऱ्या माकडांसोबत राहणं वेगळं... गावात वाढल्याने आजूबाजूला असणाऱ्या प्राणी जगतात "माकड" सुद्धा होतं.
विदर्भातील सदैव पाण्याच्या तुटवड्याने ग्रासलेलं गाव माझं ... "बारोमास" आणि "तहान" लिहिणारे सदानंद देशमुख आमच्याच गावचे... आजही बारा ते पंधरा दिवसांनी नळाला पाणी येते. सोन्यासारखे पाणी जपून वापरावे लागते... उन्हाळा प्रचंड जीवघेणा आणि पाऊस अत्यल्पच... इकडे माकडे मनुष्यवस्तीकडे आली ती पाण्याच्या शोधात.... पुढे मनुष्यवस्तीजवळच राहिली, जन्मली वाढली.... आता ही माकडे दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाली आहेत. इकडे ग्रे लंगुर असे शास्त्रीय नाव असणारे काळतोंडे माकड अर्थातच वानर पहायला मिळते... ही वानरे हनुमानाच्या वंशातली आहेत अशी मान्यता इथे प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांना कुणीही इजा करत नाहीत.... माणसांनी वानरांचा आणि वानरांनीही माणसांचा मनापासून स्वीकार केला आहे. ह्या वानरांनी माणसांचे उत्तम निरीक्षण करून कित्येक सवयी अंगीकारल्या आहेत... तुम्ही वेफर्स किंवा कुरकुरे व्यवस्थित पॅकेट फोडून खाणारी माकडांची पिल्ले पाहिली आहेत का?? आम्ही पहिली आहेत... गंमत म्हणजे हे कुणीही त्यांना शिकवले नाही हे त्यांचे तेच शिकले.... साधारण रंगाला लाल/पिवळे असणारे वेफर्सचे पाकीट, बिस्किटांचे पुडे माकडे ओळखतात आणि घेऊन पसार होतात... अगदी व्यवस्थित फोडून झाडांच्या फांद्यांवर बसून खातात... ह्याच गडबडीत डिटर्जंट पावडरचे पाकीट एका माकडाने पळवून नेले नंतर जी काही मजा आली ती शब्दांत सांगणे अशक्य आहे.... आमची हसून हसून पुरेवाट झाली.
इकडे पाण्याच्या टाक्यांना (अगदी सिंटेक्स सुद्धा) कुलपे घातलेली जागोजागी दिसतील... कारण पाणी चोरी होते... चोर माणसे नव्हे हो माकड असते .. बिचारे!... माकडांच्या टोळ्या आता झाकण उघडून पाणी प्यायला शिकल्या आहेत... झाकणाला गुंडाळलेली तार, त्यावर ठेवलेले धोंडे वजन वगैरे सहज काढून ते पाणी पितात... आणि विशेष म्हणजे उरलेले नासवतात.... माकडांना नळ सोडता येतात... वाहणारे पाणी पाहून त्यांना कोण आनंद होतो....माकड ह्या शब्दाचा समानार्थी शब्द व्रात्यपणा किंवा खोडसाळपणा असावा इतकी माकडे मूलतः व्रात्य असतात. आमच्या शेजारच्या घरी जमिनीतल्या टाक्यावर झाकायला काही टिणे /पत्रे आणली ... ती एकावर दुसरे अशी व्यवस्थित घालून, झाकून ठेवली. एक माकडाचे इवले पिल्लू उड्या मारताना निसटले आणि त्या टिणावर पडले ... ठण्ण ! ठण्ण ! आवाज झाला ... त्या सरशी सगळ्या माकडांचे लक्ष वेधले गेले आणि मग पुढे दोन तास अखंड माकडांची ती टोळी त्या टिणावर उड्या मारत होती... आजूबाजूच्या चार घरांचे त्या ठण्ण ! आवाजाने डोके उठले... शेवटी ती टीणे मोडली आणि शांतता पसरली... माकडे माणसांच्या थेट वाट्याला जात नाहीत पण निरुपद्रवी असतात हे म्हणणे चुकीचे ठरेल. माकडे सळो की पळो करून सोडतात.... माकडे बांधकामावरच्या मजुरांसारखे ओळीत उभे राहतात आणि 3/4 किलो बटाटे क्षणार्धात गायब करतात.. पोळ्यांच्या घट्ट झाकणाच्या डब्याला तुम्ही उघडून पाहता तो रिकामा असतो... माकडे पोळ्या घेऊन पुन्हा झाकण सुद्धा व्यवस्थित लावून ठेवतात... एकदा पोळ्यांचा डबा समजून एक मर्कटस्वामी आमचं तिखट मिठाचं पाळं घेऊन पळाले .... अपेक्षा भंगाच्या दारुण दुःखानंतर .... स्वयंपाक घराच्या खिडकीवर बसून रागाने दात ओठ खात तो डबा आमच्या मातोश्रींकडे पाहत त्यांनी जमिनीवर फेकून दिला. त्याचा तो आवेश पाहून मातोश्री देखील संतापून , "मेल्या तुझी देणेकरी आहे का मी फुकटच्या पोळ्या बडवायला." म्हणून धावून गेल्या... मोठाच बाका प्रसंग होता. बरोब्बर चारच दिवसांत त्याच मर्कट स्वामींनी आमच्याच घरच्या चार पोळ्या पळवून आईला दाखवत खाण्याचा विजयी सोहळा पार पाडला.
तुमच्या घराभवती डाळिंब, सीताफळ, रामफळ अशी झाडे असतील तर माकडे आलीच म्हणून समजा. त्यातही गुलमोहर हे तर त्यांचे आवडते ठिकाण. गुलमोहराच्या कळ्या माकडे अत्यंत आवडीने खातात शिवाय त्याचा पाला उधळून देतात... गुलमोहर, सुबाभूळ ह्या शेंगा मोडून खालून जाणाऱ्या गाय ,कुत्रा आदी प्राण्यांना फेकून मारणे ,हा माकडांचा आवडता छंद असतो. माकडे काय खात नाहीत?? माणूस खातो ते सगळे पदार्थ माकडे खातात... अगदी लिंबाच्या लोणच्याची उन्हाला ठेवलेली बरणी माकडे मिटक्या मारत संपवतात. गच्ची/छतावर घातलेले तांदळाचे पापड, कुरडया, खारोड्या यांवर यथेच्छ ताव मारतात. झाडांच्या कळ्या विशेषतः गुलाबाच्या आणि जास्वंदाच्या कळ्या माकडे पाहता पाहता फस्त करतात. वाळवणाला घातलेले पोतंभर धान्य विशेषतः गहू चवीला आवडले नाहीत म्हणून माकडांनी ओंजळी ओंजळी ने उधळून दिलेले आम्ही पाहिले आहेत. माकडे वस्तू फक्त खात नाहीत तर पोट भरले की उरलेल्या वस्तूंची मनसोक्त नासाडी करून ठेवतात. त्यामुळे ऐन उन्हात वाळवणावर राखण्या लावाव्या लागतात... माकडे बायकांना ऐकत नाहीत... होय ! हे सत्य आहे... ते स्त्री पुरुष भेद जाणतात, त्यातही पुरुष उंच मजबूत भीतीदायक वाटत असावेत... आपल्याला पाहून किंचाळत पळणाऱ्या बायका आहेत हे त्यांना नक्की कळते... एखाद्या बाईने हातात काठी घेऊन माकडाला हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ते ढिम्म बसून दुर्लक्ष करते... अगदीच जेरीस आले तर दात विचकवून घाबरवून सोडते. पुरुष माणसे मात्र हातात काठी घेऊन निघतात आणि वानरे शेपूट घालून हुsप्प हुsप्प ! करत पळत सुटतात. वानरांनी स्त्रियांवर झेप घेतल्याच्या, अंगचटीला आल्याचा अनेक सुरस रम्य कहाण्या येथे प्रचलित आहेत पण प्रत्यक्षात असे घडल्याचे फक्त ऐकीव आहे. कुणीही प्रत्यक्ष साक्षीदार नाही. माकडे माणसांच्या स्त्रियांवर लुब्ध व्हावीत एवढीही बावळट नसतात...😂😂 आणि त्याहूनही प्राणी मादीवर बळजबरी करीत नाहीत... ह्या बाबतीत माणसापेक्षा माकडे बरीच म्हणायची. मात्र बायकांना घाबरवून सोडण्यात त्यांना मजा येत असावी हे नक्की.
प्रत्येक वानरांच्या टोळीत एक लीडर ...म्होरक्या असतो. त्याला "महाळ्या" म्हणतात. हा महाळ्या चांगलाच ताकदवान आणि भीतीदायक वाटावा असाच असतो. साधारण एक माणूस बसल्यावर जेव्हढा दिसेल तेव्हढा धिप्पाड असतो... हा महाळ्या मात्र प्रचंड आक्रमक असतो.... आपल्या टोळीच्या रक्षणासाठी तो सज्ज असतो आणि वेळ पडली तर दात विचकवून धावून येतो... तो काळाकभिन्न पहाडागत वानर बघूनच माणसे पळत सुटतात. जरा संकट वाटले की हा बागडणाऱ्या पिल्लांना दे दणादण धपाटे मारतो आणि त्यांच्या आयांकडे पिटाळतो. ह्या महाळ्याची एक आठवण सांगते... अस्मादिक दहावीच्या परीक्षेची तयारी करत होतो.. दहावीच्या परीक्षेत नापास वगैरे होत असत मुले तो काळ... मातोश्री अलार्म लाऊन पेपर सोडवायला देत आणि बाजूला घरची कामे करत. असाच एक पेपर सोडवत होते... मागचे दार उघडे असावे , माकडे कधी आली कळलेही नाही... माझ्या पाठीवर कुणीतरी हलकेच थाप मारली... शेजारची छोटी मुलगी असेल असे समजून मी ,"पेपर सोडवतेय ग मला त्रास देऊ नको मनु" म्हणाले. पुन्हा थाप... मी मागे वळून पाहिले तर महाळ्या हे भलाथोरला ... माझ्या पासून हातभर अंतरावर... मी कर्कश्य किंचाळले आणि भीतीने थरथर कापू लागले... त्याला बहुदा कळलेच नाही की मी का किंचाळत होते... तोही जोरात किंचाळू लागला... आणि आपला लीडर संकटात आहे असे मानून झाडांवर बसलेले त्याचे टोळीजन सुद्धा जोरजोरात किंचाळू लागले... धोक्याची सूचना देण्याची त्यांची ही पद्धत असावी... शप्पत सांगते.... पंचवीसेक लोक गोळा झाले लाठ्याकाठ्या घेऊन... आईने लाटणं फेकून मारलं आणि महाळ्या धावत सुटला... पुढे कित्येक तास ती माकडं जीव खाऊन ओरडत होते... आणि मी भीतीने अर्धमेली झाले होते. वानर माणसांच्या वाट्याला स्वतःहून जात नाहीत... "तू त्यांना त्यांच्यातली वाटली असणार..." हा विषय माझ्या माहेरी अजूनही रंगवून सांगितला आणि मला यथेच्छ चिडवण्यासाठी वापरला जातो.
माकडांच्या टोळ्यांमधील पिल्ले असणारी माकडीण पाहणे हा एक उत्तम विरंगुळा असतो... देवाने आई काय घडवलीये हो! खाताना पितांना , उड्या मारतांना तिचे अखंड लक्ष पिल्लावर असते... जरा संशय आला की ती पिल्लाला घट्ट छातीशी कवटाळते ... मस्ती करणाऱ्या पिल्लाला जबराट दोन थपडा लगावते... जरा सुटे झालेल्या पिल्लाची शेपूट धरून ठेवते... झाडांवरून खाली जमिनीवर उतरून मस्ती करणाऱ्या पिल्लाला ती एक विशिष्ट प्रकारचा आवाज देऊन बोलावते.. रिकामपणाचा अख्खा वेळ ती पिल्लाला स्वच्छ करत असते... पिल्लाला जवळ घेते आणि पाहत राहते... मग मायेने घट्ट कवटाळते. अश्या पिल्ले असणाऱ्या माकडीणी अत्यंत आक्रमक असतात... पिल्लाला धोका जाणवला तर माणसांवर, कुत्र्यांवर अगदी बैलावरही धावून जातात आणि मारतात सुद्धा.....कधीतरी आगाऊ पिल्ले उपद्व्याप करतात ... मग झाडांवरून पडून किंवा विजेच्या तारांवर शॉक लागून त्यांचा जीव जातो ... नंतर जे काही घडते ते दृष्य तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाहीत. त्या पिल्लाची आई पिल्लाशेजारी बसते... त्याचे तोंड उघड, हातपाय ओढ, शेपूट ओढ असे सर्व प्रयत्न तिच्या परीने करून पाहते... अजूनही पिल्लू गेले आहे ह्यावर तिचा विश्वास नसतो... टोळीतल्या इतर माद्या पिल्ले माकडांकडे सोपवून खाली उतरतात... त्या पिल्लाभवती बसतात प्रत्येक जण पिल्लाला उठवण्याचे निष्फळ प्रयत्न करते.... भयाण शांतता पसरते... दुःखावेगाने ती माता आपल्या मृत पिल्लाला फडाफडा मारू लागते... जणूकाही सांगत असते ,"ऊठ आता तरी ऊठ!"... पिल्लू निपचित असते... मग ती माकडीण छाती पिटुन रडू लागते... तिच्या सोबत टोळीतील इतर माद्याही छाती पिटुन रडू लागतात .... हा आकांत भयंकर असतो. तास ..दोनेक तास हे रडणे चालते... त्या वेळी इतर टोळी अगदी शांत असते कुणीही काही खात नाही काही उपद्व्याप करत नाही....थोड्या वेळानी पिल्लाला न्यायला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ची गाडी येते ... माकडीण पिल्लाला अखेरचे कवटाळते आणि त्याच्यापासून बाजूला निघून दूर जाऊन बसते.... पुढे कित्येक दिवस ती माकडीण दुःखी असते खातपीत नाही शांत बसते. अशीच एकदा पिल्लू मेलेली माकडीण तान्ह्या बाळाला घेऊन गेल्याचा किस्सा ही चवीने चघळला जातो... जेमतेम काही दिवसांचं ते बाळ... लोक काठीचा धाक दाखवू लागले तर माकडीण बाळाला सोडून देईल ही भीती होतीच... मग झाडाखाली परातभर शेंगदाणे गूळ, केळी वगैरे मांडून ठेवले काही वेळानी मुकाट्याने उपाशी माकडीण खाली उतरली बाळाला बाजूला ठेवून खाणे घेऊन पळाली. बाळाला काहीही झालं नव्हतं पण बिचाऱ्या बाळाच्या आईची काय अवस्था असेल कल्पनाच करवत नाही... माझ्या जन्माच्या कितीतरी आधीचा हा किस्सा... पुढे मोठे झाल्यावरही त्या बाळाला म्हणजे आताच्या माणसाला लोक "अग तो नाही का माकडाने पळवला होता.. त्याच्याच दुकानातून आणले..." ☺️ असेच ओळखतात😂
माकडांचे असे शेकडो किस्से तिकडे ऐकायला मिळतील, पहायला देखील मिळतील. आमच्या नगरात एक पुरातन मारुती मंदिर आहे...तिथे अगदी थाटामाटात हनुमान जयंती साजरी होते. भल्या पहाटे सगळे जमा होतात आणि अभिषेक , आरती वगैरे होते. एक वर्ष एक मोठ्ठे माकड सगळ्या लोकांच्या मागे येऊन उभे राहिले, शांतपणे त्याने मारुती जन्माची कथा ऐकली... आरती झाली... काही भाविक पुरुष मंडळींनी त्या मर्कटरायांचे पूजन केले... आश्चर्य म्हणजे त्याने सगळे साग्रसंगीत न हलता करून घेतले... टिळा लावला गळ्यात माळ घातली... आरती ओवाळली... प्रसादाचे केळे आणि दोन पेढे घेऊन बजरंगबली निघून गेले... लोकांनी श्रद्धेने हात जोडले.. माणसे सहज आजूबाजूला वावरावीत अशी माकडे इकडे वावरत असतात... विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या संख्येने येतात... माझे बाबा एका मोठ्या जुन्या घमेल्यात माकडांना पाणी ठेवायचे... माकडे मग पाणी पीत त्यांची पिल्ले त्यात उड्या मारत.... शेवटी मुका जीव तो ... पाणी तर त्यालाही हवे... इथे असे पाणी घराघरांपुढे अंगणात ठेवलेले दिसेल... काही लोक पक्ष्यांसाठी पाणी ठेवत... आमच्या माठाखालचे पाझरलेले पाणी ठेवले की साळुंख्या येत पाणी पिऊन अंघोळ करून जात.... भारद्वाज देखील बरेचदा यायचे... एक काकांची मुलगी "तावळ्याला पाणी ठेवायची"😂😂 अर्थात कावळ्याला पाणी ठेवायची... तेही फ्रीज मधील थंडगार... आणि गंमत म्हणजे कावळे पण मजेत यायचे गारेगार पाणी प्यायला. खरंतर इथे मरणाचा उन्हाळा... त्यात पाण्याचा प्रचंड दुष्काळ... बारा/पंधरा दिवसांनी तासभर नळाला येणारं पाणी त्यात घरातलं प्रत्येक रिकामं भांड भरून ठेवलेले असतं. ....पण कुणालाही पटकन लोक लोटीभांडभर पाणी पुढे करतात... अगदी सुया पोत विकणाऱ्या बाईलाही तांब्याभर पाणी आणि चटणी भाकर दिली जाते. हे आमच्या मातीचे संस्कार आहेत.... माकडांच्या उच्छादाला लोक कंटाळतात पण दूर दूर पर्यंत पाणीच नाही बिचारी माकडे तरी काय करतील? हे समजून घेण्याची प्रचंड व्यापक दृष्टी येथल्या प्रेमळ माणसांमध्ये आहे.... इथे निसर्गाचे "संरक्षण करा , चिमण्या वाचवा, प्राणी वाचवा" असे घोषणाबाजी करून सोशल मीडियावर दिखाऊपणे मांडून सांगत नाहीत... इथे प्रत्यक्ष आचरणातून सृष्टीचे संरक्षण केले जाते... घराघरात गोग्रास असतात, पोळी उरली की मोकाट कुत्र्यांना घातली जाते , घराघरांत चिमण्यांची घरटी असतात, त्यांना दाणे टाकले जातात... "जगा आणि जगू द्या" किती सहज आहे ना!
दोनेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल... एका उन्हाळ्याच्या सुट्टीत लेकीला घेऊन गावी गेले होते. अचानक मोठ्या आवाजांचे फटाके वाजू लागले धडा sम ! धुडूs म! सवयीने माझी इवली लेक , "आई इंडिया मॅच जिंकला ..इंडियामॅच जिंकला." म्हणत नाचू लागली. तिला सांगितलं.. ही तर लोकल मॅच आहे .. माकडांची आणि माणसांची... कुणीतरी वाळवण ठेवलं की माकडांना घाबरवून सोडायला मोठ्या आवाजांचे फटाके फोडले जातात... मग माकडे हुप्प! हुप्प! करत गोंगाट करत पळत सुटतात.... थोड्या वेळात परत येतात... मग तिला झाडांवरची माकडे, त्यांची पिल्ले दाखवली... निसर्गात मुक्तपणे वावरणारे प्राणी पिंजऱ्यातली प्राण्यांपेक्षा कितीतरी पट सुरेख असतात. मग माकडांचे किस्से ऐकवण्यात आणि त्यांचे निरीक्षण करण्यात आमचे कित्येक तास आनंदात गेले.😊👍
✒️ यशश्री रहाळकर
यशु..तुझा किस्सा अगदी जसाच्या तसा डोळ्यसमोर आला... बेदम हसले मी...
उत्तर द्याहटवा