जगाच्या पाठीवर काय काय घडते... हे जेव्हा आपल्या पर्यंत पोहोचते तेव्हा आपण थक्क होतो. 21 वे शतक आणि स्त्री स्वातंत्र्याचा कितीही टाहो फोडला तरी अजूनही 16 व्या शतकात वावरणारी माणसे पाहिली की फार काही बदलले नाही असे वाटून जाते.
"बाई पोरांना जन्म देते म्हणून तिला पोटाला अन्न तरी मिळते... तेही बाप्ये करू लागले तर उपाशी मरावे लागेल"
हे अखिल सृष्टीचे मूलज्ञान मला जिच्यामुळे प्राप्त झाले ती "मनिषा".... माझ्या घरची कामवाली. खरेतर आमच्या सोसायटीच्या वॉचमनची बायको... अर्थातच अभारतीय .... सध्या सीमाप्रश्नावरून जे पिटुकले हिंदू राष्ट्र थयथयाट करते आहे... त्याच देशाची. त्यांचे शेकडो नागरीक टोकाच्या गरीबीने त्रासून अन्नाच्या शोधात आपल्याच देशात पडीक असतात...ही त्यांच्यापैकीच एक. नाव घेऊन आपले तोंड का खराब करा?... पण एक नक्की हे लोक अन्नार्थी असले तरी भलतेच काटक असतात, कोणत्याही परिस्थितीत आनंदात जगतात, एकमेकांना धरून असतात..... तर फार कथा भरकटू न देता पुन्हा मुद्द्यावर येते. आमच्या सोसायटीत वॉचमनला राहण्यासाठी एक खोली आहे त्यातच हिने संसार थाटलेला.. नवरा वॉचमनचे काम करतो, गाड्या धुतो, कचरा घंटागाडीत टाकतो ... आणि अशी अनेक कामे करतो. कामाला येतेस का म्हणून तिला विचारले आणि सहज तयार झाली... अतिशय स्वच्छ निर्मळ काम होते तिचे... आपल्या कामवाल्यांसारखी वायफळ बडबड नाही... इकडचे तिकडे नाही... चार घरी जायची ती... स्वतःचे घर सांभाळून. पैसे किती घेशील म्हटलं तर ..
"द्या बराबर दीदी.."
म्हणत खळखळून हसायची.... तिला फारच मोजके मराठी शब्द माहीत झाले होते बाकी भाषा अगम्य होती. तिकडच्या मुशीत घडलेली नितळ गोरी आणि गोड हसणारी ... मनिषा..फार तर 26/27 वर्षांची पण मजबूत अंगकाठीची होती.आपण बोललेले काही कळो न कळो मनिषा खळखळून हसायची. बोलाऊ त्या वेळी कामाला यायची, पडेल तेव्हढी भांडी घासायची, तक्रार हा शब्द तिला माहितीच नव्हता. खाण्यापिण्यावर तिचं चित्त नसायचं... चहा विचारला तरी नकार द्यायची... बरं !आपले कपडेही त्यांच्या कामास येत नसत..त्यांचा पेहराव वेगळाच होता... शिवाय त्यांचे हातमागावर विणलेले कापड आपल्यापेक्षा मजबूत, पोतालाही उत्तम असायचे... एका गोष्टीत तिचा जीव होता तो म्हणजे टी. व्ही. त्यावर तिच्या भाषेतील चॅनल लाऊन दिलं की ती टेकून डोलत बघत बसे... पुरुष मंडळी घरात आली की लगेच कावरी बावरी होत भर्रकन निघून जाई.
तिचे नी माझे मस्त सूत जुळले... तिचे बोलणे मला आणि माझे मोडके तोडके बोलणे तिला .. आणि जोडीला खाणाखुणा आम्हाला समजू लागल्या आणि संवाद सुरू झाला... ती स्वतःविषयी फारच थोडे बोलायची. तिच्या चॅनल वर तिकडचे मंदिर दिसले की वाकून भराभरा नमस्कार करायची.तिकडचे डोंगर, टेकड्या अनिमिष नेत्रांनी पाहत रहायची आणि मग काहीबाही सांगायची त्याबद्दल... एक मात्र नक्की ,वयाच्या मानाने ती भलतीच समंजस होती.... कधी कधी भन्नाट तत्वज्ञान देऊन जायची..
"पोटाला आग है म्हणून जग सुरू है... भूक लगते ना.. मग काम करो."
म्हणत कामाला जुंपून घ्यायची...तिला दिवस गेले तरी तिचा कामाचा झपाटा तेव्हढाच होता. एक दिवस सकाळी कचरा न्यायला म्हणून तिचा नवरा आला आणि म्हणाला...
"आज मनीषा नहीं आयेगा.. बच्चा हुआ कल रात में"
म्हणजे मनिषाची डिलिव्हरी काल रात्री झाली म्हणायची... आता महिनाभर तरी यायची नाही ती... मी ओळखी पाळखीच्यांना फोन लावले आणि त्यांची कामवाली पाठवून द्यायला सांगितले. बरोब्बर तीनच दिवसांनी नवीन कामवाली येण्याच्या आधीच मनिषा दारात उभी होती. तीन दिवसांत ही कामाला तय्यार... बापरे! मी म्हटलं ..
"ए बाई , ओली बाळंतीण तू .. पाण्यात हात नको घालू.. स्वतःचा नाहीतर त्या बाळाचा विचार कर."
काहीही न बोलता नुसतीच हसत मनिषा भांडी घासायला लागली... तिचं हसणं असं होतं जणू... "काहीच कसं कळत नाही ह्या बाईला.." तिला आपलं सवयीने विचारलं..
"बाळ कसं आहे? मुलगा की मुलगी..त्रास झाला का काही" ... वगैरे वगैरे. नवरा बायको दोघेच राहतात म्हणजे पहिलंच मूल असावं असा माझा अंदाज...
ती पुन्हा खळखळून हसत सुटली..मग जरा शांत होत म्हणाली..
"पोरगा आहे पोरगा..नशीब आपलं... लक्ष्मी न्हाई म्हणून आदमी नाराज झाला... "
मी अचंब्यात.. मुलगा झाल्यावर दुःखी होणारी पहिलीच बाई मी माझ्या आयुष्यात पहिली होती. मनिषा झपझप कामं करू लागली... बाळाकडे जायची ओढ असावी..
मी पुन्हा कळवळून म्हणाले...
"अग बाई पैसे देणार होते मी पूर्ण .. कामाला कशाला आलीस... त्रास होईल ना."
ती मानेनेच नकार देत म्हणाली...
"तरास काय असतो दीदी? चौथा पोरगा आहे माझा... "
चार बोटं नाचवत ती म्हणाली... माझे डोळेच बाहेर यायचे बाकी होते... अजून 3 पोरं आहेत हिला... देवा रे! पोरं कुठे असतात म्हणून मी खुणेनेच विचारले..तिनेही मोघम खूण करत तिकडेच म्हणजे तिच्या गावाला असल्याचे सांगितले. मी मनातल्या मनात हातचं जोडले काय काय करावं लागतं पोटासाठी पोरं तिकडेच सोडून आली ही इथे....
काही दिवसांनी एक गॉसिप क्वीन शेजारीण खास मला सांगत आली...
"तुमच्या कामवालीचा नवरा परत गेला म्हणे... कळलं का तुम्हाला?"
मी अगदीच बाळबोधपणे सांगितलं..
"छे हो! आज तर कचरा नेलाय आणि गाडीही धुतलीये..."
शेजारीण म्हणाली...
"बरोबर आहे मग त्याचा भाऊ आला असेल..."
असेल का न ! आपल्याला कामाशी कारण , कुणी का करेनात. .. मला ह्या बायकांचं हेच कळत नाही ..केव्हढा रिकामा वेळ असतो ह्यांना... शेवटी मी अगदीच बावळट आहे असा कटाक्ष टाकत शेजारीण म्हणाली..
"हा आलाय हा पण तुमच्या मनिषाचा नवराच आहे."
ती गेल्यावरही बराच वेळ लागला मला हे वाक्य समजायला... म्हणजे मनिषाचे दोन नवरे आहेत तर एक इकडे आणि एक तिकडे... असेना का? बाईच्या व्यथा बाईच जाणे... पण ह्या कारणावरून तिला उरलेल्या 4 घरी कामावरून काढून टाकलं... हा शुद्ध सुशिक्षित मूर्खपणा होता... इथे मोठमोठ्या पदावरचे उच्चभ्रू स्त्री-पुरुष विवाहबाह्य संबंध राजरोस मिरवतात, लिव्ह इन मध्ये राहतात, दोन चार वाट्टेल तितकी अफेयर्स करतात मात्र ते सगळे प्रतिष्ठेचे पाईक असतात... इथे एक पोटार्थी प्रामाणिक बाई दोन नवरे आहेत म्हणून कामावरून काढली जाते... मला जे पटत नाही ते मी स्वीकारत नाही... मी मनिषाला कधीच कामावरून काढून टाकलं नाही... आडून आडून अनेक so called हितचिंतकांनी बरंच सुनावलं... पण मी ठाम होते... मनिषा तिचं काम अत्यंत उत्तम प्रामाणिकपणे करत होती... शिवाय ती काही गैरकृत्य करत नव्हती तर तिचे रीतसर दोन नवरे होते.
एक दिवस टी व्ही च्या कुठल्याश्या चॅनलवर "घरवाली बाहरवाली" नावाचा सिनेमा सुरू होता... मनीषा टेकली आणि नकळत रमली त्या सिनेमात... त्यातली एक नायिका तिकडची होती... पाठवणीचा प्रसंग पाहून मनीषा हमसून रडू लागली... हे असं पहिल्यांदा घडलं होतं. थोडं पाणी पिऊन शांत झाल्यावर ती सहज सांगावं तशी सांगू लागली...
"दीदी .. आमच्याकडे पोरगी झाली की मोठ्ठा त्योहार करतात. पोरगी पैसा, जमीन, सोनं देते बापाला... माज्या बापाला धा तोळा सोना आणि जमीन मिळाली माझं ते लगन लावल्यावर.."
आज कित्येक दिवसांनी ती बरंच काही सांगत होती..
"पोरगी नाही मिळत आमच्याकडे लगन लावायला मग सगळे भाऊ मिळून एकच करतात... प्रत्येकाला वेगळं सोन जमीन कुटून देणार..."
ती बरंच काही बोलत होती आणि मी शांतपणे ऐकत होती... त्यांच्या भागात मुली ...मुलांच्या मानाने फारच थोड्या आहेत... त्यात मुलीच्या बापाला भरपूर सोने जमीन देऊनच लग्न होते मग बहूपतीत्व प्रथा रूढ झाली.. तिच्या आईला सुद्धा चार नवरे आहेत, आजीला दोन होते. मनिषाचे लग्न 3 भावांशी एकत्रच झाले... (म्हणजे मनिषाला 2 नव्हे तर 3 नवरे आहेत मी मनात गणित जुळवलं.) तिच्या नात्यात कोणत्याच बहिणीला एक नवरा नव्हताच... आपल्याला विचित्र वाटत आले तरी तो त्यांच्या समाज-जीवनाचा सहज स्वीकार्य भाग होता. तिला आत्तापर्यंत 4 मुले होती... मुले खाती पिती झाली की त्यांच्या गावी वडिलांबरोबर राहत... इकडे एकच भाऊ हीचा नवरा असायचा पैसे कमवून तिकडे पाठवायचे.. एक गेला की दुसरा यायचा... एकच भावना माहीत होती भूक... पोटाची आणि कधी शरीराची.
मी अगदी सहजतेने पटकन बोलून गेले..
"3 नवरे कसे सांभाळतेस बाई ग..."
पुन्हा एकदा खळखळून हास्य रेंगाळलं... तिच्या मते बाकीच्यांपेक्षा तिची अवस्था खूपच छान होती... तिच्या सोबत एकच नवरा एका वेळी असायचा... तिला भरपूर मुले होती... अजूनही होणार होती आणि तिची मुले देवाच्या कृपेने तब्येतीने छान होती. तिच्या एका दिदीला तर सहा नवरे होते आणि ती सहा भावांसोबत एकाच घरात राहत होती... त्यापेक्षा हे चाललंय ते चांगलंच म्हणायचं. डोळ्यांत पाणी आणत ती कळवळून म्हणाली...
"याद आती ना ... माझ्या पोरग्यांची.. तिकडची(म्हणजे तिच्या गावाची) माझ्या लोकांची..... पन हे दिलं है ना (पोटाकडे हात करत) मग काम करो."
भूक आदिम भावना... त्यापुढे सारेच किती निरर्थक आहे. कुठल्या पातळीवर उतरून संघर्ष करावा लागतो लोकांना... तरीही आयुष्याचा आनंदाने स्वीकार करतात. आपण मात्र थोड्याश्या गोष्टींसाठी सतत नाराज असतो... प्रेमभंग, डीमोशन होणे, नापास होणे अश्या फुटकळ कारणांसाठी जीव देणाऱ्यांना हे जग दाखवले पाहिजे.
मनिषाला त्या "घरवाली बाहरवाली" सिनेमातले लग्नाचे दृष्य पाहून आपल्या वडिलांची आणि बाकी वडील लोकांची (काका) खूप आठवण येऊन तिला रडू आल्याचं ती म्हणाली... मी त्राग्यानेच विचारलं....
"राग नाही येत का ग तुला अश्या माणसांचा? एका अर्थी पैसे , सोन, जमिनीच्या बदल्यात विकलंय त्यांनी तुला..."
स्वतःच्या तोंडात फडाफडा मारून घेत... आपले वडील लोक किती देवमाणूस आहेत हे ती सांगू लागली...
"ना दीदी... बाबूजी भगवान का रूप है..."
मला तिच्या ह्या उत्तरावर कीव वाटली आणि हसू देखिल आलं... तिने पुढे जे उत्तर दिलं ते ऐकून मी गार झाले...
तिच्या मते , तिला एखाद्या कोठ्यावर विकणे सहज शक्य होते सोने जास्त मिळाले असते... पण तिच्या वडिलांनी तसे केले नाही तिचे नीट लग्न लाऊन दिले त्यामुळे तिला आज मानाने जगता येतं , ती कुणाची तरी पत्नी आहे , आई आहे... हे सगळे वडिलांमुळे... मी निःशब्द झाले.
पुढे 2 वर्षांनी मनिषाच्या नवऱ्याला चांगल्या पगाराचे मोठे काम मिळाले... हॉटेलच्याच आऊट हौस मध्ये राहण्याची सोय झाली... निरोप घ्यायला म्हणून आलेल्या मनिषाच्या हातावर मी एक छानसा ड्रेस मटेरीयल टेकवला...माझे हात हातात घेऊन ती मूकपणे अश्रू ढाळू लागली... पुन्हा मनिषा कधी भेटली नाही... कदाचित आयुष्यात पुन्हा भेटणारही नाही. मनिषामुळे मला आयुष्याचे कितीतरी वेगळे पैलू जाणवले... आणि तीव्रतेने जाणवली पांचालीची... द्रौपदीची व्यथा... एक बाई म्हणून. आजही जेव्हा या न त्या कारणाने द्रौपदीचा हिणकस उल्लेख होतो, सोशल मीडियावर यथेच्छ शिव्या घालताना द्रौपदीचे नाव घेतले जाते... तेव्हा मनात येतं... सोपं नाहीये हे असं आयुष्य जगणं... तिला ते मान्य होतं की नव्हतं हे कुणीही विचारलं नाही... पण वाट्याला आलेल्या आयुष्याचा धीरोदात्तपणे स्वीकार करणं अवघड आहे...स्त्री देहाचा नरक माहीत झाला की द्रौपदी आपसूक कळत जाते.
✒️यशश्री रहाळकर
निशब्द
उत्तर द्याहटवावाह... अप्रतिम लिखाण उत्तम मांडणी
उत्तर द्याहटवाआणि मनीषा च्या गोष्टी साठी तर निःशब्द आहे.
यशश्री मॅडम फारच सुंदर! हे असं आजही होतं ह्यावर विश्वासच बसत नाहीये.
उत्तर द्याहटवा