फॉलोअर

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

एकुलतीचं डबोलं

"तिला काय जातंय सगळं करायला...सगळं डबोलं तर तिचंच आहे नंतर.."

नेहमीची तिखट जळजळीत प्रतिक्रिया आली... आताश्या वाईट वाटेनासं झालं होतं. बाबा गेल्यानंतर भेटीला आलेल्या कुणालातरी आई ,"माझ्या लेकीने किती नीट सगळं केलं" असं अभिमानाने सांगत होती... त्या सगळ्या कौतुकावर ह्या "डबोल्याने" बोळा फिरवला. एकुलत्या एक अपत्यांसाठी हा जन्मभराचा शापच आहे... आम्ही काळीज जरी काढून दिलं तरी ते त्या "डबोल्यासाठी" असतं ,असा सोयीस्कर समज लोक करून घेत असतात आणि त्यातही ते अगदी निलाजरेपणाने हे बोलूनही दाखवतात. एकुलता एक मुलगा असेल तर त्याच्या बाबतीत जरा सहानुभूती असते ... "बिचारा एकटाच करतो /एकटा किती धावपळ करतो/ एकटा सगळं सांभाळतो "..वगैरे वगैरे... पण तो मुलगा असल्यानं ते सो कॉल्ड "डबोलं" त्याच्याच हक्काचं असतं ना!... इथे गोची असते एकुलत्या एक लेकीची. तिच्या लग्नानंतर सासर माहेर सगळे व्याप सांभाळून जर ती आईवडिलांच प्रेमाने करतेय तर ते केवळ ह्या डबोल्यासाठी...😢

बँकेच्या/पोस्टाच्या गर्दीत आपण उभे राहून वयस्कर आईला बसायला खुर्ची दिली तरी साधारण प्रश्नांची तोफ अशी असते...
 
 "तुम्ही कोण?"
 
"रहाळकर.. मुलगी त्यांची"

"मग केतकर कोण?"

"आई माझी... तिथे बसली आहे"

"बोलवा त्यांना..." ... जोरात ओरडत... "हल्ली म्हाताऱ्यांना पोरं चुना लावतात नी मग भांडतात आमच्याशी "

रांगेत उभे असणारे ओळखीचे कुणीतरी फिस्स हसत म्हणते...

"अहो त्यांच्या बाबतीत काही घोर नाही... तेव्हढी एकच आहे त्यांना.. सगळं डबोल मिळाल्यावर चुना कशाला लावेल कुणी?"

त्यांच्या ह्या विनोदावर चार टाळकी टाळ्या देत हसली.

आताश्या मला एकुलत्या एक लेकीचे अवतारकार्य केवळ डबोलं मिळवणे हेच आहे असे वाटू लागले आहे. कुणाला चार भावंड आहेत कुणाला दोन... काय रोल आहे ह्या सगळ्यांत तुमचा? शून्य... असलीच तर तुमच्या आईवडिलांची आणि परमेश्वराची कृपा माना. 😂😝 आम्ही काही एकुलते एक म्हणून जन्म घेणारे स्पेशल कॅटेगरी आत्मे नसतो. कधी आर्थिक, कधी शारीरिक समस्या किंवा कधी तसा सुस्पष्ट साधक बाधक निर्णय  आमच्या तिर्थरूपांनी घेतल्याने आम्हाला भावंडे नसतात. त्यामुळे लगेच डोक्यावर शिंगे येत नाहीत आमच्या किंवा मागे शेपूट देखिल नसते.. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जो तो उद्धार करतो.. प्रचंड नकारात्मकतेने. माझ्या लहानपणी घरटी साधारण दोन/तीन भावंडे असायची... मग सगळ्या सवंगड्यांच्या आया आपापल्या मुलांना दम द्यायच्या... 

"तिचे काही सांगू नका.. ती एकुलती एक आहे. तिच्यासारखे सगळ्यांचे करायचे तर विकावे लागेल घरदार.."

एकुलती एक असणे म्हणजे काय हे नेमके कळायच्या आधीपासून हा असा उद्धार कानावर पडत गेला. पुढे समवयस्क मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्यातील इर्षा सुद्धा पदोपदी अनुभवली... अगदी कुजकट स्वरात..
"तुझं काय बाईsss" ची आळवणी असो किंवा आजीने मला बांगड्या न घेता आत्याच्या मुलीला घेतल्या म्हणून पसरलेले भोकाड असो... सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी उत्तर एकच... "तू एकुलती एक आहेस ना मग आधीच कौतुक होत असणार तेव्हढं खूप आहे... मग बाकीच्यांनी कशाला करा??" पुढे लग्न जुळवताना काही दिडशहाण्या मुलाच्या बापांनी ..भाऊ नाही म्हणून स्पष्ट नकार दिला... थोडक्यात हिच्या आईवडिलांचं सगळं आमच्याच मुलाला करायचे आहे तर... ही भूमिका. अश्या १८व्या शतकात जगणाऱ्या जुनाट बुरसटलेल्या शतमूर्खांशी पाला पडलाच नाही , हे बाकी भाग्य म्हणायचे. सगळ्या समाजाची गफलत अशी होते की मुलाच्या आईवडिलांची जबाबदारी सुनेचीच पण सुनेच्या आईवडिलांची जबाबदारी मात्र आमच्या मुलाची असूच नये. किती छान सोयीचा भाग आहे ना! इस्टेटीत मात्र मुलीचा असणारा समान वाटा तिच्या सासरच्या सगळ्यांना हवाच असतो... तसा कायदा आहे ना! 😂 पण जबाबदारी/ कर्तव्यात मात्र वाटा नकोच.

आज मी तुमच्यासमोर "एकुलतीचं डबोलं" उघडून बसणार आहे... तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत अश्या भन्नाट गोष्टी ह्यात आहेत. लहानपणी तुमच्या आजूबाजूची भावंडे जेव्हा मारामाऱ्या करत असतात, खेळत , मजामस्ती करत असतात तेव्हा तुम्ही मुकाट्याने "एकटेच" आपापली चित्रे रंगवत असता किंवा एखाद्या कोपऱ्यात पुस्तक वाचत असता. एकुलती एक मुले एकलकोंडी नसतात पण त्यांना some how एकटे राहून enjoy करणे जमवावे लागते. आईवडिलांचे 101% लक्ष एकवटलेले असल्याने तुम्हाला good girl असावेच लागते. प्रचंड मोठ्या अपेक्षांचे ओझे पाठीवर लादलेले असते आणि त्याच वेळी तुमचे आईवडील अतिकाळजी करतात. एकवेळ अशी येते की त्या काळजीचा प्रचंड मोठा ताण तुम्हाला वागवावा लागतो. होय! हे खात्रीने सांगतेय की एकुलत्या एक अपत्यांचे आईवडील त्यांच्या बाबतीत अधिक हळवे, अधिक protective असतात. चुकूनही चूक करण्याची मुभा नसते एकुलत्या एकीला... कारण जराशी चूक आईवडिलांसाठी मोठा धक्का असू शकते प्रसंगी ते कोसळू शकतात. 

परवाच एक मैत्रीण भेटली तिच्या भावाने परस्पर ठरवलेल्या लग्नामुळे ती नाखूष होती... आक्षेप असा की ती मुलगी एकुलती एक ,तिचा ओढा आईवडिलांकडे असणार ना! मग आम्हाला कोण विचारणार?? खरं सांगते..😢 वाईट वाटलं. ओढा असतो म्हणण्यापेक्षा टोकाची काळजी असते त्यांची. चार दिवस तापाने फणफणलेली आई आवाज बदलून तुमच्याशी बोलते... कारण लांब राहून तुम्हाला काळजी वाटू नये. तसेही सासरहून कोणती मुलगी मनात आले की माहेरी निघू शकते??... शंभर प्रकारच्या ऍडजेस्टमेंट कराव्या लागतात. ही काळजी , ही भीती काय असते हे त्या मुली समजूत शकत नाहीत ज्यांच्या आईवडीलांची काळजी घ्यायला भाऊ असतो. एकुलती एक मुलगी माहेरी गेली तरी थकलेल्या आईला म्हणते, "बस ग तू जरा, मी करते स्वयंपाक"... कारण त्या माऊलीला स्वयंपाकघरातून रिटायरमेंट नसतेच ना! ह्या गडबडीत आम्ही मोठ्या खूप मोठ्या होत जातो मनानी...

त्यातही सुदैवाने लग्न होऊन तुम्ही एका गावात असाल किंवा पुढे आईवडील तुमच्या गावात स्थायिक झाले तरी नवी आव्हाने तुमची वाट पाहत असतात. आई किंवा वडिलांपैकी कुणी गंभीर आजारी पडलं तर आमचे दोन हात दहा हातांच काम करतात... आजारी पालकाला, ऍडमिट करणे, त्यासाठी पैश्याची जमवाजमव करणे, ऍडमिशन प्रोसेस त्यासाठीची कागदपत्रे, बाहेर बसलेल्या दुसऱ्या पालकाला धीर देणे, स्वतःच्या घरातील लहान मुले, वयस्कर माणसे ह्यांची सोय लावणे, वेळ पडल्यास दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये राहणे , अर्धा तासात धावत पळत जाऊन डबे करणे ... ही आणि अशी कित्येक कामे आम्ही अर्ध्या तासात करत असतो... अगदी एकखांबी तंबू सारख्या.... ह्या वेळी फोन करायला किंवा अगदी धावून येत खांद्यावर हात ठेवायला आमच्याकडे मोठी बहीण नसते. ... कधीतरी आम्हीही घाबरतो, थकतो पण "जा घरी! झोप थोडावेळ" म्हणणारे धाकटे भावंड नसते आमच्यापाशी. स्पेशालिस्ट डॉक्टर शोधणे, ऑपरेशन करणे हे असले निर्णय ICU बाहेर घेतांना, declaration form वर थरथरत्या हातानी सह्या करताना... डोळे कोरडे ठेऊन "सगळं ठीक होईल ग ! मी आहे ना!" असं आईला सांगताना तुमच्या शेजारी कुणीही नसतं. सुदैवाने तुमचा जोडीदार , घरची माणसं मोठ्या मनाची असतील तर सगळं समजून घेतात, सहकार्य करतात... पण त्यासाठी पूर्वजन्मीची फार मोठी पुण्याई लागते... मित्र परिवार, शेजारी, कुटुंब मदतीला नक्की असतात पण जबाबदारी असते ती तुमची एकटीची. आईवडिलांशीवाय दुसरे हक्काचे कुणी त्यांनाही नसते आणि एकुलत्या एक लेकीलाही नसते.... त्यामुळे बाजीप्रभूंसारखी आयुष्याची प्रत्येक खिंड तुम्हाला एकटीला लढावी लागते. तुमच्या स्वतःच्या समस्या तर स्वयंभू होत तुम्हालाच सोडवाव्या लागतात पण त्यांच्याही समस्या तुमच्याच असतात.

एक वेळ अशीही येते की थकलेले आईवडील त्यांची सगळी पुंजी विश्वासाने तुमच्या हवाली करतात... त्यातला एक पैसाही तुमचा नसतो... असतो तो प्रचंड प्रगाढ विश्वास! एखाद्या विश्वस्तांनी करावे तसे मग त्या सगळ्याचे नीट नियोजन करावे लागते. त्याची नीट योग्य तशी गुंतवणून , त्यासाठी चार जणांशी चर्चा, त्यांच्या भविष्यातील आजारपणांची सोय, खर्चाची तरतूद वगैरे सगळ्या बाबी मग तुम्हीच सांभाळायच्या असतात. आईवडिलांचे मग तुम्ही स्वतः आईवडील होता... त्यांच्या आरोग्याची काळजी, डॉक्टरकडे नेणे, मेडिक्लेम, औषधे, त्यांच्या वेदना , त्यांचे प्रश्न सगळं सगळं तुमचं असतं. एक क्षण असाही येतो की तुमच्या स्वतःच्या कुटुंबावर ह्याचा परीणाम होऊ शकतो... तो क्षण फार अवघड असतो... इकडे तुमचा भूतकाळ आणि तिकडे तुमचा भविष्यकाळ दोन्हींची एकत्र गाठ मारत जमेल तसे वर्तमानात हात पाय मारत जावं लागतं. इतकं सगळं करूनही सगळ्यांचा सूर कडवट असतो... कारण आम्हाला ते so called "डबोलं" मिळालेलं असतं ना!😂  ते डबोलं उपभोगायला आम्ही कितपत शाबूत राहतो हे मात्र कुणालाच दिसत नाही.

गेल्या आठवड्यात मी माझ्याच वाटेवर खूप पुढे चालणाऱ्या , कैवल्याचे अंतिम शिखर गाठलेल्या, विरक्त सखीला भेटले. ही पठ्ठी सासर माहेर दोन्हीकडे एकुलती एक म्हणजे डबल डबोलं वाली 😝... गेली 22 वर्षे ती अखंड बेड रिडन पेशन्टची सेवा करतेय... हं हं! स्वतःचेच... आधी सासू मग बाबा, मग आई मग सासरे... शेवटी सगळे तारुण्याचे ,उमेदीचे दिवस अक्षरशः घरात काढल्यावर आता सगळेच गेलेत कोण माझे ? म्हणत आलेल्या भयाण पोकळीत जगते आहे. एक काळ असा होता की ही आणि नवरा जोडीने सिनेमालाही जाऊ शकले नाहीत... आता थकलेल्या गात्रांमध्ये ताकद आणि शिणलेल्या मनात उत्साहच उरला नाहीये जगण्याचा... 😢

हो !असतं ना सगळं आमचंच असतं ! दुःख, वेदना, आजारपणे, ताण... सगळं आमचं असतं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेणाऱ्या एकुलत्या एक लेकी लोखंडाचं बुलंद मन सुद्धा सोबत कवच करूनच आणतात... हा सगळा लेखनप्रपंच करण्याचा उद्देश हाच आहे की येत्या काळात बहुसंख्य मुले/मुली एकुलती एक असणार आहेत. अगदी तुमची मुलगी असेल किंवा तुमच्या घरात येणारी सून असेल कदाचित एकुलती एक... तिला समजून घ्या. तिला तुम्ही जे डबोलं देणार आहात त्याचे कमीत कमी ओझे कसे काय करता येईल ह्याची ज्याची त्याने सोय लावा. वृद्धाश्रम/केअर सेंटर/नर्सिंग होम ह्याच्या शेकड्याने सोयी असताना जीव टाकून जर एखादी आपल्या आईवडिलांचे सगळे बाणेदारपणे निभावत असेल तर समाजाचा एक प्रगत हिस्सा म्हणून तिचा आदर करा... बाकी तिचं डबोलं उचलण्याची आणि सांभाळण्याची ताकद तिच्या मनगटात असतेच... "एकुलती एक लाडाची लेक" असते की नाही माहीत ...पण "एकुलती एक लाखात एक"  नक्कीच असते.👍😊
✒️ यशश्री रहाळकर







५ टिप्पण्या:

  1. सर्वांगाला विचार करून लिहीलेला हा लेख अप्रतिम आहे.पूर्ण न्याय दिला आहे.भाषा ही खूप बोलकी!!

    उत्तर द्याहटवा
  2. खरचं खुप छान मांडलयं. एकुलता एकपणाची दुसरी बाजू खुप छान मांडली आहे

    उत्तर द्याहटवा
  3. छान मांडणी आहे .
    हल्ली एकुलती/ एकुलता चा जमाना रुढ होत आहे . व पुढील काळात अधोरेखित असेल . त्यात एकुलती असेल तिला जिवनात सर्व परिस्थितीला कसे सामोरे जावे लागेल/ लागणार याचे यतार्थ वर्णन केले आहे .

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!