'A' for Appreciation 🤗
(अर्थात प्रशंसेचा प्रयत्न)
नुकत्याच एका मैत्रीणीच्या आजारी सासूला भेटून आले. दोघींचीही तक्रार एकच..." एव्हढ केल मी हिच पण दोन शब्दांच कौतुक नाही. " वास्तविक त्या मैत्रीणीने सासूच्या भरवशावर उत्तम नोकरी करत आपली मुले वाढवली... सासूला देखिल ठावूक आहेच की आपल्या लेकी जेव्हढ्या मायेन करत नाहीत सून करते... अगदी प्रेमानं ... ...गरज आहे ते आवर्जून बोलून दाखवायची.
नेहमी एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की आपण स्त्रिया सर्वाधिक कद्रू कश्यात असतो तर प्रशंसेत...
कोणत्याही वयाच्या , कितीही शिकलेल्या ,नोकरी करणाऱ्या , व्यावसायिक वा गृहिणी असो....
दुसऱ्या स्त्रीची तारीफ चटकन मनापासून करताच येत नाही.अत्यंत कोत्या मनानें, क्षुद्र मनोभूमिकेने आपण सतत एकमेकींना स्पर्धक समजत राहतो... जणू तिची रेषा मोठी झाली की माझी लहान होणार आहे. हे वाढता वाढता एव्हढे वाढते की आपल्याला काही सुंदर आगळे दिसणेच बंद होते.
छान तयार होऊन भिशी ला स्वागत करणाऱ्या मैत्रीणी कडच्या फर्निचरची धूळ आपल्याला दिसते तर घर लक्ख आवरणाऱ्या सखीचा गबाळा अवतार आपल्या डोळ्यात सलतो. डाएट जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या मैत्रीणीला आपण नटवी म्हणतो तर सकाळ पासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला आपण काकूबाई म्हणतो. खरतर समस्या बरेचदा हीच असते की आपण काही म्हणतच नाही.
एकीच्या मुलाला दहावीला 93% मिळाले... इतरांची प्रतिक्रिया " मिळणार नाही तर काय? हीने दुसर केलच काय वर्षभर ... मुलाची दहावी म्ह्णून भिशी सुध्दा बंद केलीनं ." दुसरीच्या मुलीला 65% मिळाले प्रतिक्रिया " जरा लक्ष नाही दिल हिने सदा घराबाहेर.." गम्मत आहे ना अहो सोप आहे दोघिन कडेही जा मनापासून अभिनंदन करा ... आईचे कौतुक करा काय लागत हो यालां ... ह्म्म मन मात्र जरास मोठ लागत. .. ...माझ्या या मतावर तडकून एक जेष्ठ मैत्रीण म्हणाली.. " मला नाही बाई येत अस लगेच चांगल म्हणता... जेव्हा फारच उत्तम performance असेल तेव्हाच मी छान म्हणते."
का ग तू ऑस्करची ज्युरी आहेस ? 😆
क्षणभंगुर आयुष्य साध सोप असाव .. कश्याला हव्यात या पट्ट्या आणि मोजमापं.
स्त्री स्त्रिची शत्रू असते की नाही माहित नाही . पण ही तारीफ न करण्याची वृत्ती मात्र स्त्री ची फार मोठी शत्रू आहे. एखादीच्या उत्साहाला चैतन्याला एव्हढेच काय पहाडासारख्या कर्तुत्वाला ही नामोहरम करते. 👊
प्रशंसा म्हणजे लांगुलचालन चमचेगिरी निश्चित नाही ... ती उत्स्फूर्तपणे हृदयातून व्यक्त होते .. काही स्त्रियांना दिसेल त्या मैत्रीणीला " काय बारीक झालिस ग ! " असे म्हणायची सवय असते. ... ही प्रशंसा नव्हे...😆 एखादीच्या कर्तृत्वाची .. गुणांची संघर्षाची दखल घ्यायला काय हरकत आहे? दूध पाण्यातूनही वेगळ करतो तो राजहंस ... आणि सडलेल कुजलेल खातो तो गिधाड. स्वतःला विचारा एकदा काय व्हायला आवडेल?
आयुष्याच्या एकाच पटावर राहत असलो तरी आपण प्रतिस्पर्धी खचितच नाही . लक्षात घ्या... एखादिचे घर मस्त सुरेख नटवले म्हटले की आपले कचराडेपो होत नाही. "छान वळण लावलेस ग मुलांना" असे दुसरीला म्हटले की आपली मुले काही उनाड होत नाहीत. एखादी झक्कास स्वयंपाक करते म्हणून मी काहि कांदू होत नाही किंवा एखादी smart म्हणून मी गबाळी असे होणे नाही.
प्रशंसेचे दोन शब्द मोठा चमत्कार करतात... आंतरीक प्रेरणा , जगण्याची नवी उमेद चैतन्य देउन जातात. प्रशंसेच्या दोन शब्दांची भूक दुसऱ्या कश्याने भागत नाही. बघा एकदा करून ही जादू... त्यापेक्षा कित्येक पट positive energy तुमच्या कडे rebound होऊन येईल.. शंकाच नाही.
आपण स्त्री आहोत ... परमेश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती... जी स्वतःमधील सारे ओज तेज सगुणात साकारते अपत्यजन्माने.वाणी वाटेही हाच सृजनाचा साक्षात्कार होऊ देत.
A = appreciation हळूहळू सवय होऊ द्यात... आयुष्य सुरेख होइल तुमच्या एकटीच नाही तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच.👍
©✒ यशश्री रहाळकर
नाशिक
( आवडल्यास कृपया नावासह संपुर्ण forward करा. धन्यवाद!)
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
मंगळवार, १५ जानेवारी, २०१९
' A' for Appreciation 🤗 (अर्थात प्रशंसेचा प्रयत्न)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
True appreciation Yashasree
उत्तर द्याहटवा