फॉलोअर

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

पिल्लाचा बाबा

         आज पुन्हा एक गोड कविता घेऊन आलीये ... कविता केलीये  " त्याच्यावर  " .  आपण नेहमीच म्हणतो अपत्य जन्माने स्त्री चं आयुष्यच बदलून जातं पण त्याचं काय ?? त्याचही बदलत की जबाबदारीच्या जाणिवेनं ; खांद्यावरच्या हळव्या ओझ्यान...तो तिचा जोडीदार... तो सखा, प्रियकर ,नवरा अशा अनेक रूपांत भेटतो ... पण तिला सर्वाधिक तो कोणत्या रूपात आवडतो तर तिच्या पिल्लाचा बाबा .....

पिल्लाचा बाबा

सुखावून जाणारं असतं त्याचं हळवं हळवं होणं
त्याच्यातल्या प्रियकराचं तिच्या पिल्लाचा बाबा होणं

बेफिकिरीत उडणारे खांदे आता जवाबदारीने स्थिरावतात
बाईकला किक मारून पिटाळणारे पाय आपसूक घराकडे वळतात

आवडलेत म्हणून चार शर्ट एकदम घेणारा आता पै पै चा हिशोब मांडू लागतो
आजच्या दिवसात जगून घ्या म्हणणारा आता भविष्याची चिंता वाहू लागतो

ऑफिसमधून येतांना कधी गुलाबाची कळी तर कधी मोगऱ्याचा गजरा आणणारा तो ..
आता अँपल नी केळी आणू लागतो ... अचानक भेळ आणि पाणीपुरीला अनहायजेनिक म्हणू लागतो

तोंडात रुळलेल्या शिव्या आता तो मनातच गिळून टाकतो
चिडत नाही गोड बोलतो सारे राग रुसवे विसरून जातो
हट्ट पुरवतो सारेच तिचे लाड कौतुकाचा वर्षाव करतो
सारे हे बाळासाठीच याचाच तिला विसर पडतो

बाळ झाले एकदा की त्याची तगमग संपते
त्या इवल्या बोबड्या बोळक्याशी त्याची मस्त गट्टी जमते

पिल्लाचा बाबा सर्वस्वी आता पिल्लाचा झाला असतो
मधल्या काळात तिच्या प्रियकाराचा मात्र नवरा झाला असतो

ती वेडी आसुसून प्रियकराची पाहते वाट
तो मात्र गाजवत राहतो नवरोजींचा थाटमाट

तरीही ती रोज नव्याने त्याच्या प्रेमात पडते
तिच्या पिल्लाची काळजी ,प्रेम, माया तिला त्याच्या डोळ्यात दिसते

पडू देत टक्कल किंवा सुटू देत पोट ... तिला तो प्रिन्स चार्मिंगच वाटतो
तिच्या पिल्लासह मजामस्तीत रमलेला ' तो ' अक्षरशः तिचं सर्वस्व व्यापतो

कोणत्याही 'ती ' ला विचारा तुला त्याचं कोणत रूप अधिक भावतं??
सखा ,प्रियकर ,नवरा यापेक्षाही तिचं मन तिच्या ' पिल्लाच्या बाबा 'त अधिक रमत

🔏©यशश्री रहाळकर
            नाशिक

५ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!