नात्यांची वीण
➿➿➿➿➿➿➿➿
संक्रांतीचा तिळगूळ करतांना सहज मनात आलं
" दोन तीळांना सांधता यायला हवं ....
दोन मनांना बांधता यायला हवं...
गोडच फक्त कशाला आंबट , तुरट , तिखट ... कडूही चालेल कधीतरी ....
आधी माणसाला माणसाशी बोलता तर यायला हवं "
दिवसेंदिवस माणसांमधील संवाद एव्हढा कमी होत चाललाय की ' माणूस हा समाजशील प्राणी होय ' हे शाळेय पुस्तकांत शिकलेले वाक्य खोटं वाटावं....
एकांड्या शिलेदारा सारखी व्हर्चुअल जगातील माणसे भेटली की मला त्यांची अक्षरशः दया येते ... खळखळून हसतांना टाळी द्यायला कुणी नाही , कटकटीना वैतागल्यावर त्रागा करायला कुणी नाही, दुःखात रडायला खांदा नाही अन सुख साजरं करायला 'आपलं ' कुणी नाही .... यापेक्षा दयनीय माणूस असूच शकत नाही.
हॉटेल्स मध्ये डिनर ला आलेल्या कुटुंबातील व्यक्ती आपापल्या मोबाईल मध्ये डोकी घालून बसलेल्या असतात ... मॉल मधून फिरतांना ऑनलाइन हेडलाईन्स घेणारे बाबा ...मुलांसोबत पार्क मध्ये मैत्रिणीशी fb वर पँरेटिंग च्या टिप्स देणारी आई... एखाद्या सुंदर पिकनिक स्पॉट ला सेल्फी नी फोटोत रमलेले मित्र पाहिले की सांगावसं वाटतं ओरडून ... "अरे वेड्यांनो! हाडामासाचा जिवंत माणूस आहे तुमच्यापुढे ... मनसोक्त बोला ,गप्पा मारा , जुन्या नव्या आठवणीत रमा... यालाच जगणं असं म्हणतात." फोटोत तर दिसणारच आहोत आपण सगळेच काही वर्षांनी ....😢
घराबाहेरच काय पण घरातल्या घरातही माणसं मनमोकळं बोलनाशी झाली आहेत . घरातील प्रत्येक जण जणू स्वतंत्र बेटावरील रहिवाशी आहे. त्यातही आजकाल Space चं एव्हढं प्रचंड स्तोम माजवलंय की विचारू नका ... स्वतः च्या स्वतंत्र खोल्या असूनही यांना space का लागते कुणास ठाऊक?? माझ्या लहानपणी घरात मुळीच space नसायची ... पण मनांत प्रत्येकासाठी जागा होती...
परवा एका दूरच्या नात्यातल्या आजोबांना भेटायला गेले होते .. आजोबा साधारण 80 च्या आसपास .. माझा हात हातात घेऊन ढसाढसा रडू लागले ... मागच्या आठवड्यात त्यांच्या दुसऱ्या मुलाचा मुलगा (दहावीत आहे )येऊन गेला पण त्यांच्याकडे आला नाही भेटला नाही शब्द बोलला नाही .... तुम्हाला नक्कीच वाटलं असणार कशी ही आजची पिढी वगैरे ... पण खरं सांगू हे आजोबा रिटायर्ड झाल्यापासून घराबाहेर ... खूप जग हिंडले अनेक सामाजिक कामे केली मनसोक्त जगले ... यादरम्यान नातवंडांशी त्यांची जुजबी भेट पलीकडे काहीही नाही . आता ते वयपरत्वे थकलेत ... आता अचानक नातवंडांना प्रेम कसे वाटावे ?? केवळ आजोबा म्हणून?? जन्मजात नात्यांमध्ये माणूस निभावतो ती कर्तव्ये ... मात्र प्रेम माया मागून मिळत नाही . प्रेमाचं झाडं लावावं लागतं .. अनेकवर्षं सातत्याने त्याला खत पाणी घालावं लागतं... तेव्हाच ते रुजतं, बहरतं.
आजी आजोबांनाही हल्ली बरीच space लागते ... कागदोपत्री रिटायर्ड झाल्यावरही तसे ते तरुणच असतात ... भरपूर मजा ,हास्यक्लब, फिरणे, गाण्याचे क्लास वगैरे बरेच काही करायचे असते . नक्कीच केले पाहिजे मुलांची मुले ही त्यांची जवाबदारी नाही ... पण या नातवंडांना तुमच्या कडून श्लोक ,परिकथा ,राम कृष्णाच्या कथा ऐकण्याइतकी, तुमचं बोट धरून फिरायला जाण्या इतकी, फुगा किंवा बॉल साठी हट्ट करण्याइतकी, रात्री कुशीत झोपण्या इतकी ... space तुम्ही राखून ठेवताय का? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा.
पालक आपल्या मुलांकरिता काही वेगळा वेळ राखून ठेवतात काय? त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांची विचारपूस करणं त्यांना काही लहानमोठ्या समस्या असतील तर सामंजस्याने सोडवणं... यासाठी वेळ राखून ठेवला तर मुलांवर लक्ष द्यायला वेळ द्यावा लागत नाही . मुळात आपण मुलांच्या समस्यांच्या वेळी easy available असतो का? असायला हवे नाही का ?अन्यथा त्यांचे प्रश्न ते अन्य कोणत्याही मार्गाने सोडवू पाहतात ... मार्ग चुकूही शकतो कारण चूक की बरोबर हे सांगायलाच पालक नसतात . माया करणारी माणसे नसली की मुले मोबाईल विडिओ गेम अशा वस्तूकडे वळतात. मुलांना जन्मजात वस्तूंची आवड नसते ती आपण लावतो... खेळायला त्यांना हवा असतो सवंगडी तो आपण झालो की बास .
नवरा-बायकोच्या नात्यातला विश्वास, आदर व्हर्चुअल जगातील ओरखड्यांमुळे जखमी होता कामा नये.... आभासी प्रतिमा उंचावण्याच्या लोभाने प्रत्यक्ष नाती दुरावणार नाही ...एव्हढी खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. कधीतरी सगळी गॅझेट्स बाजूला सारून खऱ्या अर्थानं एकांत अनुभवता यायला हवा ना ! एकीकडे tv वर news चालू मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेला नवरा ... दुसरीकडे कानात हेडफोन घालून बायको स्वयंपाक करतेय ...अश्या प्रसंगी प्रेमभाव निर्माण करणं साक्षात मदानाला तरी शक्य आहे का ?? 😊 बरं छानसं बाहेर जेवायला गेलेले दोघचं .. तर आताच निवांत वेळ म्हणून ती fb किंवा whats app उघडून बसणारं आणि तो हा share पडला घे तो वाढला वीक करणारं ....
फुकट हॉटेलवाल्याची चंगळ... काय खातोय कुणालाही कळत नाही.
नाती माणसांसोबत जन्माला येत असतात पण तरीही ती विणावी लागतात ... दोन उलट एक सुलट करत स्वेटर विणलाय कधी?? ... नात्यांनाही असंच उबदार स्वेटर विणाव लागतं.... प्रेमाचं मायेचं. कुटुंबसंस्थेचा, त्यातील नात्यांचा जन्म नैसर्गिक नाही ... माणसाच्या प्रगतावस्थेत विविध गरजांतून नाती निर्माण झाली.... कदाचित काळाच्या ओघात ज्या गरजा असणार नाहीत ती नातीही असणार नाहीत.....
आज संक्रांतीच्या पर्वावर संकल्प करूया नात्यांची वीण घट्ट करण्याचा ...संवादाचा .. मनमोकळं बोलण्याचा .... गोड गोड शुभेच्छा देतेय ... आता आभासी जगातून प्रत्यक्ष जगात खऱ्या अर्थानं संक्रमण करूया !
धन्यवाद🙏
🔏© यशश्री रहाळकर
नाशिक
13/01/ 19
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
रविवार, १३ जानेवारी, २०१९
नात्यांची वीण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खूपच सुंदर मांडलं आहेस सगळं 👏👏👏
उत्तर द्याहटवासुरेख जमून आलय! खूप अर्थपूर्ण
उत्तर द्याहटवाखरोखर विचार करायला लावणारा लेख,नाती जपणं खूप आवश्यक आहे,ती वीण घट्ट करणं, तिचा एक संघ बंध कायची गरज आहे,हे होणं फार गरजेचे आहे, नाहीतर पुढे जाऊन असे नको व्हायला की बोलणं पूर्ण बंद ,हो की नाही,फक्त कोरडे msg नि chat एवढंच राहील काही दिवसांनी
उत्तर द्याहटवा