फॉलोअर

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

सेलमधील कैदी

📱 सेलमधील कैदी 🔲
🔗🔗🔗🔗🔗🔗🔗🔗
         मोबाईल नवीन आले तेव्हा त्याला ' मोबाईल ' असेच म्हणत आता मात्र सेल म्हणायची फॅशन आहे. सेल म्हटले की मला उगाचच तुरुंग आठवतो ... छोट्याश्या अंधार कोठडीत डांबले गेल्याचा फील येतो ... तळहातावर मावणाऱ्या या इवल्या जादूगाराने अशी काही जादू केलीये की आपण खरेच डांबले गेलोय या सेल नावाच्या अदृष्य कोठडीत ... आणि मोहिनी अशी की आपण तुरुंगात आहोत हे आपल्याला मुळी जाणवतच नाहीये... 😱
        मोबाईलचे दुष्परीणाम वगैरे विषयांवर मी मुळीच बोलत नाहीये ... कारण त्याची निकड आणि उपयोगिता दोन्ही मला जाणवले ,अनुभवास आले आहेत. आजच्या काळात मोबाईल असणे विशेषतः स्मार्टफोन असणे  खरंच गरज आहे  ...की फॅशन आहे ...की जीवनावश्यक बाब आहे ....की व्यसन ह्याचा मात्र विचार करायला हवाय .
       अनेक कौटुंबिक सोहळ्यात , गेट टूगेदर मध्ये आजकाल तीव्रतेनं हे मला जाणवतं ... आपण नक्की कशा करीता एकत्र येतो भेटायला , गप्पा मारायला की फोटो काढायला ?? एकमेकांना खूप दिवसांनी भेटल्यावरचा आनंद गळामिठी टाळ्या देऊन हसणं गेलय तरी कुठे ?🧐 बहुतांश वेळा स्वतःला फोटोच्या चौकटीत अडकवायच्या अट्टहासात आपण काय गमावतोय ते कळतच नाहीये मुळी...
         सगळे एकत्र जमल्यानंतर त्या सुखद क्षणांची आठवण म्हणून काही फोटो असणे यासारखे सुखाचे निधान नाही ... मात्र त्याचा अतिरेक नक्कीच टाळता आला पाहिजे . सध्या असे चित्र आहे की कुणाला भेटणं नकोसं वाटावं... इतके फोटो का कश्यासाठी? आभासी जगातल्या चार दोन ओळखीच्या आणि काही हजार अनोळखी लोकांचे likes मिळावेत म्हणून ??आजकाल चार लोक मुळी भेटतात तेच फोटो काढायला असेच वाटते.... मित्र मैत्रिणींचे ग्रुप, किटी पार्टी, समारंभ असो किंवा अगदी बाहेर dinner चा प्लान सगळेच्या सगळे सगळा वेळ फक्त फोटोज आणि सेल्फीत मग्न असतात. रिलॅक्स व्हायचे नाही ,कुटुंबाला quality time द्यायचा नाही तर  मग आपण बाहेर जेवायला का जातो ? 🤭
       लग्न समारंभात तर या वेडाचा उच्चांक गाठलेला असतो ...आधीच नवरा नवरी भवती दोन्ही कडाचे 2  फोटोग्राफर विडिओ शूटिंग करणारी 4 डोकी लाइट वगैरे 2 माणसे या गराड्यात आपण नेमक्या अक्षदा फक्त त्या दिशेनं फेकत असतो ... कुणाचं लग्न लावतोय ते दिसतच नाही. त्यातही सगळीकडे मोबाईल चा लखलखाट आणि क्लीक- क्लिकाट ... (नवीन शब्द वाह😉) अगदी पाठवणीला वडिलांच्या गळ्यात  पुन्हा फोटोसाठी पडणे,  मंगळसूत्र पुन्हा काढून घालणे , असले अगोचर चाळे केवळ त्या स्टेटस अन dp साठी 🤔
           निसर्गरम्य स्थळांना फोटोतून पाहणाऱ्याची कीव येते .. अरे आठवणी च्या नावाखाली किती फोटो.. आधी आठवणी तर गोळा करा . आकाशात उडणारे पक्षी, आकाशातले इंद्रधनुष्य, पाण्याचे थेंब हे प्रत्यक्ष बघण्यात जो आंनद आहे तो फोटोतून मिळेल कसा .. आणि हेच सगळं बघायचंय तर डोंगर दऱ्या पालथ्या घालण्यापेक्षा घरीच डिस्कवरी नाहीतर नॅशनल जिओग्राफी बघा ... (प्रोफेशनल फोटोग्राफर सोडून इतर) लोकांनी भाराभर काढलेले फोटो बरेचशे व्यर्थ डिलीट करण्याचे काम वाढते... दर कार्यक्रमानंतर मोबाइलला क्लीन करावाच लागतो ... निष्कारण व्याप कोण पाहत ते फोटो ?जे क्षण मोबाईल च्या कॅमेरात कोंडतोय आपण ते जगून तर घ्या ना !
           पूर्वीच्या स्त्रिया जसे मंगळसूत्र आमरण कवटाळून असायच्या तसे  हे स्मार्ट फोन हाताशी उश्या पायथ्याशी असतात ... अगदी तासभर किंवा अर्धा तास सेल बाजूला ठेवायला लागला बघायला मिळाला नाही की बेचैन होणारे लोक बहुसंख्य झाले आहेत .
       सेल आता सेल न राहता जेल झाला आहे . सकाळी योगासने, meditation क्लासला गेल्यावर भणाणणारे फोन किंवा मॉर्निंग वॉक ला मोठमोठ्याने फोनवर बोलणारे लोक पाहिले की संताप होतो . ऐन रंगलेल्या गप्पात उठून फोन घेणारे , नाटकात व्यत्यय आणणारे फोन, सिनेमा पाहत मोबाईल वर चॅट करणारे पाहिले की मी चाट पडते. इतकं अशक्य आहे तासभरासाठी बाजुला ठेवणं या फोनला ?
        माझ्या नणंद बाईंचे यजमान स्वतः ची मोठी कंपनी कामाचा व्याप सांभाळत पुण्यासारख्या ठिकाणी राहूनही साधा call करता येईल असाच फोन अजूनही वापरतात ...smart phone ची त्यांना आवश्यकच नाही असे त्यांचे मत. मुळात फोनचा उपयोग दोन व्यक्ती संपर्कात राहण्यासाठी .... जवळच्या व्यक्तीना दूर करत असेल तर अडथळाच नव्हे का तो  ?
      सेलला पुर्णतः नाकारणं कदाचित अडचणीचे आहे पण काही पथ्य निश्चित आपण पाळूच शकतो.... जसे
#  सार्वजनिक सामूहिक कार्यक्रमात मग तो गाण्याचा असो नाटक सिनेमा असो वा भाषण ..इतरही मनोरंजनाचे हक्कदार आहेत ... आपला फोनचा वापर दुसऱ्यांना त्रासदायक वाटेल असा नसावा. मुळात शक्य तेव्हढा तो बंद ठेवण शक्य व्हायला हवे.
# निसर्गात रमताना नैसर्गिक सौंदर्याचा संपूर्ण आस्वाद घ्या ... फोटो वाटेल तेव्हढे मिळतात गुगलच्या कृपेने.
# योग , meditation, morning walk ला स्वतः ला वेळ द्या .. मन आणि मेंदूला शांत करा.
# कुटुंबासोबत वेळ घालवताय तर फोन बंदच करा .. मुलांशी खेळतांना त्यांना वेळ द्या. इकडे मुलगा खेळतोय आणि तुम्ही फोनमध्ये डोकं घातलंय.. त्याचा तो खेळण्याचा आनंद पुन्हा पाहता येणार नाही. त्याचं बालपण पुन्हा येणारे का?
# मित्र मैत्रिणी जमणार असतील, कीटी पार्टी get togetherला पाहिले पंधरा मिनिटं किंवा फार तर अर्धा तास फोटोसेशन्स ना द्या नंतर ते फोन एका डब्यात जमा करून  घरी जातांनाच प्रत्येकाच्या ताब्यात द्या.
      आपण माणसांना भेटतोय चालत्या बोलत्या जिवंत माणसाला ... फोटोंच्या फ्रेममध्ये अडकून पडलेल्या , मोबाईल नामक कोठडीत गुदमरत घुसमटून गेलेल्या कैद्याला नव्हे. सेल चा सेलफोन एव्हढाच अर्थ असू देत तुरुंगाची कोठडी नकोच.
🔏यशश्री रहाळकर
      नाशिक

११ टिप्पण्या:

  1. मित्र मैत्रिणी जमणार असतील, कीटी पार्टी get togetherला पाहिले पंधरा मिनिटं किंवा फार तर अर्धा तास फोटोसेशन्स ना द्या नंतर ते फोन एका डब्यात जमा करून घरी जातांनाच प्रत्येकाच्या ताब्यात द्या.

    खूप महत्वाचे लिहिले ग यशश्री

    उत्तर द्याहटवा
  2. अजून एक add करायची इच्छा आहे किमान रात्री तरी मोबाईल उश्याजवळ ठेवू नका अन एक दिवस किंवा अगदीच अशक्य असल्यास 12तास तरी इंटरनेट बंद ठेवा

    उत्तर द्याहटवा
  3. Any technology brings pros & cons along with.....its totally upon d individual how 2 benefit from it without compromising our core values......agree with ur view : its very disturbing 2 c so many r succumbing to smart phones & human interaction + feelings r diminishing in ds fast paced world.....i sincerely hope that some of our like minded persons preserve our "old school method" of conversation & intermingling instead of d chats/emoji's that v r falling trap for......keep up good work dear & its always a pleasure to read ur blogs....looking frwd to many more....👍

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!