फॉलोअर

मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

भुक्कडगिरी

दिव्य मराठी मधुरीमा पुरवणीत प्रकाशित झालेला हा माझा लेख ...  अनेकांना आवडला.. ओळखीच्या आणि अनोळखी लोकांनीही email आणि अगदी call करूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या... आज रीतसर blog ला पोस्ट करतेय😊👍

🤑  भुक्कडगिरी            ##################
                 नाशिकला आल्यावर " भुक्कड "  या शब्दाची माझ्या शब्दकोशांत भर पडली. भुक्कड म्हणजे भुकेलेला नव्हे तर ज्याच पोट भरलय तरीही  दुसऱ्याच्या ताटातील पोळीवर ज्याची नजर आहे असा कद्रू मनाचा माणूस. या मागे प्रामुख्याने " मिळतयं तर का सोडा??? " ही वृत्ती असणारे असे भुक्कडगिरीतील बादशाह आपल्याला जागोजागी भेटतात...
          याबाबतीत अग्रक्रमाने राजकारणी लोकांवर आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर टीका होत असली तरी देखिल आपल्यातील बहुतांश लोकांमध्ये ही प्रवृत्ती रूजली ,फळली ,फुलली एव्हढेच काय सवयीचा भाग बनलीये. वानगीदाखल द्यायचे झाल्यास हॉटेलमधील जेवणानंतर बिलासह पुढे केलेली शोप किंवा मुखवास लोक टिशू पेपर मध्ये भरभरून घेतांना मी अनेकदा पाहिलय... मला सांगा हॉटेलचे हजार पंधराशे बिल भरू शकणाऱ्या व्यक्तीला 20/30 रुपयांचे मुखवास मारावेसे का वाटावे?? यावर आमच्या बिलात ठेवले म्हणजे संपूर्ण आमचेच अशी साळसूद धारणा करण्याचे कारण नाही ह्न! एक सांगा टूथ पिक , टिशू पेपर , फुलदाणीतील फुले ह्या काही मारायच्या ( ढापायच्या ) गोष्टी आहेत का राव???  गरजेनुसार वापराव्या पण सगळ्या कोंबून खिशात ... का सोडा?? 🤨
         भारतात railway च्या टॉयलेट मधील टमरेल चेन ने बांधलेले असते या विषयावर अनेक जोक्स येतात...... पण AC कोच मधील ब्लॅंकेट्स सुद्धा बॅगेत घालून नेणारे लोकही आहेतच की ...... AC चे तिकीट परवडणाऱ्याला काय एक ब्लॅंकेट विकत घेणे कठीण असावे का ? पण माझ ते माझ , तुझ तेही माझच आणि सरकारी ते माझ्या पिताश्रींच .... 😠 असे आपले धोरण.
           " नाव मोठ्ठे लक्षण खोट्टे " असा अनुभव विमान प्रवास सातत्याने करणाऱ्या काही व्यक्ती सिद्ध करतात... घरी आलेल्या प्रत्येक बालकांस ते विमान प्रवासात हवाहवाई केलेली अर्थातच मूठी भरभरून उचललेली चॉकलेट्स देतात. ही चॉकलेट कॅन्डी बरेचदा विमानात कॉंप्लिमेंटरी म्हणून दिलेली असतात.... आम्हाला थोड्या अधिक मिळू देत म्हणून ते डल्लाच मारतात. रिफ्रेशमेंट चे फूड , बिसलरी बॉटल्स   विमानातच भरपूर घेणे ... खाणेपिणे शक्य नसल्यास बॅगेत भरून घेणे  आणि वर केव्हढे पैसे घेतात ना उडवायचे  ?? असेही म्हणणे....  यावर एका काकूंना मी हसत हसत म्हणाले .. " हे लोक ढगात उडवायचे नाही तर पुन्हा सुखरूप जमिनीवर उतरवायचे एव्हढे पैसे घेतात . " 🤭
           सातत्याने वेगवेगळ्या टूर्स करणाऱ्या एका मैत्रीणीकडे वेगवेगळ्या हॉटेल्सचे लोगो असणारे टॉवेल नॅपकिन्स  असायचे... मी बावळट प्रश्न केला ... " कुठे ग मिळतात हे ? " तिने निलाजरेपणाने सांगितले " ज्या हॉटेल मध्ये राहते आणते तिथूनच.. सगळे थ्री स्टार हॉटेल्स ... काही कुणी चेक करत नाही आणि केलेच कधी तर sorry by mistake म्हणायचे... झालं " मी चाट ... " करतेस काय पण एव्हढ्या टॉवेल्स चे ??? " मी जवळजवळ किंचाळले . ती आश्चर्याने म्हणाली... " चांगले असतील तर वापरते नाहीतर पोछाला देते बाईला... केव्हढे पैसे भरतो आपण या हॉटेल्सचे . "  मी मनोमन हात जोडले.
             आमच्या विभागातील एक कॉर्पोरेटर  स्त्री मंडळ  चालवितात. आपल्या कडून महिलांना अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम त्या देतात ... पण या बौद्धिक मेजवानी पेक्षा बऱ्याच महिलांना अधिक रस असतो तो खाऊ खाण्यात ... या कार्यक्रमासाठी अगदी वडापाव असू देत किंवा भजी... चांगल्या घरच्या , अंगावर पाचसहा तोळे सोने अन भरजरी साड्या मिरवणाऱ्या , बंगल्यात राहणाऱ्या बायका तूटून पडतात ... ढकलाढकली करतात .... चहा ओढाओढीत एकमेकींवर सांडवितात. ज्यांची मुले फॉरेनला खोऱ्याने पैसा ओढतात खरतरं डॉलर ओढतात म्हणूया त्याही बरेचदा यात असतात . 4/5 प्लेट भजी खाऊन 2 प्लेट पर्स मध्ये कोंबणाऱ्याही  आहेत. त्याहून नवल म्हणजे बऱ्याच जणी वार्षिक नोंदणी करीत नाहीत मात्र ती अश्या प्रकारे वसूल करतात ... हे सगळे का ... कशासाठी ???
           या सगळ्या भुक्कडगिरीच्या पदोपदी येणाऱ्या अनुभवातून एक मात्र अत्यंत खेदानं नमूद करतेय ... की दिवसेंदिवस सामाजिक बांधिलकी , आपला देश आपले लोक ही भावनाच आटत चाललीये कुठेतरी..... जो दुसऱ्यासाठी जगला तो देव ...
जो स्वतःपुरतेच जगला तो मानव पण जो दुसऱ्याचे ओरबाडून जगला तो मात्र राक्षस सैतान.😈
कुठेतरी थांबा .... " माझं नाही ते माझं नाहीच ! " म्हणायला शिका. खूप मोठ सामाजिक कार्य , मोठाल्या देणग्या देणे म्हणजेच फक्त  सामाजिक कार्य नव्हे तर थोडसं आत्मभान आणि जरासा जवाबदार  नागरीक या नात्याने केलेला विचारही खूप काही देउन जाईल ... निश्चितच .👍🏻
🔏©यशश्री रहाळकर
( हा लेख कोणतीही काटछाट न करता मूळ लेखकाचे नावासह forward करण्यास माझी हरकत नाही.)

२ टिप्पण्या:

  1. झक्कास लिहिलं आहेस 👌👌

    अशा लोकांचं खरंच काहीही होऊ शकत नाही. ही वृत्ती आणतात कुठून हेच कळत नाही. ह्याचं वाढतं प्रमाण बघता तर जास्तच प्रश्न पडतो.

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!