🎭आरश्यातल्या तिच्यासाठी
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
मुली जसजश्या मोठ्या होतात तसतसे त्यांचे घरातील एका वस्तूवर विलक्षण प्रेम जडते .. ती वस्तू म्हणजे आरसा. येता जाता दिसेल त्या आरशात त्या डोकावू लागतात अगदी कपाटाचे , dressing table चे , बेसिनवरचे किंवा गाडीचे side mirrors देखिल सोडत नाहीत . कधीतरी छान मनाजोग तयार झाल्यावर आरशात बघून स्वतःशीच गोड हसतात .
ही आरश्यातली ती हळुहळू विरत जाते काळाच्या ओघात ... कधी अभ्यास नोकरी स्पर्धा या रगाड्यात गुंतून जाते तर कधी असते तिथंच पण तिला द्यायला वेळच नसतो . नवीन लग्न झालं की पहिली फारकत होते आराश्यातल्या तिच्याशी... अखंडपणे आपण बायका (हो लग्न झालं की बायकाच तर होतो सगळ्या कुठं करीना असतात 😝) नवरोबाला काय आवडेल ह्याचाच विचार करू लागतो . त्याला लाल रंग आवडतो , त्याला मी साडीतच आवडते, त्याला नाही स्लीव्हलेस आवडत , त्याला मोकळे केसच आवडतात वगैरे वगैरे न संपणारी पांघरूण घालून आपण झाकून टाकतो आराश्यातल्या तिला .
कधीकधी परंपरांच्या पदराआड झाकून टाकतो तिला .. आमच्या सासरी अशीच पद्धत आहे अन असेच वागावे लागते ... साडीच नेसतो बरं आणि ड्रेस तर चालतच नाही. ही यादी न संपणारी असते. इतक्या लहान सहान बाबी प्रतिष्ठेचा मुद्दा बनतात की काय सांगू?? माझे अगदी खोटे 10/ 20 रुपयांचे कानातले पाहिले की माझी एक मैत्रीण हळहळते तिच्या घरात म्हणे खोटं घातलेलं मुळीच चालत नाही... त्यांच्या कोणत्या प्रतिष्ठेला यामुळे तडे जातात तेच जाणो ?
पुढे या मुलीची बाई अन बाईची आई होते .. मुलांपाठी पळताना आरश्यात पहायचाही विसर पडतो... त्यांची दुखणी खुपणी रात्री त्यासाठी जागरणे , मग शाळा , क्लासेस , डबे सगळ्या व्यापात ती आकंठ बुडून जाते . लेकुरवाळ्या आईला वेणी फणीलाही वेळ मिळेनासा होतो... आरशात पहायचे ते दात घासताना तेही तिथे आरसा असेल तरच ... कपाळाची टिकलीही आरश्यात न पाहता लावण्याची आताश्या तिला सवय झालेली असते.
मुले मोठी होतात आपापल्या मार्गांना लागतात.. नवरा आपल्याभवतीच्या व्यापात, कोषात मग्न ... ज्यांची अखंड सेवा केली आणि ज्यांच्या नियमांवर आजवर जगली ते जेष्ठ देवाघरी प्रिय झालेले असतात. आता हिला भरपूर वेळ मिळतो... आरश्यात पाहते ... दिसते एक भकास , खिन्न , दुःखी ,😢 आत्मविश्वास हरवलेली, चिडचिड करणारी वैतागणारी ती. धक्काच बसतो तिला.
गेली कित्येक वर्षे आरश्यातल्या तिच्याशी ना संवाद साधला असतो ना पाहिलं असतं..... कधीकाळी गोड हसणारी ती आता हसायचं विसरलेली असते जणूकाही. कोण असते हो आराश्यातली ती?? आठवतेय तुम्हाला?
जाडी- बारीक, गोरी-काळी, उंच- बुटकी ... ही सगळी ती रूपं जी इतरांच्या डोळ्यांनी पाहिली आहेत . मात्र आरश्यातली ती खूप खूप सुंदर असते ... परमेश्वराची एकमेव अद्वितीय कलाकृती. अशी ती जिला स्वतः ची मते आहेत , आवडीनिवडी आहेत .जी स्वतः साठी नटतेय मनापासून... जी स्वतः वर खुश आहे आनंदी आहे ... शेवटी गोडस हसू तिच्याकडे आहे स्वतः लाच देण्यासाठी.
जी व्यक्ती स्वतः वर प्रेम करत नाही ती इतरांवर कसं बरं करणार? आराश्यातल्या तिला रोज एकदा वेळ काढून भेटायलाच पाहिजे .. अगदी प्रत्येकीने ... तिच्यासाठी काही क्षण राखून ठेवायला हवेत ना ! कधीतरी तिच्याच आवडीची भाजी करा (नवऱ्याला आवडत नसेल तर त्याला वेगळी ) कधीतरी तिच्या आवडीच्या रंगाची साडी नेसा, गजरा माळा, लिपस्टिक लावा काय हवं ते करा तिच्या आवडीचं.... दिवसाचे 24 तास 12 महिने कुटुंबासाठी राबणाऱ्या तिला आनंदी राहायचं असेल तर आराश्यातल्या तिला भेटलच पाहिजे...👍
🔏©यशश्री रहाळकर
नाशिक
25/01/19
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९
आरश्यातल्या तिच्यासाठी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Ekdam sahi Yashasree
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवाप्रत्येकीने स्वत: आपल्यासाठी जगल पाहिजे.
उत्तर द्याहटवाआरशातील ती म्हणजे तिचं खाजगी भावविश्व जे तिचे फक्त तिचेच असते.
खुप छान आहे लेख.
अगदी पटलं. अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न पण सुरू आहे. 😉😉
उत्तर द्याहटवाराजलक्षमी,
उत्तर द्याहटवाअगदी खरंय आपल्यासाठी जगायला शिकलेच पाहिजे आणि त्यासाठी आरशात पहायला हवे.
Kharach ! As arshat pahayala havay swatala.
उत्तर द्याहटवामनापासून आभार सगळ्यांचे
उत्तर द्याहटवाअप्रतिम....... प्रत्येकी नी आरशातल्या " ती " ओळखायला हव....
उत्तर द्याहटवा