फॉलोअर

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

छंद भांडायचा

🙅 छंद भांडायचा  🗣
➖➖➖➖➖➖➖➖
          काही लोक पुथ्वीतलावर अवतार घेतात तेच केवळ भांडायला . ह्या लोकांना इतकी अगाध शक्ती प्राप्त असते की ते न थकता दिसेल त्या प्राण्याशी भांडू शकतात ... अहो खरंच! भांडायला किमान दुसरा पक्ष वगैरे म्हणून माणूसच असावा असे काही नाही ...अशाच एका महाभागांना रात्री भुंकणाऱ्या कुत्र्याशी अन ठेच लागलेल्या दगडाशी भांडतांना याची देही याची डोळा पाहिलंय. ह्या जिवंत चालत्या फिरत्या डेली सोप्स ने प्रचंड करमणूक तर कधी प्रचंड मनस्ताप ही भोगावा लागतो... तुम्हाला भांडायची मुळीच इच्छा नाही हा मुद्दा त्यांच्या करीता अगदीच गौण असतो..😝
              ह्या प्रवर्गातील लोक अत्यंत निष्ठेने आपलं कर्तव्य पार पाडत असतात ... भांडण ही प्रतिक्रिया किंवा एखाद्या घटनेमुळे आलेला उद्वेग नसून तो आमचा जणू मूलभूत हक्कच आहे असेच त्यांना वाटत असावे .🙄लहानपणी शाळेत wh type questions हा पाठ ते  अगदी घोटून घोटून  शिकलेले असतात मुळी.... म्हणूनच कुठे(where) काय (what)कश्याला (why)हे प्रश्न ते स्वतः ला पडूच देत नाहीत.
          या संप्रदायातील लोक सकाळी उठले की एखादा निष्णात योद्धा आपली शस्त्रे परजून ठेवतो तशी जीभ भिन्न व्यायाम प्रकार आणि उष्ण चहाने मजबूत शेक घेऊन तयार करतात ... आणि प्रभातफेरीला निघतात . मग lift ने चुकून वर आलेल्या 😉 पेपर टाकणाऱ्या पोऱ्याशी किंवा दूधवाल्या भय्याशी अगम्य हिंदी मिश्रित इंग्रजीत भांडून त्यांचा वॉर्मअप होतो ....  नवीन उत्साहाने भांडायला सज्ज होत ते कामाला लागतात.  रॉंग साईडने जाणाऱ्या सायकल स्वाराशी किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकणाऱ्या एखाद्याशी उगाचच भांडण केले की त्यांचे फिरणे सुफळ संपूर्ण होऊन ते घरी परततात .
          दिवसभरात भांडीवाली बाई , सोसायटीचा वॉचमन ,प्लांबर, इलेक्ट्रीशियन वगैरे मंडळी यांच्या पासून तोंड लपवत फिरत असतात .... कोणी चुकून सापडलेच तर तडाखा बसलाच म्हणून समजावे. घंटागाडी वाल्याशी कचरा टाकताना भांडणे हा तर विशेष करमणुकीचा भाग.
      आपण वगळता इतर सर्व मानव प्रजातीतील मुले ही दंगा करून दुपारची झोप मोडण्यासाठीच जन्माला घातली आहेत.. यावर त्यांचा गाढा विश्वास असतो . यांच्या घराच्या 200 मीटरच्या परिघात चुकून गेलेला बॉल किंवा पतंग कडाक्याच्या भांडणाचे कारण बनतो . भांडण म्हणजे भांडण ... कायमच प्रामाणिकपणाने आपले मूलभूत कौशल्य ते सादर करत असतात ... चुकीला माफी नाही ✖... लहान थोर , वय, हुद्दा , ताकद आणि स्त्री पुरुष भेदांपलीकडे जात समसमान न्यायाने ते भांडत असतात.
           हे क्षेत्र बहुतांश स्त्री प्रधान असले तरी पुरुष मुळीच मागे नाहीत ... गंगा यमुना सिंधू बाई यांच्या सारखेच तात्या नाना अण्णा असतातच ...😄 नोकरीतून किंवा संसारातून निवृत्त होणे हे या क्षेत्रातील Ph.D. मानायला हवे..... भरपूर रिकामपणा आणि वेळ यांचा दुहेरी संगम .... आहाहा! किती भांडू मी भांडू कुणाला?? अशी अवस्था झाली नाही तर नवल
           नातेवाईकांतील काही मंडळी प्रत्येक लग्नात रुसलेली असतातच ... त्याशिवाय आपल्याकडे लग्न समारंभ साजरे होणे केवळ अशक्य 😠पण सातत्याने प्रत्येक लग्नात रुसणारे  म्हणजे याच गटातील लोक . हे लोक वरपक्षांकडील असतील तर विचारूच नका... पायघड्या पासूनच भांडणाचे चौघडे वाजू लागतात . वधुकडील मंडळी कामांत मग्न असतील तर ते आचाऱ्याशी (आजकाल केटरर्स ) भांडतात ... कढीची वाटी हाती घेऊन "ही काय कढी आहे का ? " असे बाळबोध पंच टाकून 1..2...3 start
          "मै तो रस्ते से जा राहा था..." .......पण पुढे कशाला तर भांडायला 😡  .....रस्ता हे ठिकाण रणांगण असावे इतक्या संधी त्यांना तेथे सहज प्राप्त होतात ... जितका ट्रॅफिक अधिक तेव्हढे मोठे भांडण .. कधीकधी तर आपली गाडी मुद्दाम आडवी घालून यथेच्छ xxx सुरु. सुज्ञास अधिक काय सांगावे .... ऐकणाऱ्या ने शिव शिव म्हणावे असल्या इरसाल शिव्या....
         "भांडकुदळ " ह्या शब्दातील कुदळ ⛏ अत्यंत सुचक आहे...जमीन खोदून भांडणास मुद्दा काढणे हा अर्थ अभिप्रेत असावा. ह्या शब्दात ज्यांचे पूर्वी वर्णन होत असे ...अश्या लहानपणी एक काकू  शेजारी होत्या. त्या 'भांडकी बेबी' ह्या नावाने ओळखल्या जात ... आज त्या दोन नातवंडांची आजी असल्या तरी ह्याच नावाने ओळखल्या जातात.🤭
         हे सारं आज तीव्रतेनं आठवायचं कारण असं की सोशल मीडियावर असे महाभाग जागोजागी भेटू लागले ... भरल्या वांग्याना 🍆आम्ही भरीतच म्हणतो या विषयावर एक व्यक्ती एका खाना खजाना ग्रुप वर 4 दिवस अहोरात्र भांडली ... ग्रुप वरचे मेंबर्स होते 2 लाख ... क्या बात है ना ? घरीच बसून जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या कित्येक लोकांशी भांडणाची विस्तृत संधीचे नवे अवकाश प्राप्त झाले आहे ...🤗
           खरंतर, झगडा किंवा भांडण परिस्थितीशी असेल तर त्यात प्रचंड positive energy सामावलेली आहे. हे कौशल्य पणाला लावून लोक आयुष्यात अक्षरशः कुठल्या कुठे जातात. अश्या लोकांपुढे आपण नतमस्तक झाल्याविना राहत नाही .
          मात्र भांडण हा छंद म्हणून असणाऱ्या व्यक्ती कुटुंबात, शेजारी ग्रुप मध्ये असतील तर ??? तुम्ही या गटांतील निश्चितच नसाल ... तर प्रश्न पडतो ,काय करायचे?? अश्या लोकांचे काहीही करायचे नाही . तुम्ही माफी मागण्याचा मोठेपणा दाखविला तरीही ते भांडणारच. तुम्ही काही केले नाही.. दुर्लक्ष केले तरीही ते भांडणारच 👊🏻 तेव्हा हे वत्सा ! या ज्ञान प्राप्तीनंतर त्यांना मनोरंजन म्हणून enjoy करावे हाच श्रेयस मार्ग 😇
©🔏यशश्री रहाळकर
           नाशिक
        28/01/19

६ टिप्पण्या:

  1. सही. आमच्या बिल्डींग मधे पण आहेत असे दोन लोकं.

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी मस्त.वाचताना अश्या भांडणाऱ्या चे चेहरे समोर आले.हे भांडणारे भांडण लावून देण्यातही पुढे असतात.काही तर अगदी नवरा बायको जोडीने भांडतात.बहुतेक त्यांना वाटत असेल तर जोडीने भांडल्यावर आपला चुकीचा मुद्दा हि बरोबर होतो☺️🤣😂😂

    उत्तर द्याहटवा
  3. आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! दर एक दिवसानंतर वाचा छानसे असेच काहीतरी...

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!