👵 आदरणीय आई
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
शाळेत असतांना हिंदीच्या तासाची गोष्ट.... पत्रलेखन सुरू होते ' आदरणीय पिताजी .... प्रिय माँ ' ??? ... आजही प्रश्न मनात तसाच आहे . बाबा निश्चित आदरणीय असतातच पण आई का नाही ?? हे सगळं पुन्हा बोचून जाण्याचं कारणही तसं आहेच ... एका मैत्रीणीकडे काही कामानिमित्त गेले होते ... तिने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या लेकीची ओळख करून दिली ... ती कशी हुशार आहे मेहनती आहे वगैरे आईला साजेसं कौतुक केलं. लेक मात्र उपम्यात मीठ कमी म्हणून वाट्टेल तसं बोलून गेली ... जातांना मला म्हणालीही " आई इतकी बावळट आहे ना की तुम्ही लोक कशी काय तिच्याशी friendship टिकवून आहात ?? Only God khows..." 😳मी अवाक... तिची लेक क्लासला गेली आणि तिचा बांध फुटला ... माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडणारी ती स्वतः लाच समजावत म्हणाली " तिचं तरी काय चुकलं म्हणा माझ्या सारखी बारावी पास बावळट आई ... तिला लाज वाटते ग माझी ... मैत्रिणीना घरीही आणत नाही . माझ्या सोबत बाहेर कुठे येत नाही .."
तिच्याच नाही तर अनेक घरांत हा प्रकार पाहायला मिळतो ... घरातील गृहिणी ची यथेच्छ निंदा करण्यात घरातील सगळ्यांनाच भूषण वाटत असते . आमचे एक family friend आहेत दोघा बाप लेकाला share trading चे भयंकर वेड ... मात्र त्यांची पत्नी या साऱ्यात मुळीच रस घेत नाही ... त्या दोघांच्या बोलण्यात वारंवार ती बिंडोक वगैरे उल्लेख येतो .... खंत वाटते पण परिस्थिती प्रत्यक्षात अशीच आहे.अनेक घरांत मुले आणि वडील अशी आघाडी उघडून सातत्याने आईचा पाणउतारा करत असतात .
गृहिणी असणाऱ्या आईंची परिस्थिती तर दयनीय आहेच पण नोकरी करणारी आई असेल तर खूप काही फरक पडतोच असेही नाही ... तिच्या कामाच्या ठिकाणावरून पदावरून तिचा अपमानास्पद उल्लेख केला जातो ... जसे " असं वागायला हे काही Z P चं office नाही तुझं " किंवा " माझी मुलं कान्व्हेन्ट मध्ये शिकतात त्यांना तुझ्या त्या नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी समजू नकोस " वगैरे वगैरे...
साधी सरळ राहणारी ती कधी गबाळी वाटते ... कमी शिकलेली ती बावळट असते .. इंग्रजी न येणारी बिंडोक.....सणवार पाळणारी जुनाट .....techno savy नसेल तर horrible.....एव्हढं करून साधा स्वयंपाक ही न येणारी अडाणी आई घराघरात रडत कुढत बसलेली दिसते. आत्मविश्वास हरवलेली , घुसमटून गेलेली ... न्यूनगंडाने पार कोलमडून पडलेली आई घराघरांत दिसते. Mother's Day साजरा करणारी ही पिढी ... त्यादिवशी आई सोबतचा DP ठेवायचा नी केक आणायचा दोन चार ओळी आईवरील कवितेत टाकायच्या ... म्हणजे बास??? झालं ??? आता या मुलांचं आई वर प्रेम नाही का तर तसे नाही प्रेम आहे पण आदर ?? तो मात्र नाही .
T V वरील विविध जाहिरातींनी आईची प्रतिमा पारच रंगवून टाकलीये... कायम व्यवस्थित कपड्यात वावरणारी make up मधील मुलांसोबत उड्या मारणारी ती जाहिरातीतील आई फारतर मोठी बहीण वाटणारी आई ... बचोंके पोषण का खास खयाला वगैरे ठेवणारी दोन मिनिटांची आई ... अशी कधी आई असते का राव 😝 .... पोरांचा पसारा आवरून कंबर मोडून पडलेली; त्यांचे डबे क्लासेस यांचे शेड्युल सांभाळत नाचणारी ; त्यांच्या आवडीचे पदार्थ न मागता पहाटे उठून करून ठेवणारी ; मुलांचे कपडे प्रेस करणारी त्यांच्या परीक्षेचं ओझं वाहणारी आणि या साऱ्यात बरेचदा जिला तोंडावरून साधा पावडरचा हातही फिरवता येत नाही बरेचदा कपडे बद्दलयालाही वेळ मिळत नाही तीअसते खरी आई ....🙏
स्त्रीला नेमकं काय हवं असतं?? या प्रश्नाचं उत्तर माझ्यापुरत तरी सन्मान आणि आदर हेच आहे . ती करत असलेल्या गोष्टी भल्याही क्षुल्लक असू देत ... तिच्या क्षमता... ज्यांचा ती आश्चर्यकारकरीत्या वापर करत असते यांचा सन्मान व्हायलाच हवा .... नसेल तिला share trading समजत मात्र ती खूप छान रांगोळी काढतेय .... नसेल येत तिला स्मार्ट फोन वापरता पण ती खूप छान पुस्तके वाचते ... नसेल येत तिला चायनीज थाई फूड पण ती उत्तम पुरणावरणाचा स्वयंपाक करते. ..
सगळ्याच गोष्टी यायला ती जादूगार नाही माणूस आहे ... एका विशिष्ट परिस्थितीत घडलेली ... एका वेगळ्या कुटुंबात वाढलेली ..... जगण्याच्या ओघात अनेक जवाबदाऱ्या लीलया पेलणारी आई ...घराचं बजेट सांभाळणारी, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी, आजारी पडलेच कुणी तर देहभान विसरून सेवा करणारी ... घरातल्या जेष्ठांना मान देणारी त्यांची काळजी घेणारी ... सगळ्यांच भलं व्हावं म्हणून सणवार आणि उपासतापास करणारी , सगळ्यांना पोटभर जेवू घालणारी , आणि सगळ्यांच्या चुका पोटात घेणारी...... आई .. ती घर चालवत नाही फक्त तर तिच्या दोन्ही हातांनी तोलत असते... आवरत नसते फक्त पसारा दोन्ही हातांनी सावरत असते ... अख्या घराला .
मानुषी चिल्लर या आपल्या देशाच्या विश्वसुंदरीने अंतिम फेरीतील प्रश्नाचे उत्तर देतां ना "आई असणे हे जगातील सर्वश्रेष्ठ असे काम आहे ज्याला सर्वाधिक सन्मान मिळायला हवा" असे उत्तर देऊन परीक्षकांसह जगभरातल्या आयांची मने जिंकून घेतली ...खरेच आई फक्त प्रिय आई नसते ... प्रेमापलिकडे जाऊन आदराची हक्कदार असलेली ती असते आदरणीय आई.
©🔏यशश्री रहाळकर
नाशिक
09/01/19
khup chan lihita
उत्तर द्याहटवाApretim yash
उत्तर द्याहटवाApratim... Proud of..
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👏👏👏
उत्तर द्याहटवावाव्वा
उत्तर द्याहटवाKhup chan lihils tai...
उत्तर द्याहटवा