कालसापेक्ष (अखेर)
♾♾♾♾♾♾♾♾
त्या मध्यरात्री हिम्मत धरून मी घराखाली उतरले अन त्याच्या हातावर हात ठेवला .... त्या सरशी क्षणार्धात आम्ही एका निर्जन टेकडीच्या टोकावर पोहोचलो .... मी काहीही कृती करूच शकत नव्हते जणू काळानं जखडून टाकलं होतं मला ... माझा हात त्यानं घट्ट धरून ठेवला होता ...तो बोलू लागला ..मी मात्र ऐकण्या अन पाहण्यापालिकडे काहीच करू शकत नव्हते... जणू काही माझी भूमिका तो अन त्याची मी करतेय... तो म्हणाला हात सोडू नकोस नाहीतर... तू अडकून पडशील ..तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देऊनच मी जाणार आहे... घाबरू नकोस... त्यासाठी तुला थोडसं मागे म्हणजे माझ्या भूतकाळात डोकवाव लागेल !....
त्याचा हात धरून तो आणि मी निश्चलपणे त्याच्या भूतकाळाची रीळ पाहू लागलो ....आता आम्ही दोघेही फक्त प्रेक्षक होतो ... एकटक तीव्र नजरेनं पहाताना मला दिसलं ... तो देवाशीष देशपांडे ... मध्यम वयाचा बँकेत कारकून म्हणता येणाऱ्या पदावर काम करणारा माणूस ... कुटुंब मुलेबाळे असणारा अगदीच निर्व्यसनी ... बिनविषारी म्हणता येईल असा माणूस ...नेहमीच स्वप्नरंजन करणारा ... भविष्यात रमणारा ... गुढकथांची पारायणे करणारा ... अज्ञात अघोरी शक्तींवर निष्ठा असणारा ...साधा सरळ चारचौघांसारखा अतिसामान्य माणूस....
2015 सालच्या ऑगस्ट महिन्यातील गोष्ट ...कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरला जाऊन विशिष्ठ मुहूर्तावर होणारे शाही स्नान बघायचे किंवा त्याहीपलीकडे जाऊन ... सगळी गंमत अनुभवायची एवढ्या साध्या भावनेनं ... आपल्या बहिणीकडे गेला ... जरा कुशावर्तीला फेरफटका मारून येतो म्हणून भल्या पहाटेच निघालेला देवाशीष देशपांडे जो गेला तो गायबच झाला कुणालाही दिसला नाही...???
पुन्हा क्षणार्धात त्याच टेकडीवर परत आल्यावर देवाशीष बोलता झाला ..." मी आत्ता का बोलू शकतोय अन तू का नाही असा प्रश्न पडला असेल ना? हा माझा वर्तमान काळ आहे. इथं मी मनुष्याच्या म्हणाव्यात त्या सगळ्या क्रिया करु शकतो ... हा तुझा मात्र वर्तमानकाळ नव्हे ... तू काळाची कित्येक आवर्तने ओलांडली आहेस....तुझा हात हातात आहे ना तोपर्यंतच मी तुला पाहू शकेन... काही सांगू शकेन ...नंतर मात्र तू मला दिसणार नाहीस अन मला काहीही आठवणारही नाही ."
तो पुढं म्हणाला ... त्या दिवशी कुशावर्त येथे सहज म्हणून फिरायला गेलो तेव्हा एक नागा साधूंचा जत्था दिसला अकरा साधू होते .अत्यंत उग्र तपस्वी वाटावेत असे ... मला हा शुभशकूनच वाटला ...मोठ्या श्रद्धेनं मी प्रत्येकाच्या पायांशी वाकून नमस्कार करत होतो ... शेवटच्या साधुबुवांना नमस्कार करतांना अचानकपणे बाकीचे विचारु लागले ... कुणाला नमस्कार करतोय ? अकरावा साधू तेथेच होता .. इतरांना दिसत मात्र नव्हता ...होता हे नक्की .
मी झपाटल्यागत त्या साधूंच्या पाठी जाऊ लागलो ... भजनीचं लागलो त्यांच्या. ते अदृष्य साधू बुवा मलाच काय ते दिसत होते .. इतर कुणालाच नाही ह्याची मला खात्री पटली ...माझ्या मनात अगदी तुझ्यासारखं प्रश्नांचं मोहोळ घोंगावत असे .. साधुबुवा शांत निश्चल नजरेनं एकटक पाहत असत ... मला ते साधुबुवा अन त्यांचे रोखलेले डोळे याविना काही सुचेना ..कित्येक दिवस त्यांच्यापाठी भटकत मी ह्या टेकडीवर आलो ... असाच एकदा त्यांनी हात पुढे केला अन मी धरला ...ते म्हणाले " बाळा !आता तू झालास कालसापेक्ष .मी सुटलो... काळाच्या चक्रातून" माझा हात सोडून ते दिसेनासे झाले ... तेव्हापासून मी भूत आणि भविष्यात लोंबकळतोय ... इथे तुम्ही सारे पाहू शकता.. विचार करता क्षणीच त्या काळात त्या प्रसंगात जाऊ शकता ... मात्र कोणतीही कृती तुम्हाला त्या काळात करता येत नाही .. फक्त पाहता येते ...घटनांमध्ये बदल मात्र करता येत नाही ...
त्या दिवशी तुला पाहता क्षणीच मी ओळखलं की तू अशीच योग्य व्यक्ती आहेस ... तुझ्या प्रत्येक स्वप्नात प्रत्येक विचारात मी डोकावलं.. तुला भाग पाडलं मला भेटायला .. स्वतः हुन हात धरायला ... तो तो ... देवाशीष देशपांडे खुनशी हसत म्हणाला " मला माझ्या प्रत्यक्ष वर्तमानातील मृत्यूपूर्वी वर्तमानात जायचं होतं ना माझ्या ! आता मी तिथे आहे जिथे मी सगळ्यात शेवटी होतो .. माझ्या वर्तमानात ... उरलेलं सारं जगण्यासाठी ." त्याने परवलीचे शब्द उच्चारले ..." आता तू झालीस कालसापेक्ष.. मी सुटलो ... काळाच्या चक्रातून " ... अन माझा हात सोडला . त्याला काहीच आठवत नव्हते ना मी दिसत होते ....
मला मात्र सारे दिसत होते ... भूतकाळ, भविष्यकाळ ..माझाच काय दिसेल त्या प्रत्येक सजीवाचा ... आता मात्र मला माझ्या वर्तमानाची ओढ लागली होती ... काळाची कित्येक आवर्तने चक्रे ओलांडून मी शोधत होते ... एक योग्य व्यक्ती .. जी मला पाहू शकेल स्वतः हुन माझ्याकडे येत माझा हात हाती धरेल ... माझ्या प्रत्यक्ष मृत्यू पूर्वी हे घडायलाच हवं ...अन्यथा या कालचक्रातून माझी सुटका होणे नाही हे अटळ आहे .
....………..............…
............….…..........................
..…..............…........................….......
कुठलीतरी काल्पनिक गूढकथा वाचतांना तिनं मोबाईल मधून डोकं काढलं अन खिडकीतून खाली डोकावून पाहिलं ... खांबाला टेकून उभी असलेली मध्यम वयाची स्त्री एकटक नजरेनं पाहत असलेली दिसली ... बऱ्या घरची असावी कोण बरं असेल ही ? माझ्याकडे का पाहातेय?? खांबाला टेकून उभी असलेली ती संध्या राजे मनातल्या मनात ओळखीचं हसली ....सापडली योग्य व्यक्ती ... ...कालसापेक्ष.
(समाप्त)
🔏© यशश्री रहाळकर
नाशिक
03/02/19
खूपच छान!!अन अंगावर काटा आणलास ग
उत्तर द्याहटवाछानच,गूढ कथेचा साजेशा अंत.
उत्तर द्याहटवा👌👌👌👌
उत्तर द्याहटवाMast ..... Vachatana pudhe Kay..... Kay Shewati hi channn
उत्तर द्याहटवाKhup chan..
उत्तर द्याहटवा