फॉलोअर

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

कविता- अधुरं स्वप्न

10 फेब्रुवारी 2019 वाघोली येथे झालेल्या काव्यधारा साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत विषय दिला होता 'अधुरं स्वप्न '. माझ्या या कवितेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले तिच आज माझ्या blog च्या वाचकांसमोर ठेवतेय.
अधुरं स्वप्न
अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांच नामस्मरण आजही करतो आपण
एव्हढेच नव्हे तर घडवतोय अजूनही आपल्यातल्याच काही..
महानतेच्या सोनेरी आवरणात गुंडाळून आयुष्याची लक्तरे सांभाळीत ...
किती सोपं असतं ना एखादीला अहिल्या ठरवणं ... एखाद्या वासनांध इंद्राच्या कपटासाठी,
तिच्या आयुष्याची शिळा अन त्याचं पुरूषत्व इंद्रपद राजरोस भूषविणारं ....
द्रौपदी तर खडा मारला तिथं भेटतील ...
नाक्यानाक्यावर नजरेनं मनातल्या मनात तर कधी 
भर चौकात विवस्त्र केल्या जाणाऱ्या .... आपल्याच कुणातरी नात्यातल्या सोयऱ्याकडून....
जोडीदार निवडीचंही स्वातंत्र्य नसणाऱ्या कित्येक द्रौपदी ओढताहेत संसाराचा गाडा ;
मन मारून लादलेेला नवरा अन नकोसं बाईपणाचं ओझं सावरीत
नवऱ्याच्या वाटचा वनवास हसतमुखाने भोगल्यानंतरही कित्येक सीतांना द्यावीच लागते पावित्र्याची अग्नीपरीक्षा ...
ती देउनही तिलाच  सोडलं जातं एकटीला रानावनात पोटात पोर असतांना
वाली आणि सुग्रीवाच्या वादात भरडल्या जाते निरपराध तारा ...
आजही तिच्याच डोक्यात दगड घातला जातोय जमिनीच्या तुकड्याच्या मालकीसाठी
कित्येक मंदोदरी भेटतात आजही नवऱ्याची सारे पापे पचवून हसतमुखानं संसाराचा तोल सावरीत
दिमाखात गृहीणीपद भूषवित मुले वाढवित तोंडातून ब्र सुद्धा न काढता
पुराणातली वांगी पुराणात म्हणावी का ?? असे असतांना
जेव्हा आजही तिच्या जगण्याचे आडवे उभे अक्षांश रेखांश काडीमात्र बदलले नासतांना
आजही रोज कित्येक अपुऱ्या स्वप्नांचे गाठोडे उशाशी घेऊनच झोपते ती...
अबला दुबळी देवघेवीची वस्तू ..आवाज उठवला की अचानक  फेमिनिस्ट असते ती
तिच्या या गाठोड्यात सर्वात वरती स्वप्न आहे मातृशक्ती जिजाऊंच
प्रत्येक स्त्रिला सन्मान आणि जगणं स्वाभिमानाचं
एक स्वप्न जोतिबाच्या सावित्रीचं प्रत्येक लेकीला शिक्षण देण्याचं ..
एक स्वप्न झाशीच्या राणीचं आयुष्यातल्या प्रश्नांशी तलवार उपसून लढण्याचं
रमाबाई रानडेंच आत्मनिर्भरतेच स्वप्न , डॉ आनंदी गोपळांच प्रत्येकीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच स्वप्न
सारीच अपुरी स्वप्ने गाठोड्यात बंद
अन गाठोड्यावर पडली आहे निरगाठ  ...
एक स्वप्न माझही आहे ती निरगाठ सोडण्याचं
सारे स्वप्ने मोकळी करून प्रत्येकीला वाटण्याचं ...
गाठोड्याला उशाशी घेउन शांत मी झोपणार आहे
आज गाठोड उघडण्याचं अधुर स्वप्न मी पुरं करणार आहे .
©यशश्री रहाळकर
( ही पोस्ट संपुर्ण आणि केवळ नावासह forward करण्यास हरकत नाही )


२ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!