प्रेम म्हणजे प्रेम असतं 💘
💞💞💞💞💞💞💞💞
" प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं " असं म्हणणाऱ्या पाडगावकरांची (माफी मागून) मोहक कविता वाचत तारुण्यात पदार्पण वगैरे केलेल्या मला प्रत्यक्षात मात्र हे 💓 'सेम ' असतं असं मुळीच वाटलं नाही ...लग्नाआधी प्रेम करून थांबलेलं प्रेम , विवाहाच्या वळणावर पोहोचून थांबलेलं प्रेम, विवाह करून नंतर कधीतरी सुरू झालेलं प्रेम (जोडीदारावर किंवा दुसऱ्याच कुणावर 😝), arrange marriage वाले किंवा love marriage वाले प्रेम किंवा नव्यानेच ज्ञानात भर पडलेलं इश्कवाला वाला love प्रेमाच्या अनेक तऱ्हा ,अनेक रूपं... आता ह्याचं वर्गीकरण करून खरं प्रेम ,आकर्षण किंवा शाश्वत प्रेम वगैरे वगैरे शाब्दिक घोडे नाचवून कोणतेही उदात्तीकरण मला मान्यच नाही. मुळात प्रेमाच्या कक्षेत कितीतरी भावनांना आपण उगाच ओढत बसतो.
प्रेमाची व्याख्या आपली आपल्यातरी कुठे उमजली असते नीटशी... ... हेच बघा आईचं प्रेम सगळ्यात पवित्र मानतो आपण त्याला म्हणतात " ममता" .. वडिलांच्या प्रेमात काळजी असते ,....भावाच्या प्रेमात संरक्षण...बहिणीच्या प्रेमात माया असते ...प्रियकराच्या आकर्षण... पतीपत्नीच्या प्रेमात जबाबदारी असते.. नातं निभावायची . ...लेकाच्या प्रेमात हक्क असतो लेकीच्या प्रेमात ओढ असते.... प्रेम प्रत्येक नात्यांनीशी आपल्या समवेत वेगवेगळ्या भावनांचं कोटींग घेऊनच येतं ....
यापलीकडे जाऊन " केवळ प्रेम" अशी एकटी जागा व्यापणार काही असतं का हो?? असायला हवं नाही का! मनुष्य उपजत स्वार्थी स्वभावानुसार सर्वाधिक प्रेम करतो ते स्वतः वर... मग आपल्या गरजेच्या, सोईंच्या, फायद्याच्या अश्या व्यक्तींचे एक वर्तुळ बनवत जातो ....वाढवत जातो. तरीदेखील सर्वाधिक प्रेम असते ते स्वतः वरच ...या स्वार्था पल्याड विचार करून जेव्हा माणूस दुसऱ्या कुणाचा विचार करतो ... तिथेच सुरुवात होते प्रेमाची...ज्यात फायदा तोटा नफा नुकसानीची गणिते नसतात... देवघेवीच्या पलीकडे जाणारं संपूर्ण समर्पण असतं प्रेम ....
अर्थात याचा नको तो अर्थ घेत ......प्रेम म्हणजे त्याग म्हणत घरादारावर तुळशीपत्र ठेऊन ... रस्त्यावरच्या उनाड मुलाचा हात धरून पळून जाणाऱ्या बिंडोक मुलींनी " प्रेमासारख्या " पवित्र भावनेला बदनाम करून ठेवले आहे .😢
आपल्या सिनेमांनी तर प्रत्येक मनावर जणू बिंबवलं आहे की कॉलेज मध्ये जायचे कश्याला? तर प्रेमात पडायला.... love at first sight वाल्यांचे तर पायच धरावेशे वाटतात... 30/35 वर्षे practice असलेला डॉक्टर देखील ढीगभर tests केल्याशिवाय नेमकं काय झालंय ते सांगत नाही ...यांना दिव्य दृष्टी प्राप्त असावी बहुदा.
यावर माझ्या जवळच्या मैत्रिणीनं "तुम्ही arranged marriage वाले जळता आमच्या वर " अशी खोचक कुजकट प्रतिक्रिया दिल्या वरही... मी शांतपणे तिला विचारलं ... " लग्नानंतर प्रेमात पडू नकोस कुणी सांगितलं?" व्यवहार म्हणून केलेल्या लग्नानंतर हळूहळू जोडीदार उमजत जाणं अन नकळत त्याच्या प्रेमात पडणं ...हेही प्रेमचं नाही का! आमच्या ह्या प्रेमात प्रपोज, रिंग , heart shape चे gift , डिनर नसेल कदाचित ... पण आधार असतो , विश्वास असतो... सगळ्यात महत्वाचे म्हणजे धीर असतो. आयुष्य उतरणीला लागल्यावर उतारवयात एकमेकांचे हात हातात घेऊन जाणाऱ्या आजीआजोबांना पाहिलं की वाटतं हेही प्रेमच ना!
काही दिवसांपूर्वी एक शहीद जवानाच्या अंत्यविधीला हातात 3 महिन्यांचं बाळ घेऊन कोरड्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या तिला पाहिलं... असं प्रेम ज्याला कोणत्याही व्याख्येची गरजच नाही.....😢
प्रेमादिवसाची खरंच आवश्यकता आहे ... एकदा क्षणभर थांबून उजळणी करण्यासाठी ... वेगवेगळ्या वाटांनी येणाऱ्या प्रेमाला वाट करून देण्यासाठी, मनाची बंद कवाडे उघडून खुल्या मनानं जगण्यासाठी...
" आज क्षणभरासाठीच मला
मागे वळून पाहायचं
ममतेचं देणं तिचं
दुप्पट करून चुकवायचं
काळजी घेतली आयुष्यभर
आता त्यांची सावली व्हायचं
काही क्षणांना स्वतः पलीकडे
मायेच्या माणसांना द्यायचं
गळा मिठीत पिल्लाच्या त्या
सारंच विसरून जायचं
प्रेमाचे सारेच रंग गुंफून
इंद्रधनुष्य ते विणायचं
त्यालाही सांगेन म्हणतेय आज
प्रेम मनांत साठलेल
आयुष्याच्या खाचखळग्यात
भक्कम होऊन उरलेलं....."
जगतोय म्हणजे प्रेम करतोच आहोत आपण... फक्त गरज आहे ते व्यक्त करण्याची . आजच्या दिनाचं सोनं करूया ..प्रेम व्यक्त करूयात .. त्या सगळ्यांवर ज्यांनी खूप प्रेम दिलंय... न मागता👍
Happy Valentine's Day!💞
🔏© यशश्री रहाळकर
नाशिक
14/02/19
Mast!
उत्तर द्याहटवाWah kya baat hai.....sundarch
उत्तर द्याहटवाव्वा मस्त च आहे ।आजच्या ह्या दिवशी छान लिहिलंस तू.
उत्तर द्याहटवासगळ्यात जास्त भावली तुझी कविता 👌👌