फॉलोअर

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

वदनी कवळ घेता

                  🙏 वदनी कवळ घेता  ☺
                🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
            
            काल कित्येक दिवसांनंतर जुन्या नाशकात भोजनाचा योग आला... कपलेश्वराला याच तिथीला गेली 45 वर्षे सातत्याने अभिषेक करणाऱ्या एका स्नेह्यांकडे प्रदोषाचा प्रसाद लाभला .'पाटांवरील पंगत आणि वदनी कवळ चा गजर '.. हल्ली nostalgic व्हायला होतं. जुन्या नाशकात आणि त्र्यंबकेश्वरला अजूनही हे ' भोजना ' चं सुख अनुभवता येतं. 'भोजन ' आणि 'जेवण'  ही आताश्या दोन भिन्न प्रकरणे वाटू लागली आहेत. त्यातही भोजनाचा लाभ क्वचितच कधीतरी ... ह्या पंगती प्रपंचात आजकाल कुणी पडत नाही ;असं म्हणतांना आपण बरंच काही गमावलं आहे .
             'जेवण 'म्हटलं की सर्रास डोळ्यांपुढे नाचतात  छोले , मिक्स व्हेज, पनीरच्या भाज्या, बिर्याणी, भिंडी दो प्याजा, राजस्थानी पकोडे, बंगाली मिठाया झालंच तर चायनीज स्टारटर्स आणि इटालियन सॅलड वगैरे वगैरे... खच्चून भरलेल्या ताटात ढकला ढकल करत उभ्या आडव्याने बुफेत मिळवलेले जेवण नामक दिव्य ... 'अवघेची सारे पोटाचसाठी' म्हणत स्वाहा केलेलं. बरेचदा तर अगम्य काही... साधारण 90 च्या दशकात पुण्या मुंबई चे लोण म्हणत आलेले हे बुफे 2000 च्या सुमारास खेड्यापाड्यांत पोहोचले .त्यावेळी एका आजोबांनी बुफे ला ' गिधाड भोजन 'असे हिणवल्याचे आजही आठवतेय.. 😂😂 वेळेची कमी आणि सोयीचा भाग म्हणून आलेल्या या जेवणाने आपले खास महाराष्ट्रीयन पदार्थ जवळपास हद्दपारच केले.
            ' भोजन ' ....मात्र पुढ्यात ताटभर वाढलेलं सुग्रास अन्न, पाटांभवती रांगोळ्या, उदबत्तीचा घमघमाट आणि साजूक तुपाची धार भाताच्या मुदीवर वाढतांना वदनी कवळ म्हणत केलेला जय जय रघुवीर समर्थ! चा पुकारा ... अजूनही या जेवणात डावीकडे मीठ, लिंबू , चटण्या , कोशिंबिरी ताटांच्या समोरील बाजूस वाट्यामध्ये कढी, खीर आमटी वगैरे उजव्या हाताला बटाट्याची सुकी भाजी अन त्या खाली अळू ची पातळ भाजी मध्यभागी मसाले भात साधं वरण भात पोळी , गिलकी भजी यांचे स्थान ... हाच अगदी असाच मेन्यू जुन्या नाशकात प्रत्येक कार्यक्रमात असतो ... अगदी तेरवी किंवा श्राद्ध प्रसंगी ह्यात आमसूल चटणी, वडे, तांदळाची खीर, डांगर +गवार भाजी यांची भर पडते . बाकी सगळे तसेच्या तसे.... बदल ही काळाची गरज आहे हे निश्चित पण कधीकधी काही गोष्टी बदलूच नये असे वाटते .
                पूर्वी लग्नात ठराविक पदार्थ असत ... नाश्त्याला उपमा,  रात्री जेवणात गोड आंबट वरण, शिरा क्वचित बुंदी ,लग्नात लाडू किंवा जिलबी मठ्ठा. आमच्या विदर्भात तर उन्हाळी लग्नात एखाद्या मोठ्या ड्रम मध्ये मठ्ठा केला जाई .. वाटेल तेव्हा वाटेल तितका प्यायचा . एखाद्या श्रीमंतांच्या लग्नात आमरस पुरी असायची बाकी भरली वांगी मसाले भात . वाढण्यात आपुलकीचा आग्रह आमंत्रणात प्रेम माया 🙏 पोटाच काय मनही भरून जाई
              एका जुन्या मैत्रिणीचे वडील आजारी होते त्यांना भेटायला म्हणून सगळ्या एकत्रच गेलो. तिच्या आईनं गरमागरम कांदे पोहे हाती दिले . त्यावर शुभ्र नारळाचा चव , हिरवीगार कोथिंबीर, पिवळे धमक लिंबू आहाहा ! कित्येक वर्षांनी कुणीतरी असे मस्त पोहे दिल्याचं आठवलं.यथेच्छ चापून डिश ठेवायला म्हणून स्वयंपाक घरात गेले तर मैत्रीण आईला झापत होती  " पोहे काय ग केलेस ,कित्ती चीप वाटतं. मला सांगितलं असतं तर येतांना ढोकळे नाहीतर राजस्थानी मिठाई वाल्याकडून चाट वगैरे आणला असता." मी विस्मयाने पाहत राहीले..... 😳 ताजे चविष्ट पोहे आपले म्हणून चीप .  कुणीतरी कधीच्या काळी करून ठेवलेले ढोकळे, इडली मात्र 😋 वाव!
             आपले सगळे सोडून काहीतरी नवीन म्हणजे झक्कास काहीतरी असे आपले समीकरण झाले आहे . नाश्त्याला केला जाणारा गोडाचा  शिरा , उन्हाळ्यातील साठवणीचे पदार्थ , पापड लोणची, साखरंबे ,इतकेच काय तर लग्नात मिळणारा चिवडा लाडू हद्दपार होत त्याची जागा मिठाया आणि पुढे चालून dry fruits ने घेतली आहे. त्या चिवड्याचीही  काय गंमत होती ... असे बरेच चिवडे एकत्र करून कांदा, कैरी ,टोमॅटो घालून एकत्र केले जाई ... सगळ्या लेकी सूना त्यावर ताव मारीत. मुळात खाणं म्हणजे वाटून हे संस्कार होते. उन्हाळ्यात पन्हे सरबते होत ... हिवाळ्यात कढी भजी , शेंगुळे होत. खाण्यात आणि खाऊ घालण्यात असीम आनंद होता. कुणाच्याही घरी गेलो अन खाणे चालू असले की लगेच आपणही बसायचे .. शिळ्या पोळीचा कुचकरा असो किंवा लोणचं पोळी चवीने जेवायचे हे अगदी उत्तम राजरोस  सामाजिक वर्तन होते.
                   दिवाळी नंतरचे दिवस असावेत ..... सासूबाईंच्या एका मैत्रीणीकडे कागदपत्रे पोहोचवायला म्हणून गेले. पुढ्यात आलेली फराळाची डिश मी चवीनं खाल्ली. अत्यंत निगुतीने केलेल्या त्या प्रत्येक पदार्थाची अप्रतिम चव होती.  काकू अनाहूतपणे म्हणून गेल्या,
" कित्येक दिवसांनी कुणीतरी फराळ खाल्ला. नाहीतर डिश भरा आणि  माघारी नेऊन डब्यात रिकाम्या करा." काकूंच्या डोळ्यात पाणी होतं.....😢 रस्त्या रस्त्यावर विकायला ठेवलेले चिवड्याचे डोंगर पाहिले की पोटात तुटतं . काय होतं कळत  नाही पण काहीतरी खूप मौल्यवान हरवल्या सारखं वाटत राहतं.
            दुसऱ्या बाजूला  फॅशन म्हणून हुरडा पार्टी, चौरंग पाटावरचे जेवण, चुलीवरचे जेवण यांचे पेव फुटले आहे . भरमसाठ पैसे अक्षरशः ओतून ही महाराष्ट्रीयन कुझीन ची मिजास मिरवली जाते. कित्येक ट्रेंडी पदार्थांचे मूळ आपल्या कडील आहे जसे टर्मरीक लाट्टे नावानं आणि भरमसाठ किंमत मोजून घेतल्या जाणारा पदार्थ आपले दूध हळद आहे 😆
              मुळात जुनं ते सोनं वगैरे मानणाऱ्या लोकांपैकी मी नाही. पण काही चवी पिच्छा पुरवत राहतात आयुष्यभर... चुलीत भाजलेले चिंचोके, कैरी चिंच पाडून मीठ लावून खाल्लेल्या , आंब्याचा रस करतांना चोखून खाल्लेल्या साली नी कोयी ,😋 वाळवणाचा चीक, ओलेच पळवलेले पापड अजूनही रेंगाळतात जिभेवर . ...." उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म " चा  अर्थ पटवून देत.
🔏© यशश्री रहाळकर
           नाशिक
         18/02/19

1 टिप्पणी:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!