फॉलोअर

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१९

भोपळ्याचं झाड ... अखेर

पूर्वार्ध :- https://kattayashashri.blogspot.com/2019/02/blog-post_21.html?m=1
भाग 2 :-  https://kattayashashri.blogspot.com/2019/02/2_23.html?m=1
आता अखेर......           
                     देवरूषीला मोठ्या मिन्तवारी करून गावकऱ्यांनी कुठूनसा आणला खरा...... पण झाडाचं नाव आणि घडला प्रकार ऐकताच तो पळून जाऊ लागला. डॉ. यथार्थ हात जोडून त्याला म्हणाले,   "वाट्टेल तेव्हढे पैसे मी देईल काय सांगशील ते करीन माझ्या लेकीला वाचव." अचानक त्यांच्या डोळ्यात पाहत देवरूषी म्हणाला, " झाडानं जीत्ता सोडला व्हय रं तुला??"  बसकण मारत त्यानी आपल्या जवळील वस्तूंची मांडामांड सुरू केली. कसली कसली लाल काळी मंडळे काढली ... काळे तीळ शेळीचा केस... काय काय विचित्र गोष्टी गावकरी भराभर पुरवत होते आणि तो मांडत बसला...... अचानक त्याने भोपळ्याच्या झाडाचे फळ आणि पाने मागितली. सारेच मागे सरले...   हे शक्य नाही . नाही नाही म्हणत माना हलवू लागले . अचानक डॉ. यथार्थला काहीतरी आठवले... धावत जाऊन त्यानी गाडीतून बॅग काढून आणली त्यात भोपळ्याचे फळ आणि पाने होती... सकाळीच त्याने ती परीक्षणाचे नमुने म्हणून गोळा केली होती.सगळे बसल्या जागेवर उडालेच...सगळ्यांची तोंडे आश्चर्याने वासली होती... " हे तू आनलस व्हय रं पावन्या??" देवरूषी ने विचारले. डॉ. यथार्थनी होकारार्थी मान डोलवत पुन्हा मनातला प्रश्न पुढे केला,
" पण मला कसं काही झालं नाही? मी कसा वाचलो??" देवरूषीने त्याला समोरच्या लाल मंडळात बसवले ... मोठमोठ्याने तो काहीबाही म्हणू लागला.
               त्या दोघांच्या मधल्या जागेत अग्नी पेटवून त्या देवरूषीने आहुती टाकायला सुरुवात केली .डॉ. यथार्थनी त्या लसलसत भडकलेल्या ज्वालांकडे एकवार एकटक पाहिले...न सहावून डोळे मिटून घेतले. पुन्हा तेच दृश्य तिच हाक वनाची " Please पपा तुम्ही हे करू शकता ह्या झाडाला मुक्ती द्या." वना ssवना ss हाकारात ते भानावर आले ... घामाघूम झाले होते धाप लागली होती.
           घडला प्रकार त्यांनी देवरूषीला सांगितला. डोळे मिटून देवरूषी किंचाळला ... " तुझी लेक बोलावतेय तुला पन तिला  वाचीव न्हाई म्हनत...झाडाले मुक्ती दे म्हणतेय .. खरं बोल" त्याने दरडावून विचारले तरीही डॉ. यथार्थचे उत्तर तेच होते. देवरूषी ने त्याच्या  डोक्यावर एक काळी विचित्र काठी ठेवत भोपळ्याचे फळ त्या आगीसमोर जोरदार आपटून फोडले आश्चर्य म्हणजे एकही बी नव्हती त्या विचित्र फळात...कसा तरी घाणेरडा चीक बाहेर पडला आणि आगीत भस्मसात होत काळा ठिक्कार पडला .. अचानक आगीडोंब उसळला ... त्या आगीत जणू एखादा चित्रपट पहावा तसा झाडाचा भूतकाळ यथार्थ पाहू लागले.
                स्वातंत्र्यपूर्व काळ असावा..रेमंड नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्या कडे मऱ्या ढोर नावाचा गडी  कामाला होता. रेमंडला झाडांची खूप आवड ... झाडांची निगा राखण्यासाठी त्यानं मऱ्याला ठेवला.या मऱ्याच झाडांवर विलक्षण प्रेम... तो मायेनं झाडं लावायचा नी ती छान फुलायची... त्याच्या हातानी झाडं सहजी जगत. त्यानी रेमंड ची बाग सुंदर फुलवली ... अनेक वर्षे काम करत असल्याने त्याची मऱ्यावर विलक्षण माया बसली ... आपल्या मायभूमीत परततांना तो मऱ्याला सोबत घेऊन परतला.
            उभे आयुष्य त्याने रेमंडच्या बागेची देखभाल केली. रेमंडच्या अखेरच्या दिवसांत त्याने बरीच मोठी संपत्ती मऱ्या ला दिली आणि आपल्या बागेतील काही झाडांच्या बिया आणि रोपे देखिल दिले. रेमंड च्या मृत्यूनंतर मऱ्या मायदेशी त्याच्या गावाला सुलतानपूरला परतला. तसा तो एकटाच होता ना लग्न ना पोरबाळ...
               आपण अन आपली झाडं यांच्याबरोबर उतरणीला लागलेले आयुष्य काढावे असा विचार करत त्याने मूळ गावापासून जरा लांब शांत ठिकाणी हा वाडा घेतला .. जरा पडका होता पण डागडुजी करून सुंदर नटला... आजूबाजूला त्याने सुंदर बाग फुलवली. परदेशातून आणलेले विविध बियाणे आणि रोपे त्यानी रुजवायचा खूप प्रयत्न केला .. पण व्यर्थ एकही रुजेना.दर वेळी तो खट्टू होऊन जातं असे.
                  एक भोपळ्या सारखे दिसणारे झाड मात्र रुजले ....☺ ते इवल रोप पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.त्याच वेळी गावात अचानक काही दुर्दैवी घटना घडल्या अनेक तरुण मुले अचानक रात्रीतून मृत्युमुखी पडले....त्याचं खापर या अघोरी झाडावर फोडण्यात आलं. मुलांनी कुठल्याश्या प्रकारची हातभट्टीची दारू प्यायल्याचे मात्र सारेच विसरले. खरंतर ते इवल झाड नुकतच कुठे रुजलं होतं. अंतस्थ प्रकार असा की मऱ्याच्या संपत्ती वर आणि घरावर डोळा ठेवणारे अनेक जण गावात होते. त्यांनी तुझे हे झाड राक्षसी आहे अश्या कथा पसरवल्या ... लोक ते झाड नष्ट करायला धावून आले. मऱ्याने अडवायचा खूप प्रयत्न केला ... म्हातारा दुबळाच तो ... या सगळ्या प्रकारात मऱ्याचा बळी गेला. तिथेच त्याला पुरून एक थडगे बांधले गेले. आता तो वाडा रंगमहाल बनला. अवैध कृत्यांना उत आला... ते झाड मातीतून पुन्हा वर आलं नी जोमानं वाढतंय याकडे सगळ्यांच दुर्लक्ष झालं.
                   झाडाची मूळे मऱ्याच्या थडग्यापर्यंत पोहोचली अन झाड राक्षसी वेगानं वाढू लागलं ... मऱ्याच्या व्यथा वेदना.. त्या परदेशी झाडाला वाढवण्याचं अधुरं स्वप्न सारेच जणू खतपाणी बनून त्या झाडाला वाढवू लागलं त्या झाडाला कुणीही पाणी घालत नव्हतं तरी ते वाढत होतं.. अजस्त्र अवाढव्य... आता पट्ट्यात येईल त्याला झाड हाक घालू लागलं अन शोषून घेऊ लागलं ...शास्त्रीय भाषेत  झाड परजीवी झालं होतं. त्या negative energy वर ते फोफाऊ लागलं मग काय अविधी कृत्यांना उत आला
.. लोक गायब होतात म्हणून अमावस्येला कोंबडे बकरे कापले जाऊ लागले... अनेक दंतकथा पसरल्या.
             भडकलेल्या ज्वाळा अचानक शांत होत विझल्या ... भोपळ्याच्या झाडाचं पान हवेत भिरभिरलं नी डॉ. यथार्थच्या मस्तकावर जखम झाली तिथे पडल. डॉ. यथार्थ काय समजायचं ते समजून चुकले. तात्काळ त्यांनी एक कुऱ्हाड फावडे , थोडे रॉकेल नी माचीस मागितली नी धावत सुटले भोपळ्याच्या झाडाच्या दिशेने... त्यांच्या पाठी देवरूषी नी सारा गाव काय होतंय हे पाहायला गेला. सरळ कुंपण ओलांडून आत येत त्यांनी थडग्याकडे धाव घेतली थडग्याला हात जोडून ते म्हणाले ," मऱ्या दादा तुमचे बाग लावायचे स्वप्न नक्की पूर्ण करीन .. वेगवेगळ्या देशांतून आणलेली झाडे येथे लावीन मी वचन देतो ..मी वचन देतो " म्हणत त्यांनी थडगे फोडण्यास सुरुवात केली. अचानक झाडाची सळसळ वाढली . झाडाच्या अजस्त्र फांद्या विव्हळू लागल्या ... जोरजोरात मोठमोठे भोपळे डॉ. यथार्थांच्या दिशेने फेकले जाऊ लागले... कडकडा फांद्या मोडून पडू लागल्या... अविचलपणे ते आपले काम करीत राहिले ... झाडाच्या माराने त्यांना फोडून काढले होते..... थडगे पूर्ण फुटले पुन्हा एकदा हात जोडून त्यांनी ते पेटवून दिले... पानांच्या आवाजाने रौद्र तांडव सुरू केले . थडगे पूर्ण पेटून विझले आणि गगनभेदी आवाजाने झाड वाड्याच्या दिशेने मोडून पडले. त्या अजस्त्र झाडाचा आवाज असा होता की सगळ्यांनी कानावर हात ठेवले... झाड वाड्यावर पडले आणि वाडा आणि ते हिरवे कंच झाड़ जळून त्याचा कोळसा झाला... विशाल राक्षसी धूर आकाशात तोंड वासून नष्ट झाला.
               झाडाच्या बुंध्याशी वनश्री पडलेली होती देहाचं मुटकुळ करून ... बेशुद्ध होती रक्त शोषले गेल्याने फिकुटलेली पण जिवंत होती . अत्यानंदाने त्यांनी तिला जवळ घेतलं ... गावकरी मदतीस धावले तातडीने त्यांना काही प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालयात हलवले... वनश्री ला अनेक बाटल्या रक्त चढवावे लागले ... पंधरा दिवसांनी ती पूर्ण शुद्धीत परतली.... हे दुखणं कदाचित तिला पुढचे अनेक दिवस पुरणार होते...पण ती सुखरूप होती. डॉ. यथार्थ देखील जीवघेण्या आघातातून आठवडाभरात बरे झाले . अजूनही डावा हात मोडला असल्याने गळ्यात लटकवून फिरत होते. त्यांना कसं काही झालं नाही ? हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता... झाड त्यांच्यावर वार करत होते पण त्यांना नेऊ शकले नाही . डॉ. यथार्थ सारे उमजून हसले... आयुष्यभर त्यांनी झाडांवर प्रेम केले होते त्याचं संरक्षक वलय त्यांच्या भवती असावे... तिथं असणाऱ्या negative energy ला त्यावर मात करता आली नाही. 
               वर्षभरात ते मोठ्या ट्रक सोबत आणि बॉटनी चे आपले बरेच सहयोगी विद्यार्थी घेऊन परतले.... त्या भोपळ्याच्या झाडाच्या आवारात अनेक परदेशी झाडांचे रोपं त्यांनी केले... पूर्णवेळ तेथे कामाला गाडी माणसे स्व खर्चाने लावून आगळ्या प्रजातींचे सुरेख उद्यान फुलवले ... सगळीच्या सगळी झाडे उत्तम रुजली ..  ही आगळी बाग पाहायला दुरदुरुन लोक येत... गाव प्रसिद्ध झाले... मात्र उद्यानाचे नाव मात्र तेच  होते..... "भोपळ्याची बाग "
©यशश्री रहाळकर

७ टिप्पण्या:

  1. शेवट उत्तम. वाईटतूनही चांगलच बाहेर पडत चांगला मतितार्थ

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!