नवरायण
▪▫▪▫▪▫▪▫
कुठल्याश्या व्हाट्स अँप ग्रुप वर ,14 फेब्रुवारी प्रेमदिना निमित्त नवऱ्याने आपल्या बायकोला लाल गुलाब🌹 दिला तर ...... विविध राशींच्या बायकांची प्रतिक्रिया काय असेल ??असा काहीसा मॅसेज आला .. 99% बायकांचे यावर एकमत झाले की नवरा 🌹लालच काय कोणताच गुलाब देणार नाही .. पूर्वीही कधी दिला नाही (दीर्घ अनुभवीचे मत ) 60% बायकांचा विश्वास तर एव्हढा दांडगा की .." आमचे नवरोबा... गेला बाजार मोगरा, शेवंती नाहीतर चाफाही देणार नाही ... गुलाबाचं काय घेऊन बसलात ." 20% बायकांनी आदर भावाने " दसरा दिवाळीला झेंडू आणतात ग बाई तेच फार वाटते ! " असेही सांगितले . आता भारतीय नवऱ्याचं अन फुलांचं 💐 काय वाकडं आहे कोण जाणे?? काही सन्माननीय अपवाद वगळता भारतात नवरे Romantic वगैरे नसतातच ...
💐एक पिढी पूर्वीच्या कथा कादंबरी मधून रंगविलेला प्रसंग साधारण असा असतो ... तो जो कोणी कथेचा नायक आहे तो कचेरीतून (ऑफिस मधून :- तेव्हा कचेरीच म्हणत ) परततांना मोगऱ्याचा गजरा आणून गुपचूप स्वयंपाकघरात राबणाऱ्या बायकोच्या अंबाड्यावर माळायचा....😍 ... आता असले काही नसणार ... एकतर बहुतेकींचे केस इवले ,अंबाडा तर दूर पोनीटेल पडली तरी बास ... आणि दुसरे ... 10 ते 5 अशी ऑफिसेस हल्ली कुठं असतात ? घरी परतण्याची कोणतीही वेळ नसणारे .. कधीतरी जेवणाच्या वेळी परतणारे ...कसे बरे गजरा माळतील ?
लग्नाला साठ वर्षे झालेल्या एक आजी मला लग्न ठरल्यावर सल्ला देतांना म्हणाल्या होत्या, " हे बघ ! भारतात वाढलेला मुलगा नवरा होतांना नवराच असतो ... 😳 उगाच त्याचा मित्र, प्रियकर, पाठीराखा करायला जाऊ नये ... त्या बिचाऱ्यावर ताण येतो अश्यान ... मग अतीताणान जो जो उत्तम नवरा होऊ शकतो तो होत नाही. " आजीबाईंचे विचार ऐकून मी थक्क झाले ... पण यालाच बहुदा अनुभवाचे बोल म्हणत असावे . (काळाच्या ओघात प्रचिती मिळतेच) एकंदरीत आजवर पारायणे केलेली सगळीच पुस्तके व्यर्थ म्हणायची ... ... आयुष्यात पहिल्यांदा मला पुस्तक प्रेमी असल्याचं अतीव दुःख झालं .
माझ्या चेहऱ्यावरील भाव वाचून आजी पुढं धीर देत म्हणाल्या .. " मनात पक्की गाठ मारून ठेव .भारतात नवरे दोनच प्रकारचे असतात ...
प्रकार पहिला :- वाईट नवरा
मारहाण करणारा ,संशय घेणारा , दारू पिऊन तमाशे घालणारा ... या प्रकारचा नवरा असेल ... अन जिवंत राहायचे असेल तर त्या क्षणी परत ये .
प्रकार दुसरा :- वाईट नसलेला नवरा
वरील दोष नसणारा नवरा ... त्याला सुधारवायला आपल्याकडे आयुष्यभर वेळ असतो . बहुतेक नवरे याच प्रकारचे असतात. तयार (ready made)चांगला नवरा असं काही नसतंच . तुम्ही आजकालच्या मुली चांगला नवरा शोधायला जाता अन तिथेच हरता ... पराभूत होता अन लग्न मोडता ... मुळात नवरा हा वाईट नाही म्हणजे तो चांगला करणे आपल्याच हाती असते नाही का ?" 🙏 मी आजीबाईंना साष्टांग दंडवत घातले ... आजही मी ही बोधवाक्ये मनोमन गिरवत असते 😉
भारतीय स्त्रियांच्या त्यागावर आणि समर्पणावर एकहाती लग्नसंस्था टिकून आहे , हे मला मुळीच मान्य नाही . वाईट नसलेला नवरा या प्रकारातील बहुसंख्य नवरे भारतात आहेत म्हणूनच भारतीय लग्नसंस्था टिकून आहे . आता हे वाईट नसलेले नवरे अनेक उपप्रकारात मोडतात जसे ...
* खवय्या नवरा
या प्रकारचे नवरा सुगरण बायकांच्या वाट्याला आला तर संसार सोन्याचा होतो .....ती स्वयंपाक करते आणि तो कौतुक . ....मात्र स्वयंपाकाचा कंटाळा असेल तर कठीण आहे 😢 अमुक भाजीत मुगडाळ च टाक, अमुक वड्याच कर , लाडूच कर असे सांगून भंडावून सोडतात . बायकोचा एकंदरीत स्वयंपाकातील उजेड पाहता हे स्वतः च बल्लवाचार्य होत हाती शस्त्र धरतात मग मात्र ते आयुष्यभर अत्यंत उत्तम नवरा म्हणून मान्यता मिळवितात.
* संतापी पती
ह्या प्रकारचे नवरे एक दोन पिढ्यानपूर्वी बहुसंख्य असायचे आता हा प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . तरीदेखील प्रत्येक पती कधी ना कधी रुद्रावतार धारण करून आपल्या पूर्वजांचे स्मरण करतोच .
लहानपणी घराशेजारी राहणारे एक अण्णा ' सद्दाम ' या नावाने ओळखले जात .... भल्या पहाटे उठून ते मोठा पितळी बंब पेटवित आणि सोबत तोंडही ... तोंडात लाकडे पेटवून ठेवता येत नव्हती.. 🗣 एव्हढाच काय तो फरक ..... मुलामाणसांनी भरल्या घरात त्यांच्या वाऱ्यालाही कुणी उभे राहायचे नाही. अण्णा आले म्हटले की आम्ही जीव खाऊन आपापल्या घरी पळत सुटायचो. त्यांचा सारा संताप पचवून डोक्यावर आयुष्यभर बर्फ़ाची लादी ठेवून नानी त्यांची पत्नी शांतपणे त्यांना सावरून घेई....... गेल्या वर्षीच्या भेटीत 92 वर्षांचे अण्णा लहान लेकरासारखे ढसाढसा रडले ... नानी खूप आजारी होत्या ... तिच्याशी आयुष्यभर प्रेमानं शब्दही बोललो नसल्याची खंत त्यांना होती शिवाय ती गेली तर ?? हे पोरकेपणाच भय होतच.
* कंजूष पती
स्वभावाने अत्यंत किचकट पै न पै चा हिशेब ठेवणारे कंजूष पती... ही बहुतेक बायकांपुढील मोठ्ठी समस्या असते.अत्यावश्यक कामांनाच केवळ ते पैसे देत असतात ... मग हुशार बायका भाजी 300 ची झाल्यावर 500 ची अन किराणा 700 चा झाला की 1000 चा अश्या round figure करतात , यात त्यांचा मुळीच दोष नसतो. बऱ्याच साड्या दागिने आईने दिले भावांनी दिले म्हणून सांगावे लागते... हे लोक दीर्घकालीन गुंतवणुकीसारखे आहेत म्हातारपणी अश्या नवऱ्याच्या बायकोला मुलांपुढे हात पसरवावे लागत नाहीत.🙄
* भांडकुदळ भ्रतार
अश्या प्रकारचे नवरे असणाऱ्या बायका अत्यंत हुशार असाव्याच लागतात ... हा प्राणी या आयुष्यात सुधारणे शक्य नाही ही ज्ञानप्राप्ती एकदा झाली की पुढचा मार्ग सुकर होतो ... मग त्याला सुधारण्यात आयुष्य व्यर्थ न घालवता इतर अनेक कल्पक , कलात्मक गोष्टींत स्वतः ला गुंतवून घेणे सोपे जाते ... वैयक्तिक विकासाच्या संधी या बायकांना अधिक उपलब्ध होतात ... कारण समाजातील अनेक लोकांशी नवऱ्याने भांडून ठेवल्याने ... सामाजिक उपक्रमातील वेळ वाया जात नाही.
* कुजकट नवरा
या प्रकारातील लोक कायम कटू आणि कडूच बोलत असतात ... टोमणे आणि शेरे मारणे हे त्यांचे आत्यंतिक आवडीचे काम असते.सवयीने बायका त्या वायफळ बदबडीला कानाच्या पडद्याच्या आत पोहोचुच देत नाहीत... बाकी तसे हे नवरे निरुपद्रवी बिनविषारी सापासारखे असतात...... फक्त साप म्हणून घाबरावे ... हे खुष😝 "तुला काही समजत नाही . " ही या लोकांची बायकोशी बोलतांना ची सुरुवात असते ... बायको चांगलीच समजून घेते काय ते?
बरेचदा नवरा एकाच नव्हे तर अनेक गटांतील गुणधर्म दर्शक असतो ... म्हणजे खवय्या आणि कुजकट किंवा चिडका आणि भांडखोर ... पण अगदीच कसाही असला किंवा नसला तरी रोमँटिक नवरा नसतोच ... किंबहुना प्रेमदिन गुलाब वगैरे ही लग्नापूर्वीची कामे असेच त्यांचे स्पष्ट मत असते . ज्यांचे प्रेमविवाह होतात त्यांचे एक बरे असते ... आधी मित्र, मग प्रियकर आणि मग नवरा असे टप्प्याटप्प्याने नाते उलगडले असते ... आम्हा कांदेपोहे अन लग्न वाल्यांचे जाम हाल होतात .... अचानक भयानक नवरा नावाचे वादळ आयुष्याच्या किनाऱ्यावर धडकते ...तरी आजकाल अण्णा ,तात्या ,नाना नसल्याने बऱ्याच अंशी नवरे उत्तम मित्र बनतात ... एक जोडीदार म्हणून उत्कृष्ट साथ ,आदर देणे, नात्यातील जबााबदारी ते निश्चित निभावत असतात.... .. पण पण ... अधिकस्य अधिक फलं या न्यायान वाटत राहतं नवरा रोमँटिक सुद्धा असावा .
कुजकट ,भांडखोर ,रागीट असा कसाही नवरा असला तरीही भारतातील स्त्रिया वटपौर्णिमा करवा चौथ यांसारखी व्रते श्रद्धेने करतांना दिसतात ... ह्याच्या मागे खूप गोड गुपित दडलंय .... भारतीय नवरा एक आदर्श बाप असतो... स्वतः च्या सुखाचा विचार बाजूला सारून बरेचदा तो आपल्या लेकरांच्या हौशी भागवत असतो... लेक झाली की तिच्या लग्नासाठी पैं पै जोडत जातो जमेल तसे सोने घेत जातो ... मुलगा झाला की जमीन घे प्लॉट घे या मागे लागतो ... आपल्या बाळाचं भविष्य कसं सुरक्षित होईल हिच त्याची धडपड असते ... प्रसंगी आजारी पत्नीचा देखील तो बाप होतो ... तिची प्रेमानं सेवा करतो ... पत्नीच्या निधनानंतर खचून जातो एकटा पडतो.कधीतरी हिटलर वाटत असला तरी देखील एक खांबी तंबू प्रमाणे सारं घर हा बाप माणूस तोलून धरतो.. कधी स्वतः च छत बनतो अन साऱ्या घराला पंखाखाली घेतो .
भारतात नवरा एकतर असा असतो ... नाहीतर रोमँटिक ...😆😆 भारतातल्या हुशार बायका असाच नवरा निवडतात ...... मग काय विसरा ते हार्ट शेप फुगे ❤ ते गिफ्ट्स💝 आणि लाल गुलाब🌹 सुद्धा 😢
🔏© यशश्री रहाळकर
नाशिक
5/1/19
साधेसोपे आयुष्य जगतांना अनेक आगळे अनुभव येतात .... त्यांना फुलपाखरासारखं हातात घट्ट धरून ठेवता येत नाही मुक्तपणे बागडू द्याव लागतं ... मात्र काही जाणीवा शब्दांत बांधून ठेवता येतात ... त्या लेख , कविता , कथा या माध्यमातून व्यक्त करता येतात ... अशाच काही ' तिच्या ' जगण्याच्या परीघातील कुंपणाआड दडलेल्या गोष्टी अन ते कुंपण ओलांडून अवकाशात झेपावणाऱ्या भरारी... माझ्या शब्दांत ... तिच्या आणि तिच्या पाठीशी असणाऱ्या त्याच्याही साठी
फॉलोअर
मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९
नवरायण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वाहह मस्त अभ्यास नवरायणाचा, मला तर वाटतं हे सगळे प्रकार थोड्या फार फरकाने प्रत्येक नवरोजी मध्ये असतातच ग त्याच स्वरूप फक्त वेगळं आणि समाजाला आपला नवरा कितीही साधा भोळा किंवा चांगला वाटलं ना तरी त्याची नवरे गिरी ही ती बापडी बायकोच जाणो ग बाई
उत्तर द्याहटवामयूरेश जपून रे बाबा
उत्तर द्याहटवानवरोबांचा सर्व एन्गलने अभ्यास केला आहे .आपण
दुबईला असताना लेख चांगला लिहिला आहे . कोणाचाही डिस्टर्ब नव्हता ना ?
लेख खुप आवडला यशश्रीजी .