फॉलोअर

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

C for credit

"C" for credit 
            ©®
सोशल मिडियावरील उचलेगिरी
🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏
           गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर एक तीव्र साथीचा रोग झपाट्याने संक्रमित होत आहे... तो म्हणजे  "उचलेगिरी ".... अर्थातच आपल्याला आवडलेल्या पोस्ट मधील व्यक्तीचे नाव काढून आणि पुढे जाऊन तेथे आपले नाव जोडून Credit ढापणे .. लाटणे .. बळकावणे ... हिरावणे .... असे सगळे " लाजिरवाणे" कृत्य साळसूद निलाजरेपणाने करणे.
        अनेक प्रतिथयश कवी , लेखकांच्या लेखणीतून झरणारे मोती उचलून हे उचले त्याची माळ गळ्यात मिरवित असतात . खरतर एखादी आवडलेली पोस्ट लेख वा कविता जशीच्या तशी forward करणे अधिक सोपे नव्हे काय ? पण ही मंडळी आपल्या विशेष कौशल्यांचा वापर करून अधिकचा रिकामटेकडा वेळ वापरून पोस्ट मोडून तोडून स्वतःसाठी वापरतात... whats app आणि facebook वर तर ह्या आजाराने संक्रमित अनेक लोक सहजी सापडतात. दुसऱ्याचे श्रेय सोयिसकररित्या हिरावून घेण्याची ही विकृती नव्हे तर काय?🙇🏻‍♀
            मृणाल कुलकर्णी ह्या नावासारख्याच चिरतरूण असणाऱ्या माझ्या सखीन  स्वतःच्या मंगळागौर गृपची ॲड नाजूक शब्द गुंफून अगदी नजाकतीने पेश केली ... नी हाय रे दुर्दैवा !!!... अल्पावधीतच अनेकांनी त्यात फक्त आपले नाव बदलून तिच ॲड पुढे केली. तनुजा जोशी डांगे नामक मैत्रीण वेट लॉस प्रोडक्ट संबंधित अत्यंत खमंग तडकेबाज लेख लिहिते .... नुकताच एकीने तिचा लेख facebook वर तसाच्या तसा आपल्या प्रोडक्ट साठी उचलला..अनेकींच्या निषेध,  विरोध,  नारेबाजीला घाबरून तिने तो काढून टाकला खरा पण साधी माफी मागण्याचे सौजन्य नाही.
आपण ' इदम्न मम ' म्हणायला कधी शिकणार ... जे ज्याचे आहे त्याचे श्रेय मिळूदेत की त्यालाच.
            यातही ladies first ...बायकांचा या बाबतीत कुणीही हात धरू शकत नाही .... ज्यांची नावे घेण्याचीही आपल्याला  हिम्मत करावी लागते... त्या गुलझार , जावेद अख्तर  वगैरे मंडळींच्या शायरी खुशाल आपल्या म्हणून खपवतात. एकीने तर कळसच गाठला... तिने पोस्ट केलेला शेर मिर्झा गालिब यांचा असल्याचे तिला स्पष्ट करताच " कोण वाचतय ग हल्ली... तुला जरा माझ कौतुक झालेल खपत नाही!" असे उत्तर दिले . मनाला नाही तरी copyright ला तरी घाबरा...😔
          वपु काळे यांच्या पुस्तकातील उतारे अन वाक्ये Good Morning thoughts म्हणून वापरताना वपुंचे आदराने नाव घेतले तर बिघडले कुठे? याहून मजेशीर प्रकार म्हणजे वाटेल तो प्रसंग आणि कथा महान लेखकांच्या नावाने खपविणे ... पुलंच्या आयुष्यात प्रत्यक्षात न आलेल्या प्रसंगांवर तर अक्खे पुस्तक लिहिता येइल.
इतिहासाचे विकृतीकरण ही याच आजाराची पुढील गंभीर अवस्था.
            एका अत्यंत जवळच्या व्यक्तीने मला एका मासिकासाठी लेख लिहायला लावला ... आणि पुढे भरपूर buttering करून... लेख प्रसिध्द व्ह्यायलाच हवा... मात्र तुझे नाव कसे देणे शक्य नाही वगैरे सांगत तो लेख स्वतःच्या नावाने छापला.... हे म्हणजे दुसऱ्याचे चोरून  आणलेले मूल स्वतः म्हणून वाढवणेचं .... या जगात सार काही ready made नसते हो मिळत ... प्रतिभा ही त्यातीलच एक दैवी देणगी.... तिचा सन्मान करा .
          आपण forward करत असलेल्या पोस्ट म्हणजे आपण त्या मतांशी  सहमत आहोत असे स्पष्ट होते... याची जाणीव खरच असते का? या सोशल मीडियाने आपल्याला साक्षर केले पण सुशिक्षित मात्र आपले आपल्यालाच व्हायला हवे. सोशल मिडीयावरील लहानमोठ्या tips , लेख , कविता ... आवडल्यास जरूर नावानिशी forwad करण्यातून आपण आपलीच प्रतिमा उंचावत असतो... Credit ह्या शब्दाचा अर्थ जसा पत प्रतिष्ठा आहे तसाच विश्वास आणि श्रध्दा देखिल आहे... त्याचप्रमाणे गुणान्मुळे प्राप्त झालेला सन्मान म्हणजे देखिल Credit .... असा सन्मान ज्याचा त्याला मिळू द्या...
लेख कविता म्हणजे आत्मजा.... आत्म्यापासून जन्मलेली.. असू देत कसेही ... पण आमचा तो बाब्याचं 👌🏻👌🏻 हजारोंचे गॅझेट्स वापरणाऱ्यानो..मन ही थोडस मोठ करा की..😊
         माझी ' माहेरपण' नावाची कविता whats app वर गाजली ... पण दुर्दैवाने माझे नाव गाळून ...याच विषयावर चर्चा करताना सीमा नावाच्या माझ्या  साहित्यप्रेमी मैत्रीणीने मोठी मार्मिक टिप्पणी केली होती...      " वेद अपौरूषेय होते असं म्हणतात ..तसं चांगल्या लेखांचे लेखक वाँटसेपवर गायब होतात."
         आवड म्हणून ..छंद म्हणून काहीबाही पण उत्तम लिहिणाऱ्या एखाद्या माझ्या ला मिळू देत ना कौतुकाची थाप  !!! शेवटी काय तर... दुसऱ्याचा मौल्यवान ऐवज स्वतःचा सांगणारा चोरच असतो.... प्रत्येक वेळी कायद्याचा बडगा कशाला??
✒© यशश्री रहाळकर
(लेख  आवडल्यास तोडफोड न करता नावासह Forward कराल अशी अपेक्षा बाळगते... धन्यवाद🙏🏻 )

1 टिप्पणी:

  1. त्रिवार सत्य. वाचनाची आवड असणाऱ्या माणसांना आपल्या आवडत्या लेखकाच्या नावावर दुसराच लेख तिसऱ्याच नावाने फॉरवर्ड होवून येतो. अशी तिडिक जाते मस्तकात!! वर लेखक बघू नकोस ग! अर्थ महत्वाचा असा ही सल्ला एकाने दिला होता. डिलीट करणे एवढेच हाती आपल्या !!

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!