फॉलोअर

गुरुवार, २८ मार्च, २०१९

रंगीत चिमण्या

रंगीत चिमण्या

पिल्लाला शाळेत सोडायला जावे
तर अवचित पाय रेंगाळतात...
लाल निळ्या पिवळ्या सोनेरी
कितीतरी चिमण्या दिसतात.

मण्या -मण्या सारखे भिरभिर
डोळे टपोरे चमकदार...
उडतात घरट्याच्या दूर स्वतंत्र
जणू कित्ती जबाबदार.

निरागस कुतूहल नवीन जगाचं
नकळत लुकलुकतं डोळ्यात...
आईच्या पंखांपेक्षा वेगळं वारं
जणू घेतात भरून श्वासात.

उडणाऱ्या पिल्लाची पहिली भरारी...
पक्षिणीची खरी परीक्षा असते.
आजवर पंखाखाली राखलेल्या
तिच्या सर्वस्वाची परिभाषा असते.

अश्या या रंगीत चिमण्या
दर वर्षी भेटतात
मोठ्ठे पायघोळ झगे
ऐटीत सावरत जातात

कुणाची नवी बॉटल,
कुणाची नवी पिन ,
कुणाच्या दोन वेण्या ,
कुणाची रीबिन...

गोड निरागस चिमण्यांना
उडण्याची घाई
रंगीबेरंगी जग सारे त्यांच्या
डोळ्यांत उमटून जाई.

झोकात बाय करून
त्या बागडत जातात....
दिसेनाश्या होईपर्यंत आयाच
हात हलवीत बसतात.

रंगीत चिमण्या हुशार झाल्यात
आता शाळेत जातांना रडत नाहीत...
क्षणभर वळून सुद्धा न पाहती
सदैव असतात घाईत.

गेटपाशी एखादी आई
डोळे पुसत असते
एका निरोपाची क्षणी
जणू खूप काही शिकते...

रंगीत चिमण्यांच्या निरोपाचे
क्षण टिपते मी नेमाने...
जोडून जोडून मनाची
तयारी करतेय प्रेमाने.

कधीतरी कायमची पाठवणी
करावी लागेल माझ्या चिमणीची..
तेव्हा भूमिका जमवावी लागेल
पिल्ले उडालेल्या पक्षिणीची..
🔏©यशश्री रहाळकर
          नाशिक
      28/03/19

२ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!