फॉलोअर

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

डाळिंबी पैठणी

                 आज सासूबाईंचा दहावा दिवस ... प्रदीर्घ काळ सोबत राहून माणसं खरी उमगतात का? फोटोला हार घालतांना वसुधाच्या मनात आलं. गेली 42 वर्षे दिवस रात्र सावली सारख्या सोबत राहिलेल्या सासूबाई ...एक विचित्र पोकळी करून गेल्या....दुखणं नाही की आजारपण नाही वय 84 च्या घरात पण कष्टीक शरीर,नावाला औषध नाही .नेहमीच्या दिनचर्येप्रमाणे सकाळी मंदिरात जाऊन आल्या... थोडा मऊ भात खाऊन झोपल्या ते कायमच्याच.. तश्या त्या दिवशी त्या अतिशय प्रसन्न होत्या देवाला मनापासून हात जोडत काय म्हणाल्या कोण जाणे? करड्या शिस्तीच्या, टोकाच्या तापट... छळ म्हणावा असं नसलं तरी बराच कठीण काळ वसुधाने निभावून नेला होता.... कदाचित म्हणूनच सासूबाई गेल्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलेच नव्हते. स्थितप्रज्ञागत भेटीला येणाऱ्या प्रत्येकाशी ती बोलत होती.
                        वसुधाचे वडील , वडील काय असतात ?हे कळण्यापूर्वीच वारले .. चौदाव्या वर्षी आई देखिल आजारपणाचे निमित्त होऊन गेली... जबाबदारी म्हणून अंगावर पडलेल्या ह्या पोरक्या वसुधाला मामाने जरा होतकरू मुलगा पाहून उजवायचे ठरवले. वसंतराव जोशींचे ठिकाण कळले..  मुलगा वसुपेक्षा 10 वर्षांनी मोठा , वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याच जागी पोस्टात लागलेला , घरची बेताची परिस्थिती, पाठच्या दोन बहिणी आणि भावाची जबाबदारी.... असे असतांना मामाने वसुला उजवले. 17 वर्षांच्या वसुधाचा दोन खणी घरात संसार सुरू झाला... घरादारावर सासूबाईंचा प्रचंड वचक होता... सगळी मुलं त्यांच्या धाकात होती. प्रत्येक पैचा हिशोब त्या ठेवीत. अतिशय कष्टानं त्या जमेल ते काम करत हातभार लावीत.वाती वळत, लोणची मसाले करीत, वाळवण करीत. वसुधा देखिल साड्यांना फॉल पिको करू लागली .. हळूहळू शिवण शिकली. दिवस ढकलले गेले... दोन्ही नणंदांची सुस्थळी लग्ने झाली. दिर बंगलोरला नोकरीला लागला.. त्याचे लग्न ,घर संसार सारे नीट जमून आले. एकीकडे वसुधाच्या झोळीत मात्र निराशाच होती.लग्नानंतर तीन वेळा आपले बाळ तिला पोटातच गमवावे लागले ... अखेर लग्नानंतर 11 वर्षांनी वरदचा जन्म झाला... "सासूबाईंनी किती कडक उपास तापास केले होते त्याच्या वेळी.." वसुधाच्या मनात आठवणींची उजळणी सुरू होती.
                       एव्हढ्यात दारात कुरियरवाला आला... सौ. वसुधा वसंतराव जोशींचे कुरियर म्हणत भला मोठा बॉक्स देऊन निघून गेला... आता काय असावे हे?? सारे भवती गोळा झाले. बॉक्समध्ये अतिशय सुरेख डाळिंबी रंगाची पैठणी होती... जाऊ ,नणंदा नावे ठेवू लागल्या... हे का दिवस ? सुतकात कुणी पैठणी घेतं होय? सारं वसुधाच्या समजशक्ती पलीकडे होतं... तिनी काहीच मागवलं नव्हतं... आताच काय गेले 42 वर्षे तिने स्वतः साठी हट्टाने काहीच घेतलं नव्हतं. जे मिळेल जसं मिळेल त्यात ती खुश असायची.. तिच्या फार अपेक्षा नव्हत्याच कधी.. त्यात एव्हढी महागडी साडी कशाला मागवणार? वसंतराव सावरून घेत म्हणाले,"वरदने मागवली असेल हो ऑनलाइन! surprize का काय ते!"  त्यांचा लेक वरद हुशार मेहनती होता ... बँकेच्या परीक्षा देत अधिकारी झाला... त्याचेही लग्न या वर्षी करायचे होतेच. "नातसुनेचे तोंड सासूबाईंना पाहता तरी यायला हवे होते",वसुधाच्या मनात येऊन गेलं.वरद घरी येताच साऱ्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली... खरंतर त्यालाही ह्या पैठणी विषयी काहीही माहीत नव्हते.हे प्रकरण कमी की काय म्हणून दुसऱ्या दिवशी साठे ज्वेलर्स चा माणूस सोन्याची नथ देऊन गेला... त्याही पावतीवर वसुधाचेच नाव... झाले नणंदानी गळे काढले,"आमच्या आईच्या मरणावर टपली होती. तेरा दिवस तर थांबायचे रितीला.. डोळ्यात टिपूस नाही हो हिच्या..."वगैरे वगैरे. वसुधाला तर काहीच कळत नव्हते... आपण काहीही न मागता हे कुणी आणि का मागवले होते??दुसऱ्या दिवशी मोतीवाल्या पेठ्यांकडून मोत्याचा तन्मणी आला अन घरातील लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला. कधी नव्हे ते वसंतरावही त्राग्याने म्हणाले,"उद्या आईच्या तेराव्याला काय मागवलंस वसुधा ? तारुण्यात कधी काहीही घेतलं नाहीस आता म्हातारचळ लागलाय का? दोन तीन वर्षांत साठची होशील तू!" बिचाऱ्या वसुधाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता.
                       तेराव्याला सासूबाईंचे दूरचे एक बंधू देशपांडे वकील अचानक आले. सारे विधी वगैरे संपल्यावर त्यांनी एक लिफाफा काढून वसंतरावांच्या हाती सोपवला... त्याचे सर्वांदेखत वाचन व्हावे अशी अखेरची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. त्या लिफाफ्यात एक पत्र होतं... थरथरत्या हातांनी लिहिलेलं ... होय सासूबाईंचेच अक्षर! सारे कुटुंबीय गोळा झाले..वसंतराव पत्र मोठ्याने वाचू लागले.... "प्रिय वसुधा... तुला कधी सांगितलं नाही पण माझ्या घरात माप ओलांडून आलीस त्या दिवसापासून मला तू मनापासून आवडली होती.तुझे सात्विक वागणे, निरपेक्षपणा ..सर्वांना सामावून घेणे यांमुळे तू अधिकाधिक लाडकी होत गेलीस... मात्र प्रांजळपणे कबूल करते...आई म्हणून माझा स्वार्थ आड येत राहिला. कौतुकानं तू बिघडशील, कुठंतरी तू हाताबाहेर होशील आणि वसंताला वेगळी चूल मांडायला लावशील ... मग माझ्या पोरांचं काय होणार?? हा कोता विचार करत मी तुझ्याशी वाईट वागत होते...तुमचे नवलाईचे दिवस सुद्धा मी साजरे करू दिले नाही... तुझी कुठलीच हौसमौज वसंताला करू दिली नाही... तशी तू तृप्त समाधानी होतीस म्हणा... कधीच काही मागितलं नाही.....वसंता तुझीही अपराधी आहे रे बाबा! बायकोला गजरा आणला म्हणून केव्हढं बोलले तुला... आज शरम वाटते हो माझीच मला......" वसंतरावांचा गळा भरून आला. बहिणीने पाठीवरून हात फिरवला.. वसुधा शांतपणे कोपऱ्यात बसून ऐकत होती.
                  पुढे ओल्या स्वरात ते पुढं वाचू लागले... "वसू ....माझ्या लेकी सासरी सुखात आहेत धाकटाही उत्तम आहे... सारे सुखात आहेत.. फक्त तुझी कोणतीच हौसमौज मी करू शकले नाही ही टोचणी अनेक वर्षे सलते आहे.... अनेक वर्षांपूर्वी , एकदा तुझ्याकडे फॉल पिकोला आलेली पैठणी लावून आरश्यात न्याहाळताना मी तुला पकडले... वाट्टेल तशी बोलले... तू गप्प राहून सारे सहन केले... तुझ्या वयाला साजेसेच तू वागत होतीस ... माफ कर पोरी! तू भलते हट्ट धरलेस तर ते परवडणारे नव्हते ग आम्हाला! पांडुरंगाकडे रडले त्या दिवशी मी ...त्याला सांगितलं एकदा अशी पैठणी तिला विकत घेऊन देऊ शकेन एव्हढे बळ दे! दिवसेंदिवस हे स्वप्न मला व्यापून टाकू लागले... मी तुला पैठणी घेणारच असे मनाशी निश्चित केले.हाती येणारे थोडे थोडे पैसे मी पोस्टात जमा करू लागली... गुपचूप बरका!अगदी दोन, पाच किंवा दहा रुपये सुद्धा. पैसे तर साठले पण डाळींबी रंग हवा तसा मिळेना... शेजारच्या गोगटे बाईंसोबत सारी साड्यांची दुकाने पालथी घातली. शेवटी येवल्याच्या विणकराशी संपर्क साधून हवी तश्शी बनवुनच घेतली.... डाळिंबी रंग अन मोराचे बुट्टे ...सुरेख दिसेल हो तुला! येईल एक दोन दिवसांत घरपोच... आणि अग !अगदी भारीतली पैठणी घेतली तरी पैसे बरेच उरले... मग माझ्या तरुणपणी डोळ्यांत भरला होता तसा डाळिंबी खड्यांचा सुरेख तन्मणी करायला दिला...मला म्हातारीला नव्हे ग तुलाच. सोन्याची नथ करायला दिलीये साठे सोनारा कडे ...ती मात्र नातसुनेला हो! वरदच्या लग्नाचे पाहताच आहात ... त्याच्या बायकोला गृह प्रवेशाचे वेळी द्या . आजेसासूने दिलीये सांगा तिला.
                       माझ्या दोघी लेकी आणि धाकट्या सूनबाईंच्या नाकावर राग आल्याचं दिसतंय हो मला स्पष्ट....आम्हाला कसे काही दिले नाही? पण खरं सांगू माझे अन वसू चे नाते वेगळेच होते....पोटची लेक नव्हती इतकेच.. माझ्या चारही अपत्यांपेक्षा कणभर अधिकच प्रेम मी वसूवर केले. वरदच्या लग्नात तुला या पैठणीत मिरवितांना पाहणे माझ्या नशीबात नाही .. आठवडा झाला पांडुरंग बोलावतो आहे... आता परतीच्या वाटेकडे डोळे लागले आहेत. ... वसू लवकरच तू माझ्या..म्हणजे  सासूच्या भूमिकेत शिरणार आहेस..वसू तू चांगली प्रेमळ सासू होशील हो!मात्र योग्य वेळी सुनेचे मनापासून कौतुक कर... माझ्यासारखी पत्रातून प्रेम व्यक्त करायची वेळ येऊ देऊ नकोस...सगळ्यांनाच खूप आशीर्वाद." पत्र पुरं होईतो सारे गंभीर झाले होते... तेरा दिवसांत पहिल्यांदाच वसुधाला सासूबाईंच्या जाण्याने झालेल्या पोकळीचा नेमका अर्थ उलगडला.अनेक क्षणांची बहुपदरी साखळी तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागली...मायेचे क्षण, सावरून घेतल्याचे क्षण , एकमेकींना धीर दिला ते क्षण ......कपाटातून काढून डाळिंबी पैठणीवर मायेनं हात फिरवत ती धाय मोकलून रडू लागली...
©यशश्री रहाळकर

९ टिप्पण्या:

  1. Pahilyanda aaj blog vachala ...khup chan lihala ahes ...tachkan dolyat Pani ala g ...ashich Chan lihat ja dear

    उत्तर द्याहटवा
  2. Khupach chaan...actually, Sagle chaanach astaat vel/paristithi kharab aste, ti ekda geli sagle vyavastit hote....

    उत्तर द्याहटवा
  3. आपली "डाळिंबि पैठणी"ही कथा खूपच छान,र्‍हदयस्पर्शि वाटली.

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!