पुन्हा एकदा, मी माझ्या मनाशीच "रिटायरमेंट घ्यायची आता"... असं ठरवलं. ऍडव्होकेट विद्या सबनीस गेली 35 वर्षे अखंड काम करताहेत आणि आता त्या थकतात कधी कधी;असं सकाळीच मी स्वतःला बजावलं.आज बाबांना जाऊन पाच वर्षे झाली .त्यांच्या फोटोला मस्त गुलाबांचा हार घातला...अहं! मला आवडतात गुलाब म्हणून.एक प्रसन्न smile स्वतःलाच देऊन मी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. आताश्या माझ्याकडे कुणीही पाहत नाही . नव्हे वय नाहीये ते!.... फुलण्याचेही नाही अन् टोचण्याचेही नाही... नजरांच्या काट्यांनी.... मी जमेल तश्या चार फेऱ्या मारल्या आणि एका बेंचवर स्वतःला झोकून दिलं. इथे शांतपणे बसून माझा स्वतःशी संवाद व्हायचा, झालेच तर येणाऱ्या जाणाऱ्याचे निरीक्षण माझा आवडता छंद.नेहमीची चांडाळ चौकडी बाजूच्या बेंचवर बसून एकमेकींना टाळ्या देत हसत होती. मी ह्यांना Lipstick Gang असं नाव दिलंय.... रोज नवनवीन कपडे आणि संपूर्ण रंगरंगोटी करून या भवान्या जमत. चालतात किती ? कोण जाणे?? पण ओठांचे लिपस्टिक फिके होईपर्यंत कुणातरी बद्दल चहाड्या अन् कुटाळक्या करीत . "चला निघावे" असा विचार मनांत यायला अन् त्यांनी समोरून जाणाऱ्या 'तिच्यावर' जहरी अस्त्र फेकायला एकच गाठ पडली.
'ती' नाजूक ,सुंदर पण फिकुटलेली; आधीच संकोचून खाली मान घालून निघालेली.... बहुदा दूध आणायला... हातात किटली होती. "कित्ती निलाजऱ्या झाल्यात हो मुली आत्ताच्या! लग्न करतात कश्याला?? उघड उघड धंदाच करावा."चांडाळ चौकडी विकृत हसली. तिच्या डोळ्यांत पाणी चमकलं... ओघळू मात्र दिलं नाही तिनं... ती नजरेआड होईपर्यंत ह्या भवान्यांनी नजरांनी तिला पुरतं रक्तबंबाळ केलं.तिचा अपराध नेहमीचाच....नवऱ्याचं घर ती सोडून आली होती. त्यात तिचा बाप गरीब म्हणजे तिची कृती माजोरडेपणाच होती. नवऱ्याच्या उच्चभ्रू कुटुंबाने ती पळून गेली म्हणून अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता..... भरमसाठ रक्कम मागितली होती. गरीब बाप लाचारही झाला होता कारण वकिलाच्या फी करता पैसा नव्हता. एव्हढी माहिती पुरवून चांडाळ चौकडी मार्गस्थ झाली. मी घरी येऊन नाश्ता करेपर्यंत फक्त तिची नजर आठवत राहिले. तेव्हढ्यात बेल वाजली.. प्रकाश असणार . सुरुवातीच्या दिवसांत, प्रकाश माझा असिस्टंट होता . आता स्वतंत्र प्रॅक्टिस करू लागलाय... उत्तम चालते, हुन्नरी आहे. मुळात अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न असून अनेकांना हातभार लावत असे.
माझ्याकडे एक केस घेऊन आला होता. मला म्हणाला," मॅडम! रिटायरमेन्ट पुढे ढकलणार तुम्ही आता!" अनेकदा मी त्याला," आता थकली आहे रे! प्रॅक्टिस थांबवणार रिटायर्ड होणार... सेंड ऑफ चे भाषण तयार ठेव" म्हणून सांगितले होते. माझे नेहमीचे कुतूहल जागे झाले."कोणाची केस आणली आहेस आता?" म्हणत मी भुवया उंचावल्या. "आमच्या घरासमोरील मंदिराच्या गरीब पुजाऱ्याची लेक आहे. तिच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. रक्कमच काय फी चे पैसे देणेही शक्य नाही तिला.ही केस तुम्हीच लढू शकता .... कारण विरुद्ध पार्टी आहे नागपूरचे प्रसिद्ध इनामदार कुटुंब... श्रीरंग व्यंकटेश इनामदार..." त्याने एका श्वासात सांगितले आणि समोरचे पाणी घटाघटा प्यायला. माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत... दोन क्षण शांततेत गेले... मी ठामपणे म्हणाले," केस घेतली... facts ची मला गरज नाही." ,दुपारीच त्यांना भेटायचे आम्ही दोघांनी ठरवले नी तो मार्गस्थ झाला.
मी तशीच तटस्थ बसून होते....कितीकाळ कोण जाणे?? भूतकाळाच्या गर्तेत भरकटत... आईविना पोर बाबांनी बारावी होताच लग्न लावून दिलं... श्रीमंत स्थळ ,देखणा नवरा काही कमी नाही. पंधरा दिवस असेन सासरी... सोळाव्या दिवशी माहेरी परत... मग सारं सुटून गेलं हातातून. परत सासरी जायचे नव्हतेच..... मग कोर्ट केस, बदनामीची भीती, लोकांच्या नजरा .. आयुष्य दगड झालं. बाबांनी हे सारं थांबावं म्हणून म्युच्युअल कँसेन्ट ने काही कागदांवर सह्या दिल्या, प्रकरण संपले. आयुष्य सुरू रहावं म्हणून शिकत गेले, वकील झाले... हळूहळू जम बसत गेला मात्र आयुष्याची घडी विस्कटत गेली ती गेलीच. कारण जाणून घेण्यात अनेकांना रस होता... कसं सांगू कुणाला नी काय सांगू?? सारं नीती अनितीच्या चौकटी बाहेरचं होतं. अखेर माझ्यावर चरित्र्यहीनतेचा ठप्पा बसला. मी कितीही ओरडून सांगितलं तरी मिटणार नव्हताच तो.
18 वर्षांच्या कोवळ्या देहात जगाविरुद्ध लढण्याची ताकद कितीशी असणार??? 15 दिवसांच्या वास्तव्यात ते दिसलं होतं जे कदाचित नरकातही बघायला मिळणार नाही. माझ्या सासर नावाच्या नरकात मारहाण नव्हती, अत्याचार नव्हते होते ते निलाजरे कोडगेपण. माझ्या सासऱ्यांच्या सगळ्यात धाकट्या लेकाची मी पत्नी.... घरांत सासू सासरे, दोन मोठे दिर, जावा, त्यांची मुलेबाळे, दोघी जणी नातेवाईक, दोघी कुणीतरी आश्रित, दोन किंवा चार सासऱ्यांच्या माघारी धाडलेल्या बहिणी...वीस बावीस माणसाचं घर... कुटुंबाचा भलामोठा एकच व्यवसाय. चांदीच्या ताटापासून ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत श्रीमंतीचा ओघ... घराण्याला प्रतिष्ठा ,समाजात मोठे नाव. अवघ्या पाच सहा दिवसांत जावांचे सूचक बोलणे... खरेच उमजले नाही. आठवडाभरात थोरल्या दिरांना रात्री खोलीत धाडण्यात आले तेव्हा उकल झाली. बाकी काहीही मान्य असले तरी हे कसे होणार??? नवऱ्याने समजूत घातली... सासूबाईंनी द्रौपदीचे उदाहरण दिले,ती पंचकन्यात पवित्र झाल्याचेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. त्यांच्या घरात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीदेहावर मादी म्हणून प्रत्येक नराचा अधिकार असल्याचे बोलून दाखवले.मी देखील मादी म्हणून मला असणारा निसर्गदत्त नकाराधिकार वापरत ते घर सोडले. ... मग काय त्यांच्या प्रतिष्ठेच्या डोलाऱ्यासाठी मी पळून गेले अशी खोटीच तक्रार दाखल करून अब्रू नुकसानीचा दावा टाकला. मुकाट्याने मान्य कर ,म्हणत दोन्ही जावा भेटून गेल्या. मी बधत नाही म्हटल्यावर साम, दाम, दंड ,भेद सारी अस्त्रे वापरून पहिली...व्यर्थ. शेवटी 'अपवित्र' म्हणत बदनामीचे अस्त्र उगारले... बाबा त्याला नमले.
मनाच्या ओल्या जखमांना पुन्हा एकदा मलमपट्टी करत मी तयार झाले. दुपारी दोनच्या सुमारास प्रकाशच्या सोबत जाऊन देवळापाठच्या खोलीवजा घराचे दार वाजवले. पुजारी बुवांनी दार उघडले... आत पाहते तर तिच... ती सकाळचीच पोर. प्रकाशने त्यांना ओळख करून देत सांगितले,"ह्या ऍडव्होकेट विद्या सबनीस मॅडम, मोठ्या वकील आहेत..." मी त्याला हातानेच पुरे!अशी खूण केली. त्या पोरीला बसायला सांगितले. तिच्या डोळ्यांत डोळे घालून पाहिले... क्षणभर मीच दिसले तिच्याजागी मला.,"मी तुझी केस घेतली.. एक पै नकोय मला" तिच्या वडिलांकडे पाहत मी म्हणाले. ती अविश्वासाने पाहत राहिली... एकटक.... अचानक म्हणाली,"कीव वाटतेय म्हणून??"... मी अश्वासकपणे म्हणाले," नाही. विश्वास वाटतोय म्हणून."... "काहीही माहीत नसतांना???" पुन्हा तिला प्रश्न पडला होता. मी स्थिरपणे एकेक शब्द उच्चारत म्हणाले," मी तुझे सासरे व्यंकटेश इनामदार ह्यांची प्रथम पत्नी...तुला मला काहीही सांगावे लागणार नाही." तिचा बांध फुटला ,ती हमसाहमशी रडू लागली.
तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला शांत करत मी म्हणाले, "हे कलीयुग आहे बेटा ! स्वतःची अहिल्या करू नकोस... राम येणार नाही मुक्त करायला शिळा झालीस तर..." तिच्याघरुन परततांना मनांत विचार डोकावला..स्त्रीचे पातिव्रत्य कोण ठरवणार? ?? तिचा पती??? पुरुषाच्या वासनांची पूर्ती करायला नकार देणारी सुद्धा 'अहिल्या' ठरते नाही! ... आयुष्याचा दगड होऊन पडते ती... तो मात्र इंद्र, देवलोकीचा राजा असतो... खुशाल राजरोस राजपद भूषवितो. मी कागदपत्रे जुळवून स्टेटमेंट तयार केलं.... मी आता ह्या अहिल्येची शिळा होऊच देणार नाही. मी निर्धारानं पुन्हा एकदा कोट चढवला.

अरे बापरे,असे असते ,हे मान्यच होत नाहीये ग मनाला,अशी कशी जीवघेणी रीत बाई त्या कुटुंबात,नाही रुचत हे मनाला बाई
उत्तर द्याहटवाKhup chan lekh
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवासत्यकथा असू शकते... छान जमलंय.नेहमी प्रमाणेच... उत्तम
उत्तर द्याहटवा